Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उत्तर प्रदेशातील संभल येथे श्री कल्की धामच्या पायाभरणी समारंभातील पंतप्रधानांचे भाषण

उत्तर प्रदेशातील संभल येथे श्री कल्की धामच्या पायाभरणी समारंभातील पंतप्रधानांचे भाषण


जय मां कैला देवी, जय मां कैला देवी, जय मां कैला देवी.

जय बूढ़े बाबा की, जय बूढ़े बाबा की.

भारत माता की जय, भारत माता की जय.

सर्व संतांना विनंती आहे की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे. उत्तर प्रदेशचे ऊर्जावान मुख्यमंत्री श्रीमान योगी आदित्यनाथ जी, पूज्य श्री अवधेशानंद गिरी जी, कल्किधामचे प्रमुख आचार्य प्रमोद कृष्णम् जी, पूज्य स्वामी कैलाशानंद ब्रह्मचारी जी, पूज्य सदगुरू श्री रितेश्वर जी, प्रचंड संख्येने आलेले, भारतातील विविध कानाकोपऱ्यातून आलेले पूज्य संतगण, आणि माझ्या प्रिय श्रद्धाळू बंधू आणि भगिनींनो!

आज उत्तर प्रदेशच्या भूमीतून, प्रभू राम आणि प्रभू कृष्णांच्या भूमीतून, भक्ती, भाव आणि अध्यात्माची आणखी एक धारा प्रवाहीत होऊ घातली आहे. आज पूज्य संतांची साधना आणि जनमानसाच्या भावनेने आणखी एका पवित्र धामाचा पाया रचला जात आहे. आता तुम्हा संत आणि आचार्यांच्या उपस्थितीत मला भव्य कल्की धामची पायाभरणी करण्याचे सद्भाग्य लाभले आहे. मला विश्वास आहे की कल्की धाम भारतीय श्रद्धेचे आणखी एक महान केंद्र म्हणून उदयास येईल. मी सर्व देशवासियांना आणि जगातील सर्व भक्तांना माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो. आता आचार्यजी सांगत होते की 18 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आज हा योग आला आहे. असो, आचार्य जी, अशी अनेक चांगली कामे आहेत जी काही लोकांनी फक्त माझ्यासाठी सोडली आहेत. आणि भविष्यातही जितकी चांगली कामे राहिली असतील ना, त्यासाठी फक्त या संतांचे, जनता जनार्दनाचे आशीर्वाद कायम असू द्या, ती देखील पूर्ण करु.

मित्रांनो,

आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही आहे. त्यामुळेच आजचा दिवस आणखी पवित्र ठरतो, आणि अधिक प्रेरणादायकही आहे. आपण आज देशात जो सांस्कृतिक पुनरोदय पाहत आहोत, आपल्या ओळखीवर गर्व आणि त्याच्या स्थापनेचा जो आत्मविश्वास दिसत आहे, ती प्रेरणा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच मिळते. मी याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी श्रद्धापूर्वक नमन करतो. त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.

मित्रांनो,

काही दिवसांपूर्वी, जेव्हा प्रमोद कृष्णम् जी मला निमंत्रण देण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी जे काही मला सांगितले होते, त्या आधारावर मी सांगू शकतो की, आज जितका आनंद त्यांना होत आहे, त्यापेक्षा अनेक पटीने आनंद त्यांच्या पूज्य माताजी यांचा आत्मा जिथेही असेल त्यांना होत असेल. आणि आईच्या वचनाचे पालन करण्याकरिता एक मुलगा आपले जीवन कसे समर्पित करू शकतो, हे प्रमोद जी यांनी दाखवून दिले आहे. प्रमोद कृष्णम् जी

सांगत होते की अनेक एकरांमध्ये पसरलेले हे विशाल धाम अनेक दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण होणार आहे. हे एक असे मंदिर असेल, जसे त्यांनी मला आताच पूर्ण समजावून सांगितले, यात 10 गाभारे असतील, आणि भगवंतांच्या सर्व 10 अवतारांना विराजमान केले जाईल. 10 अवतारांच्या माध्यमातून आपल्या शास्त्रांनी केवळ मनुष्यच नाही, तर वेगवेगळ्या स्वरूपात ईश्वरीय अवतारांना प्रस्तुत केले आहे. म्हणजेच, आपण प्रत्येक जीवनात ईश्वराच्याच चेतनेचे दर्शन केले आहे.

आपण ईश्वराचे स्वरूप सिंहामध्ये देखील पाहिले, वराहामध्ये देखील पाहिले आणि कासवातही पाहिले.

या सर्व स्वरूपांची एकत्र स्थापना आपल्या मान्यतांची व्यापक झलक प्रस्तुत करेल. ही ईश्वराचीच कृपा आहे की त्यांनी या पवित्र यज्ञात मला माध्यम बनवले आहे, याच्या पायाभरणीची संधी दिली आहे.

आणि जेव्हा ते स्वागत निवेदन करत होते, तेव्हा त्यांनी म्हटले की, प्रत्येकाजवळ काही ना काही देण्यासाठी असते. माझ्याकडे काहीच नाही, मी फक्त भावना व्यक्त करू शकतो. प्रमोद जी चांगले झाले काही दिले नाही, अन्यथा काळ असा बदलला आहे की, जर आजच्या युगात सुदामा यांनी श्रीकृष्णांना एका झोळीतून तांदूळ दिले असते, तर चित्रफित निघाली असती, सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल झाली असती, आणि निकाल आला असता की भगवान कृष्ण यांना भ्रष्टाचारामध्ये काही तरी दिले गेले आणि श्रीकृष्ण भ्रष्टाचार करत होते.

याकाळात आपण जे करत आहोत, आणि यापेक्षा चांगले आहे की आपण भावना प्रकट केली आणि काही दिले नाही. या शुभ कार्यात आपले मार्गदर्शन देण्यासाठी आलेल्या सर्व संतांनाही मी नमन करतो. मी, आचार्य प्रमोद कृष्णम् जी यांचेही अभिनंदन करतो.

मित्रांनो,

आपण आज संभल इथे ज्या क्षणाचे साक्षीदार बनत आहोत, हा भारताच्या सांस्कृतिक नवजागृतीचा आणखी एक अद्भुत क्षण आहे. आता गेल्याच महिन्यात, 22 जानेवारीला, देशाने अयोध्येत 500 वर्षांची प्रतीक्षा पूर्ण होताना पाहिली आहे. राम लल्लांच्या विराजमान होण्याचा तो अलौकिक अनुभव, ती दिव्य अनुभूती, आताही आपल्याला भावूक करून जाते. याच दरम्यान, देशापासून शेकडो किलोमीटर दूर, अरबांच्या भूमीवर अबुधाबी इथे, पहिल्या विराट मंदिराच्या लोकार्पणाचेही आपण साक्षीदार बनलो आहोत. आधी जे कल्पनेच्याही पलीकडे होते ते आता वास्तव झाले आहे. आणि आपण संभल येथे आता भव्य कल्की धामाच्या शिलान्यासाचे साक्षीदार बनत आहोत.

बंधू आणि भगिनींनो,

एकापाठोपाठ एक असे आध्यात्मिक अनुभव, सांस्कृतिक गौरवाचे हे क्षण, आपल्या पिढीच्या जीवनकाळात येणे यापेक्षा मोठे सद्भाग्य ते काय असू शकते? याच कालखंडात आपण विश्वनाथ धामाच्या वैभवास काशीच्या भूमीवर पाहिले आहे, झळाळताना पाहिले आहे. याच कालखंडात आपण काशीचा कायापालट होतानाही पाहत आहोत.

याचकाळात, महाकालांच्या महालोकाची महिमाही आपण पाहिली आहे. आपण सोमनाथचा विकास पाहिला आहे, केदार खोऱ्याचे पुनर्निर्माण पाहिले आहे. विकासही, वारसाही हा मंत्र आत्मसात करत आपण अग्रेसर होत आहोत. एकीकडे आज आपल्या तीर्थस्थांनांचा विकास होत आहे, तर दुसरीकडे शहरांमधे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज पायाभूत सुविधाही उभ्या राहत आहेत.

आज जर मंदिरे बनत आहेत, तर देशभरात नवीन वैद्यकीय महाविद्यालये देखील बनत आहेत. आज परदेशातून आपल्या प्राचीन मुर्ती परत आणल्या जात आहेत आणि विक्रमी संख्येने परदेशी गुंतवणूक देखील येत आहे. हे परिवर्तन, पुरावा आहे मित्रांनो, आणि पुरावा याचा आहे की काळाचे चक्र फिरले आहे. एक नवीन युग आज आपल्या दरवाज्यावर थाप वाजवू लागला आहे. ही वेळ आहे, आपण त्यांच्या आगमनाचे मनापासून स्वागत करावे. यासाठी, मी लाल किल्ल्यावरून देशाला हा विश्वास दिला होता की, हीच वेळ आहे, योग्य वेळ आहे.

मित्रांनो,

ज्या दिवशी अयोध्येत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली होती, तेव्हा मी आणखी एक गोष्ट सांगितली होती. 22 जानेवारीपासून आता नवीन कालचक्राची सुरुवात झाली आहे.

प्रभू श्रीरामांनी जेव्हा राज्य केले, तेव्हा त्याचा प्रभाव हजारो वर्षांपर्यंत राहिला. त्याचप्रकारे रामलल्लांच्या विराजमान होण्याने पुढील हजारो वर्षांपर्यंत भारताकरिता एका नवीन यात्रेचा शुभारंभ झाला आहे.

अमृतकाळात राष्ट्र निर्माणाकरिता संपूर्ण सहस्त्र शताब्दीचा हा संकल्प केवळ एक अभिलाषा नाही. तर हा एक असा संकल्प आहे, ज्याने आपल्या संस्कृतीने प्रत्येक कालखंडात जगून दाखवले आहे.

भगवान कल्की यांच्या विषयी आचार्य प्रमोद कृष्णम् जी यांनी सखोल अध्ययन केले आहे. भगवान कल्की यांच्या अवताराशी संबंधित अनेक तथ्य आणि, शास्त्रीय माहितीही आचार्य प्रमोद कृष्णम् जी मला सांगत होते.

त्यांनी सांगितल्याप्रमाणे कल्की पुराणात लिहिले आहे की – शम्भले वस-तस्तस्य सहस्र परिवत्सरा. अर्थात भगवान राम यांच्या प्रमाणेच कल्कि अवतार देखील हजारो वर्षांची रुपरेषा ठरवेल.

म्हणूनच बंधू आणि भगिनींनो,

कल्की कालचक्राच्या परिवर्तनाचे प्रणेते देखील आहेत आणि प्रेरणास्रोत देखील आहेत. आणि कदाचित म्हणूनच कल्की धाम एक असे स्थान बनणार आहे जे अशा भगवंताला समर्पित आहे, ज्यांनी अवतार घेणे अजून शेष आहे. तुम्ही कल्पना करा, आपल्या शास्त्रांमध्ये शेकडो हजारो वर्षांपूर्वी भविष्यासंबंधी अशा प्रकारची संकल्पना मांडण्यात आली आहे. हजारो वर्षानंतर घडणाऱ्या घटनांच्या बाबत देखील विचार केला गेला आहे. हे किती अद्भुत आहे. आणि हे देखील किती अद्भुत आहे की आज प्रमोद कृष्णम् यांच्यासारखे लोक पूर्ण विश्वासाने त्या सर्व मान्यतांना पुढे घेऊन जात आहेत, त्यासाठी आपले जीवन समर्पित करत आहेत. हजारो वर्षानंतरची आस्था आणि आतापासूनच त्याची तयारी म्हणजे आपण भविष्यासाठी किती सजग रहाणारे लोक आहोत. यासाठी तर प्रमोद कृष्णम् जी हे नक्कीच कौतुकास पात्र आहेत. मी तर प्रमोद कृष्ण जी यांना एका राजकीय व्यक्तीच्या स्वरूपात दुरूनच ओळखत होतो, माझा त्यांच्याशी परिचय नव्हता. मात्र आता जेव्हा काही दिवसांपूर्वी माझी त्यांच्याशी भेट झाली तेव्हा मला याबाबत देखील माहिती मिळाली की ते अशा धार्मिक, अध्यात्मिक कार्यामध्ये देखील किती मेहनत करत आहेत. कल्की मंदिरासाठी त्यांना मागच्या सरकारबरोबर दिर्घ काळ लढा द्यावा लागला होता. न्यायालयात फेऱ्या देखील माराव्या लागल्या होत्या. एक वेळ अशीही होती की या मंदिराच्या उभारणीमुळे शांती व्यवस्था बिघडेल असे त्यांना सांगितले जात होते, ही बाब त्यांनीच मला सांगितली. आज आमच्या सरकारच्या कार्यकाळात प्रमोद कृष्णम् जी निश्चिंत होऊन हे काम सुरू करु शकले आहेत. मला विश्वास आहे की, हे मंदिर याचे प्रमाण असेल की आम्ही भविष्याच्या बाबतीत किती सकारात्मक विचार करणारे लोक आहोत.

मित्रांनो,

भारत पराभवातून देखील विजयश्री खेचून आणणारे राष्ट्र आहे. आपल्यावर शेकडो वर्षांपर्यंत अनेक आक्रमणे झाली आहेत. कुठला अन्य देश  असता तर, कुठला अन्य समाज असला असता तर एका मागे एक झालेली अनेक आक्रमणे झेलून संपूर्णतः नष्ट झाला असता. तरी देखील आपण केवळ पाय रोवून उभे राहिलो नाही तर पूर्वीपेक्षा अधिक कणखर बनून जगासमोर उभे ठाकले आहोत. आपण शेकडो वर्षे दिलेले बलिदान आज फळाला येत आहे. ज्याप्रमाणे एखादे बिज दुष्काळात केवळ मातीत पडून राहते, मात्र वर्षा ऋतूचे आगमन होताच ते बिज अंकुरित होते. त्याप्रमाणेच आज भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत काळात भारताच्या गौरवाचे, भारताच्या उत्कर्षाचे आणि भारताच्या सामर्थ्याचे बीज अंकुरित होत आहे. प्रत्येक क्षेत्रात, एका नंतर एक अनेक नव्या गोष्टी घडत आहेत. जसे की देशातील संत आणि आचार्य नवनवीन मंदिरांची निर्मिती करत आहे, त्याप्रमाणेच मला ईश्वराने राष्ट्ररूपी मंदिराच्या नवनिर्मितीची जबाबदारी सोपवली आहे. या राष्ट्ररूपी मंदिराला भव्यता प्रदान करण्यासाठी मी रात्रंदिवस प्रयत्न करत आहे, त्याच्या गौरवाचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. या निष्ठेची फलनिष्पत्ती देखील आपल्याला जलद गतीने दिसून येत आहे. आज प्रथमच भारत अशा स्थानी पोहोचला आहे जिथे आपण कोणाचेही अनुसरण करत नसुन एक उदाहरण स्थापित करत आहोत. आज प्रथमच तंत्रज्ञान आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नव्या संधीचे केंद्र या रूपात भारताकडे पाहिले जात आहे. आपली ओळख नवोन्मेषाचे केंद्र या रुपात विकसित होत आहे. आपण प्रथमच जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासारखे नवे यश संपादित केले आहे. आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारे पहिले राष्ट्र बनलो आहोत. भारतात प्रथमच वंदे भारत आणि नमो भारत यांच्यासारख्या आधुनिक रेल्वे धावत आहेत. देशात प्रथमच बुलेट ट्रेन चालवण्याची तयारी केली जात आहे. प्रथमच हायटेक महामार्गांचे, द्रुत गती मार्गांचे इतके मोठे जाळे आणि त्यांची ताकद देशाला प्राप्त झाली आहे. प्रथमच भारताचा नागरिक जगातील कोणत्याही देशात असो तो स्वतःला गौरवान्वीत समजत आहे. देशात सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाचे हे जे उधाण आलेले आपण पाहत आहोत, हा एक विलक्षण, अद्भुत अनुभव आहे. म्हणूनच आज आपली शक्ती देखील अनंत आहे आणि आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या संधी देखील अनंत आहेत.

मित्रांनो,

राष्ट्राला सफल होण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा सामूहिकतेमधून मिळत असते.

आपल्या वेदांमध्ये असे म्हटले आहे की, ‘सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात्’, अर्थात निर्माण कार्यासाठी हजारो, लाखो, करोडो हात आहेत. गतिमान होण्यासाठी हजारो लाखो कोटी पाय आहेत. आज भारतात आपल्याला त्याच विराट चेतनेचे दर्शन घडत आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, और सबका प्रयास’ या भावनेतून प्रत्येक देशबांधव या एका भावनेने, एका संकल्पाने राष्ट्रासाठी काम करत आहे. गेल्या दहा वर्षात घडलेल्या कामांचा विस्तार पहा, 4 कोटी हून अधिक लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पक्की घरे, 11 कोटी कुटुंबांना स्वच्छतागृह म्हणजेच इज्जत घर, 2.5 कोटी कुटुंबांच्या घरांना वीज जोडणी, 10 कोटीहून अधिक कुटुंबांना पाण्यासाठी नळ जोडणी, 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य वाटप, 10 कोटी महिलांना सवलतीच्या दरात गॅस सिलेंडर, 50 कोटी लोकांना आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी आयुष्मान कार्ड, सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी, कोरोना काळात प्रत्येक देशवासीयाला मोफत प्रतिबंधक लस, स्वच्छ भारत यासारखे मोठे अभियान, आज संपूर्ण जगात भारताच्या या सर्व कार्याची चर्चा होत आहे. सरकारच्या या प्रयत्नांमध्ये देशवासीयांचे सामर्थ्य जोडले गेले आहे म्हणूनच इतक्या मोठ्या प्रमाणावर देशात काम सुरू आहे. आज लोक सरकारच्या योजनांचा लाभ गरिबांना मिळावा यासाठी मदत करत आहेत. लोक सरकारी योजनांच्या शंभर टक्के संपृप्तता अभियानाचा भाग बनत आहेत. समाजाला गरिबांची सेवा करण्याचा हा भाव ‘नरांमध्ये नारायण’ पाहण्याची प्रेरणा देणाऱ्या आपल्या अध्यात्मिक मूल्यांपासून मिळत आहे. म्हणूनच देशाने ‘विकसित भारताची निर्मिती’ आणि ‘आपल्या वारशाबद्दल अभिमान’ यांच्या पंच प्रणांचे आवाहन केले आहे.

मित्रांनो,

भारत जेव्हा मोठमोठे संकल्प करतो तेव्हा त्याच्या मार्गदर्शनासाठी ईश्वरीय चेतना कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या भेटीला येते. म्हणूनच गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेले आहे, ‘संभावामि युगे-युगे’, आपल्याला इतके मोठे आश्वासन दिले आहे. मात्र या वचना सोबतच आपल्याला हा देखील आदेश दिला आहे कि – “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” अर्थात्, फळाची चिंता न करता कर्तव्य भावनेने आपण कर्म केले पाहिजेत. भगवंतांचे हे वचन, त्यांचा हा निर्देश आज 140 कोटी देशवासीयांसाठी जीवन मंत्राप्रमाणे आहे. आगामी 25 वर्षांच्या कर्तव्य काळात आपल्याला परिश्रमाची पराकाष्ठा करायची आहे. आपल्याला निस्वार्थ भावनेने देशसेवेचे ध्येय समोर ठेवून काम करायचे आहे. आपल्या प्रत्येक प्रयत्नातून, आपल्या प्रत्येक कामातून राष्ट्राला काय लाभ होईल, हा प्रश्न आपल्या मनात सर्वप्रथम आला पाहिजे. हाच प्रश्न राष्ट्राच्या समोर उभ्या असलेल्या सामूहिक आव्हानांचे समाधान शोधण्यात मदत करेल. भगवान कल्की यांच्या आशीर्वादाने आपली ही संकल्प यात्रा निश्चित कालावधी पूर्वीच सिद्धीला जाईल. आपण सशक्त आणि समर्थ भारताचे स्वप्न शंभर टक्के पूर्ण होताना पाहू शकू. याच कामनेसह तुम्हा सर्वांचे मी खुप खुप आभार मानतो. तसेच या भव्य आयोजनासाठी आणि इतक्या मोठ्या संख्येने संत जनांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मी हृदयपूर्वक प्रणाम करत आपल्या वाणीला विराम देतो. माझ्या सोबत म्हणा –

भारत माता की जय, भारत माता की जय,

भारत माता की जय!

खुप खुप धन्यवाद!

***

NM/VG/SM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai