पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीमार्फत विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना संबोधित केले. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममधील विकसित भारत संकल्प यात्रेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.
धर्म राजन हे केळीचे बागायतदार आणि केरळमधील कोझिकोड येथील विकसित भारत संकल्प यात्रेतील लाभार्थी असून त्यांनी पंतप्रधानांना किसान क्रेडिट कार्ड कर्ज, पीएम किसान सन्माननिधी, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे फायदे मिळत असल्याची माहिती दिली. पूर्वीच्या तुलनेत अशा फायद्यांच्या उपलब्धतेच्या परिणामाबद्दल पंतप्रधानांनी विचारणा केल्यावर, धर्म राजन यांनी खते आणि इतर उपकरणांच्या उपलब्धतेसह कृषी क्षेत्रातील आर्थिक मदत अधिक प्रमाणात मिळत असल्याचे सांगितले. पीएम किसान सन्माननिधी अंतर्गत मिळालेला पैसा आपण शेतीसाठी वापरतो, अशी माहितीही त्यांनी दिली.
सरकारी योजना आणि कर्जामुळे धर्म राजन यांना कुटुंबासाठी अधिक पैसे वाचविण्यास मदत होत आहे. पूर्वी हे पैसे सावकारांच्या चढ्या व्याजदरांवर खर्च होत असत, असे पंतप्रधानांनी सांगितले. आपल्या दोन मुलींच्या शिक्षणाबाबत पंतप्रधानांना माहिती देताना राजन यांनी पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या मोठ्या मुलीच्या लग्नासाठी पैसे वाचवण्यास मदत करणाऱ्या सरकारी योजनांसाठी पंतप्रधानांचे आभार मानले.
चांगले जीवनमान दिल्याबद्दल राजन यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. राजन हे प्रगतीशील शेतकरी आहेत आणि आपल्या मुलींना शिक्षण देऊन पैशांचा योग्य वापर करत असल्याची दखल घेत पंतप्रधानांनी राजन यांचे जीवन खरोखरच प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai