नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी 2023
कर्नाटका दा,
एल्ला सहोदरा सहोदरीयारिगे, नन्ना नमस्कारागलु! सिरिगन्नडम् गेल्गे, सिरिगन्नडम् बाळ्गे जय भारत जननीय तनुजाते! जया हे कर्नाटक माते!
‘एक भारत श्रेष्ठ भारत’साठी असा समर्पण भाव ठेवणारे राष्ट्रकवी कुवेंपू यांच्या भूमीला मी आदरपूर्वक वंदन करतो. आज मला पुन्हा एकदा कर्नाटकच्या विकासाशी संबंधित हजारो कोटी रूपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करण्याचे सौभाग्य मिळाले आहे.
आत्ता मी शिमोगा इथं आहे आणि येथूनच मला बेळगावी जायचे आहे. आज शिमोगाला स्वतःचे विमानतळ मिळाले आहे. प्रदीर्घ काळापासून या विमानतळाची मागणी होती, ती आज पूर्ण झाली आहे. शिमोगा विमानतळ अतिशय भव्य आणि खूप सुंदर आहे. या विमानतळामध्ये कर्नाटकच्या परंपरेचा आणि तंत्रज्ञानाचा अनोखा संगम दृष्टीस पडतो. आणि हे काही फक्त विमानतळ नाही, तर हे या क्षेत्रातल्या नवयुवकांच्या स्वप्नांना नवे पंख देणारे अभियान आहे. आज रस्ते आणि रेल्वेशी संबंधित अनेक प्रकल्पांचा शिलान्यास झाला आहे. प्रत्येक घरामध्ये नळाव्दारे पाणी पोहोचविण्याच्या प्रकल्पाचेही काम सुरू होत आहे. विकासाच्या प्रत्येक प्रकल्पासाठी मी शिमोगा आणि त्याच्या आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यांचे आणि इथल्या सर्व नागरिकांचे खूप-खूप अभिनंदन करतो.
मित्रांनो,
आजचा दिवस आणखी एका गोष्टीमुळे विशेष आहे. आज कर्नाटकचे लोकप्रिय लोकनेते बी.एस. येडियुरप्पा यांचा जन्मदिन आहे. त्यांना दीर्घआयुष्य लाभावे, अशी मी प्रार्थना करतो. त्यांनी आपले जीवन गरीबांच्या कल्याणासाठी, शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी समर्पित केले आहे. येडियुरप्पा यांनी अलिकडेच, गेल्या आठवड्यामध्ये कर्नाटक विधानसभेमध्ये जे भाषण केले आहे, ते सार्वजनिक जीवनात कार्य करणा-या प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देणारे आहे. यशस्वीतेची इतकी उंची गाठल्यानंतरही कशा पद्धतीने व्यवहारामध्ये नम्रता कायम राहिली पाहिजे, ही गोष्ट प्रत्येकाला,अगदी आपल्या आगामी पिढीलाही येडियुरप्पा यांचे हे भाषण, त्यांचे जीवनसदोदित प्रेरणा देणारे आहे.
मित्रांनो,
आपल्या सर्वांना माझी एक विनंती आहे, हे करणार तुम्ही? जर तुमच्याकडे मोबाईल फोन असेल, तो मोबाईल फोन काढून त्याचा फ्लॅश लाइट सुरू करावा आणि येडियुरप्पा यांचा सन्मान करावा. येडियुरप्पा यांच्या सन्मानार्थ सर्व लोकांनी, आपल्या मोबाइलचा फ्लॅश लाइट सुरू केला पाहिजे. येडियुरप्पा यांच्या सन्मानार्थ सुरू करा, 50-60 वर्ष सार्वजनिक जीवन ते जगले. आपल्या आयुष्याचा संपूर्ण तरूणपणाचा काळ एका विशिष्ट विचारासाठी त्यांनी घालवला. प्रत्येकाने आपल्या मोबाइल फोनचा फ्लॅश लाइट सुरू करा आणि आदरणीय येडियुरप्पा जींचा सन्मान करा. शाब्बास ! शाब्बास !! भारत माता की जय! ज्यावेळी मी भाजपा सरकारच्या काळामध्ये कर्नाटकची विकास यात्रा पाहतो, त्यावेळी लक्षात येते की,‘’ कर्नाटक, अभिवृद्धिया रथादा, मेले! इ रथावू, प्रगतिया पथादा मेले ! ‘’
मित्रांनो,
आपण सर्वजण जाणतो की, कोणतीही गाडी असो अथवा सरकार, जर डबल इंजिन लावले तर त्याचा वेग अनेक पटींनी वाढतो. कर्नाटकचा अभिवृद्धी रथही असाच डबल इंजिनांवर सुरू आहे. त्यामुळेच हा रथ वेगाने धावतोय. भाजपाचे डबल इंजिन सरकार आणखी एक मोठे परिवर्तन घेवून आले आहे. पहिल्यांदा ज्यावेळी कर्नाटकच्या विकासाची चर्चा होत असे, त्यावेळी ती गोष्ट फक्त मोठ्या शहरांच्या भवतालपुरतीच सीमित असे. मात्र डबल इंजिन सरकारने या विकासाला कर्नाटकातल्या गावांपर्यंत, दुस-या स्तराच्या, तिसऱ्या स्तराच्या नगरांपर्यंत पोहोचविण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू ठेवला आहे. शिमोगाचा विकास याच विचारांचा परिणाम आहे.
बंधू आणि भगिनींनो,
शिमोगाचे हे विमानतळ अशा वेळी सुरू होत आहे, ज्यावेळी भारतामध्ये विमान प्रवासाविषयी अतिशय उत्साहाचे वातावरण आहे. अलिकडेच तुम्ही पाहिले असेल की, एअर इंडियाने विमान खरेदीचा सर्वात मोठा करार केला आहे. 2014च्या आधी ज्यावेळी एअर इंडियाविषयी चर्चा व्हायची, त्यावेळी सामान्यतः नकारात्मक बातम्यांचीच चर्चा व्हायची. कॉंग्रेसच्या राजवटीमध्ये एअर इंडियाची ओळख घोटाळ्यांसाठी झाली होती. ‘तोट्यात जाणारे बिझनेस मॉडेल’ अशा स्वरूपात ही ओळख होती. आज एअर इंडिया, भारतासाठी नवीन सामर्थ्याच्या स्वरूपामध्ये विश्वामध्ये नवनवीन उंची गाठून, नवीन उड्डाणे करत आहे.
आज भारताच्या नागरी विमान प्रवासी बाजारपेठेचा डंका संपूर्ण जगामध्ये वाजत आहे. आगामी काळामध्ये हजारों, विमानांची गरज भारताला भासणार आहे. या विमानांमध्ये काम करण्यासाठी हजारो युवकांची आवश्यकता असणार आहे. आत्ता भलेही ही विमाने परदेशातून मागविण्यात येत आहेत, परंतु भारताचे नागरिक ‘मेड इन इंडिया’ च्या प्रवासी विमानातून लवकरच प्रवास करतील, आता असा दिवस फार दूर असणार नाही. नागरी उड्डाण क्षेत्रामध्ये रोजगाराच्या अनेक शक्यता निर्माण होणार आहेत.
मित्रांनो,
आज भारतामध्ये विमान प्रवासाचा जो विस्तार झाला आहे, त्याच्या मागे भाजपा सरकारची धोरणे आणि सरकारने घेतलेले निर्णय आहेत. 2014 च्या आधी देशामध्ये फक्त मोठ्या शहरांमध्येच विमानतळ बनविण्यावर लक्ष्य केंद्रीत केले होते. लहान शहरेही हवाई मार्गाने जोडली पाहिजेत, असा विचार कॉंग्रेसने कधीच केला नव्हता. आम्ही ही स्थिती बदलण्याचा निर्णय घेतला. वर्ष 2014 मध्ये देशामध्ये 74 विमानतळे होती. याचा अर्थ स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सात दशकानंतर
देशामध्ये 74 विमानतळे होती. मात्र भाजपा सरकारने आपल्या 9 वर्षांच्या काळात नवीन 74 विमानतळे बनवली आहेत. देशाच्या अनेक लहान शहरांमध्येही आता आधुनिक विमानतळे आहेत. यावरून, भाजपा सरकारचा काम करण्याचा वेग किती प्रचंड आहे, याची आपण कल्पना करू शकता. गरीबांसाठी काम करणा-या भाजपा सरकारने आणखी एक मोठे काम केले आहे. आम्ही निश्चिय केला आहे की, हवाई चप्पल घालणारी व्यक्तीही हवाई प्रवास करू शकेल. यासाठी आम्ही अतिशय कमी दरामध्ये विमान तिकीट मिळू शकेल, अशी ‘उडान’ योजना सुरू केली आहे. आज ज्यावेळी मी पाहतो की, माझे कितीतरी गरीब बंधू -भगिनी पहिल्यांदाच हवाई प्रवास करतात, त्याचा मला त्यांच्याइतकाच आनंद होतो. शिमोगाचे हे विमानतळही त्याची साक्ष बनेल.
मित्रहो,
नेचर, कल्चर आणि अॅग्रीकल्चर अर्थात निसर्ग, संस्कृती आणि शेती यांनी संपन्न असलेल्या शिमोगाच्या भूमीसाठी नव्या विमानतळामुळे विकासाची दारं उघडत आहेत. पश्चिम घाटासाठी सुप्रसिद्ध असलेल्या मले नाडूचं, शिमोगा हे प्रवेशद्वार आहे. निसर्गाचा विचार केला तर इथली हिरवाई, इथली वन्यजीव अभयारण्यं, नद्या आणि डोंगरदऱ्या अतिशय विलोभनीय आहेत. तुमच्याकडे सुप्रसिद्ध जोग धबधबा आहे, हत्तींचा अधिवास म्हणून हा भाग प्रसिद्ध आहे, सिंह धाम सारखी सिंहदर्शन सफारी आहे. अगुंबे पर्वतावरून दिसणाऱ्या सूर्यास्ताचा आनंद तर कुणाला लुटावासा वाटणार नाही! इथे एक म्हण आहे-गंगा स्नाना, तुंगा पाना. म्हणजे असं की आयुष्यात गंगा स्नान केल्याशिवाय आणि तुंगा नदीचं (तुंगभद्रेचं) जलपान केल्याशिवाय जीवन कुठे न कुठे तरीअपूर्णच राहतं.
मित्रांनो,
इथल्या संस्कृती विषयी बोलायचं झालं तर शिमोग्याच्या मधुर पाण्यानं राष्ट्र कवी कुवेंपू यांच्या शब्दांमध्ये गोडवा ओतला आहे. जगातलं एकुलतं एक संस्कृत गाव मत्तुरू याच जिल्ह्यामध्ये आहे आणि ते इथून(कार्यक्रम स्थळापासून) फार दूरही नाही. सिंगधुरु चौडेश्वरी देवी, श्रीकोटे आंजनेय, श्री श्रीधर स्वामीजींचा आश्रम अशी श्रद्धा आणि अध्यात्मिक स्थानं सुद्धा शिमोगा मध्ये आहेत. इंग्रजांच्या विरुद्ध, “येसुरु बिट्टरू-ईसुरू बिडेवू” चा नारा देणारं शिमोगातील ईसुरू गाव, आपल्या सर्वांसाठीच प्रेरणास्थान आहे.
बंधू-भगिनींनो,
निसर्ग आणि संस्कृती सोबतच शिमोग्यात कृषी वैविध्य सुद्धा आहे. हा भाग, देशातील सगळ्यात सुपिक भागांपैकी एक आहे. या भागात पिकणाऱ्या विविध प्रकारच्या पिकांमुळे, हे क्षेत्र मोठं कृषी केंद्र म्हणून नावारुपाला येत आहे. चहा, सुपारी, मसाले या पिकांपासून तऱ्हे तऱ्हेची फळं आणि भाज्या आपल्या शिमोगा आणि परिसरात पिकतात. शिमोग्याचा निसर्ग, संस्कृती आणि शेतीला चालना देण्यासाठी एका महत्त्वाच्या गोष्टीची गरज होती. ही गरज आहे दळणवळणाची, चांगल्या संपर्क व्यवस्थेची! दुहेरी इंजिन सरकार ही गरज चांगल्या प्रकारे भागवत आहे.
इथे विमानतळ बनल्यामुळे स्थानिकांना सोयीचं तर होईलच, देश परदेशातल्या पर्यटकांना सुद्धा इथे येणं खूप सोपं होईल. जेव्हा पर्यटक येतात तेव्हा ते आपल्या सोबत डॉलर आणि पौंड म्हणजेच परकीय चलन घेऊन येतात आणि त्यामुळे एक प्रकारे त्यातूनच रोजगाराच्या संधी सुद्धा निर्माण होतात.एखाद्या भागात रेल्वे व्यवस्था उत्तम असली की सोयीसुविधा आणि पर्यटनासोबतच शेतकऱ्यांना नव्या बाजारपेठा उपलब्ध होतात. शेतकरी रेल्वे मार्गानं आपली कृषी उत्पादनं कमी खर्चात देशभरातल्या बाजारपेठांमध्ये पाठवू शकतात.
मित्रहो,
शिमोगा-शिकारीपुरा–रानीबेन्नूर हा नवा रेल्वे मार्ग पूर्ण झाला की शिमोग्यासह हावेरी आणि दावणगिरी या जिल्ह्यांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण मार्गावर कुठेही, रेल्वे मार्ग ओलांडणाऱ्या वाहतुकीमुळे गतिरोध निर्माण करणारी रेल्वे फाटकं नसतील. थोडक्यात काय तर हा रेल्वे मार्ग पूर्णपणे सुरक्षित असेल आणि हाय स्पीड म्हणजे जलद गतीनं धावणाऱ्या रेल्वे गाड्या या मार्गावरून निर्विघ्नपणे मार्गक्रमणा करु शकतील. कोटेगंगौर, या ठिकाणी रेल्वे गाड्यांना थांब्यासाठी आजवर एक छोटासा फलाट होता. आता याच ठिकाणी भव्य रेल्वेस्थानक होत असल्यानं या ठिकाणाचं महत्त्व वाढेल, या स्थानकाची एकंदर क्षमता वाढेल. आता इथे चार रेल्वे मार्ग, तीन फलाट आणि रेल्वे गाडीचे डबे काही काळ वास्तव्यास ठेवता येतील असा डेपो- निवारा केंद्र उभारलं जात आहे, अशाप्रकारच्या विस्तारामुळे आता इथून देशातल्या अन्य भागांमध्ये नव्या गाड्या सुटू शकतील. हवाई आणि रेल्वे वाहतुकी सोबतच रस्तेही चांगले असतात तेव्हा तरुणाईला त्याचा खूप फायदा होत असतो. शिमोगा तर मोठं शैक्षणिक केंद्र आहे. दळणवळणाची उत्तम सुविधा असल्यामुळे, आजूबाजूच्या परिसरातील तरुण तरुणींना, विद्यार्थी मित्र मैत्रिणींना, इथे येणं सोपं होईल. यामुळे नवे व्यवसाय नवे उद्योग यांच्यासाठी सुद्धा मार्ग मोकळे होतील. म्हणजेच उत्तम संपर्क व्यवस्थेसाठी आवश्यक निगडित पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे या संपूर्ण क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ घातल्या आहेत.
बंधू आणि भगिनींनो,
आज शिमोगा आणि या परिसरातील माता भगिनींचं जीवन सुकर बनवण्यासाठी सुद्धा एक मोठी मोहीम सुरू आहे. ही मोहीम आहे प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची! शिमोगा जिल्ह्यात तीन लाखांहून जास्त कुटुंब आहेत. जलजीवन मिशन सुरू होण्या आधी इथे जवळपास 90 हजार कुटुंबांच्या घरात नळ होते. दुहेरी इंजिन सरकारनं आतापर्यंत सुमारे दीड लाख नव्या कुटुंबांना नळाद्वारे पाण्याची सुविधा पुरवली आहे. शिल्लक कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी सुद्धा अनेक प्रकल्पांवर काम सुरू आहे. गेल्या साडेतीन वर्षात कर्नाटकात 40 लाख ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे.
मित्रांनो,
भाजपाचं सरकार, गाव, गरीब आणि शेतकऱ्यांचं सरकार आहे. भाजपाचं सरकार गरिबांच्या कल्याणासाठी काम करणारं सरकार आहे. भाजपाचं सरकार माता-भगिनींचा स्वाभिमान जपणारं, माता भगिनींसाठी नवनवे पर्याय संधी निर्माण करणारं, माता भगिनींचं सबलीकरण करणारं सरकार आहे.म्हणूनच आम्ही आमच्या भगिनींना होणारा प्रत्येक त्रास दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.शौचालय असो, स्वयंपाकघर असो, स्वयंपाकाचा गॅस असो, नळाद्वारे पाणी असो, या सुविधांच्या अभावामुळे सगळ्यात जास्त त्रास आमच्या माता- भगिनी-कन्या यांनाच होत होता. आज हा त्रास आम्ही दूर करत आहोत. जल जीवन मिशनच्या माध्यमातून आमचं दुहेरी इंजिन सरकार, प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे.
मित्रहो,
कर्नाटकच्या लोकांना हे चांगलच माहीत आहे की भारताचा हा अमृत काळ, विकसित भारत घडवण्याचा कालखंड आहे. स्वातंत्र्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी संधी चालून आली आहे. पहिल्यांदाच संपूर्ण जगात भारताचा डंका वाजत आहे. जगभरातले गुंतवणूकदार भारतात येऊ इच्छित आहेत आणि जेव्हा देशात गुंतवणूक येते तेव्हा त्याचा खूप मोठा फायदा कर्नाटकला सुद्धा होतो, इथल्या युवा वर्गाला सुद्धा होतो.
म्हणूनच कर्नाटकनं, दुहेरी इंजिन सरकारला वारंवार संधी द्यायचं मनात ठरवून टाकलं आहे. मी तुम्हाला आश्वासन देतो की कर्नाटकच्या विकासाची ही वाटचाल अधिक वेगवान होणार आहे, आपल्या सर्वांना मिळून पुढे जायचं आहे, एकत्र वाटचाल करायची आहे. आपल्याला एकत्र मिळून आपल्या कर्नाटकच्या लोकांची, आपल्या शिमोग्याच्या लोकांची स्वप्नं साकार करायची आहेत.तुमच्यासाठी होत असलेल्या विकासाच्या या प्रकल्पांबद्दल, पुन्हा एकदा आपणा सर्वांचं, मी खूप खूप अभिनंदन करतो. अनेकानेक शुभेच्छा देतो. माझ्यासोबत बोला- भारत मातेचा विजय असो, भारत मातेचा विजय असो, भारत मातेचा विजय असो! धन्यवाद!!
S.Kane/Suvarna/Ashutosh/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
Delighted to be in Shivamogga, where key projects pertaining to connectivity & water security are being launched. These will greatly benefit Karnataka. https://t.co/jM795e3Oel
— Narendra Modi (@narendramodi) February 27, 2023
Airport in Shivamogga will significantly boost connectivity. pic.twitter.com/kgzR5c8hME
— PMO India (@PMOIndia) February 27, 2023
Karnataka has scaled new heights of development in the last few years. pic.twitter.com/wvh2A3V9ZX
— PMO India (@PMOIndia) February 27, 2023
India's aviation market is growing rapidly. pic.twitter.com/USO6dwNUWE
— PMO India (@PMOIndia) February 27, 2023
आज भारत के एविएशन मार्केट का डंका पूरी दुनिया में बज रहा है। pic.twitter.com/dEZYgC1YjC
— PMO India (@PMOIndia) February 27, 2023
हमने बहनों से जुड़ी हर परेशानी को दूर करने का प्रयास किया है। pic.twitter.com/xHZWzjAlHg
— PMO India (@PMOIndia) February 27, 2023
The double engine Governments have helped Karnataka across sectors. pic.twitter.com/fPKeQNn4Sb
— Narendra Modi (@narendramodi) February 27, 2023
Here is how India’s aviation sector is being transformed. pic.twitter.com/sSuYDtRDs7
— Narendra Modi (@narendramodi) February 27, 2023
Celebrating the nature, culture and agriculture of Karnataka. pic.twitter.com/296s1FOzfH
— Narendra Modi (@narendramodi) February 27, 2023
We are making great progress in our efforts to ensure tap water connection to the people of Shivamogga. pic.twitter.com/EanHtJVUDX
— Narendra Modi (@narendramodi) February 27, 2023