Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

केरळच्या कोची इथे आयएनएस विक्रांत नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

केरळच्या कोची इथे आयएनएस विक्रांत नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण


 

या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित केरळचे राज्यपाल श्री आरिफ़ मोहम्मद खान, केरळचे मुख्यमंत्री श्री पिनाराई विजयन जी, देशाचे संरक्षणमंत्री, श्री राजनाथ सिंह जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे इतर सहकारी, नौदलप्रमुख अॅडमिरल आर हरीकुमार जी, कोचीन शिप यार्डचे महाव्यवस्थापक, सर्व विशेष अतिथी आणि सन्माननीय मान्यवर, आणि ह्या कार्यक्रमाशी जोडले गेलेले माझे प्रिय देशबांधव!

आज इथे केरळच्या सागरी किनाऱ्यावर भारताचा प्रत्येक नागरिक, एका नव्या भविष्याच्या सूर्योदयाचा साक्षीदार बनला आहे.  आयएनएन विक्रांतवर होत असलेला हा कार्यक्रम जगाच्या क्षितिजावर भारताच्या वाढत्या जिद्दीचा हुंकार आहे. स्वातंत्र्य लढ्यात आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी ज्या सक्षम, समर्थ आणि शक्तिशाली भारताचं स्वप्न बघितलं होतं, त्याचं एक सशक्त चित्र आज आपण इथे बघत आहोत.

विक्रांत विशाल आहे, विराट आहे, विहंगम आहे. विक्रांत विशिष्ट आहे, विक्रांत विशेष देखील आहे. विक्रांत केवळ एक युद्ध नौकाच नाही. ही 21 व्या शतकातल्या भारताच्या परिश्रम, प्रतिभा, प्रभाव आणि कटिबद्धता याचे उदाहरण आहे. जर का लक्ष्य दूर आहे, तिथपर्यंतचा प्रवास अमर्याद आहे, समुद्र अथांग आहे आणि आव्हानं अनंत आहेत – तर त्याला भारताचे उत्तर आहे – विक्रांत! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातून निघालेलं अतुलनीय अमृत आहे विक्रांत ! आत्मनिर्भर होत असलेल्या भारताचे अद्वितीय प्रतिबिंब म्हणजे विक्रांत ! हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमान आणि गौरवाचा अनमोल क्षण आहे. हा प्रत्येक भारतीयाचा मान – स्वाभिमान वाढवणारा प्रसंग आहे. यासाठी मी प्रत्येक देशवासियाचे अभिनंदन करतो.

 

मित्रांनो,

लक्ष्य कितीही कठीण का असेनात, आव्हानं कितीही मोठी का असेनात, भारत जेव्हा ठरवतो आणि जिद्दीला पेटतो, तेव्हा कुठलंही आव्हान अशक्य राहत नाही. आज भारत जगाच्या त्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे, जे स्वदेशी तंत्रज्ञानाच्या मदतीनं इतकी विशाल विमानवाहू युद्धनौका बनवू शकतात. आज आयएनएस विक्रांतने देशात एक नवा विशास निर्माण केला आहे. आज विक्रांतला बघून समुद्राच्या लाटा आवाहन करत आहेत –

अमर्त्य वीर पुत्र हो, दृढ़ प्रतिज्ञ सोच लो,

प्रशस्त पुण्य पंथ है, बढ़े चलो, बढ़े चलो।

 

मित्रांनो,

या ऐतिहासिक प्रसंगी मी भारतीय नौदल, कोचीन जहाज बांधणी कारखान्याचे सर्व अभियंते, वैज्ञानिक आणि माझ्या श्रमिक बंधू – भगिनींचे अभिनंदन करतो, ज्यांनी हे स्वप्न साकार केले आहे. केरळच्या पुण्यभूमीत देशाला हे यश अशा वेळी मिळाले आहे, जेव्हा ओणमचा पवित्र सण साजरा होत आहे. मी सर्व देशवासियांना या प्रसंगी ओणमच्या हार्दिक शुभेच्छा सुद्धा देतो.

 

मित्रांनो,

आयएनएस विक्रांतच्या प्रत्येक भागाचे एक वैशिष्ट्य आहे, शक्ती आहे, त्याची एक विकास यात्रा देखील आहे. हे स्वदेशी सामर्थ्य, स्वदेशी संसाधन, स्वदेशी कौशल्याचे प्रतीक आहे. याच्या एअरबेस मध्ये जितकं पोलाद वापरलं आहे, ते सगळं स्वदेशी आहे. हे पोलाद डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी विकसित केले आहे, भारतीय कंपन्यांनी तयार केले आहे.

ही एक युद्धनौका नाही. त्याहून खूप जास्त आहे, एक तरंगतं एअर फिल्ड आहे, एक तरंगतं शहर आहे. यावर जितकी वीज निर्माण होते, त्यातून पाच हजार घरांची विजेची गरज भागवली जाऊ शकते. याचं फ्लाईट डेक दोन फुटबॉल फिल्ड इतकं मोठं आहे. विक्रांत मध्ये जितक्या केबल्स आणि वायर्स वापरल्या गेल्या आहेत, त्या कोच्ची पासून सुरु होऊन काशी पर्यंत जाऊ शकतात. ही जटीलता आपल्या अभियंत्यांच्या चिकाटीचं उदाहरण आहे. मेगा – अभियांत्रिकी पासून तर नॅनो सर्किट्स पर्यंत, आधी भारतासाठी जे अकल्पनीय होतं, ते आता प्रत्यक्षात येतं आहे.

 

मित्रांनो,

या वर्षी स्वातंत्र्यदिनाला मी लाल किल्ल्यावरून पंच प्रणचे आवाहन केले आहे आणि आमच्या हरीजींनी देखील याचा आता उल्लेख केला आहे. या पंच प्रण पैकी पहिला प्रण आहे विकसित भारताचा मोठा संकल्प! दुसरा प्रण आहे गुलामीच्या मानसिकतेचा संपूर्ण त्याग. तिसरा प्रण आहे आपल्या वारशाचा अभिमान. चौथा आणि पाचवा प्रण आहे देशाची एकता, एकजूट आणि नागरिक कर्तव्य! आयएनएस विक्रांतची निर्मिती आणि या प्रवासात आपण या सर्व पंच प्रणांची उर्जा बघू शकतो. आयएनएस विक्रांत हे कामया उर्जेचं जिवंत संयंत्र आहे. आता पर्यंत अशा प्रकारच्या विमानवाहू नौका केवळ विकसित देशच बनवत होते. आज भारताने या क्षेत्रात प्रवेश करून विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने आणखी एक महत्वाचं पाऊल टाकलं आहे.

 

मित्रांनो,

जल वाहतुकीच्या क्षेत्रात भारताचा इतिहास अतिशय गौरवशाली आहे. आपला समृद्ध वारसा आहे. आपल्याकडे नौका आणि जहाजांशी संबंधित श्लोकांत सांगितलं आहे –

दीर्घिका तरणि: लोला, गत्वरा गामिनी तरिः।

जंघाला प्लाविनी चैव, धारिणी वेगिनी तथा॥

हे आपल्या शास्त्रांत इतकं वर्णन आहे. दीर्घिका, तरणि लोला, गत्वरा, गामिनी, जंघाला, प्लाविनी, धारिणी, वेगिनी…. आपल्याकडे जहाज आणि नौकांचे वेगवेगळे आकार आणि प्रकार होते. आपल्या वेदांत देखील नौका, जहाजे आणि समुद्राशी निगडीत कितीतरी मंत्र आहेत. वैदिक काळापासून तर गुप्तकाळ आणि मौर्य काळापर्यंत, भारताच्या सागरी सामर्थ्याचा डंका संपूर्ण जगात वाजत होता. छत्रपती वीर शिवाजी महाराजांनी या सागरी सामर्थ्याच्या बळावर असं आरमार उभारलं, ज्याने शत्रूची झोप उडवली होती.

जेव्हा इंग्रज भारतात आले, तेव्हा त्यांना भारतीय जहाजं आणि त्या मध्यमातून निर्माण झालेल्या व्यापारी शक्तीला ते घाबरत असत. म्हणून त्यांनी भारताच्या सागरी सामर्थ्याची कंबर मोडण्याचा निश्चय केला. त्या काळी कसं ब्रिटीश संसदेत कायदा करून भारतीय जहाजं आणि व्यापाऱ्यांवर कडक निर्बंध लादण्यात आले होते, याची साक्ष इतिहासात आहे.

भारताकडे प्रतिभा होती, अनुभव होता. मात्र, आपले लोक या कुटील राजकारणासाठी मानसिक दृष्ट्या तयार नव्हते. तिथे आपण दुर्बल ठरलो आणि त्यानंतर गुलामीच्या काळात आपली शक्ती हळू हळू विसरून गेलो. आता स्वातंत्र्याच्या अमृत काळात भारत आपली हरवलेली शक्ती पुन्हा प्राप्त करत आहे, ती उर्जा पुन्हा जागृत करतो आहे.

 

मित्रांनो,

आज 2 सप्टेंबर 2022 या ऐतिहासिक दिवशी, इतिहास बदलणारं आणखी एक कार्य झालं आहे. आज भारताने, गुलामीची एक खूण, गुलामीचं ओझं आपापल्या डोक्यावरून उतरवलं आहे. आज पासून भारतीय नौसेनेला एक नवा ध्वज मिळाला आहे. आता पर्यंत भारतीय नौसेनेच्या ध्वजावर गुलामीच्या खुणा होत्या. मात्र, आजपासून छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेला नौसेनेचा नवा ध्वज समुद्र आणि आकाशात फडकणार आहे.

कवी रामधारी सिंह दिनकरजींनी आपल्या कवितेत लिहिलं होतं –

नवीन सूर्य की नई प्रभा, नमो, नमो, नमो!

नमो स्वतंत्र भारत की ध्वजा, नमो, नमो, नमो!

आज याच ध्वज वंदनेसोबत मी हा नवा ध्वज, नौसेनेचे जनक, छत्रपती वीर शिवाजी महाराजांना समर्पित करतो. मला विश्वास आहे, भारतीयतेच्या भावनेने ओतःप्रोत हा नवा ध्वज, भारतीय नौसेनेचे आत्मबल वाढवेल आणि आत्मसन्मानाला नवी उर्जा देईल.

 

मित्रांनो,

आपल्या सैन्यदलात कशा प्रकारचा बदल होत आहे, त्यचा एक आणखी महत्वाचा पैलू मी सर्व देशबांधवांच्या समोर ठेवणार आहे. विक्रांत जेव्हा आपल्या सागरी क्षेत्राच्या संरक्षणाला उतरेल, तेव्हा त्यावर नौसेनेच्या अनेक महिला सैनिक देखील तैनात केल्या जातील. समुद्राच्या अथांग शक्ती सोबतच अमर्याद महिला शक्ती, ही नव्या भारताची ओळख बनते आहे.

मला सांगण्यात आलं आहे की सध्या नौसेनेत जवळपास 600 महिला अधिकारी आहेत. मात्र, आता भारतीय नौसेनेनं आपल्या सर्व शाखा महिलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. जे निर्बंध होते ते आता हटवले जात आहेत. ज्याप्रमाणे सक्षम लाटांना कुठल्याच सीमा नसतात, त्याच प्रमाणे भारताच्या मुलींसाठी देखील आता कुठलीच बंधने राहणार नाहीत.

आता, एक दोन वर्षांपूर्वी महिला अधिकाऱ्यांनी तारिणी बोटीनं पृथ्वी प्रदक्षिणा केली होती. येणाऱ्या काळात असे पराक्रम करायला कितीतरी मुली पुढे येतील, जगाला आपल्या शक्तीचा परिचय करून देतील. नौसेने प्रमाणेच तिन्ही सशस्त्र सेना दलांत मुख्य भूमिकेत महिलांना सामील करून घेतले जात आहे, त्यांच्यासाठी नव्या जबाबदाऱ्यांच्या वाटा उघडल्या जात आहेत.

 

मित्रांनो,

आत्मनिर्भरता आणि स्वातंत्र्य हे एकमेकांचे पूरक समजले जातात. जो देश जितका दुसऱ्या कुठल्या देशावर अवलंबून असतो, हे त्याच्यासाठी तितकंच मोठं संकट असतं. जो देश जितका जास्त आत्मनिर्भर असतो, तो तितकाच जास्त शक्तिशाली असतो. कोरोनाच्या संकट काळात आपण सर्वांनी आत्मनिर्भर असण्याची शक्ती म्हणजे काय हे बघितलं आहे, समजून घेतलं आहे, याचा अनुभव घेतला आहे. म्हणूनच आज भारत, आत्मनिर्भर होण्यासाठी, संपूर्ण शक्तीनिशी काम करतो आहे.

आज जर अथांग समुद्रात भारताच्या ताकदीचा उद्घोष करायला आयएनएस विक्रांत तयार आहे तर अनंत आकाशात हीच गर्जना आपले तेजस करत आहेत. या वर्षी 15 ऑगस्टला संपूर्ण देशानी लाल किल्ल्यावरून स्वदेशी तोफांचा हुंकार देखील ऐकला आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर सेनांमध्ये सुधारणा करून, भारत आपल्या सैन्याला सातत्याने आधुनिक बनवत आहे, आत्मनिर्भर बनवत आहे.

आपल्या सैन्याने अशा उपकरणांची एक मोठी यादी बनवली आहे, ही खरेदी आता स्वदेशी कंपन्यांकडूनच केली जाईल. संरक्षण क्षेत्रात संशोधन आणि विकास यासाठी 25 टक्के तरतूद देखील देशातील विद्यापीठे आणि देशातल्या कंपन्यांना उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तामीळनाडू आणि उत्तरप्रदेशात दोन मोठ्या संरक्षण मार्गिका विकसित होत आहेत. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या या पावलांमुळे देशांत रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत आहेत.

 

मित्रांनो,

एकदा लाल किल्ल्यावरुन मी नागरिकांच्या याच कर्तव्याविषयी बोललो होतो. यावर्षीच्या भाषणात देखील मी त्याचा पुनरुच्चार केला होता. जसा थेंब थेंबातून सागर बनतो, तशाचप्रमाणे भारताचा एकेक नागरिक जर व्होकल फॉर लोकलच्या मंत्रानुसार आचरण सुरु करेल, तर देश आत्मनिर्भर होण्यास फार वेळ लागणार नाही.जेव्हा सगळे देशबांधव लोकल म्हणजे स्थानिक उत्पादनांसाठी बोलतील, त्याचा प्रचार आणि वापर सुरु करतील, तेव्हा त्याचा नाद संपूर्ण जगात ऐकू येईल, आणि बघता बघता, जगभरातील जे उत्पादक असतील, त्यांना देखील भारतात यावेच लागेल आणि इथे उत्पादन करावे लागेल, ही ताकद प्रत्येक माणसाच्या आपापल्या अनुभवांची ताकद आहे.

 

मित्रांनो,

आज ज्या जलद गतीने जागतिक परिस्थिती बदलते आहे, जागतिक पटलावरील स्थिती बदलते आहे, त्यामुळे जागतिक स्थिती, बहुकेंद्री झाली आहे. म्हणूनच, येत्या काळात, भविष्यातील सर्व घडामोडी आणि सक्रियतेचे कुठे असेल याची भविष्यातील दृष्टी महत्वाची ठरते. उदाहरणार्थ गेल्या काळात हिंद-प्रशांत प्रदेश आणि हिंद महासागर प्रदेशात सुरक्षाविषयक ज्या चिंता होत्या, त्यांच्याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केले गेले. मात्र, आज ह्या प्रदेशाची सुरक्षितता भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे.आणि म्हणूनच, आम्ही नौदलासाठीची तरतूद वाढवण्यासोबतच, त्याची क्षमता  वाढवण्यापर्यंत सर्व दिशांनी काम करतो आहोत.

आज किनारी गस्ती नौका असोत, किंवा मग पाणबुडी असो अथवा विमानवाहू नौका असोत, आज भारतीय नौदलाची ताकद अभूतपूर्व गतीने वाढते आहे. यामुळे येणाऱ्या काळात, आमचे नौदल आणखी मजबूत होणार आहे.अधिक सुरक्षित सी-लेन्स, उत्तम देखरेख आणि चांगली संरक्षण व्यवस्था यामुळे येत्या काळात, आमची निर्यात, सागरी व्यापार आणि सागरी उत्पादन यातही वाढ होईल. यामुळे केवळ भारतच नाही, तर जगातील इतर देश, विशेषतः आमच्या शेजारी मित्र देशांसाठी व्यापार आणि समृद्धीचे नवे मार्ग खुले होणार आहेत.

 

मित्रांनो,

आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे, आणि अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली आहे.आणि केवळ संगीतलेच नाही, तर आम्ही सर्वांनी, एक संस्कार म्हणून हे तत्व जगण्याचा भागही बनवले आहे. आपल्याकडच्या शास्त्रांत म्हटले आहे

विद्या विवादाय धनं मदाय शक्तिः परेशां परिपीडनाय ।

खलस्य साधोः विपरीतम् एतद्, ज्ञानाय दानाय च रक्षणाय॥

म्हणजेच, दुष्ट लोकांची विद्या, विवाद करण्यासाठी, धन गर्व करण्यासाठी, आणि शक्ती दुसऱ्यांना शिक्षा देण्यासाठी खर्च होते. मात्र, सज्जनासाठी, हे ज्ञान, दान आणि दुर्बल व्यक्तीचे रक्षण करण्याचा मार्ग असतो. हाच भारताचा संस्कार आहे. आणि म्हणूनच जगाला सक्षम भारताची जास्त गरज आहे.

मी एकदा असे वाचले होते, की एकदा जेव्हा डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना कोणीतरी विचारले होते, की आपले व्यक्तिमत्व तर खूप शांतिप्रिय आहे, आपण शांत व्यक्ती आहात, तर मग आपल्याला शस्त्रांची गरज का वाटते? त्यावर उत्तर देतांना कलाम साहेब म्हणाले होतेशक्ती आणि शांती एकमेकांसाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच आज भारत, बल आणि बदल दोन्ही एकत्र घेऊन चालत आहे.

मला विश्वास आहे, सशक्त भारत, शांत आणि सुरक्षित अशा विश्वाचा मार्ग प्रशस्त करेल. ह्याच भावनेने, आपले वीर जवान, वीर सैनिक यांच्याप्रती अतीव अभिमानाची भावना मनात ठेवत, हा महत्वाचा प्रसंग त्यांच्या शौर्याला समर्पित करतो आणि आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो.

जय हिन्द!

***

Jaydevi PS/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai