Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उत्तर प्रदेशातील बहराईच येथे महाराजा सुहेलदेव स्मारक आणि चित्तौरा तलावाच्या विकासकामांच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

उत्तर प्रदेशातील बहराईच येथे महाराजा सुहेलदेव स्मारक आणि चित्तौरा तलावाच्या विकासकामांच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण


नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी 2021

 

नमस्‍कार !

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल , राज्याचे लोकप्रिय आणि यशस्‍वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ , उत्तर प्रदेश सरकारचे अन्य मंत्रिगण, संसदेतील माझे सहकारी, आमदार, आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो !

आपल्या पराक्रमाने मातृभूमीचा मान वाढवणारे राष्ट्रनायक महाराजा सुहेलदेव यांची जन्मभूमी आणि ऋषीमुनींनी जिथे तप केले ,त्या बहराइचच्या पवित्र धरतीला मी आदरपूर्वक वंदन करतो . वसंत पंचमीच्या तुम्हा सर्वाना, संपूर्ण देशाला खूप-खूप शुभेच्छा !! सरस्वती माता भारताच्या ज्ञान-विज्ञानाला अधिक समृद्ध करो. आजचा दिवस विद्या आरंभ आणि अक्षर ज्ञानासाठी अतिशय शुभ दिवस मानला जातो. आपल्याकडे म्हटले आहे :-

सरस्वती महाभागे विद्ये कमललोचने।

विद्यारूपे विशालाक्षि विद्यां देहि नमोऽस्तु ते॥

म्हणजे , हे महाभाग्यवती, ज्ञानरूपी , कमळासारखे विशाल नेत्र असलेली ज्ञानदात्री सरस्वती, मला विद्या दे, मी तुला वंदन करतो. भारताच्या, मानवतेच्या सेवेसाठी संशोधन आणि अभिनवतेत सहभागी झालेल्या, राष्ट्र निर्मितीत सहभागी झालेल्या प्रत्येक देशवासियाला सरस्वती मातेचा आशीर्वाद मिळो, त्यांना यश मिळो हीच आम्हा सर्वांची प्रार्थना आहे.

बंधू आणि भगिनींनो,

रामचरित मानसमध्ये गोस्वामी तुलसीदास म्हणतात , ऋतु बसंत बह त्रिबिध बयारी। म्हणजे वसंत ऋतूमध्ये शीतल, मंद सुगंध, अशी तीन प्रकारची हवा वाहत आहे, याच हवेत, याच ऋतूत शेते , बाग-बगीचा तसेच जीवनाचा प्रत्येक घटक आनंदित होत आहे. खरेच , आपण जिथे पाहू तिथे फुलांचे ताटवे नजरेस पडतात, प्रत्येक प्राणी वसंत ऋतूच्या स्वागतासाठी तयार आहे. हा वसंत महामारीची निराशा झटकून पुढे वाटचाल करणाऱ्या भारतासाठी नवी आशा , नवी उमेद घेऊन आला आहे. या उल्हासात भारतीयत्व , आपली संस्कृती , आपल्या संस्कारांसाठी ढाल बनून उभे राहणारे महानायक, महाराजा सुहेल देव यांचा जन्मोत्सव आपला आनंद द्विगुणित करत आहे.

मित्रानो,

मला सुमारे दोन वर्षांपूर्वी गाज़ीपुर येथे महाराजा सुहेल देव यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी करण्याची संधी मिळाली होती. आज बहराइच येथे त्यांच्या भव्य स्मारकाचा शिलान्यास करण्याचे सौभाग्य लाभले आहे. हे आधुनिक आणि भव्य स्मारक, ऐतिहासिक चित्तोरा तलावाचा विकास, बहराइचवर महाराजा सुहेलदेव यांचा आशीर्वाद आणखी वाढवेल , भावी पिढयांना देखील प्रेरित करेल.

मित्रानो,

आज महाराजा सुहेल देव यांच्या नावे बांधण्यात आलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाला आणखी एक नवीन भव्य इमारत मिळाली आहे. बहराइच सारख्या विकासासाठी महत्वाकांक्षी जिल्ह्यात आरोग्य सुविधेतील वाढ इथल्या लोकांचे जीवन सुलभ करेल. याचा लाभ आसपासच्या श्रावस्ती, बलरामपुर, सिद्धार्थनगर यांना होईलच , नेपाळ इथून येणाऱ्या रुग्णांना देखील ते मदत करेल.

बंधू आणि भगिनींनो

भारताचा इतिहास केवळ तेवढा नाही जो देशाला गुलाम बनवणऱ्या , गुलामगिरीच्या मानसिकतेतून इतिहास लिहिणाऱ्यांनी लिहिला आहे. भारताचा इतिहास तो देखील आहे जो भारताच्या सामान्य लोकांनी , भारताच्या लोककथांमध्ये रचलेला -वसलेला आहे. , जो पिढ्यानी पुढे नेला आहे. आज जेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्यच्या 75 व्या वर्षात प्रवेश करत आहे ,अशा महापुरुषांचे योगदान, त्यांचा त्‍याग, त्यांची तपस्‍या, त्यांचा संघर्ष, त्यांची वीरता, त्यांचे हौतात्म्य, या सर्व गोष्टींचे स्‍मरण करणे, त्यांना आदरपूर्वक वंदन करणे , त्यांच्याकडून प्रेरणा घेणे यापेक्षा मोठी कोणतीही संधी असू शकत नाही. हे दुर्भाग्य आहे की भारत आणि भारतीयत्वाच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले अशा अनेक नायक-नायिकांना ते स्थान दिले गेले नाही ज्यावर त्यांचा हक्क होता. इतिहास रचणाऱ्यांबरोबरच , इतिहास लिहिण्याच्या नावावर हेर-फेर करणाऱ्यांनी जो अन्याय केला, तो आता आजचा भारत सुधारत आहे , बरोबर करत आहे. चुकांपासुन देशाला मुक्त करत आहे. तुम्ही बघा, नेताजी सुभाषचंद्र बोस, जे आझाद हिंद सरकारचे पहिले पंतप्रधान होते, त्यांच्या या ओळखीला , आझाद हिंद सेनेच्या योगदानाला ते महत्व दिले गेले , जे महत्‍व नेताजी यांना मिळायला हवे होते?

आज लाल किल्ला ते अंदमान-निकोबार पर्यंत त्यांची ही ओळख आपण देश आणि जगासमोर सशक्त केली आहे. देशाच्या पाचशेहून अधिक संस्थानांना एकत्र करण्याचे कठीण कार्य करणाऱ्या सरदार पटेल यांच्याबरोबर काय झाले, देशातील प्रत्येक लहान मुलाला हे चांगले माहीत आहे. आज जगातील सर्वात मोठा पुतळा स्टेच्यू ऑफ यूनिटी सरदार पटेल यांचा आहे, जो आपल्याला प्रेरणा देत आहे. देशाला संविधान देण्यात महत्वाची भूमिका देणारे, वंचित, पीडित, शोषित यांचा आवाज, बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडेही केवळ राजकीय चष्म्यातून पाहिले गेले. आज भारत तसेच इंग्लंड मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित ठिकाणांना पंचतीर्थ म्हणून विकसित केले जात आहे.

मित्रानो

भारताचे असे अनेक सेनानी आहेत ज्यांच्या योगदानाला अनेक कारणांमुळे मान दिला गेला नाही , ओळख दिली गेली नाही . चौरी-चौराच्या वीरांबरोबर जे झाले ते आपण विसरू शकतो का ? महाराजा सुहेल देव आणि भारतीयत्वाच्या रक्षणासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबरोबर देखील असाच व्यवहार केला गेला.

इतिहासाच्या पुस्तकांमध्ये भले ही महाराजा सुहेलदेव यांचे शौर्य, पराक्रम, त्यांची वीरता यांना ते स्थान मिळाले नाही , मात्र अवध आणि तराई पासून पूर्वांचलच्या लोककथांमध्ये , लोकांच्या हृदयात ते कायम राहिले. केवळ वीरताच नाही , एक संवेदनशील आणि विकासवादी शासक म्हणून त्यांचा अमिट ठसा आहे. आपल्या शासनकाळात ज्याप्रकारे त्यांनी उत्तम रस्ते , तलाव , बाग-बगीचे आणि शिक्षण क्षेत्रात काम केले ते अभूतपूर्व होते. त्यांचा हाच विचार , या स्मारक स्थळात देखील दिसणार आहे.

मित्रानो,

महाराजा सुहेलदेव यांच्या जीवनाने पर्यटकांना प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचा 40 फुटाचा कांस्य पुतळा उभारला जाईल. इथे उभारण्यात येणाऱ्या संग्रहालयात महाराजा सुहेलदेव यांच्याशी निगडित ऐतिहासिक माहिती असेल. त्याच्या अंतर्गत भागाचा तसेच आजूबाजूच्या रस्त्यांचेरुंदीकरण केले जाईल. मुलांसाठी उद्यान असेल, सभागृह असेल , पर्यटकांसाठी निवासस्थान , पार्किंग, कैफेटीरिया सारख्या अनेक सुविधांची निर्मिती केली जाईल. त्याचबरोबर जे स्थानिक शिल्पकार आहेत, कलाकार आहेत, ते त्यांच्या वस्तू इथे सहज विकू शकतील , यासाठी दुकाने बांधली जातील. त्याप्रमाणे चित्तौरा तलावावर घाट आणि पायऱ्यांचे बांधकाम आणि सौंदर्यीकरणामुळे या ऐतिहासिक तलावाचे महत्व आणखी वाढेल. हे सर्व प्रयत्न , बहराइचची सुंदरताच केवळ वाढवणार नाहीत तर इथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही वाढ करतील. ‘मरी मैय्या’ च्या कृपेने हे कार्य लवकरच पूर्ण होईल.

बंधू आणि भगिनींनो ,

गेल्या काही वर्षात देशभरात इतिहास, आस्था, अध्यात्म, संस्कृतीशी संबंधित जितक्या स्मारकांचे बांधकाम केले जात आहे त्यांचे सर्वात मोठे उद्दिष्ट पर्यटनाला चालना देणे हे देखील आहे . उत्तर प्रदेश तर पर्यटन आणि तीर्थाटन, दोन्ही बाबतीत समृद्ध देखील आहे आणि त्याच्या अपार क्षमता देखील आहेत. मग ते भगवान राम यांचे जन्मस्थान असेल किंवा कृष्णाचे वृंदावन, भगवान बुद्धाचे सारनाथ असेल किंवा मग काशी विश्वनाथ, संत कबीर यांचे मगहर धाम असो किंवा मग वाराणसी इथे संत रविदास यांच्या जन्मस्थळाचे आधुनिकीकरण, संपूर्ण प्रदेशात मोठ्या प्रमाणावर काम सुरु आहे. त्यांच्या विकासासाठी भगवान राम, श्रीकृष्ण आणि बुद्ध यांच्या जीवनाशी संबंधित स्थळे उदा. अयोध्या , चित्रकूट, मथुरा, वृन्दावन, गोवर्धन, कुशीनगर, श्रावस्ती आदि तीर्थस्थळांवर रामायण सर्किट, आध्यात्मिक सर्किट, बौद्ध सर्किटचा विकास केला जात आहे.

बंधू आणि भगिनींनो

गेल्या काही वर्षात जे प्रयत्न झाले आहेत , त्यांचा प्रभाव देखील दिसू लागला आहे . ज्या राज्यात अन्य राज्यापेक्षा सर्वात जास्त पर्यटक येतात , त्याचे नाव उत्तर प्रदेश आहे. परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यातही उत्तर प्रदेशने देशातील अव्वल तीन राज्यांमध्ये स्थान मिळवले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये पर्यटकांसाठी आवश्यक सुविधांबरोबरच आधुनिक संपर्क साधनेही वाढविण्यात येत आहेत. भविष्यामध्ये अयोध्येचे विमानतळ आणि कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातल्या आणि परदेशातल्या पर्यटकांसाठी अतिशय उपयोगी ठरणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये लहान-मोठ्या डझनभर विमानतळांचे काम सुरू आहे. त्यापैकी काही विमानतळे पूर्वांचल भागातही आहेत. ‘उडान’ योजनेअंतर्गत परवडणारे तिकीटदर ठेवून उत्तर प्रदेशातल्या अनेक शहरांना हवाई सेवेने जोडण्याची मोहीम सुरू आहे.

याशिवाय पूर्वांचल द्रुतगती मार्ग, बुंदेलखंड द्रुतगती मार्ग, गंगा द्रुतगती मार्ग, गोरखपूर लिंक द्रुतगती मार्ग, बलिया द्रुतगती मार्ग असे आधुनिक आणि रूंद रस्ते संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये बनविण्यात येत आहेत. आणि या कामामुळे एका पद्धतीने आधुनिक उत्तर प्रदेशमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. हवाई आणि रस्ते संपर्क व्यवस्थेशिवाय उत्तर प्रदेशमध्ये रेल्वे संपर्क यंत्रणाही आता आधुनिक होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये दोन मोठी मालवाहतूक समर्पित मार्गिका जंक्शन्स आहेत. अलिकडेच मालवाहतूक समर्पित पूर्वेकडील मार्गिकेच्या एका मोठ्या भागाचे लोकार्पण उत्तर प्रदेशात केले गेले आहे. उत्तर प्रदेशात ज्याप्रकारे आज आधुनिक पायाभूत सुविधा निर्माणाचे काम सुरू आहे, ते लक्षात घेता उत्तर प्रदेशामध्ये उद्योग सुरू करण्यासाठी देश आणि दुनियेतले गुंतवणूकदार उत्साहित होत आहेत. यामुळे येथे नवीन उद्योगांसाठी अधिक चांगल्या संधी निर्माण होत आहेत. इथल्या युवकांना रोजगाराच्या नवीन संधीही मिळत आहेत.

मित्रांनो,

कोरोना काळामध्ये ज्याप्रकारे उत्तर प्रदेशामध्ये काम झाले आहे, ते खूप महत्वाचे आहे. कल्पना करा, जर उत्तर प्रदेशच्या परिस्थितीत गडबड झाली असती तर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर कशा पद्धतीने चर्चा केली गेली असती. परंतु योगी यांच्या सरकारने, योगी यांच्या संपूर्ण टीमने अतिशय चांगल्या पद्धतीने परिस्थिती सांभाळली असल्याचे दिसून आले आहे. उत्तर प्रदेश जास्तीत जास्त लोकांचे जीवन वाचविण्यात यशस्वी झाला नाही तर बाहेरून परत आलेल्या श्रमिकांना रोजगार देण्याचे उत्तर प्रदेशाने जे काम केले आहे, ते खूप कौतुकास्पद आहे.

बंधू आणि भगिनींनो,

कोरोनाच्या विरोधात उत्तर प्रदेशाने जो लढा दिला आहे, त्याच्या मागे गेल्या 3 ते 4 वर्षांमध्ये राज्यात करण्यात आलेल्या कामांचे खूप मोठे योगदान आहे. पूर्वांचलला दशकांपर्यंत त्रासदायक ठरणा-या मेंदूज्वराची साथ कमी करण्यासाठी खूप प्रभावी काम उत्तर प्रदेशाने करून दाखवले आहे. उत्तर प्रदेशामध्ये 2014 पर्यंत 14 वैद्यकीय महाविद्यालये होती. आज त्यांची संख्या वाढून 24 झाली आहे. त्याचबरोबर गोरखपूर आणि बरेली येथे एम्सच्या उभारणीचे काम सुरू आहे. याशिवाय आणखी 22 नवीन वैद्यकीय महाविद्यालये बनविण्यात येत आहेत. वाराणसीमध्ये आधुनिक कर्करोग उपचार रूग्णालयाची सुविधाही आता पूर्वांचल भागाला मिळत आहे. उत्तर प्रदेशात जलजीवन मिशन म्हणजेच प्रत्येक घरामध्ये नळाव्दारे पाणी पोहोचविण्यासाठीही अतिशय कौतुकास्पद कार्य केले जात आहे. आता प्रत्येक घरामध्ये शुद्ध पेयजल पोहोचल्यानंतर पाण्यामुळे होणारे अनेक आजार आपोआपच कमी होणार आहेत.

बंधु आणि भगिनींनो,

उत्तर प्रदेशमध्ये वीज, पेयजल, रस्ते आणि आरोग्य सुविधांचा अधिक चांगल्या प्रकारे, थेट लाभ गावांना, गरीब आणि शेतक-यांना होत आहे. विशेषतः ज्या लहान शेतकरी बांधवांकडे खूप कमी जमीन आहे, ते या योजनांचे खूप मोठ्या संख्येने लाभार्थी आहेत. उत्तर प्रदेशातल्या जवळपास अडीच कोटी शेतकरी परिवारांच्या बँक खात्यांमध्ये प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीच्या माध्यमातून थेट पैसे जमा करण्यात आले आहेत. याच शेतकरी बांधवांना यापूर्वी कधी विजेचे बिल भरण्यासाठी किंवा शेतातल्या पिकांसाठी खताचे पोते खरेदी करण्यासाठी इतरांकडून नाइलाजाने कर्ज घ्यावे लागत होते. परंतु अशा लहान शेतकरी बांधवांना आमच्या सरकारने 27 हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त निधी थेट हस्तांतरित केला आहे. त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट पैसा जमा केले आहेत. इथल्या शेतक-यांना विजेचा पुरवठा होत नसल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. बोअरिंगचे पाणी मिळावे, यासाठी रात्र रात्रभर जागावे लागत होते. पाणी मिळावे यासाठी आपली बारी येण्यासाठी वाट पहावी लागत होती. आता विजेचा अखंड पुरवठा होत असल्यामुळे अशा अनेक समस्याही आता संपुष्टात आल्या आहेत.

मित्रांनो,

देशाची लोकसंख्या वाढली त्याचबरोबरच शेतीसाठी वापरण्यात येणारी जमीनही लहान, कमी-कमी होऊ लागली आहे. म्हणूनच देशामध्ये शेतकरी उत्पादक संघांची निर्मिती करणे खूप आवश्यक बनले आहे. आज सरकार लहान लहान शेतक-यांसाठी हजारो शेतकरी उत्पादक संघ म्हणजे ‘एफपीओ’ तयार करीत आहे. 1-2 बीघा जमीन असलेले 500 शेतकरी परिवार ज्यावेळी संघटित होवून बाजारात उतरतील त्यावेळी ते 500-1000 बीघा मालकीची जमीन असलेल्या शेतक-यापेक्षाही जास्त शक्तिशाली, प्रबळ बनू शकणार आहेत. त्याच प्रकारे शेतकरी रेल्वेच्या माध्यमातून भाजीपाला, फळे, दूध, मासे आणि अशा अनेक कृषी व्यवसायांशी संलग्न असलेल्या शेतक-यांना आता मोठ्या बाजारांना जोडण्यात येत आहे. ज्या नवीन सुधारणा कृषी क्षेत्रामध्ये लागू करण्यात आल्या आहेत, त्याचा लाभही लहान आणि छोट्या-मध्यम शेतकरी बांधवांना सर्वात जास्त होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये नवीन कायदे झाल्यानंतर ठिकठिकाणच्या शेतकरी बांधवांनी हे कायदे उपयुक्त, चांगले असल्याचा अनुभव घेतल्याचे आता सामोरे आले आहे. या कृषी कायद्यांविषयी अगदी जाणून-बुजून अपप्रचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला; हे तर आता संपूर्ण देशाने पाहिले आहे. इतकेच नाही तर ज्यांनी देशाच्या कृषी बाजारामध्ये परदेशी कंपन्यांनी यावे म्हणून कायदा तयार केला, तेच आज देशी कंपन्यांच्या नावाने शेतकरी बांधवांना घाबरवून सोडत आहेत.

मित्रांनो,

राजकारण करण्यासाठी असा खोटा आणि अपप्रचार केला जातोय, हे आता उघडकीस आले आहे. नवीन कायद्यांना लागू केल्यानंतर उत्तर प्रदेशात यंदा, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दुप्पट शेतक-यांकडून धान्य खरेदी झाली आहे.

यावर्षी जवळपास 64 लाख मेट्रिक टन अन्नधान्याची खरेदी उत्तर प्रदेशात झाली आहे. ही खरेदी, गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. इतकेच नाही तर योगी जी यांच्या सरकारने ऊस उत्पादक शेतक-यांपर्यंत गेल्या वर्षांतले एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी पोहोचवला आहे. कोरोना काळामध्येही ऊस उत्पादकांना कोणताही त्रास होवू नये म्हणून त्यांना सर्वतोपरी मदत दिली आहे. साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांचे पैसे चुकते करावेत यासाठी केंद्रानेही हजारो कोटी रुपयांची मदत राज्य सरकारांना दिली आहे. ऊस उत्पादक शेतक-यांची बिले त्यांना वेळेवर मिळावीत, यासाठी योगी जी यांच्या सरकारचेही प्रयत्न सुरू आहेत.

बंधू आणि भगिनींनो,

गावांतल्या लोकांचे आणि शेतकरी बांधवांचे जीवनमान चांगले व्हावे, यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. शेतकरी असो, गावांमध्ये वास्तव्य करणारा गरीब असो त्याला कोणतीही समस्या असू नये, त्याला आपल्या घरावर होणा-या अवैध कब्जाच्या भीतीतून मुक्तता मिळावी, यासाठी स्वामित्व योजनाही संपूर्ण उत्तर प्रदेशामध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अलिकडे उत्तर प्रदेशातल्या जवळपास 50 जिल्ह्यांमध्ये ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येत आहे. जवळपास 12 हजार गावांमध्ये ड्रोन सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे आणि आत्तापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त परिवारांना मालमत्ता कार्ड देण्यात आले आहे. म्हणजेच हे सर्व परिवार आता सर्व प्रकारच्या शंका, भीतीतून मुक्त झाले आहेत.

मित्रांनो,

आज गावातला गरीब नागरिक, शेतकरी पहात आहेत की, त्यांचे लहानसे घर वाचविण्यासाठी, त्यांची जमीन वाचविण्यासाठी पहिल्यांदाच कोणते तरी सरकार इतक्या मोठ्या प्रमाणावर योजना चालवतेय. असा अनुभव ही गरीब मंडळी पहिल्यांदा घेत आहेत. इतके मोठे सुरक्षा कवच, प्रत्येक गरीबाला, अगदी प्रत्येक शेतक-याला, प्रत्येक ग्रामवासियाला सरकार देत आहे. म्हणूनच जर कोणाकडून कृषी सुधारणांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांची जमीन लुटण्याचा खोटा प्रचार केला जात असेल तर, त्यावर कसा काय विश्वास ठेवता येईल? आमचे लक्ष्य देशाच्या प्रत्येक नागरिकाला समर्थ बनविण्याचे आहे. आमचा संकल्प देशाला आत्मनिर्भर बनविण्याचा आहे. या संकल्पाच्या सिद्धीसाठी समर्पित भावनेने आम्ही कार्यरत राहणार आहोत. ‘रामचरित मानस’ मधील एका चौपाईने मी आज आपले भाषण समाप्त करणार आहे:-

प्रबिसि नगर कीजे सब काजा ।

हृदयँ राखि कोसलपुर राजा ।।

या चौपाईचा भावार्थ असा आहे की, हृदयामध्ये भगवान रामाचे नाव धारण करून आपण जे काही कार्य करणार आहोत, त्यामध्ये निश्चितच यश मिळणार आहे.

पुन्हा एकदा महाराजा सुहेलदेव यांना वंदन करून, आपल्या सर्वांना या नवीन सुविधांसाठी खूप-खूप शुभेच्छा देतो, योगी जी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करून त्यांना खूप- खूप धन्यवाद देतो!!

 

M.Chopade/S.Kane/S.BedekarP.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com