Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उत्तराखंड राज्यात हर्शील येथे आयोजित हिवाळी पर्यटन कार्यक्रमात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

उत्तराखंड राज्यात हर्शील येथे आयोजित हिवाळी पर्यटन कार्यक्रमात,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मजकूर


नवी दिल्ली, 6 मार्च 2025

 

गंगा मातेचा विजय असो.
 गंगा मातेचा विजय असो.
 गंगा मातेचा विजय असो.
भारत मातेचा विजय असो
भारत मातेचा विजय असो
भारत मातेचा विजय असो
उत्तराखंडच्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मी तुम्हा सर्वांना नमस्कार करतो!
येथील उर्जावंत मुख्यमंत्री, माझे धाकटे बंधू पुष्कर सिंह धामी जी, केंद्रीय मंत्री श्री अजय टामटा जी, राज्याचे मंत्री सतपाल महाराज जी, संसदेतील माझे सहकारी आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट जी, संसदेतील माझ्या सहकारी माला राज्यलक्ष्मी जी, आमदार सुरेश चौहान जी, सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनींनो….
सर्वप्रथम….माणा  गावात काही दिवसांपूर्वी झालेल्या दुर्घटनेबद्दल मी दुःख व्यक्त करतो. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मंडळींच्या कुटुंबियांबद्दल मी माझ्या सहवेदना व्यक्त करतो.  या संकटाच्या वेळी देशातील जनतेने दाखवलेल्या एकजुटीमुळे पीडित कुटुंबांना मोठा धीर मिळाला आहे.
मित्रांनो,
उत्तराखंडची ही भूमी, आपली देवभूमी, आध्यात्मिक उर्जेने ओथंबलेली आहे.  चार धाम आणि अनंत तीर्थक्षेत्रांच्या आशीर्वादाने, जीवनदात्या गंगेच्या या हिवाळी शक्तिस्थळी, आज पुन्हा एकदा येथे येऊन तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबियांना भेटून मी धन्य झालो आहे.  गंगा मातेच्या कृपेमुळेच मला अनेक दशकांपासून उत्तराखंडची सेवा करण्याचे सद्भाग्य लाभले आहे.  त्यांच्या आशीर्वादामुळेच मी काशीपर्यंत पोहोचलो आणि आता मी खासदार म्हणून काशीची सेवा करत आहे, असे मला वाटते. आणि म्हणूनच मी काशीमध्ये असेही म्हटले होते – मला गंगा मातेने बोलावले आहे.  आणि काही महिन्यांपूर्वी मला असेही जाणवले की जणू काही गंगा मातेने मला आता दत्तक घेतले आहे.  ही गंगा मातेचीच माया आहे.  तिच्या या मुलाबद्दलच्या प्रेमामुळेच आज मी मुखवा गावातील तिच्या माहेरी आलो आहे.  इथे मला मुखिमठ-मुखवा येथे दर्शनाची आणि पूजा करण्याची संधी मिळाली.
मित्रांनो,
इथे आज  मी हर्शीलच्या या भूमीवर आलो असताना,  मला माझ्या दीदी-भुलींयाच्या प्रेमाचीही आठवण येत आहे. त्या मला हर्शीलचा राजमा आणि इतर स्थानिक उत्पादने पाठवत असतात.  तुमची ही आपुलकी आणि भेटवस्तूंबद्दल मी तुमचा आभारी आहे.
मित्रांनो,
काही वर्षांपूर्वी जेव्हा मी बाबा केदारनाथाच्या दर्शनासाठी बाबांच्या चरणी गेलो होतो, तेव्हा बाबांना नमस्कार आणि प्रार्थना केल्यानंतर अचानक माझ्या तोंडातून काही भावना व्यक्त झाल्या आणि मी म्हणालो – हे दशक उत्तराखंडचे दशक असेल.  ते शब्द माझे होते, भावना माझ्या होत्या, पण त्यामागील बळ देण्याची शक्ती स्वतः बाबा केदारनाथांनी दिली होती.  बाबा केदारनाथांच्या आशीर्वादाने…. ते शब्द, त्या भावना हळूहळू सत्यात, वास्तवात रूपांतरित होत आहेत… हे मी पाहत आहे.  हे दशक उत्तराखंडचे दशक बनत आहे.  येथे उत्तराखंडच्या प्रगतीसाठी नवीन मार्ग उघडत आहेत.  ज्या आकांक्षा घेऊन उत्तराखंडचा जन्म झाला, उत्तराखंडच्या विकासासाठी आम्ही जे संकल्प केले…. दररोज नवीन यश मिळवत नवीन ध्येयांकडे वाटचाल करत, ते संकल्प आज पूर्ण होत आहेत.  या दृष्टीने, हिवाळी पर्यटन हे आणखी एक मोठे महत्त्वाचे पाऊल आहे.  या माध्यमातून, उत्तराखंडची आर्थिक क्षमता वृद्धिंगत करण्यात मोठी मदत होईल.  या नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी मी, धामीजी आणि उत्तराखंड सरकारचे अभिनंदन करतो आणि उत्तराखंडच्या प्रगतीसाठी शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
आपल्या पर्यटन क्षेत्रात वैविध्य आणणे….ते वर्षभर, 365 दिवस चालणारे बारमाही बनवणे, हे उत्तराखंडसाठी खूप आवश्यक आहे. मला असे वाटते की उत्तराखंडमध्ये, ऋतू कोणताही असो, तो भाकड (ऑफ-सीझन) राहू नये, पर्यटन प्रत्येक हंगामात सुरु राहावे.  आता सुरु ठेवण्याचे युग आहे, बंद ठेवण्याचे नाही.  सध्या पर्वतीय पर्यटन, हंगामावर अवलंबून असते.  तुम्हाला माहितीच आहे की, मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्यात मोठ्या संख्येने पर्यटक येतात, परंतु त्यानंतर त्यांची संख्या लक्षणीयरीत्या रोडावते.  हिवाळ्यात बहुतेक हॉटेल्स, विश्रामगृहे (रिसॉर्ट्स) आणि घरात थाटलेले पर्यटक निवास (होमस्टे) रिकामे राहतात.  या असमतोलामुळे उत्तराखंडमध्ये वर्षाच्या मोठ्या कालावधीत आर्थिक मंदी येते; त्यामुळे पर्यावरणासमोरही आव्हाने निर्माण होतात.
मित्रांनो,
वास्तव हे आहे की जर भारतातील आणि परदेशातील लोक हिवाळ्याच्या काळात येथे आले तर त्यांना देवभूमीचे तेज खऱ्या अर्थाने अनुभवता येईल.  हिवाळी पर्यटनात, ट्रेकिंग, स्कीइंग यांसारख्या क्रीडा उपक्रमांचा थरार, इथे आलेल्या  लोकांना खरोखरच रोमांचित करेल. उत्तराखंडमध्ये धार्मिक तीर्थयात्रेसाठी देखील हिवाळा ऋतू खूप विशेष असतो.  यावेळी अनेक तीर्थस्थळांवर विशेष विधी (अनुष्ठाने) देखील केले जातात.  इथे मुखवा गावातच पहा…. इथे केले जाणारे धार्मिक विधी आपल्या प्राचीन आणि विलक्षण परंपरेचा भाग आहेत.  म्हणूनच, उत्तराखंड सरकारचे बारमाही पर्यटन, 365 दिवसांचे पर्यटनाचे स्वप्न, लोकांना दैवी अनूभुती मिळवण्याची संधी देईल.  यामुळे इथे वर्षभर उपलब्ध राहणाऱ्या रोजगाराच्या संधी विकसित होतील….याचा मोठा फायदा, उत्तराखंडमधील स्थानिक लोकांना…. तरुणाईला होईल.
 मित्रांनो,
आमचे डबल इंजिन सरकार उत्तराखंडला विकसित राज्य बनवण्यासाठी एकत्रितपणे काम करत आहे. चारधाम- कुठल्याही हवामानात खराब न होणारे रस्ते (ऑल वेदर रोड), आधुनिक दृतगती मार्ग (एक्सप्रेस वे), रेल्वे, हवाई आणि हेलिकॉप्टर सेवांचा विस्तार….उत्तराखंड राज्यात गेल्या 10 वर्षांत जलद विकास झाला आहे. अगदी  कालच, केंद्र सरकारने उत्तराखंडसाठी खूप मोठे निर्णय घेतले आहेत.  केंद्रीय मंत्रिमंडळाने काल केदारनाथ रोपवे प्रकल्प आणि हेमकुंड रोपवे या प्रवासी मार्ग प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.  केदारनाथ रोपवे बांधून सज्ज झाल्यानंतर, पूर्वी 8 ते 9 तास लागणारा प्रवास, आता सुमारे अर्ध्या तासात (30 मिनिटांत) पूर्ण होईल.  यामुळे वृद्ध, मुले आणि महिलांसाठी केदारनाथ यात्रा सोपी आणि सोयीची होईल.  या रोपवे प्रकल्पांवर हजारो कोटी रुपये खर्च केले जातील.  या प्रकल्पांसाठी मी उत्तराखंडसह संपूर्ण देशाचे अभिनंदन करतो.
मित्रांनो,
आज पर्वतीय भागात, पर्यावरण पूरक लाकडी विश्रामगृहे (इको लॉग हट्स),परिषद  केंद्र (कन्व्हेन्शन सेंटर), हेलिपॅड यांसारख्या पायाभूत सुविधांवर देखील लक्ष केंद्रीत केले जात आहे.  उत्तराखंडमधील टिमर-सैन महादेव, माणा  गाव, जाडुंग गाव येथे पर्यटनीय पायाभूत सुविधा नव्याने विकसित केल्या जात आहेत आणि देशवासीयांना कदाचित माहित असेल नसेल……1962 मध्ये जेव्हा चीनने भारतावर हल्ला केला तेव्हा आपले जाडुंग गाव रिकामे करण्यात आले होते, आपली अशी  दोन गावे रिकामी करण्यात आली होती. 60-70 वर्षे उलटून गेली आहेत, लोक विसरले असतील….आम्ही मात्र नाही विसरू शकत….आम्ही ती दोन गावे पुन्हा वसवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे आणि ते एक मोठे पर्यटन स्थळ बनवण्याच्या दिशेने आम्ही पुढे जात आहोत. आणि याचा परिणाम असा झाला की या दशकात उत्तराखंडमधील पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. 2014 पूर्वी दरवर्षी सरासरी 18 लाख यात्रेकरू चारधाम यात्रा करत असत.  आता दरवर्षी सुमारे 50 लाख यात्रेकरू येऊ लागले आहेत.  या वर्षीच्या अर्थसंकल्पात 50 पर्यटन स्थळे विकसित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.  या ठिकाणच्या हॉटेल्सना पायाभूत सुविधांचा दर्जा दिला जाईल.  यामुळे पर्यटकांसाठी सुविधा वाढतील आणि स्थानिक रोजगारही वाढेल.
मित्रांनो,
आमचे प्रयत्न आहेत की, उत्तराखंडच्या सीमेवरील क्षेत्रांनाही पर्यटनाचा विशेष लाभ मिळाला पाहिजे. आधी सीमेवरील  गावांना शेवटचे गाव असे म्हटले जात होते. आम्ही या विचारसरणीमध्ये परिवर्तन घडवून आणले. आम्ही याच गावांना अखेरचे, शेवटचे गाव नाही, तर पहिले- प्रथम गाव म्हणण्यास प्रारंभ केला. त्यांच्या विकासासाठी ‘व्हायब्रंट व्हिलेज’ कार्यक्रम सुरू केला. या क्षेत्रातीलही 10 गावांना या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. आणि मला असे सांगण्यात आले की, त्या गावांमधील काही बंधू आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. नेलांग आणि जादुंग गाव, यांच्याबाबत 1962 मध्ये नेमके काय झाले,   यांच्याविषयीचे वर्णन  मी केले. त्यानंतर ही गावे पुन्हा एकदा वसविण्याचे काम सुरू केले आहे. आज इथून जादुंगसाठी मी आत्ताच बाईक रॅली रवाना केली. आम्ही ‘होम स्टे’ सेवा उपलब्ध करून देणा-यांना मुद्रा योजनेतून पत पुरवठा करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. उत्तराखंड सरकारही राज्यामध्ये ‘होम स्टे’ ला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत आहे. जी गावे,  इतक्या दशकांपासून पायाभूत सुविधांपासून वंचित राहिली आहेत, त्या गावांमध्ये आता नवीन होम स्टे सुरू झाल्यामुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळत आहे. लोकांना उत्पन्न कमविण्याचा नवा मार्ग मिळत आहे. त्यांचे उत्पन्न वाढत आहे.
मित्रांनो,
आज मी देवभूमीतून, देशाच्या पूर्व- पश्चिम- उत्तर- दक्षिण आणि मध्यही, अशा प्रत्येक कोनो-कोप-यांतील लोकांना, विशेषतः युवा पिढीतील मंडळींबरोबर संवाद साधतो आहे  आणि माता गंगेच्या माहेरगावातील लोकांना मी सांगतोय.   या पवित्र भूमीमध्ये देशातील नवयुवकांच्या पिढीला विशेषत्वाने आवाहन करीत आहे. आग्रह करीत आहे.
मित्रांनो,
हिवाळा-थंडीच्या दिवसांमध्ये देशाच्या खूप मोठ्या भागात ज्यावेळी सगळीकडे दाट धुक्याची चादर पसरलेली असते, सूर्यदेवाचे लवकर दर्शन होत नाही, त्यावेळी या पर्वतांवर-डोंगरमाथ्यांवर सूर्यप्रकाशाचा आनंद घेता येत असतो. हा एक जणू विशेष कार्यक्रम,सोहळाच असतो. ही  मोठी-महत्वाची घटना बनू शकते. आणि असा सूर्यप्रकाशाचा आनंद घेणे, याला गढवालीमध्ये काय म्हणता येईल? ‘‘घाम तापो पर्यटन’’! बरोबर आहे ना? ‘घाम तापो पर्यटन‘. यासाठी देशातील कोना-कोप-यातील लोकांनी उत्तराखंडला जरूर भेट द्यावी. विशेष म्हणजे, कॉर्पोरेट जगतातील सहकारी मंडळींना हा एक  हिवाळी पर्यटनाचा भाग बनवता येईल. या इथे बैठकांचे आयोजन करणे असो,  परिषदांचे आयोजन करणे असो, प्रदर्शन भरविणे असो, तसेच हिवाळ्याचा   काळखंड लक्षात घेवून इथे विविध  कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी  देवभूमीसारखी योग्य अशी दुसरी जागा शोधूनही सापडणार नाही. इथे येवून लोकांना योग आणि आयुर्वेद यांच्या माध्यमातून ‘रिचार्ज’ होता येईल. नव्याने ऊर्जा प्राप्त करणेही शक्य होईल. देशातील विद्यापीठे, खाजगी शाळा आणि महाविद्यालयांना माझा आग्रह आहे की, त्यांनी आपल्या सर्व नवयुवकांना बरोबर घेवून हिवाळी सहलींसाठी उत्तराखंडला  पहिली पसंती देवून निवड करावी.
मित्रांनो,
आपल्याकडे ‘वेडिंग इकॉनॉमी’मध्ये हजारो कोटींची उलाढाल होते. विवाह समारंभावर हजारों कोटीं रूपयांचा खर्च केला जातो. खरोखरीच यामागे खूप मोठे अर्थशास्त्र दडलेले आहे. तुम्हाला आठवत असेल, की देशातील लोकांना मी आग्रह केला होता की, ‘वेड इन इंडिया’! हिंदुस्तानात, आपल्या देशात विवाह समारंभ केला जावा. अलिकडच्या काळात अनेक लोक इतर बाहेरच्या देशात जावून विवाह करतात. का बरं? इथे आपल्या देशात कशाची कमतरता आहे? तुम्हाला मोठ्या प्रमाणावर विवाह समारंभ करायचा आहे ना, मग तो पैसा आपल्या देशातच खर्च करावा. आणि उत्तराखंडपेक्षा कोणते स्थान विवाहाला अधिक चांगले असू शकेल ? मला असे वाटते की, हिवाळ्यात ‘डेस्टिनेशन वेडिंग’ साठीही उत्तराखंडला सर्व देशवासियांनी प्राधान्य द्यावे. याच प्रमाणे भारताच्या चित्रपट उद्योगाकडूनही मला खूप अपेक्षा आहेत. उत्तराखंडला सर्वाधिक चित्रपटस्नेही राज्य  म्हणून पुरस्कार मिळाला आहे. या राज्यामध्ये अतिशय वेगाने आधुनिक पायाभूत सुविधा विकसित होत आहेत. त्यामुळे हिवाळ्यामध्ये चित्रपट चित्रीकरणासाठी उत्तराखंड हे संपूर्ण भारताचे आवडते स्थान बनू शकते.
मित्रांनो,
जगातील अनेक देशांमध्ये हिवाळी पर्यटन खूप मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे. उत्तराखंडमध्ये हिवाळी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आपण अशा बाहेरच्या देशांकडून खूप काही शिकू शकतो. माझी अशी इच्छा आहे की, उत्तराखंडमध्ये पर्यटनाशी संबंधित सर्व भागधारकांनी, हॉटेल आणि रिसॉर्टचालकांनी इतर देशांचा जरूर अभ्यास करावा. आज, इथे एक लहानसे प्रदर्शन लावण्यात आले आहे. ते प्रदर्शन पाहून मी, खूप प्रभावित झालो. मला असे वाटले की, मी ज्याप्रमाणे कल्पना केली होती, ज्या विशिष्ट स्थानांवर काही वेगळे करता येईल, असे मला वाटत होते, या स्थानांवर आधुनिक गरजा ओळखून तशा वास्तू निर्माण करणे शक्य आहे. त्या एक-एक स्थानांचे, एक-एक चित्र इतके प्रभावशाली होते की, माझ्या मनामध्ये 50 वर्षांपूर्वी घालवलेले दिवस आले. आणि मला आज असे वाटले की, मी पुन्हा एकदा इथे आपल्यामध्ये येवून काही काळ व्यतीत केला पाहिजे. आणि या प्रदर्शनामध्ये दाखवलेल्या प्रत्येक स्थानावर जाण्याची संधी शोधली पाहिजे, हे इतके काही सुंदर, देखणे आहे. मला उत्तराखंड सरकारला असे सांगावेसे वाटते की, परदेशात जावून केलेला अभ्यास असो,  अथवा या अभ्यास दौ-यातून निघालेले प्रत्यक्ष कृतीचे मुद्दे असोत, त्यावर सक्रियतेने काम करावे. आपल्याला स्थानिक परंपरा, संगीत, नृत्य आणि स्थानिक खाद्यपदार्थ- पाककला यांना प्रोत्साहन द्यायचे आहे. या भागामध्ये काही ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत. फक्त बद्रिनाथ येथेच गरम पाण्याचे कुंड आहे, असे नाही, तर इतर ठिकाणीही आहेत. त्या स्थानांचा विकास ‘वेलनेस स्पा’ अशा स्वरूपामध्ये केला जावू शकतो. शांत आणि बर्फाळ क्षेत्रामध्ये हिवाळी योग शिबिराचे आयोजन केले जावू शकते. सर्व मोठ-मोठ्या साधू-महात्मा लोकांना, मठ- मंदिरांच्या मठाधिपतींना, सर्व योगाचार्यांना माझा आग्रह आहे की, त्यांनी वर्षभरामध्ये विशेषतः हिवाळ्यात आपल्या शिष्यांचे एक योग शिबीर उत्तराखंडमध्ये जरूर घ्यावे. हिवाळ्यामध्ये या भागात विशेष वनचर जीव दर्शन सफारीचे आकर्षण हे उत्तराखंडची विशेष ओळख बनू शकते. याचा अर्थ आपल्याला अगदी 360 अंश पाहून त्याप्रमाणे विचार करून पुढे पावले टाकायची आहेत. यासाठी सर्व स्तरावर काम केले पाहिजे. 
मित्रांनो,
सुविधांच्या विकासाशिवाय, लोकांपर्यंत माहिती पोहोचविणे, हेही तितकेच महत्वाचे आहे. यासाठी देशातील समाज आणि प्रसार माध्यमांसाठी  आशय निर्मिती प्रक्रियेमध्ये गुंतलेल्या युवकांना मी आग्रह करतो. असे खूप मोठ्या प्रमाणावर प्रभावी आशय निर्माते आहेत. त्यांनी समाज माध्यमावर आशय निर्मिती करताना उत्तराखंडमधील सोई सुविधांची माहिती द्यावी. ही मंडळी आपल्या जागी बसूनही माझ्या या उत्तराखंडची, माझ्या या देवभूमीची सेवा करू शकतात आणि पुण्याची कमाई करू शकतात. तुम्ही मंडळी देशाच्या पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याबरोबरच त्या स्थानांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यात खूप मोठी, महत्वाची भूमिका पार पाडू शकता. जी मंडळी अशी भूमिका पार पाडत आहेत, त्यांना आता आपल्या या कामाचा विस्तार करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही मंडळीही उत्तराखंडच्या हिवाळी पर्यटन वृद्धीसाठी सुरू केलेल्या मोहिमेचा भाग बनावे आणि मला तर असेही वाटते की, उत्तरराखंड सरकारने एक मोठी स्पर्धा आयोजित करावी. त्यामध्ये आशय निर्मिती  करणारी मंडळी असतील, प्रभावशाली मंडळी असतील, अशा सर्वांनी पाच मिनिटांची हिवाळी पर्यटन या विषयावर प्रोत्साहनपर चित्रफीत तयार करून सादर करावी. ही स्पर्धा असल्यामुळे सगळेचजण सर्वात चांगल्यात चांगली चित्रफीत बनवतील. सर्वोत्कृष्ट चित्रफितीला चांगले आकर्षक पारितोषिक दिले जावे. देशभरातील लोकांना आता म्हणावेसे वाटते  की, चला या, आता उतरा मैदानामध्ये!! यामुळे राज्यातील पर्यटन स्थळांचा  खूप मोठ्या प्रमाणावर प्रचार-प्रसार होवू शकेल. आणि मला विश्वास आहे की, ज्यावेळी अशा पद्धतीने स्पर्धा घेतली जाईल, त्यावेळी नव-नवीन स्थानांचा शोध घेतला जाईल. नवनवीन चित्रफिती बनतील. सगळेजण आपल्या चित्रफितीची माहिती लोकांना देतील.
मित्रांनो, 
मला विश्वास आहे, आगामी वर्षांमध्ये आपण या क्षेत्रामध्ये वेगाने होणा-या विकासाचे साक्षीदार बनणार आहोत. पुन्हा एकदा 365 दिवसांचे, पूर्ण बारा महिन्यांचे पर्यटन अभियान सुरू होईल. यासाठी मी उत्तराखंडच्या सर्व बंधू-भगिनींना शुभेच्छा देतो. आणि सर्वांचे मी अभिनंदनही करतो. तसेच राज्य सरकारचेही अभिनंदन करतो. तुम्ही सर्वांनी माझ्याबरोबर एका स्वरामध्ये जयघोष करावा….
गंगामाता की जय ।
गंगामाता की जय ।
गंगामाता की जय ।
खूप -खूप धन्यवाद ।।

 

* * *

JPS/S.Tupe/Ashutosh/Suvarna/D. Rane