Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कोसी रेल्वे महासेतूचे लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांचे अभिभाषण


नवी दिल्ली, 18 सप्‍टेंबर 2020

 

बिहारचे राज्यपाल फागू चौहान जी, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी पियुष गोयलजी, रवीशंकर प्रसादजी, गिरीरीज सिंग जी, नित्यानंद रायजी, देवाश्री चौधरी जी, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदीजी, इतर मंत्री, आमदार, खासदार आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपस्थित माझ्या बंधु भगिनींनो,

मित्रहो, आज बिहारमध्ये रेल्वे जोडणीच्या क्षेत्रात एक नवा इतिहास रचला गेला आहे. कोसी महासेतू आणि किऊल ब्रिज बरोबरच बिहारमध्ये रेल्वेप्रवास, रेल्वेचे विद्युतीकरण आणि रेल्वेमध्ये मेक इन इंडियाला प्रोत्साहन देणाऱ्या, नवे रोजगार निर्माण करणाऱ्या एक डझन प्रकल्पांचे आज लोकार्पण आणि शुभारंभ झाला आहे. सुमारे तीन हजार कोटी रुपये मूल्याच्या या प्रकल्पांमुळे बिहारमधील रेल्वेचे जाळे अधिक सक्षम होईल, त्याचबरोबर पश्चिम बंगाल आणि पूर्व भारतातील रेल्वे जोडणी ही मजबूत होईल. बिहारसह पूर्व भारतातील कोट्यवधी रेल्वे प्रवाशांना मिळणार्‍या या नव्या आणि आधुनिक सुविधांबद्दल मी आज सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो.

मित्रहो, बिहारमध्ये गंगाजी असो, कोसी असो किंवा सोन नदी असो, नद्यांच्या विस्तारामुळे बिहारचे अनेक‌ भाग परस्परांपासून विलग झाले आहेत. बिहारमधील जवळजवळ सर्वच भागातील लोकांना एक मोठी समस्या सतावत राहिली आहे, ती म्हणजे नद्यांमुळे करावा लागणारा दीर्घ प्रवास. जेव्हा नीतीशजी रेल्वेमंत्री होते, जेव्हा पासवानजी रेल्वेमंत्री होते, तेव्हा त्यांनी सुद्धा या समस्येच्या निराकरणासाठी खूप प्रयत्न केले होते. मात्र त्यानंतर दीर्घ काळ असा होता, जेव्हा यासाठी कोणतेच प्रयत्न करण्यात आले नाहीत. अशा परिस्थितीत बिहारच्या, बिहारमधील कोट्यवधी लोकांच्या या मोठ्या समस्येच्या निराकरणासाठीच्या संकल्पासह आम्ही आगेकूच करत आहोत. मागच्या पाच-सहा वर्षांमध्ये एकापाठोपाठ एका समस्येचे निराकरण करण्यासाठी आम्ही वेगाने पावले उचलत आहोत.

मित्रहो, चार वर्षांपूर्वी उत्तर आणि दक्षिण बिहारला जोडणाऱ्या दोन महासेतूंचे काम, एक पाटणामध्ये आणि दुसरे मुंगेर येथे सुरू करण्यात आले होते. हे दोन्ही रेल्वे पूल सुरु झाल्यामुळे उत्तर बिहार आणि दक्षिण बिहार मधील नागरिकांना ये-जा करणे सोयीचे झाले आहे. विशेषतः उत्तर बिहार मधील भाग, जे कित्येक दशके विकासापासून वंचित होते, त्यांच्या विकासाला नवा वेग लाभला आहे. आज मिथिला आणि कोसी क्षेत्राला जोडणारा महासेतू आणि सुपौल-आसनपूर कुपहा रेल्वे मार्ग सुद्धा बिहारवासियांच्या सेवेत समर्पित आहे.

मित्रहो, सुमारे साडेआठ दशकांपूर्वी भूकंपाच्या एका भीषण आपत्तीने मिथिला आणि कोसी क्षेत्राचे विभाजन केले होते. आज योगायोगाने कोरोना सारख्या जागतिक साथ रोगाच्या काळात या दोन्ही क्षेत्रांना परस्परांशी जोडले जाते आहे. मला सांगण्यात आले आहे की या प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यातील कामांमध्ये इतर राज्यांमधून आलेल्या श्रमिक वर्गाने खूपच सहाय्य केले. हा महासेतू आणि हा प्रकल्प आदरणीय अटलजी आणि नितीशजी यांच्या स्वप्नातील प्रकल्प आहे. 2003 साली जेव्हा नितीशजी रेल्वेमंत्री होते आणि आदरणीय अटलजी पंतप्रधान होते, तेव्हा नव्या कोसी रेल्वे मार्ग प्रकल्पाबाबत विचारविनिमय करण्यात आला होता. मिथिला आणि कोसी क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या दूर करणे, हा यामागचा उद्देश होता. याच विचारासह 2003 साली अटलजींनी या प्रकल्पाची पायाभरणी सुद्धा केली होती. मात्र पुढच्या वर्षी अटलजी सत्तेत राहिले नाहीत आणि त्यानंतर कोसी रेल्वेमार्ग प्रकल्पाच्या योजनेचा वेगही मंदावला.

मिथिलांचलची काळजी असती, बिहार मधील लोकांच्या समस्यांची काळजी असती तर कोसी रेल्वेमार्ग प्रकल्पावर वेगाने काम झाले असते. मधल्या काळात रेल्वे मंत्रालय कोणाकडे होते, कोणाचे सरकार होते, याबद्दल मी खोलात शिरत नाही. मात्र ज्या वेगाने आधी काम सुरू होते, त्याच वेगाने 2004 सालानंतर सुद्धा काम सुरू राहिले असते तर आजचा हा दिवस केव्हा आला असता, त्याला किती वर्षे, किती दशके लागली असती, किती पिढ्या लागल्या असत्या, याची कल्पनाही करता येत नाही, हे खरे आहे. मात्र दृढनिश्चय असेल, नितीशजींसारखा सहकारी असेल तर अशक्य असे काहीच नाही. माती रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुपौल-आसनपूर-कुपहा मार्गावर काम पूर्ण करण्यात आले.  2017 साली जो भीषण पूर आला होता, त्या दरम्यान झालेल्या नुकसानाची भरपाईसुद्धा दरम्यानच्या काळात देण्यात आली. अखेर कोसी महासेतू आणि सुपौल-आसनपूर-कुपहा मार्ग बिहारच्या लोकांच्या सेवेत रुजू होण्यास सज्ज आहे.

मित्रहो, आज कोसी महासेतू निर्माण झाल्यामुळे सुपौल-आसनपूर-कुपहा दरम्यान रेल्वेसेवा सुरू झाल्यामुळे सुपौल, अररिया आणि सहरसा जिल्ह्यातील लोकांना मोठा लाभ होणार आहे. त्याचबरोबर ईशान्य क्षेत्रातील नागरिकांसाठी सुद्धा एक पर्यायी रेल्वे मार्ग , होईल. कोसी आणि मिथिला क्षेत्रासाठी हा महासेतू सोयीचा असणार आहे, त्याचबरोबर त्यामुळे या संपूर्ण क्षेत्रात उद्योग, व्यापार आणि रोजगाराला सुद्धा प्रोत्साहन मिळेल.

मित्रहो, सध्या निर्मलीपासून सरायगढ पर्यंतचा रेल्वे प्रवास सुमारे तीनशे किलोमीटर अंतराचा असतो, हे बिहारमधील नागरिकांना चांगलेच ठाऊक आहे. त्यासाठी दरभंगा- समस्तीपुर-खगडिया-मानसी – सहरसा अशा मार्गाने जावे लागते. मात्र आता बिहारमधील लोकांना तीनशे किलोमीटर अंतराचा हा प्रवास फार काळ करावा लागणार नाही. तीनशे किलोमीटर अंतराचा हा प्रवास अवघ्या बावीस किलोमीटर मध्ये शक्य होईल. आठ तासांचा रेल्वे प्रवास केवळ अर्ध्या तासात पूर्ण होऊन होईल, म्हणजेच प्रवास कमी, वेळेची बचत आणि त्याचबरोबर बिहारमधील लोकांची पैशांचीही बचत होईल.

मित्रहो, कोसी महासेतू प्रमाणेच किउल नदीवर नवी रेल्वे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुविधा सुरू झाल्यामुळे या संपूर्ण मार्गावर सुविधा आणि वेग, दोन्हींमध्ये वाढ होणार आहे. या नव्या रेल्वे पुलाच्या निर्मितीमुळे झाझा पासून पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन पर्यंत मुख्य मार्गावर ताशी शंभर ते सव्वाशे किलोमीटर वेगाने रेल्वे धावू शकेल. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू झाल्यामुळे हावडा-दिल्ली मुख्य मार्गावर रेल्वे प्रवास सोपा होईल, विनाकारण होणारा विलंब टाळता येईल आणि रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित होईल.

मित्रहो, गेल्या सहा वर्षांपासून भारतीय रेल्वेला नव भारताच्या आकांक्षेला आणि आत्मनिर्भर भारताच्या अपेक्षांना अनुरूप असे बदल करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पूर्वीच्या तुलनेत आज भारतीय रेल्वे खूपच स्वच्छ झाली आहे. आज भारतीय रेल्वेचे ब्रॉडगेज रेल्वे जाळे मानवरहित फाटकापासून मुक्त करून आधीपेक्षा कितीतरी जास्त सुरक्षित करण्यात आले आहे. आज भारतीय रेल्वेचा वेग वाढला आहे. आज आत्मनिर्भरता आणि आधुनिकतेचे प्रतीक असणाऱ्या वंदे भारत सारख्या भारतात तयार झालेल्या रेल्वेगाड्या या रेल्वे जाळ्यात समाविष्ट होत आहेत. आज देशातील अस्पर्श भागांना रेल्वे सुविधा प्रदान करण्याबरोबरच रेल्वे मार्गांचे रुंदीकरण आणि विद्युतीकरणाचाही वेगाने विस्तार होतो आहे.

मित्रहो, रेल्वे आधुनिकीकरणाच्या या व्यापक प्रयत्नांचा फार मोठा लाभ बिहारला आणि संपूर्ण पूर्व भारताला मिळतो आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी मधेपुरा येथे इलेक्ट्रिक लोको फॅक्टरी आणि मढौरा येथे डिझेल लोको फॅक्टरी स्थापन करण्यात आली. या दोन्ही प्रकल्पांच्या माध्यमातून बिहारमध्ये सुमारे 44 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. आज बिहारमध्ये 12 हजार अश्वशक्तिची सर्वात जास्त शक्तिशाली विद्युत इंजिने तयार केली जात आहेत, हे ऐकून  बिहार मधील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल. बरौनी येथे विद्युत इंजिनांच्या देखभालीसाठी बिहारमधील पहिली लोको शेड उभारण्याचे काम सुद्धा सुरू झाले आहे. आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे आज बिहारमध्ये रेल्वे जाळ्याच्या सुमारे 90 टक्के  भागाचे विद्युतीकरण पुर्ण झाले आहे. मागच्या सहा वर्षात बिहारमध्ये तीन हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाले आहे. आज त्यात आणखी पाच प्रकल्पांची भर पडली आहे.

मित्रहो, बिहारमध्ये ज्या प्रकारची परिस्थिती आहे, त्या परिस्थितीत रेल्वे, हे लोकांसाठी प्रवासाचे फार महत्त्वाचे साधन आहे. अशा वेळी बिहारमधील रेल्वेची परिस्थिती सुधारण्याला केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. आज बिहारमध्ये काय वेगाने रेल्वे जाळ्याचे काम सुरू आहे, ते सांगण्यासाठी मी तुम्हाला काही माहिती देऊ इच्छितो. 2014 पूर्वीच्या पाच वर्षांमध्ये सुमारे सव्वा तीनशे किलोमीटर रेल्वेमार्ग कमिशन झाला होता. सोप्या शब्दात सांगायचे तर 2014 पूर्वीच्या पाच वर्षांमध्ये बिहारमध्ये केवळ सव्वा तीनशे किलोमीटर नवे रेल्वेमार्ग सुरू झाले होते. मात्र 2014 नंतरच्या पाच वर्षांमध्ये बिहारमध्ये सुमारे सातशे किलोमीटर रेल्वे मार्ग कमिशन झाले आहेत, म्हणजेच सुमारे दुप्पट रेल्वेमार्ग सुरू झाले आहेत. सध्या सुमारे एक हजार किलोमीटर नव्या रेल्वेमार्गाच्या निर्मितीचे काम वेगाने सुरू आहे. आज हाजीपुर-घोसवर- वैशाली नवा रेल्वेमार्ग सुरू झाल्यामुळे वैशाली नगर, दिल्ली आणि पाटणा सुद्धा थेट रेल्वे सेवेने जोडले जाईल. या सेवेमुळे वैशाली मध्ये पर्यटनाला मोठे बळ लाभेल आणि युवा सहकाऱ्यांना नवे रोजगार उपलब्ध होतील. याच प्रकारे इस्लामपूर-नटेसर नव्या रेल्वे मार्गामुळे सुद्धा लोकांना फार फायदा होईल. विशेषतः बौद्ध विचारांचा प्रभाव असणाऱ्यांना या नव्या सुविधेमुळे मोठा दिलासा मिळेल.

मित्रहो, आज देशात मालवाहू गाड्या आणि प्रवासी गाड्या, दोन्हींसाठी वेगवेगळे मार्ग तयार करण्याच्या व्यापक व्यवस्थेवर अर्थात समर्पित फ्रेट कॉरिडॉरवर सुद्धा वेगाने काम सुरू आहे. त्यापैकी बिहारमध्ये सुमारे अडीचशे किलोमीटर लांबीचा समर्पित फ्रेट कॉरिडॉर तयार केला जात आहे, जो लवकरच पूर्ण होणार आहे. यामुळे रेल्वेगाड्या विलंबाने धावण्याची समस्या कमी होईल आणि मालवाहतूकीत होणारा विलंब सुद्धा कमी होईल.

मित्रहो, ज्या पद्धतीने कोरोनाच्या या संकटकाळात रेल्वेने काम केले आहे, रेल्वे काम करत आहे, त्याबद्दल मी भारतीय रेल्वेच्या सेवेतील लाखो कर्मचाऱ्यांचे, त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष कौतुक करतो. देशातील लाखो श्रमिकांना श्रमिक विशेष रेल्वे गाड्यांमधून त्यांच्या घरी सुरक्षित पोचवण्यासाठी रेल्वेने दिवसरात्र काम केले. स्थानिक पातळीवर कामगारांना रोजगार प्रदान करण्यात सुद्धा रेल्वे मोठी भूमिका बजावत आहे. कोरोना काळात भारतीय रेल्वेची प्रवासी वाहतूक काही काळ थांबली असले तरीही रेल्वेला सुरक्षित आणि आधुनिक करण्याचे काम वेगाने सुरूच राहिले. देशातील पहिली किसान रेल्वे अर्थात रेल्वेच्या रुळांवर धावणाऱ्या शितगृहाची सोय असणारी गाडी सुद्धा कोरोनाच्या काळातच बिहार आणि महाराष्ट्र या राज्यांच्या दरम्यान सुरू करण्यात आली.

मित्रहो, हा कार्यक्रम रेल्वेचा असला, तरीही रेल्वेच्या बरोबरीने लोकांचे जगणे सुसह्य करण्याचे आणि अधिक चांगले करण्याचे प्रयत्नही या माध्यमातून केले जात आहेत. त्याचमुळे मी आणखी एका विषयाबाबत आपल्याशी संवाद साधू इच्छितो, जो बिहारच्या नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आहे. नितीशजींचे सरकार सत्तेवर येण्यापूर्वी बिहारमध्ये एखाद-दुसरे वैद्यकीय महाविद्यालय होते, त्यामुळे बिहारमधील रुग्णांची फारच गैरसोय होत असे. त्याच बरोबर बिहारमधील बुद्धिमान युवकांना वैद्यकीय शिक्षणासाठी इतर राज्यांमध्ये जावे लागत असे. आज बिहारमध्ये पंधरापेक्षा जास्त वैद्यकीय महाविद्यालये आहेत, ज्यापैकी अनेक महाविद्यालये गेल्या काही वर्षांमध्ये उभारण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वीच बिहारमध्ये एका नव्या एम्सला सुद्धा स्वीकृती देण्यात आली. दरभंगा येथे हे नवे एम्स उभारण्यात येणार आहे. या नव्या एम्समध्ये 750 खाटांचे रुग्णालय तयार होईल, त्याचबरोबर यात एमबीबीएसच्या 100 आणि नर्सिंगच्या साठ जागा असतील. दरभंगा येथे उभारण्यात येणाऱ्या या एम्समुळे हजारो नवे रोजगारही निर्माण होतील.

मित्रहो, देशातील शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने, कृषी सुधारणांच्या दृष्टीने कालचा दिवस देशासाठी फारच महत्त्वाचा होता. काल विश्वकर्मा जयंती दिनी लोकसभेत ऐतिहासिक कृषी सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकांनी आमचे अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक बंधनांमधून मुक्त केले आहे. स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील स्वातंत्र्य बहाल करण्याचे काम झाले आहे, त्यांना मुक्त करण्यात आले आहे. या सुधारणांमुळे शेतकऱ्यांना आपली उत्पादने विकण्याचे आणखी पर्याय प्राप्त होतील, आणखी संधी प्राप्त होतील. ही विधेयके मंजूर झाल्याबद्दल मी देशभरातील शेतकऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो. शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये जे मध्यस्थ असतात, जे शेतकऱ्यांच्या कमाईचा फार मोठा भाग स्वतः घेतात, त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी ही विधेयके आणणे अतिशय गरजेचे होते. ही विधेयके शेतकऱ्यांसाठी संरक्षण कवचासमान आहेत. मात्र काही दशके सत्तेत असलेले, देशावर राज्य करणारे लोक, याबाबतीत शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, शेतकर्‍यांशी खोटे बोलत आहे.

मित्रहो, निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना मोहीत करण्यासाठी यांनी मोठ-मोठ्या बाता मारल्या, मोठमोठ्या गोष्टी लिहिल्या, आपल्या घोषणापत्रात नमूद केल्या आणि निवडणुकीनंतर विसरूनही गेले. आज त्या सर्व गोष्टी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार करते आहे. शेतकऱ्यांसाठी समर्पित असणारे आमचे सरकार करते आहे. अशा वेळी हे लोक नागरिकांची दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत. ज्या एपीएमसी ॲक्ट बद्दल हे लोक राजकारण करत आहेत, कृषी बाजारपेठांच्या तरतूदींमधील बदलांचा विरोध करत आहेत, त्याच बदलांचा उल्लेख या लोकांनी आपल्या घोषणापत्रात केला होता. मात्र आज जेव्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने हे बदल केले, तेव्हा ते विरोध करत आहेत, खोटे बोलत आहेत आणि लोकांची दिशाभूल करत आहेत. विरोधासाठी विरोध करण्याची एकामागून एक उदाहरणे समोर येत आहेत. मात्र देशातील शेतकरी किती जागृत आहे, याची जाणीव यांना नाही. शेतकरी हे सगळे पाहत आहेत. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नव्या संधी काही लोकांना पसंत नाहीत. मध्यस्थांच्या सोबतीने कोण उभे आहे, हेसुद्धा देशातील शेतकरी पाहत आहेत.

मित्रहो, एम एस पी बद्दल हे लोक मोठमोठ्या बाता मारत होते, मात्र त्यांनी कधीही आपले आश्वासन पूर्ण केले नाही. शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विद्यमान सरकारने पूर्ण केले आहे. मात्र आता सरकार शेतकऱ्यांना एम एस पी चा लाभ देणार नाही, असा अपप्रचार केला जातो आहे. आता सरकार शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करणार नाही, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. हे खोटे आहे, चुकीचे आहे, शेतकऱ्यांची फसवणूक आहे. आमचे सरकार शेतकऱ्यांना एम एस पी च्या माध्यमातून योग्य दर प्रदान करण्याप्रती वचनबद्ध आहे. या पूर्वीही होते, आताही आहे आणि यापुढेही राहील. सरकारी खरेदीसुद्धा पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. कोणत्याही व्यक्तीला आपले उत्पादन, तो घेत असलेले पीक जगात कुठेही विकता येईल, त्याची इच्छा असेल तिथे विकू शकेल. जर तो कपडा तयार करत असेल, तर तो त्याला हवे तिथे विक्री करू शकेल, जर तो भांडी तयार करत असेल, तर तो भांड्यांची विक्री त्याला हवी तिथे करू शकेल, जर तो चपला तयार करणारा असेल तर तो त्या कुठेही विकू शकतो. मात्र केवळ माझ्या शेतकरी बंधू-भगिनींना या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले होते, असहाय्य ठेवण्यात आले होते. मात्र आता नव्या तरतुदी लागू झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपले उत्पादन देशाच्या कोणत्याही बाजारात, आपल्याला वाटेल त्या दरात विकता येईल. आमच्या सहकारी संस्था, कृषी उत्पादक संघ आणि बिहार मधील जीविका सारख्या महिला स्वयंसहाय्यता गटांसाठी ही एक सोनेरी संधी आहे.

मित्रहो, नितीशजी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. एपीएमसी मुळे शेतकऱ्यांचे काय नुकसान होत आले आहे, हे त्यांना माहिती आहे. त्याचमुळे बिहारचे मुख्यमंत्री झाल्यानंतर सुरुवातीच्या काळातच नितीशजींनी बिहारमधून हा कायदा हद्दपार केला होता. जे काम बिहारने केले होते, आज देश त्याच मार्गावर चालू लागला आहे.

मित्रहो, शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने गेल्या सहा वर्षांत जे काही केले आहे, तेवढे यापूर्वी कधीच करण्यात आले नाही. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत एकेक समस्या दूर करण्यासाठी आमच्या सरकारने सातत्याने प्रयत्न केले आहेत. देशातील शेतकऱ्यांना बियाण्यांच्या खरेदीसाठी, खतांच्या खरेदीसाठी, आपल्या किरकोळ गरजांसाठी कोणाकडून कर्ज घ्यावे लागू नये,यासाठी प्रधानमंत्री किसान कल्याण योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत आतापर्यंत देशातील दहा कोटी शेतकऱ्यांच्या खाती सुमारे एक लाख कोटी रुपये थेट हस्तांतरित करण्यात आले आहेत. यात कोणीही मध्यस्थ नाही. शेतकऱ्यांना पाण्याची समस्या जाणवू नये, दशकांपासून अडकून पडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करता यावेत, यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेवर सुमारे एक लाख कोटी रुपये खर्च केले जात आहेत. युरीयासाठी आधी मोठ्या रांगा लागत असत, जे शेतकऱ्यांच्या शेतात कमी आणि कारखान्यांमध्ये जास्त सहजतेने पोहोचत असे. आता त्याला शंभर टक्के निम कोटिंग केले जाते आहे. आज देशात मोठ्या प्रमाणात शीतगृहांचे जाळे तयार केले जाते आहे. खाद्य प्रक्रिया संबंधित उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाते आहे. एक लाख कोटी रुपयांचा कृषी पायाभूत सुविधा निधी तयार केला जातो आहे. शेतकऱ्यांच्या पशुधनाला रोगांपासून वाचवण्यासाठी देशव्यापी मोहीम राबवली जाते आहे, मत्स्योत्पादन वाढविण्यासाठी, कुकुट पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी, मधाचे आणि दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी, शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवण्यासाठी पर्याय प्रदान करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे.

मित्रहो, मी आज देशातील शेतकऱ्यांना अत्यंत नम्रतेने काही सांगू इच्छितो, स्पष्ट संदेश देऊ इच्छितो. आपण मनात कोणताही संशय येऊ देऊ नका. अशा लोकांपासून देशातील शेतकऱ्यांनी सावध राहिले पाहिजे, ज्यांनी कित्येक दशके देशावर राज्य केले आणि ते आज देशातील शेतकऱ्यांची खोटे बोलत आहेत. अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे. हे लोक शेतकऱ्यांचे संरक्षण करण्याच्या बाता मारत आहेत, मात्र प्रत्यक्षात ते शेतकऱ्यांना अनेक बंधनांमध्ये जखडून ठेवू इच्छित आहेत.  हे लोक मध्यस्थांच्या सोबत उभे आहेत, हे लोक शेतकऱ्यांच्या कमाईची लुबाडणूक  करणाऱ्यांची साथ देत आहेत. शेतकऱ्यांना आपले उत्पादन देशात कुठेही, कोणालाही विकण्याचे स्वातंत्र्य देणे, हे ऐतिहासिक पाऊल आहे. एकविसाव्या शतकात भारताचा शेतकरी बंधनात नाही तर तो मोकळेपणाने शेती करेल, त्याची इच्छा असेल तेथे आपल्या उत्पादनाची विक्री करेल. जिथे त्याला जास्त चांगला दर मिळेल, तिथेच तो आपल्या मालाची विक्री करेल. कोणत्याही मध्यस्थाची त्याला आवश्यकता भासणार नाही आणि आपल्या उत्पादनाच्या माध्यमातून त्याला आपले उत्पन्न वाढवता येईल. ही देशाची आणि काळाचीही गरज आहे.

मित्रहो, शेतकरी असो, महिला असो, युवा असो, राष्ट्राच्या विकासात सर्वांना सक्षम करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आज जे प्रकल्प समर्पित केले आहेत, ते याच जबाबदारीचा एक भाग आहे. आज या प्रकल्पांचे लोकार्पण आणि शुभारंभ झाला आहे, त्यामुळे बिहारमधील लोकांना, येथील युवांना आणि महिलांना निश्चितच लाभ होईल, असा विश्वास मला वाटतो.

मित्रहो, कोरोनाच्या या संकटकाळात आपण सर्वांनी सांभाळून राहायचे आहे. थोडासा हलगर्जीपणा आपले आणि आपल्या आप्तांचे मोठे नुकसान करू शकेल, म्हणूनच मी बिहारच्या नागरिकांना, देशातील सर्व नागरिकांना पुन्हा एकदा आग्रहाने सांगू इच्छितो. मास्क वापरा, योग्य प्रकारे वापरा, दोन मीटर अंतर नेहमीच लक्षात ठेवा. या बाबींचे पालन करा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, गर्दी करणे टाळा. आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काढा प्या, गरम पाणी प्या. सतत आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या. सतर्क राहा, सुरक्षित राहा, निरोगी राहा.

आपले कुटुंबही निरोगी राहो. याच सदिच्छेसह आपले सर्वांचे अनेकानेक आभार!

 

* * *

B.Gokhale/M.Pange/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो कराPM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com