Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कोरियाला प्रयाण करण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन


प्रजासत्ताक कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन यांच्या आमंत्रणावरुन कोरियाला भेट देत आहे. कोरियाला मी दुसऱ्यांदा भेट देत असून, राष्ट्राध्यक्ष मून यांच्यासोबतची ही माझी दुसरी शिखर परिषद आहे.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात राष्ट्राध्यक्ष मून जे-इन आणि प्रथम महिला किम जुंग-सूक यांचे भारतात स्वागत करतांना आम्हाला खूप आनंद झाला होता. माझा दौरा हे आम्ही दोघेही आपल्या संबंधांना देत असलेल्या महत्वाचे प्रतिबिंब आहे.

प्रजासत्ताक कोरियाला आम्ही महत्वाचा मित्र मानतो. या देशाबरोबर आमची विशेष धोरणात्मक भागिदारी आहे. मित्र लोकशाही देश म्हणून भारत आणि प्रजासत्ताक कोरिया यांच्यातली मूल्ये समान आहेत आणि क्षेत्रिय आणि वैश्विक शांततेबाबत दोघांचे दृष्टिकोन समान आहेत. मित्र अर्थव्यवस्था म्हणून आमच्या गरजा आणि जमेच्या बाजू एकमेकांना पूरक आहेत. ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्ट अप इंडिया’ आणि ‘क्लिन इंडिया’ उपक्रमात कोरिया हा आमचा महत्वाचा भागिदार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातले आमचे सहकार्य प्रोत्साहनपर असून, प्राथमिक ते प्रगत विज्ञानापर्यंतच्या टप्प्यावर आम्ही संयुक्त संशोधन करत आहोत.

आमच्या दोन्ही देशांमधले नागरिकांचे संबंध आणि आदानप्रदान हा आमच्या मैत्रीचा भक्कम पाया आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अयोध्येत झालेल्या दीपोत्सवात आपला विशेष प्रतिनिधी म्हणून प्रथम महिला किम जुंग सूक यांना पाठवण्याचा राष्ट्राध्यक्ष मून यांचा निर्णय आमच्या हृदयाला स्पर्शून गेला.

आमच्या संबंधातली दृढता आणि वैविध्य आमचे ॲक्ट इस्ट धोरण आणि प्रजासत्ताक कोरियाचे नवे दक्षिणात्य धोरण यांच्यातल्या मिलापामुळे अधिक दृढ झाले आहे. ‘नागरिक, समृद्धी आणि शांतता यासाठी भविष्यकालामुख भागीदारी’ म्हणून आमचे संबंध अधिक दृढ करण्याचा निश्चय आम्ही केला आहे.

या दौऱ्यादरम्यान राष्ट्राध्यक्ष मून यांच्या सोबतच्या चर्चेबरोबरच मी उद्योजक, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि भारतीय समुदायाच्या नागरिकांना भेटणार आहे.

ही महत्वाची भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी हा दौरा साहाय्यक ठरेल, असा मला विश्वास आहे.

B.Gokhale/S.Kakade/D. Rane