Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

केरळमध्ये भारतातल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे उद्‌घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

केरळमध्ये भारतातल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे उद्‌घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण


नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी 2021

 

केरळचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान, केरळचे मुख्यमंत्री पिनारवी विजयन, मंत्रिमंडळातले माझे सहकारी धमेंद्र प्रधान, राज्यमंत्री मनसुख मांडवीय जी, राज्यमंत्री मुरलीधरन जी,

व्यासपीठावरील सर्व सन्माननीय,

मित्रहो,

नमस्कार कोची, नमस्कारम् केरळ. अरबी समुद्राची राणी नेहमीच अद्भूत असते. तुम्हा सर्वांना भेटल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. आज आपण इथे ‘विकास’- विकासयात्रा साजरी करण्यासाठी जमलो आहोत. हा विकास केरळने  आणि भारताने साध्य केला आहे. आज उद्‌घाटन करण्यात येत असलेल्या कामांमध्ये विविध क्षेत्रांचा व्यापक समावेश आहे. या कामांमुळे भारताच्या विकासमार्गाला प्रोत्साहन, चालना मिळणार आहे.

मित्रांनो,

गेल्या दोन वर्षांपूर्वी मी कोची शुद्धीकरण प्रकल्पाला भेट दिली होती. हा प्रकल्प भारतातल्या अत्याधुनिक तेल शुद्धीकरण प्रकल्पांपैकी एक आहे. आजही पुन्हा एकदा कोची इथलाच प्रकल्प राष्ट्राला अर्पण केला जात आहे. कोची शुद्धीकरण प्रकल्पामध्ये उभारण्यात आलेल्या  प्रॉपिलेन डेरिव्हेटिव्हज् पेट्रोकेमिकल्स कॉम्प्लेक्सचे राष्ट्रार्पण आज करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी सुरू केलेला प्रवास अधिक वेगाने होण्यासाठी मदत होणार आहे. या संकुलाच्या उभारणीबद्दल  धन्यवाद दिले पाहिजेत. कारण यामुळे आपल्याकडच्या परकीय चलनामध्ये बचत होऊ शकणार आहे. विविध विस्तारित क्षेत्रामध्ये नवीन उद्योग सुरू करण्यासाठी चालना मिळणार आहे आणि त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत.

मित्रांनो,

कोची शहरामध्ये व्यापार आणि वाणिज्य व्यवहार खूप होतात. त्यामुळे या शहरातल्या लोकांना या संकुलाच्या उभारणीचे महत्व नक्कीच समजते. त्यांना या शहरामध्ये असलेल्या सुयोग्य संपर्क यंत्रणेचे, व्यवस्थेचे महत्वही चांगले माहिती आहे. त्यामुळे रो-रो व्हेसलचे आज होणारे लोकार्पण विशेष महत्वाचे आहे. या सेवेमुळे जवळपास तीस किलोमीटरचे रस्तेमार्गाचे अंतर  जलमार्गाने अवघ्या साडेतीन किलोमीटरचे होणार आहे. याचा अर्थ, सुविधा होणार आहे. वाणिज्य, व्यापार वाढणार, क्षमता वाढणार, वाहतुकीची होणारी कोंडी संपुष्टात येणार आहे. प्रदूषण कमी होणार आहे. त्याचबरोबर वाहतुकीचा खर्चही कमी होणार आहे.

मित्रांनो,

जे पर्यटक केरळ पाहण्यासाठी येतात, त्यांच्यासाठी कोची हा मधला केंद्रबिंदू असतो. इथूनच केरळ पाहण्यासाठी ते जातात. त्यामुळेच इथली संस्कृती, इथले पदार्थ, सागरी किनारे, खरेदीची ठिकाणे, बाजारपेठ, ऐतिहासिक स्थाने आणि अध्यात्मिक स्थळे यांची सर्वांना माहिती आहे, यासाठी तर कोची प्रसिद्ध आहे. पर्यटनाला अधिक चालना मिळावी, यासाठी केंद्र सरकार इथल्या पायाभूत सुविधा अधिक विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहे. कोची येथे आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल सागरिकाचे उद्घाटन करणेहे त्याचेच एक उदाहरण आहे. सागरिका आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलमुळे पर्यटकांची सुविधा होणार आहे आणि त्यांच्यासाठी इतर अनेक सुखसोयीही निर्माण होणार आहेत. या टर्मिनलमुळे एक लाखांपेक्षाही जास्त अतिथींना सुविधा पुरवणे शक्य होणार आहे.

मित्रांनो,

गेल्या काही महिन्यांपासून मला एक गोष्ट दिसून आली आहे. अनेक लोकांनी मला याविषयी लिहूनही पाठवले आहे. इतकेच नाही तर स्थानिक प्रवासांविषयी समाज माध्यमांवरून अनेकांनी छायाचित्रेही सामायिक केली आहेत. संपूर्ण विश्वभरामध्ये कोविड महामारीचा उद्रेक झाल्यामुळे त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय पर्यटक, प्रवासी, यांच्यावरही झाला आहे. त्यामुळे प्रवासी जवळपासच्या, स्थानिक स्थळांना भेट देत आहेत. ही आपल्यासाठी एक चांगली संधी मानली पाहिजे. ज्या लोकांचा उदर निर्वाह पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे, त्यांच्यासाठी ही एककडे संधी निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे आमचा युवावर्ग आणि आमची संस्कृती यांच्यातले धागे अधिक मजबूत झाले आहेत. आपल्याकडे पाहण्यासारखे खूप आहे. ते सर्व काही पाहून घ्या. त्यातून नवीन शिकून घ्या आणि नवीन काहीतरी शोधून काढा. पर्यटन व्यवसायाशी संबंधित, उपयुक्त नवनवीन उत्पादने काढण्यासाठी स्टार्ट-अप्सचा विचार करण्यासाठी मी आपल्या तरूण मित्रांना आवाहन करीत आहे. त्याचबरोबर या कालावधीमध्ये सर्वांनी जास्तीत जास्त वेळ आजूबाजूच्या स्थानांना भेट देण्यासाठी प्रवास करावा, असे आवाहन करतो. गेल्या पाच वर्षांमध्ये भारताच्या पर्यटन क्षेत्रामध्ये खूप चांगली वृद्धी होत आहे, हे जाणून तुम्हा सर्वांना आनंद होईल. जागतिक पर्यटन निर्देशांकाच्या क्रमवारीमध्ये भारताचे स्थान 65व्या स्थानावरून आता 34 व्या क्रमांकावर आले आहे. मात्र या क्षेत्रामध्ये अजून बरेच काही करण्यासारखे बाकी आहे. या सर्व कामांमध्ये आम्ही नक्कीच सुधारणा करणार आहोत, असा मला विश्वास आहे.

मित्रांनो,

आर्थिक विकासाला आकार देण्यासाठी दोन घटक महत्वाचे असतात, यामध्ये एक म्हणजे क्षमता निर्माण करणे आणि भविष्यातल्या गरजा ओळखून त्यादृष्टीने आधुनिक पायाभूत सुविधा तयार करणे. आजची यानंतरची दोन्ही विकासकामे, या संकल्पनेशी संबंधित आहेत. ‘विज्ञान सागर’  या कोचिन शिपयार्डमध्ये नवीन ज्ञान परिसर विकसित करण्यात आला आहे. या माध्यमातून आपण मनुष्य बळ विकसित करून मानवी भांडवलाचा विस्तार करणर आहे. ज्यांना सागरी अभियांत्रिकी या विषयामध्ये अभ्यास करण्याची इच्छा आहे, त्यांना या परिसराची मदत होवू शकणार आहे. आगामी काळामध्ये सागरी अभियांत्रिकी या क्षेत्राला महत्वाचे स्थान मिळेल, हे मला दिसून येतेय. या क्षेत्राविषयी ज्ञान असलेल्या तरूण वर्गाला अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.  याविषयी मी आधीच म्हणालो होतो, आर्थिक वृद्धीसाठी आपल्याकडे असलेल्या क्षमता वाढविण्याची आवश्यकता असते. आपण आज दक्षिण कोळसा धक्का उभारण्यासाठी पायाभरणी करीत आहोत. या कामामुळे दैनंदिन कामकाजाच्या खर्चात मोठी बचत होवू शकणार आहे. तसेच माल वाहतुकीच्या सरासरी क्षमतेमध्येही वाढ होणार आहे. या भागामध्ये व्यवसायांची भरभराट व्हावी, यासाठी या दोन्ही गोष्टी महत्वपूर्ण आहेत.

मित्रांनो,

आज, पायाभूत सुविधा म्हणजे नेमके काय याची व्याख्या आणि व्याप्तीही बदलली आहे. पायाभूत सुविधा म्हणजे केवळ चांगले रस्ते, विकास काम आणि काही शहरी केंद्रे तसेच गावे यांच्यामध्ये असलेली संपर्क व्यवस्था, इतकाच अर्थ मर्यादित नाही. तर याही पेक्षा वेगळ्यापलिकडे जावून पायाभूत सुविधा असतात. आम्ही येणा-या पिढीला अशाच प्रकारच्या उच्च दर्जाच्या आणि उच्च प्रतीच्या पायाभूत सुविधा देण्याचा विचार आणि प्रयत्न करीत आहोत. राष्ट्रीय पायाभूत ‘पाइपलाइन’च्या माध्यमातून इन्फ्रा निर्मितीसाठी 110 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत आहे. त्यामध्ये सागरी किनारपट्टीवरील भूभागामध्ये, ईशान्य भागामध्ये आणि डोंगराळ प्रदेशाकडे विशेष लक्ष दिले आहे. भारतामध्ये प्रत्येक गावाला ब्रॉडबँडने जोडण्याचे महत्वाकांक्षी काम सुरू आहे. त्याचबरोबर भारताने आपल्या अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी नील अर्थक्रांती घडवून आणण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण कामे सुरू केली आहे. त्याचबरोबर सध्याच्या सर्व बंदरांचा विकास करण्यासाठी तिथे पायाभूत सुविधा तयार करणे, ऑफ शोअर  ऊर्जा, किना-यावरील भूभागाचा शाश्वत विकास, सागरी किनारपटटीवर संपर्क यंत्रणा विकसित करण्याचे काम केले जात आहे. यासाठी आवश्यक ठरणारी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनाही तयार करण्यात आली आहे. ही योजना सर्व स्तरातल्या मच्छिमार समुदायांच्या असलेल्या सर्व गरजा पूर्ण करीत आहे. त्यामध्ये पत सुनिश्चित करण्याची तरतूद आहे. किसान क्रेडिट कार्डचा वापर आता मच्छिमारांनाही करता येणार आहे. तसेच त्यांना जास्त वापर करण्यात येणार आहे.  त्याचबरोबर सागरी अन्नाची निर्यात करणारे  भारत हे एक केंद्र बनावे, या दिशेने काम सुरू झाले आहे. समुद्री शैवाळाची शेती आता दिवसेंदिवस लोकप्रिय होत असल्याचा मला आनंद होत आहे. मत्स्योद्योग अधिक संपन्न व्हावा, यासाठी संशोधकांना आणि या क्षेत्रात नव्या संकल्पना राबविणा-या माझे आवाहन आहे की, त्यांनी आपल्याकडच्या नवीन संकल्पना, नवीन ज्ञान नवशिक्यांबरोबर सामायिक करावे, ही आमच्या कष्टकरी मच्छिमारांना खूप मोठी मदत ठरणार आहे.

मित्रांनो,

यावर्षी सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकामध्ये केरळला लाभ होईल अशा महत्वपूर्ण गोष्टी, समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोची मेट्रोच्या पुढच्या टप्प्याचा कामाचा समावेश आहे. मेट्रोचे जाळे तयार झाल्यास अनेक व्यावसायिक लाभ होवू शकणार आहेत. हे काम म्हणजे प्रगती आणि व्यावसायिकता यांचे एक चांगले उदाहरण ठरणार आहे.

मित्रांनो,

मागचे वर्ष म्हणजे संपूर्ण मानवतेसमोर एक आव्हान घेवून आलेले वर्ष होते. 130 कोटी भारतीयांनी या कोविडच्या या संकटाशी मोठ्या धैर्याने सामना केला. आखाती देशांमध्ये असलेल्या भारतीयांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारत सरकार नेहमीच संवेदनशील होते. आखातातल्या आपल्या भारतीयांविषयी भारताला अभिमान आहे. याआधी सौदी अरेबियातल्या कतार, संयुक्त अरब अमिरात आणि बहरीन यांना मी भेटी दिल्या. त्यांच्याबरोबर बराच वेळ व्यतित केला. त्यांच्याबरोबर भोजन केले, अनेक योजना सामायिक केल्या, त्यांच्याशी संवाद साधला या भेटींमध्ये माझा सन्मान वाढला असल्याचे जाणवले. वंदे भारत मिशनचा एक भाग म्हणून पन्नास लाख भारतीयांना मायदेशी आणण्यात आले. त्यापैकी बरेचजण केरळचे रहिवासी होते. अशा संवेदनशील काळामध्ये त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली, हा मी आमच्या सरकारचा सन्मान मानतो. गेल्या काही वर्षांमध्ये आखाती देशांनी तिथल्या कारागृहामध्ये असलेल्या अनेक भारतीयांविषयी दया दाखवून त्यांना मुक्त केले आहे, या विषयी  आखाती देशांनी आपण केलेल्या व्यक्तिगत आवाहनाला प्रतिसाद दिला, हे महत्वाचे आहे. त्यांनी भारतीयांना मायदेशी परत पाठविण्याच्या कार्याला प्राधान्य दिले. तसेच आम्हाला ही प्रक्रिया सुलभतेने पार पाडता यावी यासाठीही हवाई सुविधा उपलब्ध करून दिली. आखाती देशात कार्यरत असलेल्यांना आपल्या सरकारचा पूर्ण पाठिंबा असल्याचे आम्ही सुनिश्चित करीत आहोत.

मित्रांनो,

आज आपण एका ऐतिहासिक बिंदूवर उभे आहोत. आज आपण जी काही कृती करणार आहोत, त्याच आपण भविष्याच्या वृद्धीला आकार देणार आहेत. त्यामुळे अशावेळी आपली स्वतःची वृद्धी करताना आपल्याला जागतिक स्तरावर सर्वांचे कल्याण करायचे आहे, यासाठी आपल्या क्षमतांमध्ये वाढ करायची आहे. हे सर्वांनी जाणून घेतले पाहिजे. आगामी काळात येणा-या संधी चमत्कार घडवू शकतात. अशा संधी निर्माण करण्यासाठी आपण कार्य केले पाहिजे. आत्मनिर्भर भारताच्या निर्माणासाठी आपण सर्वांनी एकत्रित कार्य करूया. आज उद्घाटन करण्यात आलेल्या सर्व विकास कामांसाठी मी केरळच्या जनतेचे अभिनंदन करतो.

धन्यवाद. खूप खूप धन्यवाद!!

ओराईराम नंदी

M.Chopade/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com