Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे पंतप्रधानांनी किसान सन्मान संमेलनाला केले संबोधित

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे पंतप्रधानांनी किसान सन्मान संमेलनाला केले संबोधित


नवी दिल्ली, 18 जून 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे किसान सन्मान संमेलनाला संबोधित केले. यावेळी त्यांनी  सुमारे 9.26 कोटी लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 20,000 कोटींहून अधिक रकमेचा  17 वा हप्ता जारी केला. शेतकरी कार्यक्रमादरम्यान, त्यांनी स्वयं सहाय्यक  गटांमधील 30,000 हून अधिक महिलांना ‘कृषी सखी’ म्हणून प्रमाणपत्रे प्रदान केली.दूरदृश्‍य प्रणाली तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशभरातील शेतकरीसुद्धा या कार्यक्रमाशी जोडले गेले होते.

यावेळी उपस्थितांना पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी  संबोधित केले. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर पहिल्यांदाच पंतप्रधानांनी वाराणसी मतदारसंघाला  भेट दिली.  यावेळी  काशीच्या जनतेने आपल्याला सलग तिसऱ्यांदा निवडून  दिल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले. आता तर गंगा मातेनेही मला दत्तक घेतले आहे असे वाटत असल्याचे ते म्हणाले. काशीसाठी मी आता इथला स्‍थानिकच बनलो आहे,’’ अशा शब्दांमध्‍ये  पंतप्रधान मोदी यांनी मतदारांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

18व्या लोकसभेसाठी  नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुका म्हणजे  भारताच्या लोकशाहीची विशालता, क्षमता, व्यापकता आणि ही पाळेमुळे किती खोलवर गेली आहेतयांचे प्रतीक असल्याचे संपूर्ण जगाला दिसून आल्याचे  पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या निवडणुकांमध्ये 64 कोटींहून अधिक लोकांनी मतदान केल्याचे नमूद करून पंतप्रधान म्हणाले की, नागरिकांचा एवढा मोठा सहभाग पाहून इतक्या मोठ्या प्रमाणावर निवडणूक इतरत्र कुठेही होत नाही. इटलीतील जी 7 शिखर परिषदेच्या आपल्या नुकत्याच झालेल्या भेटीचा उल्लेख  करून पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले की, भारतातील मतदारांची संख्या सर्व जी 7 राष्ट्रांमधील एकूण मतदारांच्या संख्येपेक्षा दीडपट  अधिक आहे तर  युरोपियन महासंघाच्या सर्व सदस्य देशांमधील मतदारांच्या  संख्येपेक्षा ही संख्‍या अडीचपट असल्याचेही त्यांनी सांगितले. या निवडणुकीमध्‍ये  31 कोटींहून अधिक महिला मतदारांनी  सहभाग नोंदवला, हा एक नवा‍ विक्रम असल्याचे पंतप्रधानांनी  अधोरेखित केले. विशेष म्हणजे ही संख्या  एका  देशात  महिला मतदारांच्या संख्‍येच्या तुलनेत संपूर्ण जगात सर्वात जास्त  आहे. असे  सांगून ते पुढे म्हणाले की  अमेरिकेच्या संपूर्ण लोकसंख्येच्या जवळ जाणारी हा आकडा  आहे. “भारताच्या लोकशाहीचे सामर्थ्य आणि सौंदर्य संपूर्ण जगाला केवळ  आकर्षित करत नाही तर आपली लोकशाही   मोठा प्रभावही टाकते”, असे पंतप्रधान  मोदी म्हणाले. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन तो यशस्वी केल्याबद्दल वाराणसीतील जनतेचे आभार मानण्याची संधीही पंतप्रधानांनी घेतली. वाराणसीच्या जनतेने केवळ खासदारच नाही तर पंतप्रधान निवडले आहेत, असे सांगून पंतप्रधान मोदींनी आभार व्यक्त केले.

निवडून आलेले सरकार सलग  तिसऱ्यांदा सत्तेवर आल्याने निवडणूक आदेशाला ‘अभूतपूर्व’ असे संबोधून पंतप्रधान म्हणाले की, जागतिक लोकशाहीमध्ये ही एक फार क्वचित घडणारी गोष्‍ट  आहे. भारतात अशा प्रकारची हॅटट्रिक 60 वर्षांहून अधिक वर्षांपूर्वी झाली होती, असे सांगून  पंतप्रधान म्हणाले, भारतासारख्या देशात जिथे तरुणांच्या आकांक्षा उत्तुंग  असतात, तिथे जर  10 वर्षांच्या कारकिर्दीनंतर सरकार पुन्हा सत्तेवर आले, तर हा मोठा विजय आहे  आणि प्रचंड विश्वास दर्शवणारे   बहुमत आहे आणि तुमचा हा विश्वास हेच माझे सर्वात मोठे भांडवल आहे, या  देशाला नवीन उंचीवर नेण्यासाठी हा विश्‍चासच  मला सतत उत्साही ठेवतो.

विकसित भारताचे आधारस्तंभ म्हणून शेतकरी, महिलाशक्ती, तरुण आणि गरीब यांना आपण महत्वाचे  मानतो, याचा  पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला आणि सरकार स्थापनेनंतरचा पहिला निर्णय शेतकरी आणि गरीब कुटुंबांबाबत होता, याचे त्यांनी स्मरण केले. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 3 कोटी अतिरिक्त घरे किंवा पीएम किसान सन्मान निधीच्या हप्त्यांबाबतचे हे निर्णय अनेक लोकांना मदत करतील, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित शेतकऱ्यांना आणि दूरदृश्‍य प्रणाली तंत्रज्ञानाद्वारे कार्यक्रमाशी जोडलेल्या सर्वाना  अभिवादन केले.  कोट्यवधी  शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटी रुपये जमा झाल्याचा उल्लेख त्यांनी  केला. 3 कोटी ‘लखपती दीदी’ तयार करण्याच्या दिशेने एक ठोस  पाऊल म्हणून कृषी सखी उपक्रमाबद्दलही त्यांनी सांगितले. हा उपक्रम लाभार्थी महिलांना सन्मान आणि उत्पन्नाच्या स्त्रोताची खात्री देईल, असे पंतप्रधान म्हणाले.

“पंतप्रधान किसान सन्मान निधी ही जगातील सर्वात मोठी थेट लाभ हस्तांतरण योजना म्हणून उदयास आली आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 3.25 लाख कोटींहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे. तर  700 कोटी रुपये एकट्या वाराणसीतील कुटुंबांना हस्तांतरित केले आहेत. तंत्रज्ञानामुळे   पात्र लाभार्थ्यांपर्यंत थेट मदत पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विकसित भारत संकल्प यात्रा  ज्याने 1 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेंतर्गत स्वत:ची नोंदणी करण्यास सक्षम केले. ते पुढे म्हणाले की, सुलभता वाढवण्यासाठी नियम आणि कायदे सोपे करण्यात आले आहेत. “जेव्हा हेतू आणि विश्वास योग्य ठिकाणी असतात तेव्हा शेतकरी कल्याणाशी संबंधित काम वेगाने होते”, असे पंतप्रधान  मोदी पुढे म्हणाले.

21व्या शतकात भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यात कृषी-परिसंस्थेच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करून, पंतप्रधान मोदींनी डाळी आणि तेलबियांमध्ये आत्मनिर्भरतेकरिता जागतिक दृष्टिकोन आणि निकड यावर भर दिला. अग्रगण्य कृषी निर्यातदार बनण्याची आवश्यकताही त्यांनी उद्धृत केली. प्रदेशातील स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळत आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा एक उत्पादन योजना आणि निर्यात केंद्रांद्वारे निर्यातीला चालना मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतीतही झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट मंत्रावर जोर देत जगभरातील प्रत्येक जेवणाच्या टेबलावर किमान एक भारतीय अन्नपदार्थ असावा असे आपले स्वप्न असल्याचेही त्यांनी सांगितले. भरडधान्ये, वनौषधी उत्पादने आणि नैसर्गिक शेतीला पाठबळ देण्यासाठी किसान समृद्धी केंद्रांच्या माध्यमातून मोठे नेटवर्क तयार केले जात असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती लक्षात घेऊन, पंतप्रधानांनी कृषी क्षेत्रातील त्यांचे महत्त्व आणि समर्थन अधोरेखित केले आणि त्यांच्या योगदानाला चालना देण्यासाठी कृषी क्षेत्राचा विस्तार करण्याचा उल्लेख केला. कृषी सखी कार्यक्रम म्हणजे ड्रोन दीदी कार्यक्रमाप्रमाणेच या दिशेने टाकलेले पाऊल आहे यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. आशा वर्कर्स आणि बँक सखी म्हणून महिलांचे योगदान अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की, देश आता कृषी सखी म्हणून त्यांच्या क्षमतांची अनुभूती घेईल. पीएम मोदींनी कृषी सखी म्हणून बचत गटांना 30,000 हून अधिक प्रमाणपत्रे प्रदान केल्याचा उल्लेख केला आणि सांगितले की सध्या 11 राज्यांमध्ये सुरू असलेली ही योजना देशभरातील हजारो बचत गटांशी जोडली जाईल आणि 3 कोटी लखपती दीदी तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

पंतप्रधानांनी काशी आणि पूर्वांचलच्या शेतकऱ्यांप्रती केंद्र आणि राज्य सरकारची आस्था अधोरेखित केली आणि बनास डेअरी संकुल, नाशवंत मालासाठी कार्गो केंद्र आणि एकात्मिक पॅकेजिंग हाऊसचा उल्लेख केला. पंतप्रधान म्हणाले, बनास डेअरीने बनारस आणि आसपासच्या शेतकरी आणि पशुपालकांचे नशीब पालटले आहे. आज ही डेअरी दररोज सुमारे तीन लाख लिटर दुधाचे संकलन करत आहे. एकट्या बनारसमधील 14 हजारांहून अधिक पशुपालक कुटुंबे या डेअरीमध्ये नोंदणीकृत आहेत. आता बनास डेअरी येत्या दीड वर्षात काशीतील आणखी 16 हजार पशुपालकांना सामावून घेणार आहे. बनास डेअरी सुरू झाल्यावर बनारसच्या अनेक दूध उत्पादकांच्या उत्पन्नात 5 लाख रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने केलेल्या कामांवर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी पीएम मत्स्य संपदा योजना आणि किसान क्रेडिट कार्डच्या फायद्यांचा उल्लेख केला. वाराणसीमध्ये मत्स्यपालन करणाऱ्यांना मदत करण्यासाठी सुमारे 70 कोटी रुपये खर्चून चंदौली येथे आधुनिक मासळी बाजार (फिश मार्केट) उभारण्याबाबतही त्यांनी अवगत केले.

वाराणसीमध्ये पीएम सूर्यघर मोफत वीज योजना भरभराटीला येत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. या योजनेत सुमारे 40 हजार स्थानिक लोकांनी नोंदणी केली असून 2,500 घरांना सोलर पॅनल मिळाले असून 3,000 घरांसाठी काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे लाभार्थी कुटुंबांना शून्य वीज बिल आणि अतिरिक्त उत्पन्न असा दुहेरी लाभ मिळत आहे.

वाराणसी आणि नजीकच्या  गावांमध्ये संपर्क सुविधा  वाढवण्याच्या दिशेने गेल्या 10 वर्षात केलेल्या कामांचा उल्लेख  करून पंतप्रधानांनी वाराणसीतील देशाचा  पहिला सिटी रोपवे प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे नमूद केले . गाझीपूर, आझमगड आणि जौनपूर शहरांना जोडणारा रिंग रोड, फुलवारिया आणि चौकघाट येथील उड्डाणपूल, काशी, वाराणसी आणि कँट रेल्वे स्थानकांना नवे रूपहवाई वाहतूक आणि व्यवसाय सुलभ करण्यात मदत करणारा बाबतपूर विमानतळ, गंगा घाट परिसरातील विकास, बनारस हिंदू विद्यापीठातील नवीन सुविधा, शहरातील कुंडांचे नूतनीकरण आणि  वाराणसीमध्ये विविध ठिकाणी नवीन यंत्रणा विकसित केल्या जात आहेत.  काशीमधील क्रीडा विषयक पायाभूत सुविधांचा विकास आणि नवीन स्टेडियम युवकांसाठी नवीन संधी निर्माण करत आहेत असे पंतप्रधान म्हणाले.

विद्येची राजधानी म्हणून काशी प्रसिद्ध असल्याची आठवण करून देत , वारसा असलेले शहर शहरी विकासाची नवीन गाथा  कशी लिहू शकते हे संपूर्ण जगाला शिकवणारे शहर बनल्याबद्दल पंतप्रधानांनी या प्राचीन शहराची प्रशंसा केली. विकासाचा मंत्र आणि वारसा काशीत सर्वत्र दिसतो. आणि या विकासाचा फायदा केवळ काशीलाच होत नाही. तर संपूर्ण पूर्वांचलमधील कुटुंबे जी त्यांच्या कामासाठी आणि गरजांसाठी काशीला येतात, त्यांनाही या सर्व विकास कामातून खूप मदत मिळते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.  बाबा विश्वनाथांच्या आशीर्वादाने काशीच्या विकासाची ही नवीन गाथा अविरत चालू राहील, असे सांगत  मोदींनी समारोप केला.

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल  आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री  शिवराज सिंह चौहान, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री  भगीरथ चौधरी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक तसेच  उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान  किसान निधीचा  17 वा हप्ता जारी करण्यासंबंधी पहिल्या फाईलवर स्वाक्षरी केली ज्यातून शेतकरी कल्याणाप्रति सरकारची वचनबद्धता दिसून येते. याच  वचनबद्धतेचे पुढचे पाऊल म्हणून, पंतप्रधानांनी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत सुमारे 9.26 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा 17 वा हप्ता जारी केला. आतापर्यंत 11 कोटींहून अधिक पात्र शेतकरी कुटुंबांना पीएम-किसान  अंतर्गत 3.04 लाख कोटी रुपयांहून  अधिक लाभ मिळाले आहेत.

पंतप्रधानांनी बचत गटांमधील 30,000 हून अधिक महिलांना कृषी सखी म्हणून प्रमाणपत्रेही प्रदान केली. कृषी सखी अभिसरण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण महिलांचे कृषी सखी म्हणून सक्षमीकरण करून आणि कृषी सखींना निम -विस्तार कामगार म्हणून प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र देऊन ग्रामीण भारताचा कायापालट करणे हा आहे. हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम ‘लखपती दीदी’ कार्यक्रमाच्या उद्दिष्टांना अनुरुप आहे.

 

 

 

N.Chitale/Suvarna/Vasanti/Sushama/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai