Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

केंद्रीय अर्थसंकल्पावरील पंतप्रधानांच्या टिप्पणीचा मजकूर

केंद्रीय अर्थसंकल्पावरील पंतप्रधानांच्या टिप्पणीचा मजकूर


 

आज भारताच्या विकास प्रवासातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. हा 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षांचा अर्थसंकल्प आहे. हा प्रत्येक भारतीयाचे स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प आहे. आम्ही अनेक क्षेत्रे तरुणाईसाठी खुली केली आहेत. सामान्य नागरिक, विकसित भारताच्या मोहिमेला पुढे घेऊन जाणार आहे. हा अर्थसंकल्प एक फोर्स मल्टिप्लायर म्हणजे बळ बहुगुणीत करणारा आहे. या अर्थसंकल्पामुळे बचत वाढेल, गुंतवणूक वाढेल, वापर वाढेल आणि विकासालाही गती मिळेल.  मी अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे , हा जनता जनार्दनाचा अर्थसंकल्प… लोकांचा अर्थसंकल्प दिल्याबद्दल खूप खूप अभिनंदन करतो.

मित्रांनो,

साधारणपणे अर्थसंकल्पाचा भर सरकारी तिजोरी कशी भरली जाईल यावर असतो, परंतु हा अर्थसंकल्प त्याच्या अगदी उलट आहे. मात्र हा अर्थसंकल्प, देशातील नागरिकांचे खिसे कसे भरतील, देशातील नागरिकांची बचत कशी वाढेल आणि देशातील नागरिक विकासात भागीदार कसे होतील, याचा खूप मजबूत पाया रचणारा आहे.

मित्रांनो,

या अर्थसंकल्पात सुधारणांच्या दिशेने महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत.  अणुऊर्जेमध्ये खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा निर्णय खूप ऐतिहासिक आहे.  यामुळे येणाऱ्या काळात देशाच्या विकासात नागरी अणुऊर्जेचे मोठे योगदान निश्चित होईल. या अर्थसंकल्पात रोजगाराच्या सर्व क्षेत्रांना प्रत्येक प्रकारे प्राधान्य देण्यात आले आहे.  पण मी दोन गोष्टींकडे लक्ष वेधू इच्छितो… मी त्या सुधारणांबद्दल चर्चा करू इच्छितो ज्या येणाऱ्या काळात मोठा बदल घडवून आणणार आहेत.  एक – पायाभूत सुविधांचा दर्जा दिल्याने भारतात मोठ्या जहाजांच्या बांधकामाला प्रोत्साहन मिळेल, आत्मनिर्भर भारत मोहिमेला गती मिळेल आणि आपल्या सर्वांना माहित आहे की जहाज बांधणी हे जास्तीत जास्त रोजगार देणारे क्षेत्र आहे.  त्याचप्रमाणे, देशात पर्यटनासाठी खूप संधी आहेत.  पहिल्यांदाच, 50 महत्त्वाच्या पर्यटन स्थळांवर बांधल्या जाणाऱ्या हॉटेल्सना पायाभूत सुविधांच्या कक्षेत आणून पर्यटनावर खूप भर देण्यात आला आहे.  हे, मोठे रोजगार निर्मिती क्षेत्र असलेल्या आदरातिथ्य क्षेत्रासाठी, तसेच सर्वात मोठे रोजगार क्षेत्र असलेल्या पर्यटन क्षेत्रासाठी…जे एक प्रकारे चहुबाजूनी रोजगाराच्या संधी निर्माण करणारे  क्षेत्र आहे…यांना ऊर्जा देण्याचे काम करेल.  आज देशविकास देखील आणि वारसा देखील याच मंत्राने पुढे जात आहे.  या अर्थसंकल्पातही यासाठी खूप महत्त्वाची आणि ठोस पावले उचलण्यात आली आहेत.  एक कोटी हस्तलिखितांचे जतन करण्यासाठी…दस्तावेजांसाठीज्ञान भारतम मिशन ही मोहीम सुरू करण्यात आले आहे.  तसेच, भारतीय ज्ञान परंपरेने प्रेरित एक राष्ट्रीय डिजिटल भांडार तयार केले जाईल.  म्हणजेच तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला जाईल आणि आपल्या पारंपारिक ज्ञानातून अमृत काढण्याचे काम देखील केले जाईल.

मित्रांनो,

या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी केलेली घोषणा कृषी क्षेत्रात आणि संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेत नव्या क्रांतीचा आधार ठरणार आहे.  पीएम धन-धान्य कृषी योजने अंतर्गत, 100 जिल्ह्यांमध्ये सिंचन आणि पायाभूत सुविधांचा विकास केला जाईल, किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत वाढवल्यामुळे त्यांना अधिक मदत होईल.

मित्रांनो,

आता या अर्थसंकल्पात 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्नकरमुक्त करण्यात आले आहे.  सर्व उत्पन्न गटातील लोकांसाठीही कर कमी करण्यात आला आहे.  आपल्या मध्यमवर्गीयांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे, नोकरी करणारे लोक ज्यांचे उत्पन्न निश्चित आहे, अशा मध्यमवर्गीय लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे.  त्याचप्रमाणे, जे  व्यवसायात नुकतेच आले आहेत…ज्यांना नोकऱ्या अलिकडेच मिळाल्या आहेत, त्यांच्यासाठी ही आयकर सूटएक मोठी संधी ठरणार आहे.

मित्रांनो,

या अर्थसंकल्पात उत्पादनावर 360 डिग्री लक्ष केंद्रीत आहे, जेणेकरून उद्योजक, सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग (एमएसएमई), लघु उद्योजकांना बळ मिळेल आणि नवीन रोजगार निर्माण होतील. राष्ट्रीय उत्पादन मोहीम (नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशन) पासून ते पर्यावरणीय तंत्रज्ञान (क्लीनटेक), चर्म उद्योग,पादत्राणे, खेळणी  उद्योग अशा अनेक क्षेत्रांना विशेष सहाय्य देण्यात आले आहे.  भारतीय उत्पादने जागतिक बाजारपेठेत तळपू शकतात, हा उद्देश स्पष्ट आहे.

मित्रांनो,

राज्यांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्साहवर्धक स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्यावर अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला आहे. सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग  (एमएसएमई) आणि नवउद्योग (स्टार्टअप) साठी कर्ज हमी दुप्पट करण्याची घोषणाही करण्यात आली आहे.  देशातील अनुसूचित जाती, जमाती आणि नवीन उद्योजक बनू पाहणाऱ्या महिला उद्योजकांसाठी 2 कोटी रुपयांपर्यंत कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे…. आणि ती ही हमीशिवाय.  या अर्थसंकल्पात नव्या युगाची अर्थव्यवस्था लक्षात घेऊन गीग (कंत्राटी अर्धवेळ कामगार) कामगारांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे.  प्रथमच, गीग कामगारांची नोंदणी ई-श्रम पोर्टलवर केली जाईल.  त्यानंतर या मित्रांना आरोग्य सेवा आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळणार आहे. ही,   श्रमांची प्रतिष्ठा, श्रमेव जयतेप्रती सरकारची बांधिलकी दर्शवते.  नियामक सुधारणांपासून ते आर्थिक सुधारणांपर्यंत, जनविश्वास 2.0 सारखे उपक्रम, किमान सरकार (सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप)  आणि विश्वासावर आधारित राज्यकारभाराप्रति आमची वचनबद्धता आणखी मजबूत करतील.

मित्रांनो,

हा अर्थसंकल्प केवळ देशाच्या  सध्याच्या गरजाच लक्षात घेत नाही तर भविष्यासाठी सज्ज होण्यास देखील मदत करतो.  स्टार्टअप्ससाठी डीप टेक फंड, भू-अवकाशीय  मोहीम (जिओस्पेशिअल मिशन) आणि अणुऊर्जा मोहीम (न्यूक्लियर एनर्जी मिशन) ही अशीच महत्त्वाची पावले आहेत. मी पुन्हा एकदा सर्व देशवासियांचे  या ऐतिहासिक लोक अर्थसंकल्पासाठी अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा मी अर्थमंत्रीजींचे खूप खूप अभिनंदन करतो.  खूप खूप आभार!

***

S.Kane/A.Save/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com