Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

केंद्र सरकारच्या द्विवर्ष पुर्तीनिमित्त आयोजित “ एक नयी सुबह “ या कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण

केंद्र सरकारच्या द्विवर्ष पुर्तीनिमित्त आयोजित “ एक नयी सुबह “ या कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण


देशवासियांनो नमस्कार !

दोन वर्षापूर्वी देशाने आमच्यावर एक नवीन जबाबदारी सोपवली आणि लोकशाहीचे असे महात्म्य आहे की लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचे निरंतर आकलन झाले पाहिजे . उणीवा असो, चांगल्या बाबी असो त्याचा जमा खर्च मांडला गेला पाहिजे. दोन वर्षाच्या कार्यकालावर नजर टाकली असता हे लक्षात येते की जे लक्ष्य निश्चित करून आपण वाटचाल सुरु केली होती तिथपर्यंत आपण पोहचू शकलो आहोत की नाही , ज्या दिशेने आपण मार्गक्रमण करत आहोत ती दिशा योग्य आहे की नाही , ज्या उद्देशाने आपण वाटचाल सुरु केली आहे तो उद्देश पूर्ण झाला की नाही .

आणि जेव्हा दोन वर्षांच्या जमाखर्चाचा आढावा घेतो तेव्हा आगामी दिवसांसाठी ना केवळ सरकारमध्येच, देशवासियांच्या मनामध्ये देखील आत्मविश्वास निर्माण होतो. मागील अंदाजे १५ दिवसांपासून मी पाहतो आहे की देशामध्ये भारत सरकारच्या प्रत्येक कामाचे बारकाईने मुल्यांकन होत आहे.प्रत्येक पैलू बारकाईने पहिला जात आहे आणि आज देशवासियांसमोर मी मोठ्या समाधानाने उभा आहे. इतक्या बारकाईने पडताळणी झाल्यानंतर आम्ही एक नवीन आत्मविश्वास प्राप्त करू शकलो आहोत नवीन उत्साह प्राप्त करू शकलो आहोत आणि मायबाप जनतेचा आशीर्वाद दिवसागणिक वाढतच चालला आहे त्यामुळे आमचा काम करण्याचा उत्साहदेखील वाढतच चालला आहे. आता मी अशा लोकांचे तर काहीच करू शकत नाही जे केवळ राजकीय कारणांमुळे विरोध करत आहेत आणि लोकशाहीमध्ये हि एक स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. परंतु, मागील १५ दिवसांमध्ये देशाने २ बाबी तर स्पष्टपणे पहिल्या आहेत, एका बाजूला विकास आहे तर दुसरीकडे विरोधवाद आहे . विकासवाद आणि विरोधावादामध्ये जनता खरे खोटे करून काय सत्य आहे किती सत्य आहे हे बरोबर शोधून काढेल .

अनेक विषयांवर चर्चा झाली आहे आणि म्हणूनच मी त्या गोष्टींचा पुनरुच्चार येथे करू इच्छित नाही, परंतु ह्या गोष्टीची काळजी नक्कीच वाटते. मुद्द्यांच्या आधारे, तथ्यांच्या आधारे प्रत्येक कामाचे मुल्यांकन होणे लोकशाहीमध्ये गरजेचे आहे . परंतु आपण अशी कोणतीच चूक करता कामा नये ज्यामुळे देश विनाकारण निराशेच्या छायेत जाईल . जिथे तथ्यांचा आधार नसतो अशा ठिकाणी अशा गोष्टी नजरेस पडतात परंतु यावर जेव्हा परिस्थिती हावी होते तेव्हा कधी कधी ती चिंतेची बाब बनते .

मागील सरकारांच्या कामाच्या आधारे चालू सरकारच्या कामाचा जमाखर्च मांडला जातो . पूर्वी काय होत होते आता काय होत आहे याचा तुलनात्मक अभ्यास होत आहे . आपण मागील सरकारच्या गोष्टीकडे संपूर्णपणे नजरंदाज करून अचानकपणे एखाद्या गोष्टीची चर्चा केली तर कदाचित योग्य मुल्यांकन होणार नाही . माझे सरकार जर आज असे म्हणाले की कोळशाच्या समस्येवर आम्ही उपाययोजना केली आहे तर असा तुम्ही विचार करा की अचानक सर्वोच्च न्यायालयाने कोळशाच्या खाणींचे परवाने रद्द केले आणि वीजनिर्मिती कारखान्यांमध्ये कोळशाची समस्या निर्माण झाली अशा वेळी जेव्हा संपूर्ण सरकारची कोळसा घोटाळ्यामुळे देशभरात नाचक्की झाली असताना काय होईल?
दोन वर्ष पूर्वी कोणतेही वृत्तपत्र , कोणताही दिवस , कोणताही टी व्ही , कोणतीही वाहिनी , कोणतीही चर्चा , कोणतेही भाषण असे नसेल जिथे या इतक्या मोठ्या भ्रष्टाचाराबाबत वाच्यता झाली नसेल, परंतु आता जर मी सांगितले की पारदर्शक पद्धतीने लिलाव केला तर कोणीहि त्यावर कुठलीही शंका उपस्थित केलेली नाहि . देशाच्या खजान्या मध्ये लाखो करोडो रुपये येणे आता निश्चित आहे. राज्यांच्या खजान्यांमध्ये देखील पैसे जात आहेत. एवढेच नाही जिथे कोळशाच्या खाणी आहेत तिथे आपले अधिकाधिक आदिवासी समाजातील लोक राहतात त्यांच्या कल्याणासाठी यामधून निधी बाजूला ठेवण्यात येणार आहे .

या सर्व गोष्टी जर मी अशाच सांगितल्या तर वाटेल की चला मोदिजींनी काम केले , परंतु याचे खरे सामर्थ्य तेव्हा लक्षात येते जेव्हा आपण विचार करतो की सर्वोच्च न्यायालयाला इतका मोठा निर्णय का घ्यावा लागला, कोळशामध्ये इतका मोठा भ्रष्टाचार का झाला, त्या कोणत्या पद्धती होत्या आणि त्या सर्वामधून देशाला बाहेर काढणे…….तेव्हा कुठे लक्षात येते की किती मोठे काम झाले आहे किती महत्वाचे काम झाले आहे . म्हणूनच जेव्हा आपण मागील सरकारच्या दिवसांचे स्मरण करून वर्तमान निर्णयांचे परीक्षण केले तर आपल्याला लक्षात येईल की किती परिवर्तन घडून आले आहे .

या देशाला भ्रष्टाचाराने वाळवी सारखे पोखरून आतून पोकळ करून बरबाद केले आहे याबाबत कोणाचे हि दुमत नाही . आपली सर्व स्वप्न धुळीला मिळवण्याची ताकद जर कोणत्या वाळवीत असेल तर तो आहे भ्रष्टाचार.

आणि मी भ्रष्टाचाराविरुद्ध एकूणच अशापद्धतीने एका मागून एक पावलं उचलून हिंदुस्थानच्या जनतेच्या हृदयाला आंदोलित करणाऱ्या या मुद्याला प्रकाशात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि जेव्हा तुम्ही याच्या खोलात जाल तेव्हा तुम्ही अचंबित व्हाल . तुम्ही कल्पना करू शकता का की देशाचा कारभार कशा प्रकारे सुरु आहे . अशी मुलगी जिचा कधी जन्मच झाला नाही देशाच्या सरकारी दस्तावेजामध्ये ती मुलगी विधवा पण होते आणि त्या विधवा मुलीला पेन्शन देखील मिळायला लागते आणि वर्षानुवर्षे ही पेन्शन दिली जाते आणि कधीही या भ्रष्टाचाराची चर्चा देखील होत नाही .

आम्ही जेव्हा थेट लाभ हस्थांतरण योजनेच्या माध्यमातून स्वयंपाकाच्या गॅसचे अनुदान थेट लाभाधारकांच्या खात्यात जमा करायला सुरुवात केली, त्याला आधार सोबत जोडले जनधन खात्यासोबत त्याला जोडले तेव्हा त्याचे अद्भूत परिणाम समोर आले . देशवासियांना हे ऐकून आश्चर्य वाटेल की केवळ स्वयंपाकाच्या गॅसमध्ये इतकी बनावट नावे समोर आली , इतक्या बनावट नावांवर सिलेंडर होती त्याची चर्चा झाली या सर्व गळतीला आम्ही बंद करण्याचा प्रयत्न केला . अंदाजे तुमच्या हक्काचे १५ हजार कोटी आम्ही वाचवले .

कोणाच्या इथे धाड पडली आणि कोणाच्या इथून ५० कोटी रुपये जप्त करण्यात आले तर आपल्या देशात त्या घटनेची लगेच ठळक बातमी होते . ५० मिळाले तर…… कठोर मेहनत करून योजना तयार करून देशाचे जवळ जवळ १५ हजार कोटी वाचवायचे आहेत . मी असे म्हणतो की माझा देश माझ्या या कामासाठी सांगेल की, मोदिजी तुम्ही योग्यच करत आहात .

तुम्हाला आश्चर्य वाटेल शिधापत्र ज्यामुळे गरिबांना स्वस्तामध्ये अन्नधान्य मिळते , रॉकेल मिळते त्यांची गरज भागते . आम्ही जरा पडताळणी करायला सुरुवात केली ह्याचा कारभार कसा सुरु आहे कारण गरीबाच्या ताटात जे तांदूळ जातात त्याला तर असेच वाटते की मला ३ रुपयांमध्ये तांदूळ मिळाले , २ रुपयांमध्ये मिळाले, १ रुपयांमध्ये मिळाले परंतु त्या गरिबाला तर हे महिताच नसते की त्याच्या ताटात जेव्हा हे तांदूळ पोहोचतात तेव्हा त्या एका किलो तांदळासाठी भारत सरकारच्या तिजोरीतून २७ रुपये जातात . तेव्हा कुठे त्याच्या ताटात १ रुपया, २ रुपये, ३ रुपयांमध्ये तांदूळ मिळतात आणि ते शिधापत्रिकेचे असतात . आता तर सध्या मी ह्यावर काम करत आहे परंतु आतापर्यंत जितके काम झाले आहे त्यामध्ये आम्ही १ कोटी ६२ लाख बनावट शिधापत्रिका शोधून काढल्या आहेत . १ कोटी ६२ लाख बनावट शिधापत्रिका .याचाच अर्थ त्या शिधापत्रिकांवर जे काही मिळत होते ते कोणाच्या तरी खिशात जात होते .कुठे तरी बेईमानी होत होती .

हरियाणा सरकारने एक अभियान चालविले , आमच्या या आधार योजने अंतर्गत ,जनधन योजने अंतर्गत , मोबाईल जोडणी अंतर्गत . मला सांगण्यात आले की ,एका छोट्या राज्यात रॉकेल…..बनावट शिधापात्रीकेद्वारे रॉकेल घेणाऱ्यांची संख्या सहा लाख निघाली . या सहा लाख लोकांच्या नावे अनुदानित रॉकेल जात होते. ते रॉकेल कुठे जात असेल, डीझेलमध्ये मिसळण्यासाठी जात असेल, ते प्रदूषण पसरवण्यासाठी जात असेल, एखाद्या रासायनिक कारखान्यात जात असेल आणि सरकारच्या तिजोरीतून पैसे मात्र गरिबाच्या नावावर जात होते .

१ कोटी ६२ लाख शिधापत्रिका , ६ लाख रॉकेलचे , आम्ही या योजने अंतर्गत एका राज्यात ५४० कोटी वाचवले , ५४० कोटी रुपये कसले तर बनावट शिक्षक , पगारासाठी, गणवेशासाठी, शाळेच्या माध्यान्ह भोजनासाठी जात होते. शिक्षक आहेत तर शाळा तर असणारच. हे सगळ तपासणी केल्यानंतर उघडकीस येत आहे . आणि ह्या सर्वाचा निकाल काय समोर आला ह्याचा मी वरचेवर हिशोब मांडला तर तो अंदाजे ३६००० कोटी रुपये इतका समोर आला आहे , ही सर्व गळती आता थांबली आहे . भ्रष्टाचार आता थांबला आहे आणि हि रक्कम एका वर्षाची होती आता दरवर्षी इतकी रक्कम वाचणार आहे . आता सुरुवात झाली आहे एका नवीन पहाटेची .

काही लोक म्हणतात मोदिजी तुम्ही इतके परिश्रम करता, इतके काम करता तरी देखील आपला इतका विरोध का होतो ? रोज आपल्या विरुद्ध इतकी वादळ का उठतात ? तुम्ही तुचे संवाद धोरण नीट करा . प्रसार माध्यमाशी संवाद साधा . मला खूप लोक समजावतात . आता मी त्यांना कसे समजावू की ज्या लोकांच्या खिशात ३६ कोटी रुपये जात होते ते तर मोदिजींनी बंद केले अशावेळी मोदी शिव्या नाही खाणार तर आणखी काय खाणार? लूट माजवणाऱ्यांना किती त्रास होत असेल याचा अंदाज आपण सहजपणे लावू शकतो. मी असे कितीतरी विषय सांगतो ज्यांवर दोन वर्षात आम्ही योग्य प्रकारे पुढाकार घेतला आहे आणि हे परिणाम आता पाहायला मिळत आहेत.

तुम्ही बघा एलईडी दिवे आधी किती रुपयाला विकले जायचे आणि आता किती रुपयाला विकले जात आहेत . कुठे २००, २५०, ३०० रुपयांपर्यंत एलईडी दिव्यांची किंमत होती, आज ती ६०, ७०, ८० पर्यंत आली आहे . जर आपल्या देशात आपण कुठे वीजनिर्मिती कारखाना सुरु करू, तर आपल्या देशात आर्थिक विषयांवर लिहिणारे जितके वर्तमानपत्र आहेत ते ठळक बातमी बनवतील की मोदिजींनी खूप मोठे स्वप्न बघितले आहे, १ लाख कोटी रुपयांच्या भांडवलासह वीजनिर्मितीचा नवीन कारखाना सुरु करणार आहेत , अस होणार आहे तसं होणार आहे, अमुक तमुक, कोणी तर असे देखील लिहितील की मोदी तर फक्त बोलताहेत पैसे कुठून येणार, १ लाख कोटी कुठून येणार, याचाच अर्थ काय तर सगळ्या गोष्टी होतील परंतु ह्याची चर्चा नाही होणार की एलईडी दिव्यांच्या अभियानासाठी ज्या ५०० शहरांची आम्ही निवड केली आहे , त्या ५०० शहरांमध्ये जर १०० टक्के एलईडी दिवे पोहोचवायला जर आणि यशस्वी झालो तर आणि होणारच आहोत, ज्या दिवशी ते उद्दिष्ट पूर्ण होईल देशात २० हजार मेगावॅट वीज वाचणार आहे . २० हजार मेगावेट वीज बचतीचा अर्थ आहे १ लाख कोटी रूपये जे वीजनिर्मिती कारखाना उभारण्यासाठीचे भांडवल होते त्याची बचत होणार आहे , परंतु ६० – ७० रूपयांचा एलईडी दिवा हा काही बातमीचा विषय होऊ शकतो का ? यात काय बातमी आहे आणि म्हणूनच आम्ही जे जलद गतीने परिवर्तन आणत आहोत आणि जे बदल देश आज अनुभवत आहे . एका पाठून एक नवीन योजना, ज्याची कोणी कधी कल्पना केली असेल ते सर्व बदल आज देश अनुभवत आहे . तुम्ही कितीतरी निवडणुका पहिल्या आहेत, निवडणुकीत हीच चर्चा होती की १२ सिलेंडर हवे की ६ . मोठे मोठे नेता घोषणा करायचे आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात ठळक बातमी छापून यायची की आता ९ नाही तर १२ सिलेंडरवर मिळणार अनुदान आणि ९ सिलेंडर ते १२ सिलेंडरच्या नावावर मते मागितली जायची. ते दिवस आठवा जेव्हा हिंदुस्थानच्या संसद सदस्यांना २५ स्वयंपाक गॅसचे कुपन मिळायचे. मला चांगल्या प्रकारे लक्षात आहे की, आमच्या इथे अहमदाबाद विमानतळावर एक अधिकारी होते आणि ते प्रत्येक खासदाराला ओळखत होते कारण त्यांचे विमानतळावर येणे जाणे होते. ते प्रत्येक खासदाराला सांगायचे की मला १ गॅसच कुपन द्या, माझा मुलगा वेगळा राहतो आहे आणि त्याच्यासाठी १ गॅसच कुपन हवे आहे आणि पूर्ण वर्षभर एकही खासदार त्याला एकपण देऊ शकला नाही . एका गॅस जोडणीचे दिवस आपण लक्षात ठेवायला हवेत. ही मी ५ वर्ष १० वर्षाआधीची गोष्ट सांगत आहे काही खूप वर्षापूर्वीची नाही. ज्या देशात हि चर्चा होते आणि ज्या देशाचे पंतप्रधान बोलण्याबोलण्यामध्ये देशाच्या जनतेला विनंती करतात की तुम्ही गॅसवरील अनुदान सोडून द्या आणि मी ह्या देशाच्या जनतेला प्रणाम करतो १ कोटी १३ लाख कोटी लोकांनी आपले अनुदान सोडून दिले आहे, हे परिवर्तन नाही ? हे जण मनातील परिवर्तन नाही ? हे देशामधील परिवर्तन नाही ? देशाच्या विकासासाठी जनभागीदारीचे याहून मोठे उदाहरण काय असू शकते ? हे देशाने अनुभवले आहे . आणि आम्ही हे देखील हे ठरवले आहे की हे जे गॅसवरील अनुदान सोडले आहे, गरीबाच्या घरी आई लाकडाची चूल पेटवते आणि दिवसभर जेवण बनवताना जवळ जवळ ४०० सिगरेट इतका धूर तिच्या शरीरात जातो . ४०० सिगरेट इतका धूर…. त्या आईची काळजी कोण घेणार आणि आम्ही मागील एका वर्षात अंदाजे ३ कोटींहून अधिक कुटुंबांना नवीन स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी दिली आहे . स्वतंत्र भारतात एका वर्षात इतका मोठ काम कधीच नाही झाले आणि आम्ही निश्चय केला आहे की आगामी ३ वर्षांमध्ये ५ कोटी कुटंब ज्यांच्याकडे आता स्वयंपाकाचा गॅस नाही त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचायचे आहे. कारण ती गरीब कुटुंब आहेत. मध्यम वर्गापर्यंत तर स्वयंपाकाचा गॅस पोहोचला आहे. निम्न मध्यम वर्गापर्यंत मात्र अजून पोहोचलेला नाही. झोपडीमध्ये राहणाऱ्यांचा तर इथे प्रश्नच येत नाही परंतु आम्ही विडा उचलला आहे . हे कस शक्य होईल हे तेव्हा लक्षात येईल की ९ सिलेंडर १२ सिलेंडर यासाठी भांडण व्हायची, हे तेव्हा लक्षात येईल जेव्हा १ संसद सदस्याला २५ अनुदानित गॅस सिलेंडरची कुपन मिळण्याचा त्याला गर्व वाटायचा त्या दिवसांच्या समोर आता जेव्हा ५ कोटी गॅस जोडणी दिल्या जातील, हे आहे परिवर्तन. आणि म्हणूनच ह्याची उंची बघा, ह्याचा अवाका बघा. गती बघा, लाभधारक बघा तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की गरिबांच्या कल्याणासाठी एका पाठोपाठ पावलं उचलली आहेत .

आपला शेतकरी, आपण कधीतरी फक्त बोलतो की आता पाउस पडला नाही, परंतु आपण धरणी मातेचे काय हाल केले आहेत यावर कोणी चर्चाच करत नाही. बिचाऱ्या शेतकऱ्याचे नुकसान झाले तर आपण बोलतो की बियाणे खराब होते किंवा पाऊस नाही पडला. परंतु आपण ही बाब लक्षात नाही घेत की आपण धरणी मातेची वाट लावली आहे. आपण आपल्या ह्या आईवर इतके अत्याचार केले आहेत की आता आपल्या धरणीला वाचवण्याची वेळ आली आहे. आणि म्हणूनच ह्यासाठी आम्ही मृदा आरोग्य कार्डचे मोठे अभियान सुरु केले आहे. जमिनीचे आरोग्य कसे आहे ? मातीमध्ये कोणते गुण आहेत ? कोणत्या उणीवा आहेत ? कोणत्या पिकासाठी ती जमीन योग्य आहे ? कोणते औषध लागेल ? कोणते खत लागेल ? मनुष्य ज्याप्रकारे रक्त तपासतो , लघवी तपासतो, मधुमेह आहे की नाही ते पाहतो , जमिनीचे देखील हि त्याच प्रकारची तपासणी करण्याचे काम सरकार करत आहे आणि देशातल्या शेतकऱ्यांपर्यंत आम्ही ही बाब मोठ्याप्रमाणात पोहोचवली आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी आज आपल्या मृदा कार्डाच्या माध्यमातून हे ठरवतात की पिक पध्दतीत कशाप्रकारे बदल केले पाहिजे.

माझे सांगण्याचे तात्पर्य हे आहे की देशातल्या सामान्य माणसाच्या आयुष्यात परिवर्तन आणण्याच्या दिशेने आम्ही अशी अनेक कामे केली आहेत आणि हे त्यातील एक महत्वपूर्ण काम आहे. आणि मला हे मान्य आहे की लोकशाही ही एक मोठी ठेव आहे . लोकशाहीची पहिली अट आहे की शासनकर्त्याच्या मनात आपल्या जनतेप्रती अप्रतिम विश्वास असला पाहिजे . आम्ही आतापर्यंत सरकारं चालवली आहेत , जनतेवर अविश्वास करून . मी एक दिवस आयकर अधिकाऱ्यांसोबत बैठक केली होती . मी विचारले तुम्ही व्यापाऱ्यांना चोर का समजता ? देश असा चालणार आहे का ? ही संपूर्ण पद्धत चुकीची आहे , विचार चुकीचे आहेत. आम्ही बदल करायला सुरुवात केली .

आपल्या इथे जर कोणी पदवीधारक असेल आणि त्याला नोकरीसाठी कुठे अर्ज करायचा असेल आणि त्यासाठी त्याला दाखला हवा असेल तर त्याला कोणत्या नगरसेवक, आमदार, खासदाराच्या घराबाहेर रांगेत उभे राहावे लागत होते आणि तुमचा चेहरा पण न बघता त्याचा एखादा छोटा मुलगा घरी बसून ठप्पा मारून द्यायचा. तुम्हाला तुम्ही पदवीधारक असल्याचा दाखला द्यायचा. जर हेच करायचे आहे तर आवश्यकता का आहे, आम्ही सांगितले काही गरज नाही, लोकांना सांगितले तुम्ही तुम्हालाच दाखला दया आणि सरकारी कार्यालयात पाठवा. आणि जेव्हा अंतिम ऑर्डर येईल तेव्हा तुम्ही मूळ प्रमाणपत्र सादर करा. आपल्याला लोकांवर विश्वास करायला हवा. हा देश त्यांचापण आहे .

आपण जर का एकदा लोकांवर विश्वास केला तर तुम्हला बदल दिसून येईल. मी एक दिवशी सुरेश प्रभूंना सांगत होतो, की सुरेश कधी तरी अशी पण घोषणा कर की अमुक एका तारखेला, अमुक एका मार्गावर ट्रेनमध्ये एकही तिकीट तपासनीस असणार नाही. बघा ह्या देशातले लोक असे आहेत आपण विश्वास केला पाहिजे कधी हे पण करून बघ . आम्ही प्रयत्न करत आहोत, मी आपल्या देशात जी अधिकारशाही सुरु आहे ती हळू हळू बंद करण्याचे भरपूर प्रयत्न करत आहे.

ही लोकशाही आहे, इथे जनता जनार्दनाची ताकत सर्वाधिक असायला हवी आणि आम्ही त्या दिशेने एका मागून एक पावलं उचलत आहोत . आता आम्ही एक निर्णय घेतला आहे आणि तो देशतील युवकांच्या दृष्टीने खूप महत्वपूर्ण निर्णय आहे . आपल्या देशामध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार कुठे होत असेल तर तो आहे नोकरीमध्ये. एखादा तरुण लेखी परीक्षा देतो , तिथपर्यंत अधिक चिंतेची बाब नसते बिचारा परीक्षा देतो आणि त्यातही नंतर मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुलाखतीसाठी जेव्हा त्याला बोलावले जाते तेव्हा त्याच्या मनात आशा पल्लवित होतात. तेव्हा तो मुलाखतीमध्ये काय प्रश्न विचारतील ? कोणते कपडे घालून जाऊ ? याची चिंता नाही करत. तो विचार करतो मुलाखतीचे पत्र आले आहे. कोणाचे तरी शिफारशीचे पत्र मिळेल का ? कोणी मला मदत करणारा मिळेल का ? आणि कोणीतरी दलाल त्याला गाठतो , आणि त्याला सांगतो की बघ तुला मुलाखतीचे पत्र आले आहे आणि तुला ही नोकरी हवी असेल तर अमुक एक रक्कम द्यावी लागेल . भ्रष्टाचाराचा हा खेळ मुलाखतीच्या आसपासच सुरु आहे . आम्ही निर्णय घेतला की भारत सरकारच्या श्रेणी ३ आणि श्रेणी ४ च्या कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही मुलाखत होणार नाही . मेरीट लिस्ट संगणक तयार करेल की आधी इतक्या लोकांना नोकरी दिली जावी . दोन निर्णय चुकतील देखील, परंतु देशाला जी वाळवी लागली आहे ती ह्यामुळे नष्ट तरी होईल . आणि म्हणूनच एका पाठोपाठ आम्ही असे निर्णय घेत आहोत आणि हे निर्णय नवीन विचारांनी प्रेरित होऊन घेत आहोत.

आणि हेच सर्वात मोठे परिवर्तन आहे की देशामध्ये एक नवीन विश्वास जागृत करणे, संकल्पासोबत चालणे आणि सामान्य माणसाच्या आयुष्यातील आशा आकांक्षा पूर्ण करण्याचे प्रयत्न करणे . सरकारच्या २ वर्षाच्या कामगिरीबद्दल जर मला बोलायचे असेल तर दूरदर्शन वाहिनीला संपूर्ण आठवडाभर इथे पूर्ण दिवस माझे भाषण दाखवावे लागेल . इतक्या सगळ्या कामगिरी परंतु मी इथे कामगिरीनं बाबत चर्चा करायला आलेलो नाही . मी तुम्हाला विश्वास द्यायला आलो आहे की देशवासीयांनी जा=ऑ आमच्यावर विश्वास टाकला आहे त्याला सार्थ ठरवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू . आणि देशाने बघितले आहे की आम्ही चुकीच्या हेतूने कोणताही निर्णय घेतला नाही. मेहनत करण्यात कुठेच कसूर केली नाही आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देवून, सर्वसामान्य जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन आम्ही स्वतःला कामात जुंपले आहे .

टीम इंडियाची कल्पना घेऊन आम्ही वाटचालीला सुरुवात केली आहे . खांद्याला खांदा लावून राज्यांना देखील या कामात सोबत घेतले आहे . परंतु हे तर नक्की आहे ज्यांनी आतापर्यंत खाबुगिरी केली आहे त्यांना तर त्रास होणारच आहे , समस्या येणारच आहेत . कोणी पैसे खाल्ले, केव्हा खाल्ले हा माझा विषय नाही परंतु हा देशाचा पैसा आहे, गरीबांचा पैसा आहे हा कोणा दुसऱ्याकडे जाऊ देणार नाही. ह्या कामात मी लागलो आहे .ज्यांना त्रास होतोय होऊ दे, आम्ही देशासाठी काम करत राहू . देशाच्या जनतेने आशीर्वाद देत रहावे . आज ह्या निमित्ताने पुन्हा एकदा तुम्हा सर्वांमध्ये येण्याची संधी मिळाली, माझी मत मांडण्याची संधी मिळाली त्यासाठी मी तुमचा खूप खूप आभारी आहे .

धन्यवाद .

S.Mhatre/B.Gokhale