Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे किसान सन्मान संमेलनात पंतप्रधानांनी केलेले भाषण

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे किसान सन्मान संमेलनात पंतप्रधानांनी केलेले भाषण


नवी दिल्‍ली, 18 जून 2024

 

नम: पार्वती पतये!

हर हर महादेव!

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री श्रीयुत योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी शिवराज सिंह चौहान, भगीरथ चौधरी जी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक, विधान परिषदेचे सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष श्री भूपेंद्र चौधरी जी, राज्य सरकारचे इतर मंत्री, लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने आलेले माझे शेतकरी बंधू-भगिनी, काशीचे माझे कुटुंबीय,

निवडणूक जिंकल्यानंतर आज प्रथमच मी बनारसला आलो आहे. काशीच्या जनता जनार्दनाला माझा प्रणाम !

बाबा विश्वनाथ आणि गंगा मातेच्या आशीर्वादामुळे, काशीवासीयांच्या अपार प्रेमामुळे, मला तिसऱ्यांदा देशाचा प्रधान सेवक होण्याचे भाग्य लाभले आहे. काशीच्या लोकांनी सलग तिसऱ्यांदा मला आपला प्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यामुळे मी कृतार्थ झालो आहे. आता तर गंगा मातेनेचे मला दत्तक घेतल्यासारखे झाले आहे. मी इथलाच झालो आहे. एवढा उन्हाळा असूनही तुम्ही सर्व एवढ्या मोठ्या संख्येने मला आशीर्वाद देण्यासाठी इथे आलात आणि तुमची ही तपस्या पाहून सूर्यदेवालादेखील दया वाटू लागली आहे. मी आपल्या सर्वांचे आभारी आहे. मी तुमचा ऋणी आहे. 

मित्रांनो, 

भारतात 18व्या लोकसभेसाठी झालेली ही निवडणूक, भारतीय लोकशाहीची विशालता,भारतीय लोकशाहीचे सामर्थ्य,भारतीय लोकशाहीची व्यापकता, भारतीय लोकशाहीची खोलवर रुजलेली मुळे जगाला दर्शवत आहे.  या निवडणुकीत देशातील 64 कोटींहून अधिक लोकांनी मतदान केले आहे. यापेक्षा मोठी निवडणूक जगात कुठलीही नाही, जिथे एवढ्या मोठ्या संख्येने लोक मतदानात भाग घेतात. अलीकडेच मी जी -7 च्या बैठकीसाठी इटलीला गेलो होतो. सर्व जी -7 देशांतील सर्व मतदारांचा समावेश केला तरी भारतातील मतदारांची संख्या दीडपट अधिक आहे. युरोपमधील सर्व देश आणि युरोपियन युनियनच्या  सर्व मतदारांची संख्या एकत्र केली तरी भारतातील मतदारांची संख्या अडीच पट अधिक आहे. या निवडणुकीत 31 कोटींहून अधिक महिलांनी सहभाग घेतला आहे. संपूर्ण जगात कुठल्याही देशापेक्षा  महिला मतदारांची ही  संख्या सर्वाधिक आहे. ही संख्या संपूर्ण अमेरिकेच्या लोकसंख्येच्या आसपास आहे. भारताच्या लोकशाहीचे हे सौंदर्य आणि सामर्थ्य संपूर्ण जगाला आकर्षित करते आणि प्रभावित करते. लोकशाहीचा हा उत्सव यशस्वी केल्याबद्दल मी बनारसच्या प्रत्येक मतदाराचे आभार मानतो. बनारसच्या लोकांसाठीही ही अभिमानाची बाब आहे. काशीच्या जनतेने केवळ खासदारच नाही तर तिसऱ्यांदा पंतप्रधानही निवडला आहे. त्यामुळे तुमचे दुहेरी अभिनंदन.

मित्रांनो,

या निवडणुकीत देशातील जनतेने दिलेला जनादेश खरोखरच अभूतपूर्व आहे. या जनादेशाने नवा इतिहास रचला आहे. एखादे सरकार सलग तिसऱ्यांदा निवडून येणे, हे जगातल्या लोकशाही देशांमध्ये फारच कमी वेळा पाहायला मिळते. पण या वेळेस भारतातल्या जनतेने हे करून दाखवले आहे. भारतात असे 60 वर्षांपूर्वी घडले होते. तेव्हापासून भारतात कुठल्याच सरकारने अशा प्रकारची हॅट्रिक साधली नव्हती. तुम्ही हे भाग्य आम्हाला दिलेत, तुमचा सेवक मोदींना दिले. भारतासारख्या देशात जिथे युवा पिढीच्या आकांक्षा इतक्या मोठ्या आहेत, जिथे लोकांची स्वप्ने अपार आहेत, तिथले लोक जर कुठल्या सरकारला 10 वर्षांच्या कामानंतर पुन्हा सेवा करण्याची संधी देत असतील तर हा खूप मोठा विजय आहे, खूप मोठा विजय  आहे आणि खूप मोठा विश्वास आहे. तुमचा हा विश्वास माझी खूप मोठी ठेव आहे. तुमचा हा विश्वास मला सतत तुमची सेवा करण्यासाठी, देशाला नव्या उंचीवर पोहोचवण्यासाठी कठोर मेहनत घेण्याची प्रेरणा देतो. मी दिवसरात्र कठोर मेहनत करेन, तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुमचे संकल्प पूर्ण करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.

मित्रांनो,

शेतकरी, तरुण, नारीशक्ती आणि गरीब यांना मी, विकसित भारताचे मजबूत स्तंभ मानले आहे. आपल्या तिसऱ्या कार्यकाळाची सुरुवात मी त्यांच्या सक्षमीकरणाने केली आहे. सरकार स्थापन होताच, सर्वात पहिला निर्णय शेतकरी आणि गरीब कुटुंबांबाबत घेण्यात आला. देशभरातील गरीब कुटुंबांसाठी 3 कोटी नवीन घरे बांधणे असो किंवा पीएम किसान सन्मान निधी पुढे नेणे असो, या निर्णयांमुळे करोडो लोकांना मदत होईल.आजचा हा कार्यक्रमदेखील विकसित भारताचा हा मार्ग मजबूत करणारा आहे. आजच्या या खास कार्यक्रमात काशीसोबतच देशातल्या इतर गावांमधले लोक जोडले गेले आहेत, करोडो शेतकरी जोडले गेले आहेत, आणि हे सारे आपले शेतकरी, माता, बंधू-भगिनी आज या कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत. मी आपल्या काशीमधून, हिंदुस्तानातल्या कानाकोपऱ्यातल्या गावांमध्ये आज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमात जोडल्या गेलेल्या सर्व शेतकरी बंधू-भगिनींना, देशाच्या नागरिकांना अभिवादन करतो.  थोड्याच वेळापूर्वी देशभरातल्या करोडो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसान सन्मान निधीचे 20 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.  3 कोटी भगिनींना लखपती दीदी बनवण्याच्या दिशेने आज एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. कृषी सखी म्हणून  देशातल्या भगिनींची नवी भूमिका, त्यांना सन्मान आणि उत्पन्नाची नवी साधने, या दोहोंची सुनिश्चिती करेल. मी आपल्या सर्व शेतकरी कुटुंबांना, माता-भगिनींना खूप खूप शुभेच्छा देतो. 

मित्रांनो,

पीएम  किसान सन्मान निधी ही आज जगातील सर्वात मोठी थेट लाभ हस्तांतरण योजना बनली आहे. आतापर्यंत देशातील करोडो शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात सव्वा 3 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. येथे वाराणसी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यातही 700 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.  पीएम किसान सन्मान निधीअंतर्गत लाभ, योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तंत्रज्ञानाचा खूप चांगला उपयोग झाला आहे, याचा मला आनंद आहे. काही महिन्यांपूर्वीच विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान एक कोटींहून अधिक शेतकरी या योजनेशी जोडले गेले आहेत. पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेता यावा यासाठी अनेक नियमदेखील सरकारने सुलभ केले आहेत. जेव्हा हेतू शुद्ध असतो, सेवाभाव ठायी असतो तेव्हा अशीच वेगाने शेतकरी हिताची, जनहिताची कामे होतात. 

बंधू आणि भगिनींनो, 

21व्या शतकातल्या भारताला जगातली तिसरी मोठी आर्थिक ताकद बनवण्यात संपूर्ण कृषी व्यवस्थेची मोठी भूमिका आहे. आपल्याला वैश्विक पातळीवर विचार करायला हवा, जागतिक बाजारपेठ डोळ्यासमोर ठेवायला हवी. आपल्याला डाळी आणि तेलबियांमध्ये आत्मनिर्भर व्हायचे आहे, आणि कृषी निर्यातीत अग्रणी व्हायचे आहे. 

आता बघा बनारसचा लंगडा आंबा, जौनपूरचा मुळा, गाझीपूरची भेंडी अशी अनेक उत्पादने आज परदेशी बाजारपेठेत पोहोचत आहेत. वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट आणि जिल्हा स्तरावर निर्यात केंद्र बनल्याने निर्यातीमध्ये वाढ होत आहे आणि उत्पादन देखील निर्यातीच्या दर्जाचे होऊ लागले आहे. आता आपल्याला पॅकेज्ड फूडच्या जागतिक बाजारपेठेत देशाला नव्या उंचीवर न्यायचे आहे आणि माझे तर असे स्वप्न आहे की जगातील प्रत्येक डायनिंग टेबलवर भारताचे कोणते ना कोणते खाद्यान्न किंवा फूड प्रॉडक्ट असलेच पाहिजे.म्हणूनच आपल्याला शेतीमध्येही झिरो इफेक्ट, झिरो डिफेक्टवाल्या मंत्राला चालना द्यायची आहे. भरड धान्य- श्री अन्नाचे उत्पादन असो, औषधी गुणधर्म असलेली पिके असोत किंवा मग नैसर्गिक शेतीच्या दिशेने वळणे असो, पीएम किसान समृद्धी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक मोठी पाठबळ प्रणाली विकसित केली जात आहे.  

बंधू आणि भगिनींनो,

येथे इतक्या मोठ्या संख्येने आमच्या  माता-भगिनी उपस्थित आहेत. माता-भगिनींशिवाय शेतीची कल्पनाच अशक्य आहे. म्हणूनच आता शेतीला नवी दिशा देण्यामध्ये माता-भगिनींच्या भूमिकेचा विस्तार केला जात आहे. नमो ड्रोन दीदीप्रमाणेच कृषी सखी कार्यक्रम असाच एक प्रयत्न आहे. आम्ही आशा सेविकेच्या रुपात भगिनींचे काम पाहिले आहे. आम्ही बँक सखीच्या रुपात डिजिटल इंडिया बनवण्यात भगिनींची भूमिका पाहिली आहे. आता आम्ही कृषी सखीच्या रुपात शेतीला नवी ताकद मिळताना पाहणार आहोत. आज 30 हजारपेक्षा जास्त बचत गटांना कृषी सखीच्या रुपात प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. आता 12 राज्यांमध्ये ही योजना सुरू झाली आहे. आगामी काळात संपूर्ण देशात हजारो गटांना याच्याशी संलग्न केले जाईल. हे अभियान तीन कोटी लखपती दीदी बनवण्यात देखील मदत करेल.

बंधू आणि भगिनींनो

गेल्या 10 वर्षात काशीच्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने गेल्या सात वर्षांपासून राज्य सरकारला संधी मिळाली आहे. संपूर्ण समर्पणाच्या भावनेने काम केले आहे. काशीमध्ये बनास डेरी संकुलाची स्थापना असो, शेतकऱ्यांसाठी बनवलेले पेरिशेबल कार्गो सेंटर असो, विविध कृषी शिक्षण आणि संशोधन केंद्र असो, इंटिग्रेटेड पॅक हाऊस असो, आज या सर्वांमुळे काशी आणि पूर्वांचलचे शेतकरी खूप मजबूत झाले आहेत, त्यांचे उत्पन्न वाढले आहे. बनास डेरीने तर बनारस आणि आजूबाजूच्या भागातील शेतकरी आणि पशुपालकांचे भाग्य बदलण्याचे काम केले आहे. आज ही डेरी दररोज सुमारे 3 लाख लीटर दूध संकलन करण्याचे काम करत आहे. एकट्या बनारसचेच 14 हजारपेक्षा जास्त पशुपालक, ही आमची कुटंबे या डेरीमध्ये नोंदणीकृत झाले आहेत. आता बनास डेरी पुढील दीड वर्षात काशीच्याच आणखी 16 हजार पशुपालकांना आपल्या सोबत जोडणार आहे. बनास डेरी आल्यानंतर बनारसच्या अनेक दूध उत्पादकांच्या उत्पन्नात 5 लाख रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. दर वर्षी शेतकऱ्यांना बोनस देखील दिला जात आहे. गेल्या वर्षी देखील 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त बोनस पशुपालकांच्या बँक खात्यात पाठवण्यात आला होता. बनास डेरी उत्तम वाणाच्या गीर आणि साहिवाल गाई देखील शेतकऱ्यांना देत आहे. यामुळे देखील त्यांचे उत्पन्न वाढले आहे.

मित्रहो,

बनारसमध्ये मत्स्यपालकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी देखील आमचे सरकार सातत्याने काम करत आहे. पीएम मत्स्य संपदा योजनेमुळे शेकडो शेतकऱ्यांना फायदा होत आहे. त्यांना आता किसान क्रेडीट कार्डची सुविधा देखील मिळत आहे. येथे जवळच चंदौलीमध्ये सुमारे 70 कोटी रुपये खर्चाने आधुनिक फिश मार्केटची निर्मिती केली जात आहे यामुळे देखील बनारसच्या मत्स्य पालनाशी संबंधित शेतकऱ्यांना मदत मिळेल.

मित्रहो,

पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेला बनारसमध्ये जबरदस्त यश मिळत आहे. येथील जवळ-जवळ 40 हजार लोकांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. बनारसच्या 2100 पेक्षा जास्त घरांमध्ये सोलर पॅनेल बसवण्यात आले आहेत. आता तीन हजारपेक्षा जास्त घरांमध्ये पॅनेल बसवण्याचे काम सुरू आहे. जी घरे पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेशी जोडले गेले आहेत त्यापैकी बहुतेकांना दुप्पट लाभ झाला आहे. त्यांचे विजबील तर शून्य झालेच आहे, दुसरीकडे दोन-तीन हजारांची कमाई देखील होऊ लागली आहे.

मित्रहो,

गेल्या 10 वर्षात बनारस शहर आणि आसपासच्या गावात कनेक्टिव्हिटीचे जे काम झाले आहे, त्यामुळे देखील मदत मिळाली आहे. आज काशीमध्ये देशातील सर्वात पहिल्या सिटी रोपवे प्रकल्पाचे काम अखेरच्या टप्प्यात पोहोचत आहे. गाझीपूर, आझमगड आणि जौनपूरच्या रस्त्यांना जोडणारा रिंग रोड विकासाचा मार्ग बनला आहे. फुलवारिया आणि चौकघाट येथे उड्डाणपूल बांधण्यात आल्याने वाहतूक कोंडीने त्रस्त बनारसवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

काशी, बनारस आणि केंटची रेल्वे स्थानके आता पर्यटकांचे आणि बनारसी लोकांचे नव्या रूपात स्वागत करत आहेत. बाबतपूर विमानतळाचे नवे स्वरूप केवळ वाहतुकीलाच नव्हे तर व्यवसायासाठीही मोठी सुविधा देत आहे. गंगा घाटांवर होत असलेला विकास, बीएचयू मध्ये बांधल्या जात असलेल्या नवीन आरोग्य सुविधा, शहरातील तलावांचे नवे रूप आणि वाराणसीमध्ये विविध ठिकाणी विकसित होत असलेल्या नवीन प्रणालींमुळे काशीतील लोकांमध्ये अभिमानाची भावना आहे. काशीमध्ये खेळांबाबत जे काम सुरू आहे, नवीन स्टेडियमवर जे काम सुरू आहे, त्यातून तरुणांसाठीही नव्या संधी निर्माण होत आहेत.

मित्रहो,

आपली काशी संस्कृतीची राजधानी राहिली आहे , आपली काशी ही ज्ञानाची राजधानी राहिली आहे, आपली काशी सर्व विद्यांची राजधानी आहे. पण या सर्वांसोबतच काशी एक अशी नगरी बनली आहे जिने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे की ही हेरिटेज सिटी देखील  शहरी विकासाचा नवा अध्याय लिहू शकते. विकास भी आणि विरासत भी चा मंत्र काशीत सर्वत्र दिसतो. आणि या विकासाचा फायदा केवळ काशीला होत नाही. तर पूर्वांचलच्या कानाकोपऱ्यातून जी कुटुंबे आपल्या कामासाठी आणि गरजांसाठी काशीला येतात, त्या सर्वांना या सर्व कामांमुळे खूप मदत होत आहे.  

मित्रहो,

बाबा विश्वनाथाच्या कृपेने काशीच्या विकासाची ही नवी गाथा अविरत सुरू राहील. मी पुन्हा एकदा, देशभरातून जोडले गेलेल्या सर्व शेतकरी सहकाऱ्यांना मनापासून अभिवादन करतो, अभिनंदन करतो. काशीवासीयांचे देखील पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. 

नम: पार्वती पतये!

हर हर महादेव!

 

* * *

NM/Sonali K/Shailesh P/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai