Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ओदिशा, संबलपूर इथे, पंतप्रधानांच्या हस्ते, 68,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन अणि लोकार्पण

ओदिशा, संबलपूर इथे, पंतप्रधानांच्या हस्ते, 68,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन अणि लोकार्पण


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, ओदिशात संबलपूर इथे, 68,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्यांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये, नैसर्गिक वायू, कोळसा आणि ऊर्जा निर्मितीशी संबंधित, ऊर्जा क्षेत्राला अधिक चालना देणाऱ्या प्रकल्पांचा समावेश आहे. त्याशिवाय, रस्ते, रेल्वे आणि उच्चशिक्षण क्षेत्राशी संबंधित महत्वाचे प्रकल्पही आहेत. यावेळी, पंतप्रधानांनी, आयआयएम संबलपूर परिसराची पाहणी केली आणि तिथे आयोजित केलेल्या प्रदर्शनालाही भेट दिली.

यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले, “आज इथे, शिक्षण, रेल्वे, रस्ते, वीज आणि पेट्रोलियम या क्षेत्रांमध्ये आज सुमारे 70,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ झाला आहे, त्यामुळे ओदिशाच्या विकासाच्या प्रवासासाठी आज एक महत्त्वपूर्ण प्रसंग आहे.ओदिशातील गरीब वर्गातील लोक, मजूर, कामगार वर्ग, व्यापारी आणि शेतकरी यांच्यासह समाजातील इतर सर्व घटकांना आजच्या विकास प्रकल्पांचा लाभ मिळेल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. यामुळे ओदिशातील तरुणांसाठी रोजगाराच्या हजारो नवीन संधी निर्माण होतील, असेही ते पुढे म्हणाले.

देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ नेते लाल कृष्ण आडवाणी यंना भारत रत्न देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. माजी उपपंतप्रधान अडवाणी यांनी, गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री, तसेच दीर्घकाळ खासदार म्हणूनही  देशासाठी अद्वितीय योगदान दिले आहे, असे मोदी म्हणाले.

अडवाणीजी यांना भारतरत्न देऊन सन्मानित करणे हे ज्यांनी आपल्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित केले त्यांना देश कधीही विसरत नाही, या भावनेचे प्रतीक आहे.लालकृष्ण अडवाणी यांनी दाखवलेले प्रेम, आशीर्वाद आणि मार्गदर्शनासाठी पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आणि सर्व देशवासियांच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले.

ओदिशाला शिक्षण आणि कौशल्य विकासाचे केंद्र बनवण्यासाठी, सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आता ओदिशात आयआयएसईआर बेहरामपूर आणि भुवनेश्वर इथले इंस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी अशा संस्थांची स्थापना गेल्या एका दशकात करण्यात आली.  या अत्याधुनिक शिक्षण संस्थामुळे इथल्या युवकांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन येईल, असेही ते पुढे म्हणाले..

आता, आय. आय. एम. संबलपूर ही आधुनिक व्यवस्थापन संस्था स्थापन झाल्यामुळे शिक्षणक्षेत्रात राज्याची भूमिका आणखी मजबूत होत आहे. महामारीच्या काळात आय. आय. एम. (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट) ची पायाभरणी केल्याचे त्यांनी स्मरण केले आणि सर्व अडथळ्यांदरम्यान ते पूर्ण करण्याशी संबंधित असलेल्या सर्वाची प्रशंसा केली. सर्व राज्यांचा विकास झाला तरच विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य होईल”, पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आणि त्यांनी ओदिशा राज्याला प्रत्येक क्षेत्रात जास्तीत जास्त सहाय्य केले जाईल, असे आश्वासन दिले. केंद्र सरकारची गेल्या दहा वर्षांमधील कामगिरी अधोरेखित करत, ते म्हणाले की, ओदिशाच्या पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्रात सुमारे 1.25 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, राज्याच्या रेल्वे अर्थसंकल्पाला 12 पटींहून अधिक चालना मिळाली आहे. ओदिशाच्या ग्रामीण भागात पीएम ग्राम सडक योजनेअंतर्गत 50,000 किलोमीटर रस्त्यांचे बांधकाम आणि 4,000 किमी राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाचा त्यांनी उल्लेख केला. तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या आजच्या उद्घाटनाचा संदर्भ देत पंतप्रधानांनी सांगितले की ओदिशा आणि झारखंडमधील आंतरराज्यीय संपर्कामुळे प्रवासाचे अंतर कमी होईल. हा प्रदेश खाणकाम, ऊर्जा आणि पोलाद उद्योगांच्या क्षमतेसाठी ओळखला जातो, असे नमूद करून पंतप्रधान मोदी म्हणाले की नवीन दळणवळण सुविधा संपूर्ण प्रदेशात नवीन उद्योगांच्या शक्यता निर्माण करेल, ज्यामुळे हजारो नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. संबलपूर-तालचेर रेल्वे विभागाचे दुहेरीकरण आणि झार-तर्भा ते सोनपूर या नवीन रेल्वे मार्गाच्या पायाभरणीचाही त्यांनी उल्लेख केला. “सुवर्णपूर जिल्हा पुरी-सोनपूर एक्स्प्रेसने देखील जोडला जाईल, ज्यामुळे भाविकांना भगवान जगन्नाथाचे दर्शन घेणे सोपे होईल”, ते म्हणाले. आज उद्घाटन करण्यात आलेली सुपरक्रिटिकल आणि अल्ट्रा-सुपरक्रिटिकल औष्णिक ऊर्जा केंद्रे  ओदिशातील प्रत्येक कुटुंबासाठी पुरेशी आणि परवडणारी वीज सुनिश्चित करतील, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

गेल्या 10 वर्षांत केंद्र सरकारने केलेल्या धोरणांचा ओदिशाला खूप लाभ मिळाला आहे”, पंतप्रधान म्हणाले. खनिकर्म धोरणातील बदलानंतर ओदिशाचे उत्पन्न 10 पट वाढल्याचे त्यांनी नमूद केले. पूर्वीच्या धोरणात ज्या ठिकाणी खाणकाम होते, त्या प्रदेशांना आणि राज्यांना खनिज उत्पादनाचे फायदे मिळत नव्हते, हे नमूद करून, खाणकामातून मिळालेल्या उत्पन्नातून त्याच क्षेत्राच्या विकासासाठी गुंतवणुकीची हमी देणाऱ्या जिल्हा मिनरल फाऊंडेशनच्या स्थापनेद्वारे या समस्येचे निराकरण करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. “ओदिशाला आतापर्यंत 25,000 कोटींहून अधिक निधी प्राप्त झाला आहे आणि तो ज्या भागात खाणकाम होत आहे त्या भागातील लोकांच्या कल्याणासाठी वापरला जात आहे.” आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी ओदिशाच्या जनतेला आश्वासन दिले की केंद्र सरकार अशाच समर्पित भावनेने राज्याच्या विकासासाठी काम करत राहील.

ओदिशाचे राज्यपाल रघुबर दास, ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

देशाची ऊर्जा सुरक्षा बळकट करण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला अनुसरून, ऊर्जा क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने, ओदिशा मध्ये संबलपूर येथे एका कार्यक्रमात विविध प्रकल्पांचे उद्‌घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करण्यात आली.

पंतप्रधानांनी जगदीशपूर-हल्दिया आणि बोकारो-धामरा पाइपलाइन प्रकल्पाच्या (JHBDPL)’  ‘धामरा अंगुल पाइपलाइन विभाग’ (412 किमी) चे उद्घाटन केले. प्रधानमंत्री ऊर्जा गंगाअंतर्गत 2450 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून बांधण्यात आलेला हा प्रकल्प ओदिशाला राष्ट्रीय गॅस ग्रीडशी जोडेल. पंतप्रधानांनी मुंबई-नागपूर-झारसुगुडा पाइपलाइनच्या नागपूर झारसुगुडा नैसर्गिक वायू पाइपलाइन विभागाची’ (692 किमी) पायाभरणीही केली. 2660 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित करण्यात येणारा हा प्रकल्प ओदिशा, महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये नैसर्गिक वायूची उपलब्धता वाढवेल.

कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी सुमारे 28,980 कोटी रुपयांच्या अनेक ऊर्जा प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. राष्ट्राला समर्पित केल्या जाणाऱ्या प्रकल्पांमध्ये ओदिशातील सुंदरगढ जिल्ह्यातील एनटीपीसी दारलीपाली सुपर थर्मल पॉवर स्टेशन (2×800 MW) आणि एनएसपीसीएल  राउरकेला PP-II विस्तार प्रकल्प (1×250 MW) यांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी ओदिशाच्या अंगुल जिल्ह्यातील एनटीपीसी तालचेर थर्मल पॉवर प्रोजेक्ट, टप्पा-III (2×660 MW) ची पायाभरणी देखील केली. हे ऊर्जा प्रकल्प ओदिशा तसेच इतर अनेक राज्यांना कमी किमतीत वीज पुरवठा करतील.

पंतप्रधानांनी 27,000 कोटींहून अधिक किमतीच्या नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन (NLC) तालाबिरा औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचीही पायाभरणी केली.  पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळकटी देत, हा अत्याधुनिक प्रकल्प विश्वासार्ह, परवडणाऱ्या दरात आणि चोवीस तास वीज पुरवठा करेल आणि देशाच्या ऊर्जा सुरक्षेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देईल, सोबतच देशाची आर्थिक वाढ आणि समृद्धीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

पंतप्रधानांनी फर्स्ट माईल कनेक्टिव्हिटी (FMC) प्रकल्पांसह महानदी कोलफिल्ड्स लिमिटेडच्या कोळसा पायाभूत सुविधा प्रकल्पांचे तसेच अंगुल जिल्ह्यातील तालचेर कोलफिल्ड्समधील भुवनेश्वरी फेज-1 आणि लाजकुरा रॅपिड लोडिंग सिस्टम (RLS) चे उद्घाटन केले. सुमारे 2145 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या प्रकल्पांमुळे ओदिशातील कोरड्या इंधनाची गुणवत्ता आणि पुरवठा सुधारेल. पंतप्रधानांनी ओदिशातील झारसुगुडा जिल्ह्यात 550 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या आयबी व्हॅली वॉशरीचेही उद्घाटन केले. या वॉशरीमुळे कोळशाच्या गुणवत्ता सुधारण्याच्या प्रक्रियेत, नवोन्मेषात आणि शाश्वततेत आमूलाग्र बदल घडून येईल. पंतप्रधानांनी 878 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून महानदी कोलफिल्ड्स लिमिटेडने बांधलेल्या झारसुगुडा-बारपाली-सरदेगा रेल्वे मार्ग टप्पा-1 चा 50 किमी लांबीचा दुसरा ट्रॅक राष्ट्राला समर्पित केला.

पंतप्रधानांनी सुमारे 2110 कोटी रुपयांच्या एकूण खर्चाने विकसित केलेल्या तीन राष्ट्रीय महामार्ग रस्ते क्षेत्रातील प्रकल्पांचे उद्घाटनही केले. या प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय महामार्ग 215 (नवीन NH नं. 520) च्या रिमुली-कोइडा विभागाचे चौपदरीकरण, राष्ट्रीय महामार्ग 23 (नवीन NH क्र. 143) च्या बिरामित्रपूर-ब्राह्मणी बायपास एंड विभागाचे चौपदरीकरण आणि राष्ट्रीय महामार्ग 23 (नवीन NH क्र. 143) च्या ब्राह्मणी बायपास एंड-राजामुंडा विभागाचे चौपदरीकरण यांचा समावेश आहे.  हे प्रकल्प या क्षेत्राची संपर्क सुविधा वाढवतील तसेच क्षेत्राच्या आर्थिक विकासातही योगदान देतील.

याशिवाय, पंतप्रधानांनी सुमारे 2146 कोटी रुपये खर्चाच्या रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले.  पंतप्रधानांनी संबलपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली. या स्थानकाची वास्तुकला शैलश्री महालापासून प्रेरित आहे.  याशिवाय पंतप्रधानांनी संबलपूर-तालचेर दुहेरीकरण रेल्वे मार्ग (168 किमी) आणि झारतारभा ते सोनपूर नवीन रेल्वे मार्गाचे (21.7 किमी) लोकार्पण केले. या प्रकल्पामुळे या प्रदेशातील रेल्वेच्या जाळ्याची क्षमता वाढेल.  या भागातील रेल्वे प्रवाशांसाठी संपर्क सुविधा सुधारणाऱ्या पुरी-सोनेपूर-पुरी या साप्ताहिक रेल्वे एक्स्प्रेसलाही पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. पंतप्रधानांनी आयआयएम संबलपूरच्या कायमस्वरूपी परिसराचे उद्घाटनही केले. त्यांनी झारसुगुडा मुख्य टपाल कार्यालयाची ऐतिहासिक इमारतही राष्ट्राला समर्पित केली.

***

S.Patil/R.Aghor/R.Agashe/S.Mukhedkar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai