Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कैथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया द्वारा आयोजित ख्रिसमस समारंभातील पंतप्रधानांचे भाषण

कैथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया द्वारा आयोजित ख्रिसमस समारंभातील पंतप्रधानांचे भाषण


नवी दिल्‍ली, 23 डिसेंबर 2024

 

मान्यवर अतिथीगण,

तुम्हा सर्वांना, सर्व देशवासियांना आणि विशेषतः जगभरातील ईसाई समुदायाला  ख्रिसमसच्या खूप-खूप शुभेच्छा , ‘Merry Christmas’ !!!

आता तीन-चार दिवसापूर्वीच मी माझे सहकारी भारत सरकारमधील मंत्री जॉर्ज कुरियन जी यांच्याकडे ख्रिसमस निमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झालो होतो. आणि आज तुमच्या समवेत   उपस्थित राहण्याचा  आनंद मिळत आहे. कैथलिक बिशप्स कौन्फरन्स औफ इंडिया- सीबीसीआय  चे हे आयोजन ख्रिसमसच्या आनंदात तुमच्याबरोबर सहभागी होण्याची ही संधी, हा दिवस आपणा सर्वांसाठी अविस्मरणीय राहणार आहे. ही संधी यासाठी देखील खास आहे, कारण याच वर्षी सीबीसीआय च्या स्थापनेला  80 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त मी   सीबीसीआय आणि त्यांच्याशी संलग्न सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो. 

मित्रांनो,

गेल्या वेळी तुम्हा सर्वांबरोबर मला पंतप्रधान निवासस्थानी ख्रिसमस साजरा करण्याची संधी मिळाली होती. आता  आपण सर्वजण  CBCI घ्या  परिसरात एकत्र जमलो आहोत. मी याआधीही  ईस्टर दरम्यान इथे सैक्रेड हार्ट कैथड्राल चर्च मध्ये आलो आहे. हे माझे सौभाग्य आहे की मला तुम्हा सर्वांकडून इतका स्नेह लाभला आहे.  एवढाच स्नेह मला महामहीम पोप फ्रान्सिस  यांच्याकडून देखील  मिळतो. याच वर्षी इटली येथे जी  7 शिखर परिषदेदरम्यान मला महामहीम पोप फ्रान्सिस यांना भेटण्याची संधी मिळाली होती. मागील तीन वर्षांमध्ये ही आमची दुसरी भेट होती. मी त्यांना भारतभेटीवर येण्याचे निमंत्रण देखील दिले आहे. त्याचप्रमाणे, सप्टेंबर मध्ये न्यूयौर्क  दौऱ्यावर कार्डिनल पीट्रो पैरोलिन यांना देखील भेटण्याचा योग आला होता. ही आध्यात्मिक भेट, ही आध्यात्मिक चर्चा, यातून जी उर्जा मिळते, ती सेवेच्या आपल्या संकल्पाला अधिक बळ देते.

आत्ताच मला कार्डिनल जॉर्ज कुवाकाड यांना भेटण्याची आणि त्यांना सन्मानित करण्याची संधी मिळाली आहे . काही आठवड्यांपूर्वीच कार्डिनल जॉर्ज कुवाकाड यांना महामहीम पोप फ्रान्सिस यांनी कार्डिनल या उपाधीने सन्मानित केले आहे . या आयोजनात भारत सरकारने केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांच्या नेतृत्वाखाली अधिकृतपणे एक उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळ तिथे पाठवलं होते.  जेव्हा भारताचा एखादा सुपुत्र यशाच्या या शिखरावर पोहोचतो तेव्हा संपूर्ण देशाला त्याचा अभिमान वाटणे स्वाभाविक आहे.  मी कार्डिनल जॉर्ज कुवाकाड  यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो.

मित्रांनो, आज तुमच्याबरोबर सहभागी होताना खूप काही आठवत आहे.  माझ्यासाठी ते खूप समाधानाचे क्षण होते, जेव्हा आम्ही एका दशकापूर्वी फादर एलेक्सिस प्रेमकुमार यांना युद्धग्रस्त अफगाणिस्तान मधून सुरक्षितपणे परत आणले होते. आठ महिने तिथे अतिशय कठीण संकटात ते अडकले होते. त्यांना ओलिस ठेवले होते. आमच्या सरकारने त्यांना तिथून बाहेर काढण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. अफगाणिस्तानच्या त्या परिस्थितीत हे किती कठीण होतं याचा तुम्ही अंदाज लावू शकता.  मात्र आम्हाला यात यश मिळाले.  त्यावेळी मी त्यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांशी देखील संवाद साधला होता . त्यांच्याशी झालेला संवाद, त्यांचा तो आनंद मी कधीही विसरू शकत नाही. अशाच प्रकारे आपले फादर टॉम यांना यमन इथे ओलिस ठेवले होते.  आमच्या सरकारने त्यांना तिथून पूर्ण ताकदीनिशी परत आणले. मी त्यांना देखील माझ्या घरी आमंत्रित केलं होतं. जेव्हा आखाती देशांमध्ये आपल्या परिचारिका भगिनी संकटात सापडल्या होत्या, तेव्हा देखील संपूर्ण देशाला त्यांची चिंता लागून राहिली होती . त्यांना देखील मायदेशी परत आणण्याचे आमचे अथक प्रयत्न यशस्वी झाले. आमच्यासाठी हे प्रयत्न केवळ राजनैतिक मिशन नव्हते, ती आमच्यासाठी एक भावनिक वचनबद्धता होती. ते आपल्या कुटुंबाच्या एखाद्या सदस्याला सुरक्षितपणे परत आणण्याचे मिशन होते. भारताचे सुपुत्र जगात कुठेही असतील कुठल्याही संकटात असतील, आजचा भारत त्यांना प्रत्येक संकटातून सुरक्षितपणे परत आणतो, हे आपलं कर्तव्य समजतो. 

मित्रांनो,

भारत आपल्या परराष्ट्र धोरणात देखील राष्ट्रीय हिताबरोबर मानवी हिताला देखील प्राधान्य देतो. करोनाच्या काळात संपूर्ण जगाने हे  पाहिलं आहे आणि अनुभवलं देखील आहे. करोना सारखी एवढी मोठी महामारी आली, जगातले अनेक देश जे मानवी हक्क आणि मानवतेबाबत मोठमोठ्या गप्पा मारतात, जे या गोष्टींचा राजनैतिक शस्त्र म्हणून वापर करतात. गरज पडली तेव्हा ते गरीब आणि छोट्या देशांच्या मदतीने मागे हटले. त्यावेळी त्यांनी केवळ आपल्या हिताची चिंता केली. मात्र भारताने परमार्थ भावनेने आपल्या सामर्थ्याने पुढे येऊन कितीतरी देशांची मदत केली आणि जगातील 150 हून अधिक देशांमध्ये औषधे पोहोचवली, अनेक देशांना लसींचा पुरवठा केला . याचा संपूर्ण जगावर एक खूपच सकारात्मक प्रभाव देखील पडला. आता नुकताच मी गयाना दौऱ्यावर गेलो होतो. कालच मी कुवेत मध्ये होतो. तिथे बहुतांश लोक भारताची प्रशंसा करत होते. भारताने लसींचा पुरवठा करून त्यांची मदत केली होती आणि ते याबद्दल खूप आभार मानत होते. भारताप्रती अशी भावना ठेवणारा गयाना हा एकमेव देश नाही. अनेक द्वीपसमूह देश, पॅसिफिक देश कॅरिबियन देश भारताची प्रशंसा करतात. भारताची ही भावना मानवतेप्रति आमचे हे समर्पण हा मानवता केंद्रित दृष्टिकोनच 21व्या शतकातील जगाला नव्या उंचीवर घेऊन जाईल. 

मित्रांनो,

प्रभु ख्रिस्ताची शिकवण प्रेम, सौहार्द आणि बंधुत्व यांचा प्रसार करते. ही भावना अधिक मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी काम करणे महत्त्वाचे आहे. पण, जेव्हा हिंसाचार पसरवण्याचे आणि समाजात द्वेष पसरवण्याचे प्रयत्न होतात तेव्हा माझ्या मनाला वेदना होतात. काही दिवसांपूर्वी, जर्मनीतील ख्रिसमस मार्केटमध्ये काय घडले ते आपण पाहिले. 2019 मध्ये ईस्टर दरम्यान, श्रीलंकेतील चर्चवर हल्ले झाले. बॉम्बस्फोटात बळी पडलेल्यांप्रति श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी कोलंबोला गेलो होतो. एकत्र येऊन अशा आव्हानांचा सामना करणे महत्त्वाचे आहे.  

मित्रांनो,

तुमचे  वर्धापनदिन विशेष वर्ष सुरू झाल्यामुळे हा ख्रिसमस आणखी खास आहे, त्याला विशेष महत्त्व आहे. या महोत्सवी वर्षाच्या विविध उपक्रमांसाठी मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. या वेळी, महोत्सवी वर्षासाठी, तुम्ही आशेभोवती केंद्रित संकल्पना निवडली आहे. पवित्र बायबल आशेला सामर्थ्य आणि शांतीचा स्रोत मानते. ते म्हणते: “तुमच्यासाठी नक्कीच भविष्याची आशा आहे आणि तुमची आशा  तुटणार नाही.” आपल्याला देखील आशा आणि सकारात्मकता  मार्ग दाखवते.  मानवतेसाठी, चांगल्या जगासाठी  आणि शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी आशा करूया.

मित्रांनो,

गेल्या 10 वर्षात आपल्या देशात  25 कोटी  लोकांनी  गरीबीवर मात केली आहे. हे यामुळे शक्य झाले कारण,  गरीबीमध्ये एक आशा निर्माण झाली, की हो, गरीबीवर मात करता येऊ शकते.  मागील  10 वर्षांमध्ये  भारत 10 व्या  क्रमांकावरील अर्थव्यवस्थेवरून  5 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला.  हे यामुळे शक्य झाले कारण आपण स्वत:वर विश्वास ठेवला, आपण आशा सोडली नाही आणि हे  लक्ष्य प्राप्त करून दाखवले.

भारताने दहा वर्षांत विकासाच्या दिशेने केलेल्या प्रवासाने आम्हाला येणारे वर्ष आणि भविष्यासाठी नवी आशा प्रदान केली आहे, भरभरून नवी उमेद दिली आहे. दहा वर्षात आमच्या युवा वर्गाला ज्या संधी मिळाल्या आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी यशाचा नवीन मार्ग उघडला आहे. स्टार्ट अपपासून विज्ञानापर्यंत, क्रीडा क्षेत्रापासून नवोद्योजकतेपर्यंत आत्मविश्वासाने परिपूर्ण असे आमचे युवा देशाला प्रगतीच्या नवीन मार्गावर घेऊन निघाले आहेत. आमच्या नवयुवकांनी आम्हाला हा आत्मविश्वास दिला आहे, विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होणारच, अशी आशा जागवली आहे. गेल्या दहा वर्षांत देशातील स्त्रियांनी सक्षमतेच्या नवीन गाथा रचल्या. नवोद्योजकतेपासून ड्रोनपर्यंत, विमान उड्डाणापासून लष्करातील जबाबदाऱ्यांपर्यंत असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे स्त्रियांनी आपला झेंडा रोवलेला नाही. जगातला कोणताही देश स्त्रियांच्या उन्नतीशिवाय प्रगती करू शकत नाही आणि त्यासाठी आज आमच्या श्रमशक्तीमध्ये स्त्रियांचा सहभाग वाढत आहे, त्यामुळे आपली भावी काळाबद्दलची उमेद वाढते आहे, नवीन आशा जाग्या होत आहेत. आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या विविध क्षेत्रांमध्ये आपला देश गेल्या दहा वर्षांत खूप पुढे गेला आहे. मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग असो किंवा सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग असो, देश वेगाने संपूर्ण मॅन्युफॅक्चरिंग लँडस्केपमध्ये आपली जागा निर्माण करत आहे. तंत्रज्ञान असो किंवा फिनटेक, भारत यातून केवळ गरिबांना नवी शक्ती देत नाही तर स्वतःला टेक हबच्या रूपात स्थापित करत आहे. पायाभूत सुविधा उभारण्याचा आमचा वेग सुद्धा अभूतपूर्व आहे. आम्ही केवळ हजारो किलोमीटरचे एक्सप्रेसवे बनवत नाही तर आपली गावे सुद्धा ग्रामीण रस्त्यांशी जोडत आहोत. चांगल्या वाहतुकीसाठी शेकडो किलोमीटरचे मेट्रो मार्ग तयार होत आहेत. भारताने केलेले हे सर्व काही आम्हाला आशा आणि सकारात्मकता बहाल करते आणि भारत आपली उद्दिष्टे वेगाने पूर्ण करू शकेल हा विश्वास देते आणि केवळ आम्ही स्वतः जे काही मिळवले आहे त्याबद्दल आशा आणि विश्वास बाळगत आहोत असे नाही, तर संपूर्ण जगसुद्धा भारताकडे याच आशेने आणि विश्वासाने पाहत आहे.

मित्रांनो,

बायबल सांगते कॅरी इच अदर्स बर्डन्स म्हणजे आपण एकमेकांची काळजी घ्यायला हवी, एकमेकांच्या कल्याणाची भावना बाळगायला हवी. या विचारांच्या आमच्या संस्था आणि संघटना समाजसेवेच्या दिशेने मुख्य भूमिका बजावतात. नव्या शाळांची स्थापना व्हायला हवी प्रत्येक समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून पुढे नेण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. आरोग्याच्या क्षेत्रात सामान्य मानवी सेवेचा संकल्प असायला हवा. या सगळ्या गोष्टीं म्हणजे आम्ही आमची जबाबदारी  मानतो.

मित्रांनो,

जीजस ख्राईस्टने जगाला करुणा आणि निःस्वार्थ सेवेचा मार्ग दाखवला. आम्ही ख्रिसमस साजरा करतो आणि जीजसचे स्मरण करतो, जेणेकरून आम्ही ही मूल्ये आपल्या जीवनात उतरवू शकू, आपल्या कर्तव्यांना नेहमीच प्राधान्य देत राहू. मी असे मानतो की ही आपली व्यक्तिगत जबाबदारीसुद्धा आहे, सामाजिक दायित्व देखील आहे आणि राष्ट्र म्हणून आपले कर्तव्य सुद्धा आहे. आज देश या भावनेला ‘सबका साथ सबका विकास और सब का प्रयास’ या संकल्पाच्या रूपाने पुढे नेत आहे. असे कितीतरी विषय होते, ज्यांच्या बाबतीत आधी कधीही विचार केला गेला नाही पण मानवी दृष्टिकोनातून जे सर्वाधिक आवश्यक होते, त्या विषयांना आम्ही प्राधान्य दिले. आम्ही सरकारला नियम आणि औपचारिकतेच्या कुंपणातून बाहेर काढले. आम्ही संवेदनशीलतेला एक मापदंड मानले. प्रत्येक गरिबाला पक्के घर मिळावे, गावोगावी वीज पोहोचावी, लोकांच्या जीवनातून अंधःकार दूर व्हावा, लोकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे, पैशाच्या अभावामुळे कोणी औषधोपचारापासून वंचित राहू नये अशी संवेदनशील व्यवस्था आम्ही बनवली, जी या प्रकारच्या सेवेची, या प्रकारच्या प्रशासनाची हमी देऊ शकेल.

आपण कल्पना करू शकता की जेव्हा एखाद्या गरीब परिवाराला ही हमी मिळते तेव्हा त्याच्यावरील चिंतेचे केवढे तरी ओझे उतरते. पीएम आवास योजनेचे घर जेव्हा कुटुंबातील महिलेच्या नावाने उभारले जाते तेव्हा त्यामुळे त्या महिलांना कितीतरी ताकद मिळते. आम्ही महिला सशक्तीकरणासाठी नारीशक्ती वंदन अधिनियम आणून संसदेतसुद्धा त्यांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित केला आहे. याच प्रकारे आपण पाहिले असेल, आधी आपल्याकडे दिव्यांग समाजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यांना अशा नावांनी संबोधले जायचे जे एकप्रकारे मानवी सभ्यतेच्या विरुद्ध होते. एक समाज म्हणून आमच्यासाठी ही खेदाची गोष्ट होती. आमच्या सरकारने ही चूक सुधारली. आम्ही त्यांना दिव्यांग अशी ओळख देऊन त्यांच्या प्रति सन्मानाचा भाव व्यक्त केला. आज देश सार्वजनिक पायाभूत सुविधांपासून रोजगारापर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये दिव्यांगांना प्राधान्य देत आहे.

मित्रांनो,

सरकारमध्ये संवेदनशीलता असेल तर ते देशाच्या आर्थिक विकासासाठीसुद्धा तेवढेच आवश्यक असते.  आपल्या देशात जवळपास तीन कोटी मच्छीमार आहेत आणि शेती करणारे आहेत. परंतु या कोट्यवधी लोकांच्या बाबतीत आधी कधीही या प्रकारे विचार केला गेला नव्हता. आम्ही मत्स्यव्यवसायासाठी वेगळे मंत्रालय निर्माण केले.‌ मच्छीमारांसाठी आम्ही क्रेडिट कार्डसारख्या सुविधा सुरू केल्या. आम्ही मत्स्यसंपदा योजना सुरू केली. समुद्रात मच्छीमारांच्या सुरक्षेसाठी आधुनिक प्रयत्न केले गेले.  या प्रयत्नांकरवी लोकांचे जीवन सुद्धा बदलले आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक बळ मिळाले.

मित्रांनो,

लाल किल्ल्यावरून बोलताना मी सबका प्रयासबद्दल बोललो होतो. याचा अर्थ सर्वांचे एकत्रित प्रयत्न. आपल्यापैकी प्रत्येक जण राष्ट्राच्या भविष्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतो. लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण चमत्कार घडवू शकतो. आज सामाजिकदृष्ट्या जागृत असलेले भारतीय अनेक लोकचळवळींना बळ देत आहे. स्वच्छ भारत मोहिमेने जास्त स्वच्छ भारताची उभारणी करायला मदत केली.  स्त्रिया आणि मुलांच्या आरोग्यावर याचा चांगला परिणाम होतो. आमचे शेतकरी जे भरड धान्ये किंवा श्रीअन्न पिकवतात, त्याचे देशात आणि जगातही स्वागत होते. आता माणसे लोकलसाठी व्होकल बनून कारागिरांना आणि उद्योगांना  प्रोत्साहन देऊ लागली आहेत. ‘एक पेड मां के नाम’ याचा अर्थ आईसाठी एक झाड ही सुद्धा लोकप्रिय होत चाललेली कल्पना आहे.  निसर्ग मातेचा तसेच आपल्या मातेचाही सन्मान करणारी ही कल्पना आहे. ख्रिश्चन समुदायातील अनेकजण अशा उपक्रमात आघाडीवर असतात. ख्रिश्चन समुदायातील युवकांसह इतरही युवा वर्गाचे मी अभिनंदन करतो ते त्यांनी अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये घेतलेल्या पुढाकारामुळे. अशा प्रकारचे एकत्रित प्रयत्न हे विकसित भारताच्या उभारणीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

मला विश्वास आहे की आपल्या सर्वांचे सामूहिक प्रयास आपल्या देशाला पुढे नेतील. विकसित भारत हे आपल्या सर्वांचे उद्दिष्ट आहे आणि आपल्या सर्वांना मिळून हे साध्य करायचे आहे. येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी एक उज्वल भारत प्दान करणे, हे आपले कर्तव्य आहे. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना ख्रिसमस आणि उत्सवी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.

धन्यवाद !

 

* * *

Tupe/Pange/Sushma/Vijaya/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai