Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कोविड-19 शी लढा देण्यासाठी पीएम केअर्स निधी न्यासातून 3100 कोटी रुपये निधी वितरीत


पीएम केअर्स (आप्त्कालीन परिस्थितीत पंतप्रधान नागरिक सहाय्य आणि मदत) निधी न्यासात जमा झालेल्या रकमेतून 3100 कोटी रुपये कोविड-19 च्या लढ्यासाठी दिले जाणार आहेत. या 3,100 कोटी रुपयांपैकी सुमारे 2000 कोटी रुपये व्हेंटीलेटर्स खरेदीसाठी आणि 1000 कोटी रुपये स्थलांतरित मजुरांच्या कल्याणासाठी आणि 100 कोटी रुपये लस विकसित करण्याच्या प्रयत्नांना सहाय्य म्हणून दिले जातील.

या न्यासाची स्थापना 27 मार्च 2020 रोजी झाली असून भारताचे पंतप्रधान याचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत, इतर पदसिध्द सदस्यांमध्ये संरक्षण मंत्री, गृहमंत्री आणि अर्थमंत्री हे आहेत. हे पॅकेज घोषित करतांना पंतप्रधान मोदी यांनी कोविड-19 वर उपाययोजना करण्यासाठी PM CARES निधीसाठी योगदान देणाऱ्या सर्व दात्यांचे आभार मानले होते.

a) 50,000 व्हेंटीलेटर्स

कोविड-19 च्या देशभरातील वाढत्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी “मेक इन इंडिया” अंतर्गत भारतात तयार झालेल्या 50000 व्हेंटीलेटर्सची खरेदी 2000 कोटी रुपये निधीतून केली जाणार आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकारच्या कोविड-19 विशेष रुग्णालयांना ही व्हेंटीलेटर्स पुरवली जातील.

b) स्थलांतरित मजुरांसाठी मदतीच्या उपाययोजना

स्थलांतरित मजूर आणि गरिबांच्या कल्याणासाठी सुरु असलेल्या उपाययोजना आधी सक्षमपणे राबवण्याच्या दृष्टीने सर्व राज्यांना पीएम केअर्स फंड मधून 1000 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. ही रक्कम सर्व राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेशांमध्ये जिल्हा प्रशासन/ महानगरपालिका प्रशासनाला थेट दिली जाईल. यातून मजूर आणि गरजूंच्या राहण्याची, जेवण-खाण्याची तसेच वैद्यकीय उपचार देण्याची व्यवस्था करायची आहे. तसेच मजुरांना कुठेही जाण्यासाठी वाहतुकीची सोयही करता येईल. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना किती वाटा द्यायचा, हे ठरवण्यासाठी पुढील निकष बघितले जातील—

1) राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसंख्या (2011 च्या जणगणनेनुसार), राज्यातील कोविड-19 च्या रूग्णांची संख्या (50 %, महत्व) 2) कोविड-19 च्या एकूण रुग्णांची संख्या किती आहे – (40 % महत्व) आणि 3) राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना सारखा वाटा (10 % महत्व). हा निधी जिल्हाधिकारी/जिल्हा न्यायाधीश/ महापालिका आयुक्त यांना राज्य आपत्ती मदत आयुक्तांच्या मार्फत दिला जाईल.

c) लस विकसित करणे

सध्याच्या काळात कोविड-19 वर लस विकसित होणे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. भारतीय संशोधक, स्टार्ट अप कंपन्या आणि उद्योगजगत यासाठी एकत्र आले असून या लसीसाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. कोविड लसविषयक संशोधन करणारे शास्त्रज्ञ आणि इतर संबधित घटकांना मदत म्हणून 100 कोटी रुपये पीएम केअर्स मधून दिले जाणार आहेत. ह्या पैशांचा विनियोग मुख्य वैज्ञानिक सल्लागारांच्या निरीक्षणाखाली केला जाईल.

****

B.Gokhale/ R.Aghor/P.Kor