Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

केंद्रीय मंत्रिमंडळाने वैद्यकीय उपकरणे क्षेत्रासाठीच्या धोरणाला दिली मंजुरी


नवी दिल्‍ली, 26 एप्रिल 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज राष्ट्रीय वैद्यकीय उपकरण धोरण 2023 ला मंजुरी दिली.

भारतातील वैद्यकीय उपकरणे क्षेत्र हे भारतीय आरोग्य सेवा क्षेत्राचा एक आवश्यक आणि अविभाज्य घटक आहे.  व्हेंटिलेटर, रॅपिड अँटीजेन टेस्ट किट्स, रिअल-टाईम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन -RTPCR किट्स ,  इन्फ्रारेड (IR) थर्मामीटर, वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे (PPE) किट आणि N-95 मास्क यांसारख्या वैद्यकीय उपकरणे आणि नैदानिक  किट्सचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून कोविड-19 महामारीविरुद्धच्या देशांतर्गत आणि जागतिक लढाईत भारतीय वैद्यकीय उपकरण क्षेत्राचे योगदान अधिक ठळकपणे दिसून आले आहे.

भारतातील वैद्यकीय उपकरणे क्षेत्र हे उदयोन्मुख  क्षेत्र आहे जे जलद गतीने  वाढत आहे. 2020 मध्ये भारतातील वैद्यकीय उपकरणे क्षेत्राच्या बाजारपेठेचा आकार 11 अब्ज डॉलर्स (अंदाजे 90,000 कोटी रुपये ) होता असा अंदाज आहे आणि जागतिक वैद्यकीय उपकरणांच्या बाजारपेठेतील त्याचा वाटा 1.5% असल्याचा  अंदाज आहे. भारतीय वैद्यकीय उपकरणे क्षेत्राची घोडदौड सुरु असून स्वयंपूर्ण बनण्याची आणि सार्वत्रिक आरोग्य सेवेचे उद्दिष्ट गाठण्यात योगदान देण्याची त्यात प्रचंड क्षमता आहे. केंद्र सरकारने याआधीच वैद्यकीय उपकरणांसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेची अंमलबजावणी सुरू केली असून हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये 4 वैद्यकीय उपकरण पार्क उभारण्यासाठी सहाय्य पुरवले आहे.

या उपायांवर आधारित, या विकासाला गती देण्यासाठी आणि या क्षेत्राची क्षमता पूर्ण करण्यासाठी एक समग्र धोरण आराखडा तयार करणे ही काळाची गरज आहे. सध्याच्या धोरणाचे उद्दिष्ट म्हणजे समन्वित पद्धतीने क्षेत्राच्या वाढीसाठी लक्ष्यीत क्षेत्रांचा सर्वसमावेशक संच निर्धारित करणे होय. दुसरे म्हणजे, वैद्यकीय उपकरण उद्योगाचे कौशल्य व्यापार प्रोत्साहन केंद्र आणि राज्य या दोन्ही स्तरांवर सरकारमधील अनेक विभागांमध्ये व्यापलेले आहे. सुसंगत पद्धतीने हस्तक्षेपांची श्रेणी एकत्रित करण्याची गरज आहे.

उपलब्धता, किफायतशीरपणा, गुणवत्ता आणि नवोन्मेष या सार्वजनिक आरोग्य उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रीय वैद्यकीय उपकरण धोरण, 2023 द्वारे वैद्यकीय उपकरण क्षेत्राची सुव्यवस्थित वाढ सुलभ करणे अपेक्षित आहे. देशांतर्गत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आणि वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन हे सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमांना पूरक आहे.

राष्ट्रीय वैद्यकीय उपकरणे धोरण, 2023 ची ठळक वैशिष्ट्ये

दृष्टिकोन : रुग्ण केंद्री दृष्टिकोनासह, विकासाचा वाढवलेला वेग आणि वैद्यकीय उपकरणे आणि नवोन्मेष क्षेत्रात, जागतिक नेतृत्व म्हणून उदयास येण्यासाठी, येत्या 25 वर्षात, जागतिक  बाजारात आपला वाटा 10-12% नी वाढवणे. या धोरणानुसार, देशातील वैद्यकीय उपकरणे क्षेत्र, आजच्या 11 अब्ज डॉलर्सपासून 2030 पर्यंत 50 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

ध्येय : या धोरणाअंतर्गत, वैद्यकीय उपकरणे क्षेत्राचा वेग वाढवण्यासाठीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, ह्या सर्वांना सहज उपलब्धता आणि सार्वत्रिकता, परवडणाऱ्या दरात उपकरणे, गुणवत्ता, रुग्ण केंद्री दृष्टिकोन आणि दर्जाबद्दल सजगता, प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहनपर आरोग्य, सुरक्षा,संशोधन आणि नवोन्मेष तसेच कुशल मनुष्यबळ, अशा उपाययोजना करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

वैद्यकीय उपकरण क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठीची धोरणे:

विविध प्रकारच्या धोरणांच्या आधारे, वैद्यकीय उपकरण क्षेत्राला सुविधा आणि मार्गदर्शन केले जाईल, ज्या अंतर्गत, ह्या क्षेत्रात, सरकार खालील प्रमुख सहा ठिकाणी मदतीसाठी हस्तक्षेप करेल:

  • नियामकतेत सुसूत्रता : संशोधन आणि व्यवसाय अशा दोन्हीमध्ये, सुलभता वाढवण्यासाठी, तसेच, रुग्णसुरक्षा आणि उत्पादनविषयक नवोन्मेषी उपाययोजना यांच्यात समतोल साधण्यासाठी, जसे की, वैद्यकीय उपकरणांचा परवाना मिळवण्यासाठी, एकल खिडकी मंजुरी योजना, सर्व भागधारक/संघटना जसे की एईआरबी, MeitY, डीएएचडी इत्यादीमध्ये सहकार्य, बीआयएस सारख्या संस्थांची भूमिका वाढवणे आणि किंमतविषयक नियंमामध्ये सूसूत्रता आणणे, अशा गोष्टी केल्या जातील.
  • पायाभूत सुविधा सक्षम करणे: राष्ट्रीय औद्योगिक मार्गिका कार्यक्रम आणि पीबीएमद्वारे, प्रस्तावित राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण 2021 अंतर्गत आवश्यक लॉजिस्टिक संपर्क व्यवस्थेसह, आर्थिक क्षेत्राच्या जवळपास जागतिक दर्जाच्या सामान्य पायाभूत सुविधांनी सुसज्ज असलेल्या मोठ्या वैद्यकीय उपकरण पार्कची उभारणी, क्लस्टर्सची स्थापना आणि गती शक्ती द्वारे बळकटीकरण, या सगळ्याद्वारे, राज्य सरकारे आणि उद्योगक्षेत्र, वैद्यकीय उपकरण उद्योगाशी अंतर्गत समन्वय साधण्यासाठी पाठपुरावा करतील.
  • संशोधन व विकास आणि नवोन्मेषाची सुविधा: हे धोरण भारतातील संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी आणि भारतातील औषधनिर्माण-वैद्यकीय-तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधन व विकास आणि नवोन्मेषासंबंधीच्या प्रस्तावित राष्ट्रीय धोरणाला पूरक ठरेल. शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमध्ये उत्कृष्टता केंद्रे, इनोव्हेशन हब, ‘प्लग अँड प्ले’ अशा पायाभूत सुविधा आणि स्टार्ट-अप्सना पाठिंबा देणे हे देखील या धोरणाचे उद्दिष्ट आहे. 
  • या क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करणे: मेक इन इंडिया, आयुष्मान भारत कार्यक्रम, हील-इन-इंडिया, स्टार्ट-अप मिशन यासारख्या अलिकडच्या  योजना आणि उपायांबरोबरच  हे  धोरण खाजगी गुंतवणूक, व्हेंचर कॅपिटलिस्टकडून अर्थसहाय्य  आणि सार्वजनिक-खाजगी  भागीदारीला प्रोत्साहन देते. 
  • मनुष्यबळ  विकास: शास्त्रज्ञ, नियामक, आरोग्य तज्ञ, व्यवस्थापक, तंत्रज्ञ यांसारखे  मूल्य साखळीतील कुशल कार्यबळ सातत्याने  पुरवण्यासाठी  धोरणात तरतूद आहे.
  • वैद्यकीय उपकरण क्षेत्रातील व्यावसायिकांचे कौशल्य आम्ही कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी विकास आणि उद्योजकता मंत्रालयातील उपलब्ध संसाधनांचा लाभ घेता येईल.
  • भविष्यकालीन वैद्यकीय तंत्रज्ञान, उच्च दर्जाचे उत्पादन आणि संशोधन यासाठी कुशल मनुष्यबळाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, भविष्यासाठी सज्ज मनुष्यबळ  तयार करण्यासाठी आणि क्षेत्राच्याउदयोन्मुख गरजा पूर्ण करण्यासाठी विद्यमान संस्थांमध्ये वैद्यकीय उपकरणांसाठी समर्पित बहु-शाखीय  अभ्यासक्रमांना हे धोरण पाठिंबा  देईल.
  • जागतिक बाजारपेठेबरोबर राहण्यासाठी वैद्यकीय तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी परदेशी शैक्षणिक/उद्योग संस्थांसोबत भागीदारी विकसित करणे.
  • ब्रँड पोझिशनिंग आणि जागरूकता निर्मिती : विभागांतर्गत क्षेत्रासाठी एक समर्पित निर्यात प्रोत्साहन परिषद स्थापन  करण्याची कल्पना धोरणामध्ये आहे, ज्यामुळे विविध बाजारपेठांमधील  प्रवेश समस्यांना हाताळणे सुलभ होईल.
  • उत्पादन आणि कौशल्य प्रणालीच्या सर्वोत्कृष्ट जागतिक पद्धतींमधून शिकण्यासाठी अभ्यास आणि प्रकल्प हाती घेणे जेणेकरून भारतात अशा   यशस्वी मॉडेल्सचा अवलंब करण्यातील  व्यवहार्यतेची चाचपणी करता येईल.
  • ज्ञानाचे आदानप्रदान  करण्यासाठी आणि संपूर्ण क्षेत्रात मजबूत नेटवर्क तयार करण्यासाठी विविध हितधारकांना एकत्र आणण्यासाठी जास्तीत जास्त  मंचांना प्रोत्साहन देणे
  • वैद्यकीय उपकरण उद्योगाला एक स्पर्धात्मक, स्वयंपूर्ण , लवचिक आणि अभिनव  उद्योग म्हणून बळकट करण्यासाठी आवश्यक मदत  आणि दिशानिर्देश हे धोरण प्रदान करेल, यामुळे  केवळ भारताच्याच नव्हे तर जगाच्या आरोग्यसेवा विषयक गरजा पूर्ण होतील  अशी अपेक्षा आहे. राष्ट्रीय वैद्यकीय उपकरण धोरण  2023 चा उद्देश रूग्णांच्या नवनवीन आरोग्य सेवा विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी रूग्ण-केंद्रित दृष्टिकोनासह वैद्यकीय उपकरणे क्षेत्राला गती देणे हे आहे.

 

* * *

Jaydevi/Sushama/Radhika/Vasanti/D.Rane