पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्र सरकारच्या सेवेतल्या सर्व सचिवांची भेट घेतली. मंत्रिमंडळातले मंत्री आणि स्वतंत्र प्रभार असणारे राज्यमंत्रीसुध्दा या बैठकीला उपस्थित होते.
यावर्षी जानेवारी महिन्यात पंतप्रधानांसमोर सचिवांच्या 8 गटांनी सादर केलेल्या अहवालांचा पाठपुरावा म्हणून मुख्य सचिवांनी आतापर्यंत झालेल्या कामाचे संक्षिप्त सादरीकरण केले.
8पैकी 2 गटांच्या प्रतिनिधींनी आपापल्या गटांनी केलेल्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबतच्या सद्यस्थिती संदर्भातील सादरीकरण यावेळी केले.
सचिवांचे 10 नवे गट तयार करण्यात आले असून ते नोव्हेंबर अखेरपर्यंत प्रशासना संदर्भातील विविध मुद्दयांबाबतचे अहवाल सादर करणार आहेत. पूर्वीच्या गटांनी विशिष्ट संकल्पनांवर आधारित काम केले होते. या गटांचे लक्ष्य प्रामुख्याने कृषी, ऊर्जा, परिवहन अशा विविध क्षेत्रांवर असणार आहे.
सचिवांशी संवाद साधताना या जानेवारी महिन्यात आठ संकल्पनांवर आधारित गटांनी केलेल्या कामाचे पंतप्रधानांनी कौतुक केले. आपण अभ्यास करत असलेल्या संबंधित क्षेत्रात केंद्र सरकारने केलेल्या कार्याचा कठोर आढावा घ्यावा, अशी विनंती पंतप्रधानांनी केली. संशोधनासंबंधी मुद्दयांमध्ये युवा अधिकाऱ्यांना सहभागी करुन घ्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
लोकसंख्या शास्त्रीय विभागणी संदर्भात बोलतांना आपल्या शिफारशींमध्ये सर्व गटांनी देशातील 800 दशलक्ष युवकांच्या क्षमतांना प्राधान्याने विचारात घ्यावे, असे पंतप्रधानांनी सांगितले. केंद्र सरकारच्या सचिवांचे पथक देशाच्या नागरिकांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने धोरणे तयार करण्यास अनुभवी आणि तज्ञ आहे, असे ते म्हणाले. आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.
B.Gokhale/M.Pange/Anagha
Held productive & enriching interactions on policy issues with Secretaries to the GoI. https://t.co/nclDhHrKTH
— Narendra Modi (@narendramodi) October 27, 2016