Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कॅनडाचे नामनिर्दिष्ट पंतप्रधान जस्टीन त्रुदाँ यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरुन संवाद साधला


लिबरल पक्षाचे नेते आणि कॅनडाचे नामनिर्दिष्ट पंतप्रधान जस्टीन त्रुदाँ यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधला. कॅनडात नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्रुदाँ यांच्या नेतृत्वाखाली लिबरल पक्षाने मिळवलेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. कॅनडाला विकास आणि समृध्दीच्या मार्गावर नेण्याची जबाबदारी त्रुदाँ यांनी समर्थपणे पार पाडावी यासाठी पंतप्रधानांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

कॅनडाला यावर्षी एप्रिलमध्ये दिलेल्या भेटीच्या वेळी त्रुदाँ यांच्याशी झालेल्या भेटीचे स्मरण पंतप्रधान मोदी यांनी करुन दिले. भारत-कॅनडातील संबंध हे लोकशाही, बहुत्ववाद, कायद्याचा अंमल आणि लोकांमधील दृढ संबंध या समान चौकटींमुळे मजबूत असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. कॅनडाबरोबरची धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आणि त्याच्या आणखी विस्तार करण्याला भारत सर्वाधिक प्राधान्य देत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

जस्टीन त्रुदाँ यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या अभिनंदनाबाबत त्यांचे आभार मानले. राजकीय, आर्थिक आणि सुरक्षा यांसह सर्व क्षेत्रातील सहकार्याचा विकास व्हावा, यासाठी पंतप्रधानांच्या सोबत कार्य करुन, हे संबंध वृध्दींगत करण्याची तीव्र इच्छा त्रुदाँ यांनी व्यक्त केली.

जस्टीन त्रुदाँ यांनी भारताला अधिकृत भेट द्यावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या निमंत्रणाचा त्रुदाँ यांनी सहर्ष स्वीकार केला. आगामी जी-20 आणि कॉप परिषदेच्यावेळी भेटण्याबाबत दोन्ही नेत्यांनी अनुमती दर्शवली.

J.Patnakar/S.Tupe