नवी दिल्ली, 13 मार्च 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने ऊर्जा कार्यक्षमता आणि ऊर्जा संवर्धन उपायांच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि भूतान यांच्यातील सामंजस्य कराराला मंजुरी दिली.
भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाचा ऊर्जा कार्यक्षमता विभाग आणि भूतान रॉयल सरकारच्या ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधन मंत्रालयाचा ऊर्जा विभाग यांच्यात या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
या सामंजस्य कराराचा एक भाग म्हणून, ऊर्जा कार्यक्षमता कार्यालयाने विकसित केलेल्या स्टार लेबलिंग कार्यक्रमाला प्रोत्साहन देऊन घरगुती क्षेत्रात ऊर्जा कार्यक्षमता वाढवण्यासाठी भूतानला मदत करणे हे भारताचे उद्दिष्ट आहे. भारताच्या अनुभवा आधारे भूतानच्या हवामानाशी सुसंगत इमारत बांधणी संदर्भातील निकष तयार केले जातील. ऊर्जा लेखापरीक्षकांचे प्रशिक्षण संस्थात्मक करून भूतानमध्ये ऊर्जा व्यावसायिकांचा एक समूह तयार करण्याचा मानस आहे.
किरकोळ विक्रेत्यांच्या प्रशिक्षणामुळे तारांकित दर्जाच्या उपकरणांमधून होणाऱ्या बचतीबाबत, ऊर्जा कार्यक्षम उत्पादनांचा प्रसार ग्राहकांपर्यंत होण्यास मदत होईल. मानके आणि लेबलिंग योजना विकसित आणि अंमलात आणण्याच्या भूतानच्या प्रयत्नांना पाठबळ देण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे.
ऊर्जेचा जास्त खप असलेली उपकरणे ही घरगुती किंवा व्यावसायिक आस्थापनांमध्ये जास्त वापर होणारी मुख्य उत्पादने आहेत. ऊर्जेची गरज असलेल्या ग्राहकोपयोगी वस्तूंमधील वेगवान वाढ लक्षात घेता, विद्युत ऊर्जेची मागणी दरवर्षी वाढत आहे. ग्राहकांनी उच्च कार्यक्षमतेच्या उपकरणांना पसंती दिली तर ही वाढती मागणी अनुकूल केली जाऊ शकते. BEE (बीईई) देशाच्या स्टार-लेबलिंग कार्यक्रमाचे नेतृत्व करत आहे. यात आता दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या 37 उपकरणांचा समावेश आहे.
परराष्ट्र मंत्रालय (एमईए) तसेच उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (डीपीआयआयटी) यांच्याशी विचारविनिमय करून ऊर्जा मंत्रालयाने हा सामंजस्य करार तयार केला आहे. या सामंजस्य करारामुळे भारत आणि भूतान यांच्यात ऊर्जा कार्यक्षमता आणि ऊर्जा संवर्धनाशी संबंधित माहिती, विदा आणि तांत्रिक तज्ञांची देवाणघेवाण शक्य होईल. यामुळे बाजारात ऊर्जा कार्यक्षम उत्पादनांची उपलब्धता सुनिश्चित करण्यास भूतानला मदत होईल.
हा सामंजस्य करार ऊर्जा कार्यक्षमता धोरणे तसेच ऊर्जा कार्यक्षमता संशोधन आणि तंत्रज्ञान उपयोजन क्षेत्रातील सहकार्याचे विश्लेषण करेल.
* * *
S.Patil/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai