आदरणीय राष्ट्रपती उहुरू केन्याता ,
उप राष्ट्रपती विलियम रूतो,
कॅबिनेट सदस्य
सन्माननीय अतिथी,
जम्बो, नमस्कार
या मन:पूर्वक स्वागताबद्दल आपले आभार.
मी आपणासाठी भारतातील १२५ कोटी नागरिकांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा घेऊन आलो आहे. दोन हजार वर्षांपेक्षा जास्त काळापासून हिंदी महासागराचे जल आपल्या दोन्ही देशातील नागरिकांना परस्परांना मिळून-मिसळून वागण्याची संधी देत आहे. आपण एकमेकांचे सागरी शेजारी आहोत.
भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर, विशेषत: माझे राज्य गुजरात आणि आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील समुदाय, परस्पराच्या भूमीवर वसले आहेत. १९ व्या शतकाच्या शेवटी वसाहतवादाच्या युगात भारतीय, प्रतिष्ठेच्या मोंबासा युगांडा रेल्वेच्या निर्मितीसाठी केनियामध्ये आले होते. त्यापैकी अनेक जण येथेच स्थायिक झाले आणि त्यांनी केनियाच्या आर्थिक विकासात मोलाचे योगदान दिले. अनेक भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाले आणि ते केनियाचे संस्थापक राष्ट्रपती म्झी जोमो केन्याता यांच्या खांद्याला खांदा भिडवून उभे राहिले. यात माखन सिंग, पिओ गामा पिंटो, चमन लाल, एम.ए.देसाई सारखे अनेक जण सहभागी आहेत. दोन्ही देशांमधील प्राचीन संपर्कांमुळे आमची संस्कृती समृद्ध झाली आहे. समृद्ध अशा स्वाहिली भाषेत अनेक हिंदी शब्दांचा समावेश आहे.
अनेक भारतीय खाद्यपदार्थ आता केनियाच्या खाद्यसंस्कृतीचे अविभाज्य घटक झाले आहेत. आदरणीय महोदय, काल संध्याकाळी आपण आणि मी, केनिया सोबत भारतीय वंशाच्या लोकांचा स्नेह आणि बंध अनुभवले. हा दोन्ही देशांना साधणारा एक मजबूत पूल आहे आणि हा संयुक्त वारसा आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. २००८ साली या देशात येऊन गेल्यानंतर आता पुन्हा आपल्या या सुंदर देशात येणे हा माझ्यासाठी आनंददायक अनुभव आहे. हा दौरा लहान असला तरी त्याचे परिणाम फारच महत्वाचे आहेत. ऑक्टोबर २०१५ मध्ये नवी दिल्ली येथे सुरू झालेल्या आपल्या व्यक्तिगत मैत्रीला पुन्हा जागृत करण्यात मी यशस्वी ठरलो आहे. गेल्या काही तासांमध्ये आम्ही आपल्या दीर्घकालीन संबंधांना नवी ऊर्जा आणि गती प्रदान करू शकलो आहोत. आमची राजकीय समज आणि वचनबद्धता आता अधिक दृढ झाली आहे.
आम्ही आपल्या विकासाशी संबंधित प्राधान्यांना पूर्ण करण्यासाठी केनियाबरोबर हातमिळवणी करायला तयार आहोत.
– आपण निवडलेल्या क्षेत्रात
– आपल्या पसंतीच्या आणि इच्छा असेल त्या गतीने
– कृषी अथवा आरोग्य सेवा
– शिक्षण, व्यावसायिक शिक्षण किंवा प्रशिक्षणाच्या गरजा
– लहान उद्योगांचा विकास
– नवीकरणीय ऊर्जा किंवा विद्युत पारेषण, आणि
– संस्थात्मक क्षमतांची निर्मिती
पूर्वीप्रमाणेच आमचे अनुभव आणि कौशल्ये केनियाच्या लाभासाठी उपलब्ध आहेत.
आदरणीय महोदय, आपल्या दोन्ही देशांमध्ये प्रगतीशील आर्थिक आणि वाणिज्यिक नाते कायम राहिले आहे. मात्र हे तात्पुरते किंवा सौदेबाजी करणारे नाते नाही. काळाच्या कसोटीवर हे नाणे खरे सिद्ध झाले आहे, ज्याची पायाभरणी समान मूल्ये आणि अनुभवांवर झाली आहे.
मित्रांनो,
भारत आणि केनिया या दोन्ही देशांमध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. दोन्ही देश शिक्षणाला अतिशय महत्व देतात. स्वाहिली भाषेत एक म्हण आहे, एलिमुंबिलाअमाली, कमानताबिलाअसाली (अर्थात अभ्यासाशिवाय ज्ञान म्हणजे मेणाशिवाय मध असल्यासारखे आहे.) केनिया आणि भारत, दोन्ही देशांनी विश्व शांतीसाठी काम केले आहे. आम्ही केवळ गरीबांच्या कल्याणासाठी नाही तर आपल्या धरती मातेच्या संरक्षणासाठी मदत करण्यासाठीही इतर विकसनशील देशांसोबत आपले एकत्रित प्रयत्न करू शकतो.
आम्ही नैसर्गिक संपत्तीच्या संरक्षणासारख्या महत्वाच्या क्षेत्रात परस्परांकडून शिकू शकतो. म्झी जोमो केन्याता यांनी सांगितल्याप्रमाणे “आमची मुले भूतकाळातील नायकांबद्दल शिकू शकतात. स्वत:ला भविष्याचा निर्माता बनविणे, हे आमचे काम आहे. ”
राष्ट्रपती उहुरू केन्याता, आदरणीय अतिथी, आता मी काही इच्छा व्यक्त करू इच्छितो,
केनियाचे राष्ट्रपती, आदरणीय राष्ट्रपती उहुरू केन्याता यांचे आरोग्य आणि समृद्धीसाठी,
केनियाच्या नागरिकांच्या, आमच्या शेजाऱ्यांच्या प्रगती आणि समृद्धीसाठी,
भारत आणि केनियातील अनंत मैत्रीसाठी…
M.Pange/B.Gokhale