Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उत्तर प्रदेशमध्ये लखनौ येथे आयोजित जागतिक गुंतवणुकदार संमेलन 2023 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

उत्तर प्रदेशमध्ये लखनौ येथे आयोजित जागतिक गुंतवणुकदार संमेलन 2023 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण


 

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्यजी, ब्रजेश पाठकजी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी आणि इथले लखनौचे प्रतिनिधी राजनाथ सिंहजी, विविध देशांमधून आलेले सर्व ज्येष्ठ मान्यवर, उत्तर प्रदेशचे सर्व मंत्री आणि जागतिक गुंतवणूकदार संमेलनासाठी उपस्थित उद्योग क्षेत्रातील आदरणीय सदस्य, जागतिक स्तरावरील गुंतवणूकदार, धोरणकर्ते, कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गज आणि बधु भगिनिंनो!

जागतिक गुंतवणूकदार संमेलनात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. तुम्ही विचार करत असाल की मी प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताची जबाबदारी का घेतोय, ते अशासाठी की माझी आज मी आणखी एका भूमिकेत आहे. तुम्ही सर्वांनी मला भारताचा पंतप्रधान तसेच उत्तर प्रदेशचा खासदार सुद्धा बनवले आहे. उत्तर प्रदेशबद्दल माझ्या मनात विशेष स्नेह आहे आणि उत्तर प्रदेशातील लोकांप्रतीही माझी विशेष जबाबदारी आहे. ती जबाबदारीसुद्धा पार पाडण्यासाठी आज मी या संमेलनाचा एक भाग म्हणून उपस्थित आहे. आणि म्हणूनच मी देशातून आणि परदेशातून उत्तर प्रदेशमध्ये आलेल्या आपणा सर्व गुंतवणूकदारांचे अभिनंदन करतो आहे, स्वागत करतो आहे.

 

मित्रहो,

उत्तर प्रदेशची ही भूमी सांस्कृतिक वैभव, गौरवशाली इतिहास आणि समृद्ध वारशासाठी ओळखली जाते. इतके सामर्थ्य असूनसुद्धा काही गोष्टींचा संबंध उत्तर प्रदेशशी जोडला गेला आहे. लोक म्हणायचे की उत्तर प्रदेशचा विकास होणे कठीण आहे. लोक म्हणायचे की इथे कायदा आणि सुव्यवस्था सुधारणे अशक्य आहे. उत्तर प्रदेशला बीमारू राज्य म्हटले जात असे, इथे दर दिवशी हजारो कोटी रूपयांचे घोटाळे होत असत. उत्तर प्रदेशकडून कोणालाही कोणतीही अपेक्षा राहिली नव्हती. पण अवघ्या पाच ते सहा वर्षांमध्ये उत्तर प्रदेशाने स्वत:ची एक नवी ओळख निर्माण केली आहे आणि अगदी ठामपणे ही ओळख निर्माण केली आहे. आता सुशासन ही उत्तर प्रदेशची ओळख झाली आहे. आता उत्तम कायदा आणि सुव्यवस्था, शांतता आणि स्थिरतेसाठी उत्तर प्रदेश हे राज्य ओळखले जाते आहे. संपत्ती निर्माण करणाऱ्यांसाठी आता येथे नवीन संधी निर्माण होत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा विकसित झाल्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये त्या उपक्रमांचे परिणाम दिसून येत आहेत. वीजेपासून जोडणीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात सुधारणा घडून आली आहे. 5 आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे देशातील एकमेव राज्य म्हणून लवकरच उत्तर प्रदेश हे राज्य ओळखले जाईल. मालवाहतुकीसाठी समर्पित कॉरीडॉरद्वारे उत्तर प्रदेश हे राज्य थेट सागरी मार्गाने जोडले, गुजरात आणि महाराष्ट्रातील बंदरांशी जोडले जाते आहे. उत्तर प्रदेशमध्ये पायाभूत सुविधांबरोबरच उद्योग सुलभता वाढविण्यासाठी सरकारी विचारसरणीत आणि दृष्टिकोनात सार्थक बदल घडून आला आहे.

 

मित्रहो,

उत्तर प्रदेश ही आज एक आशा आहे, उमेद आहे. भारत आज अवघ्या जगासाठी आकर्षणाचा उज्ज्वल केंद्रबिंदू ठरला आहे आणि त्याच वेळी उत्तर प्रदेश हे राज्य भारताच्या विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण नेतृत्व देत आहे.

 

मित्रहो,

उद्योग विश्वातील आपण सर्व दिग्गज येथे आहात. तुमच्यापैकी बहुतेकांकडे प्रदीर्घ अनुभव आहे. जगाच्या सद्यस्थितीची तुम्हा सर्वांना पुरेपूर जाणीव आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेची आजची क्षमता तसेच वृहत् आणि सुक्ष्म आर्थिक मुलभूत बाबींकडे अगदी बारकाईने पाहत आहात. महामारी  आणि युद्धाच्या धक्क्यातून बाहेर पडल्यानंतर भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनला आहे, ते कसे? भारताची अर्थव्यवस्था याच वेगाने वाढत राहील असा विश्वास आज जगातील प्रत्येक विश्वासार्ह घटकाला वाटतो आहे. नेमके काय घडले, ज्यामुळे जागतिक संकटाच्या या काळातही विकासाच्या बाबतीत भारताने केवळ लवचिकता दाखवली नाही तर तितक्याच वेगाने मुसंडीही मारली.

 

मित्रहो,

भारतीयांचा वाढता आत्मविश्वास हे त्यामागचे सर्वात मोठे कारण आहे. आज भारतीय तरुणांच्या विचारसरणीत, भारतीय समाजाच्या विचारसरणीत आणि आकांक्षांमध्ये मोठा बदल होताना दिसत आहे. आज भारतातील प्रत्येक नागरिकाला जास्तीत जास्त विकास पाहायचा आहे. त्याला आता भारताचा लवकरात लवकर विकास होताना पाहायचे आहे. भारतीय समाजाच्या आकांक्षा आता सरकारांनाही चालना देत आहेत आणि याच आकांक्षा विकासाच्या कामांनाही गती देत आहेत.

 

आणि मित्रहो,

आज तुम्ही ज्या राज्यात बसले आहात, त्या राज्याची लोकसंख्या सुमारे 25 कोटी आहे, हे विसरू नका. जगातील मोठ्यात मोठ्या देशांच्या तुलनेत एकट्या उत्तर प्रदेशची क्षमता कितीतरी जास्त आहे. संपूर्ण भारताप्रमाणेच आज उत्तर प्रदेशमध्येही एक मोठा महत्त्वाकांक्षी समाज तुमची वाट बघतो आहे.

 

मित्रहो,

आज भारतात सामाजिक, भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांवर जे काम झाले आहे, त्याचा मोठा फायदा उत्तर प्रदेशलाही झाला आहे. त्याचमुळे आज येथील समाज सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या अतिशय समावेशक झाला आहे, जोडला गेला आहे. एक बाजारपेठ म्हणून भारत आता अखंड होतो आहे, सरकारी प्रक्रियासुद्धा सोप्या होत आहेत. मी अनेकदा म्हणतो की आज भारतातील सुधारणा सक्तीने होत नाहीत, तर खात्रीशीरपणे होतात. त्याचमुळे भारताने 40 हजारांपेक्षा जास्त प्रक्रिया रद्द केल्या आहेत, डझनावारी जुने कायदे संपुष्टात आणले आहेत.

 

मित्रहो,

आज भारत खऱ्या अर्थाने वेगाच्या आणि मोठ्या विकासाच्या मार्गावर आगेकूच करतो आहे. खूप मोठ्या वर्गाच्या मूलभूत गरजा आपण पूर्ण केल्या आहेत, त्यामुळे तो वर्ग आता पुढचा विचार करू लागला आहे, एक पाऊल पुढे जाऊन विचार करू लागला आहे. भारतावर विश्वास ठेवण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे.

 

मित्रहो,

काही दिवसांपूर्वी भारत सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात हीच वचनबद्धता तुम्हाला स्पष्टपणे दिसून येईल. आज सरकार पायाभूत सुविधांवर विक्रमी खर्च करत आहे आणि आम्ही दरवर्षी त्यात वाढ करत आहोत. त्याचमुळे आज पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण होत आहेत. आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याच्या अनेक संधी आज तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. हरित विकासाच्या ज्या मार्गावर भारताने पुढचे पाऊल टाकले आहे, त्या प्रवासात सहभागी होण्यासाठी मी तुम्हाला खास आमंत्रण देतो. यंदाच्या अर्थसंकल्पात आपण केवळ ऊर्जा संक्रमणासाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद ठेवली आहे, यावरून आपला हेतू काय आहे, हे लक्षात येते. हरीत हायड्रोजन मोहिमही आमच्या याच हेतूला पुरक आहे. या अर्थसंकल्पात या घटकाशी संबंधित संपूर्ण परिसंस्था विकसित करण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. इलेक्ट्रिक मोबिलिटीचे परिवर्तन घडवून आणण्यासाठी आम्ही एक नवीन पुरवठा आणि मूल्य साखळी विकसित करत आहोत.

 

मित्रांनो,

मला आनंद आहे की आज उत्तर प्रदेश नवीन मूल्य आणि पुरवठा साखळी विकसित करण्यासाठी एक नवीन चॅम्पियन म्हणून उदयास येत आहे. परंपरा आणि आधुनिकतेशी जोडलेले उद्योग असलेल्या एमएसएमईचे अतिशय मजबूत जाळे आज उत्तर प्रदेशमध्ये सक्रीय आहे. इथे भदोही गालिचे आणि बनारसी (रेशमी वस्त्र) सिल्क आहेत. भदोही गालिचे समूह विकास आणि वाराणसी सिल्क समूह विकास यामुळे उत्तर प्रदेश हे भारताचे वस्त्रोद्योग केन्द्र आहे. आज भारतात 60 टक्क्यांहून अधिक मोबाइल उत्पादन एकट्या उत्तर प्रदेशमध्ये होते. मोबाईल घटकांचे जास्तीत जास्त उत्पादन फक्त उत्तर प्रदेशमध्येच केले जाते. आता देशाच्या दोन संरक्षण कॉरिडॉरपैकी एक उत्तर प्रदेशमध्ये बांधला जात आहे. उत्तर प्रदेश संरक्षण कॉरिडॉरचे काम वेगाने सुरू आहे. आज मेड इन इंडिया संरक्षण उपकरणांची मागणी सातत्याने वाढत आहे. भारतीय लष्कराला जास्तीत जास्त मेड इन इंडिया संरक्षण प्रणाली आणि संरक्षण मंच प्रदान करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आणि या महान कार्याचे नेतृत्व या लखनऊ भूमीचे आपले कर्मवीर राजनाथ सिंह जी करत आहेत. भारत चैतन्याने सळसळता संरक्षण उद्योग विकसित करत आहे, अशावेळी तुम्ही प्रथम लाभधारक असल्याचा लाभ घ्यावा.

 

मित्रांनो,

उत्तर प्रदेशमध्ये दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रात अनेक शक्यता आहेत. उत्तर प्रदेशात फळे आणि भाजीपाला याबाबतीत बरीच विविधता आहे. हे असे क्षेत्र आहे ज्यात खाजगी क्षेत्राचा सहभाग अजूनही खूप मर्यादित आहे. तुम्हाला माहिती असेल की आम्ही अन्न प्रक्रियेसाठी उत्पादन सलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजना आणली आहे. याचा तुम्ही जरूर लाभ घ्या.

 

मित्रांनो,

आज, सरकारचा प्रयत्न आहे की प्राथमिक कामापासून (इनपुटपासून) ते काढणीनंतरच्या व्यवस्थापनापर्यंत, शेतकर्यांसाठी आधुनिक यंत्रणा तयार करावी. लहान गुंतवणूकदार अॅग्री इन्फ्रा फंड वापरू शकतात. त्याचप्रमाणे देशभरात प्रचंड साठवणूक क्षमता विकसित करण्यासाठी आम्ही अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. छोट्या गुंतवणूकदारांसाठीही ही एक उत्तम संधी आहे.

 

मित्रांनो,

आज, भारताने आपले बरेचसे लक्ष पीक विविधीकरणावर, लहान शेतकर्यांना अधिक संसाधने देणे आणि त्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यावर केन्द्रीत केले आहे. त्यामुळे नैसर्गिक शेतीकडे आपण वेगाने वाटचाल करत आहोत. येथे यूपीमध्ये गंगेच्या दोन्ही बाजूला 5 किलोमीटर परिसरात नैसर्गिक शेती सुरू झाली आहे. आता या वर्षीच्या अर्थसंकल्पात आम्ही शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी 10,000 जैव कचऱ्यापासून खतनिर्मितीसाठी संशोधन करणारे केंद्र (बायो इनपुट रिसोर्स सेंटर्स) स्थापन करण्याची घोषणा केली आहे. यामुळे नैसर्गिक शेतीला अधिक प्रोत्साहन मिळेल. यामध्ये खाजगी उद्योजकांसाठी गुंतवणुकीच्या अनेक शक्यता आहेत.

 

मित्रांनो,

आपल्या भरडधान्यासंदर्भात भारतात आणखी एक नवीन मोहीम सुरू झाली आहे. भारतातील या भरडधान्याला सामान्यतः लोकांच्या भाषेत मोठे धान्य म्हणतात. आता त्याचे अनेक प्रकार आहेत, जागतिक बाजारपेठेत त्याची ओळख निर्माण व्हावी, यासाठी तुम्ही अर्थसंकल्पात ऐकले असेलच, या भरडधान्याला आम्ही नवीन नाव दिले आहेश्रीअन्न, हया श्रीअन्नात पौष्टिक मूल्य भरपूर आहे. हे सुपर फूड आहे. जसे श्रीफळाचे माहात्म्य आहे, त्याचप्रमाणे श्रीअन्नाचेही महात्म्य होणार आहेत. भारताच्या श्रीअन्नाने जागतिक पोषण सुरक्षेला संबोधित करावे असा आमचा प्रयत्न आहे. जग हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणूनही साजरे करत आहे. म्हणूनच एकीकडे आम्ही शेतकऱ्यांना श्रीअन्नाच्या उत्पादनासाठी प्रेरित करत आहोत, तर दुसरीकडे जागतिक बाजारपेठही विस्तारत आहोत. अन्न प्रक्रिया क्षेत्राशी निगडित मित्र श्री अन्न उत्पादनांसंदर्भात खाण्यासाठी तय्यार (रेडी टू इट) आणि स्वयंपाकासाठी तय्यार (रेडी टू कुक) या क्षेत्रातील शक्यता पाहू शकतात आणि मानवजातीची मोठ्या प्रमाणात सेवा देखील करू शकतात.

 

मित्रांनो,

उत्तर प्रदेशात आणखी एका विषयात अतिशय प्रशंसनीय काम झाले आहे. हे काम शिक्षण आणि कौशल्य विकासाशी संबंधित आहे. महायोगी गुरु गोरखनाथ आयुष विद्यापीठ, अटलबिहारी वाजपेयी आरोग्य विद्यापीठ, राजा महेंद्र प्रताप सिंग विद्यापीठ, मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठ, अशा अनेक संस्था तरुणांना विविध कौशल्यांसाठी तयार करतील. मला सांगण्यात आले आहे की कौशल्य विकास अभियानांतर्गत आतापर्यंत यूपीतील 16 लाखांहून अधिक तरुणांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यूपी सरकारने पीजीआय लखनऊ, आयआयटी कानपूरमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित अभ्यासक्रमही सुरू केले आहेत. आणि मी येत होतो, तेव्हा आमच्या राज्यपाल महोदया, ज्या शिक्षणाच्या प्रभारीही आहेत, त्या कुलपती म्हणून काम पाहतात, त्यांनी मला सांगितले की, उत्तर प्रदेशसाठी ही खूप अभिमानाची बाब आहे की, यावेळी राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेच्या मानांकनात उत्तर प्रदेशने 4 जागा मिळवत, इथल्या विद्यापीठांनी भारतात आपला दबदबा निर्माण केला आहे. मी शिक्षण जगताशी संबंधित लोकांचे आणि कुलपती महेदया यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. देशाच्या स्टार्टअप क्रांतीमध्ये यूपीची भूमिकाही सातत्याने वाढत आहे. यूपी सरकारने येत्या काही वर्षांत 100 इनक्यूबेटर आणि तीन अत्याधुनिक केंद्रे उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. याचा अर्थ असा की येथे येणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रतिभावान आणि कुशल तरुणांचा मोठा समूहही मिळणार आहे.

 

मित्रांनो,

एकीकडे डबल इंजिन सरकारचा निर्धार आणि दुसरीकडे शक्यतांनी परिपूर्ण उत्तर प्रदेश, यापेक्षा चांगली भागीदारी असूच शकत नाही. हा काळ आपण गमावता कामा नये. भारताच्या समृद्धीमध्ये जगाची समृद्धी आहे. भारताच्या उज्वल भविष्यात जगाच्या उज्ज्वल भविष्याची हमी आहे. या समृद्धीच्या प्रवासात तुमचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. ही गुंतवणूक सर्वांसाठी शुभ होवो, मंगल होवो. याच मनोकामनेसह, गुंतवणुकीसाठी पुढे आलेल्या देशातील आणि जगातील सर्व गुंतवणूकदारांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि उत्तर प्रदेशचा खासदार या नात्याने मी तुम्हाला खात्री देतो की उत्तर प्रदेशचे आजचे सरकार, उत्तर प्रदेशची आजची नोकरशाही प्रगतीच्या मार्गावर दृढ संकल्प होऊन अग्रेसर झाली आहे. तुमची स्वप्ने सत्यात उतरवण्याच्या निर्धाराने, तुमचे संकल्प पूर्ण करण्याच्या पूर्ण क्षमतेने ती अग्रदूत म्हणून तुमच्या पाठीशी उभी आहे. या विश्वासाने मी पुन्हा एकदा देश आणि जगातील गुंतवणूकदारांना मी आमच्या उत्तर प्रदेशाच्या भूमीत आमंत्रित करतो, स्वागत करतो.

खूपखूप धन्यवाद.

***

D.Wankhede/M.Pange/V.Ghode/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai