Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उत्तरप्रदेशातील नऊ वैद्यकीय महाविद्यालयांच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण

उत्तरप्रदेशातील नऊ वैद्यकीय महाविद्यालयांच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण


नवी दिल्ली,  25 ऑक्टोबर 2021

भारत माता की जय,

भारत माता की जय !

महात्मा बुद्धांच्या या पवित्र धरतीवर, सिद्धार्थनगर मध्ये मी आपल्या सर्वांना प्रणाम करतो! महात्मा बुद्धांच्या ज्या भूमीत आपल्या आयुष्याची सुरुवातीची वर्षे घालवलीत, त्या भूमीवर, आज नऊ नव्या वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्‌घाटन  होत आहे. निरोगी भारतासाठी उचललेले हे एक मोठे पाऊल आहे. यासाठी आपल्या सर्वांचे अभिनंदन!

उत्तरप्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल जी, उत्तरप्रदेशचे यशस्वी आणि कर्मयोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय आरोग्यमंत्री श्री. मनसुख मांडवीया जी, व्यासपीठावर उपस्थित उत्तरप्रदेश सरकारचे इतर मंत्रीगण, ज्या इतर ठिकाणी नवी वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात आली आहेत, तिथे उपस्थित मंत्री, कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व खासदार, आमदार, इतर लोकप्रतिनिधी आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,

आजचा दिवस पूर्वांचलासाठी, संपूर्ण उत्तरप्रदेशासाठी आरोग्याची दुहेरी मात्रा घेऊन आला आहे. आपल्यासाठी एक भेट घेऊन आला आहे. इथे सिद्धार्थनगरात उत्तरप्रदेशातील नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचे लोकार्पण होत आहे. यानंतर, पूर्वांचलातूनच, संपूर्ण देशासाठी खूप आवश्यक अशा खूप आवश्यक वैद्यकीय पायाभूत सुविधा उभारणारी एक खूप मोठी योजना देखील सुरु होणार आहे. आणि या महत्वाच्या कामासाठी मी आपला आशीर्वाद घ्यायला आलो आहे. या पवित्र भूमीचा आशीर्वाद घेतल्यानंतर, आपल्याशी संवाद साधल्यानंतर, मी वाराणसीला जाणार आहे आणि वाराणसीतून त्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे.

मित्रांनो ,

आज केंद्रात जे सरकार आहे, इथे उत्तरप्रदेशात जे सरकार आहे, ते अनेक कर्मयोग्यांच्या कित्येक दशकांच्या तपस्येचे फलित आहे. सिद्धार्थनगर मध्ये स्वर्गीय माधव प्रसाद त्रिपाठी जी, यांच्या रूपाने एक असे समर्पित लोकप्रतिनिधी देशाला दिला आहे, ज्यांचे अखंड परिश्रम आज राष्ट्रासाठी उपयुक्त ठरले आहेत. माधव बाबू यांनी राजकरणात कर्मयोगाचा अंतर्भाव करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले.. उत्तरप्रदेश भाजपाचे पहिले अध्यक्ष म्हणून, केंद्रातील मंत्री म्हणून,त्यांनी विशेषत: पूर्वांचलाच्या विकासाची चिंता केली. म्हणूनच, सिद्धार्थनगर इथल्या वैद्यकीय महाविद्यालाचे नाव माधव बाबूंच्या नावे ठेवण्यात आले असून माधव बाबूंच्या कार्याला ही योग्य श्रद्धांजली आहे. आणि यासाठी मी योगी जी आणि त्यांच्या पूर्ण सरकारचे अभिनंदन करतो. माधव बाबू यांच्या नावाने असलेल्या या महाविद्यालयात शिकून बाहेर पडणाऱ्या डॉक्टरांना कायमच लोकसेवेची प्रेरणा मिळत राहणार आहे.

बंधू आणि भगिनींनो,

उत्तरप्रदेश आणि पूर्वांचलाविषयीची आस्था, अध्यात्म आणि सामाजिक जीवनाशी संबंधित खूप समृद्ध वारसा आहे. ह्या वारशाला निरोगी, सक्षम आणि समृद्ध उत्तरप्रदेशाच्या भविष्याशी जोडले जात आहे. आज ज्या नऊ जिल्ह्यांतल्या वैद्यकीय महाविद्यालयांचे लोकार्पण करण्यात आले आहे, त्यातही हेच दिसते आहे. सिद्धार्थनगर इथे, माधव प्रसाद वैद्यकीय महाविद्यालय, देवरिया इथे महर्षी देवरहा बाबा वैद्यकीय महाविद्यालय, गाजीपूर येथे महर्षी विश्वामित्र वैद्यकीय महाविद्यालय, मिर्झापूर इथे मां विंध्य-वासिनी महाविद्यालय, प्रतापगढ इथे डॉक्टर सोने लाल पटेल वैद्यकीय महाविद्यालय, एटा इथे वीरांगना अवंती बाई लोधी वैद्यकीय महाविद्यालय, फतेहपूर इथे महान योद्धा अमर शहीद जोधा सिंह आणि ठाकूर दरियांव सिंह यांच्या नावाचे वैद्यकीय महाविद्यालय, जौनपूर इथे उमानाथ सिंह वैद्यकीय महाविद्यालय आणि हरदोई येथील वैद्यकीय महाविद्यालय. अशी कित्येक नवी वैद्यकीय महाविद्यालये आता पुर्वांचलाच्या कोट्यवधी जनतेची सेवा करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. ही नऊ महाविद्यालये स्थापन केल्यामुळे इथे सुमारे अडीच हजार नवे बेड्स तयार करण्यात आले आहेत.  पाच हजारपेक्षा अधिक डॉक्टर्स आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. यासोबतच, दरवर्षी शेकडो युवकांसाठी वैद्यकीय शिक्षणाचा नवा मार्ग मोकळा झाला आहे.

मित्रांनो ,

ज्या पूर्वांचलाला आधीच्या सरकारांनी आजारांशी लढण्यासाठी सोडून दिले होते, आता तेच पूर्वांचल वैद्यकीय सुविधांचे केंद्र बनणार आहे. आता देशाला आजारांपासून वाचवणारे अनेक डॉक्टर्स ही भूमी देशाला देणार आहे. आधीच्या सरकारांनी ज्या पूर्वांचलाची प्रतिमा खराब केली होती, ज्या पूर्वांचलाचे नाव मेंदूज्वरामुळे होणाऱ्या दुःखद मृत्युंमुळे बदनाम झाले होते. तेच पूर्वांचल, तेच उत्तरप्रदेश आता पूर्व भारताच्या आरोग्याला नवी ऊर्जा देणार आहे.

मित्रांनो ,

उत्तरप्रदेशचे बंधू-भगिनी कधीही विसरू शकणार नाहीत, की योगीजींनी संसदेत कसे  उत्तरप्रदेशातल्या भयंकर वैद्यकीय स्थितीची व्यथा मांडली होती. योगी जी तेव्हा मुख्यमंत्री नव्हते, एक खासदार होते आणि अत्यंत कमी वयात ते खासदार बनले होते. आणि आज उत्तरप्रदेशातील लोक देखील बघत आहेत, की जेव्हा योगीजींना जनतेची सेवा करण्याची संधी दिली, तेव्हा त्यांनी मेंदूज्वराचा प्रकोप वाढण्यापासून अटकाव केला. या क्षेत्रातल्या हजारो मुलांचे आयुष्य त्यांनी वाचवले. सरकार जेव्हा संवेदनशील असेल, गरिबांचे दुःख समजून घेणारे असेल, तरच अशाप्रकारे काम होऊ शकते.

बंधू आणि भगिनींनो,

आपण देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी आणि त्यानंतरही कधीच एक मूलभूत चिकित्सा आणि आरोग्य सुविधांना कधीच प्राधान्य दिले नाही, उत्तम उपचार हवे असतील, तर मोठ्या शहरात जावे लागेल.चांगल्या डॉक्टरांकडून उपचार करुन घ्यायचे असतील, तर मोठ्या शहरात जावे लागेल. रात्री-बेरात्री, कोणाची तब्येत बिघडली, तर गाडीची व्यवस्था करा आणि तातडीने शहराकडे घेऊन चला.आपल्या गावखेड्यात आज हीच वस्तुस्थिती आहे. गावात, वस्त्यांमध्ये, जिल्हा मुख्यालयात उत्तम आरोग्याच्या सुविधा मिळणे अत्यंत दुरापास्त होते. या कष्टाचा अनुभव मी देखील घेतला आहे, त्यांच्या व्यथा मलादेखील जाणवल्या आहेत. देशातील गरीब-दलित-शोषित-वंचित, देशातील शेतकरी, गावकरी, लहानग्या मुलांना छातीशी घेऊन इकडेतिकडे जाणाऱ्या माता, आपले ज्येष्ठ नागरिक, हे सगळे लोक, ज्यावेळी आरोग्याच्या मूलभूत सुविधांसाठी सरकारकडे बघत होते, तेव्हा त्यांच्या हाती केवळ निराशा येत असे. आणि अशी निराशा होणे, हेच आपल्या नशिबात आहे, असे आमच्या गरीब बंधू-भगिनींनी आपल्या मनाची समजूत घातली होती.

2014 साली जेव्हा आमच्या सरकारला आपण सेवा करण्याची संधी दिली होती, तेव्हा ही आधीची स्थिती बदलण्यासाठी आमच्या सरकारने दिवसरात्र परिश्रम केले. सर्वसामान्यांचे कष्ट समजून घेत, सर्वसामन्यांच्या व्यथा जाणून घेत, त्यांची दुःखे वाटून घेण्यात आम्ही भागीदार होऊ. आम्ही देशातल्या आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी, आधुनिक करण्यासाठी, एक महायज्ञ सुरु केला. अनेक योजना सुरु केल्या. मात्र, एका गोष्टीचे मला कायम दुःख असेल की इथे आधी जे सरकार होते, त्यांनी आम्हाला साथ दिली नाही. विकासकार्यात, ते राजकारण घेऊन आले. केंद्र सरकारच्या योजना इथे उत्तरप्रदेशात लागू होऊ दिल्या नाहीत.

मित्रांनो ,

इथे, वेगवेगळ्या वयाचे बंधू-भगिनी बसले आहेत. आपल्यापैकी कोणाला हे लक्षात आहे का, की असेल तर मला सांगाल का, की उत्तरप्रदेशच्या इतिहासात, कधीतरी एकाच वेळी इतक्या वैद्यकीय महाविद्यालयांचे लोकार्पण झाले आहे का? या आधी कधी झाले आहे का? नाही ना? आधी असे कधी होत नव्हते, आणि आता असे का होत आहे? याचे कारण एकाच आहे- राजकीय इच्छाशक्ती आणि राजकीय प्राधान्यक्रम. जे आधी होते, त्यांचे प्राधान्य होते, आपल्यासाठी पैसे कमावणे आणि आपल्या कुटुंबाची तिजोरी भरणे. आमचे प्राधान्य आहे- गरिबांचा पैसा वाचवणे, गरिबांच्या कुटुंबांना मूलभूत सुविधा देणे.

मित्रांनो ,

आजार श्रीमंत-गरीब काहीही बघत नाही, त्यांच्यासाठी तर सगळेच, समान असतात. आणि म्हणूनच, या सुविधांचा लाभ गरीबांना जितका होतो, तेवढाच लाभ मध्यम वर्गाच्या कुटुंबांना देखील होतो आहे.

मित्रांनो

7 वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये जे  सरकार होते आणि  4 वर्षांपूर्वी इथे उत्तर प्रदेशात जे सरकार होते , ते  पूर्वांचलमध्ये काय करत होते? जे आधी सरकारमध्ये होते ते मतांसाठी कुठेतरी एखादा दवाखाना किंवा एखाद्या छोट्या रुग्णालयाची घोषणा करून गप्प बसायचे. लोक देखील आशेने वाट पाहत बसायचे, मात्र वर्षानुवर्षे  इमारत बांधली जात नव्हतीकिंवा इमारत असेल तर  यंत्रसामुग्री नाही, या दोन्ही गोष्टी आहेत तर  डॉक्टर आणि इतर कर्मचारी नाहीत . आणि याशिवाय गरीबांकडून हजारो कोटी रुपये लुटणारे  भ्रष्टाचाराचे चक्र  अहोरात्र सतत चालत होते. औषधांमध्ये  भ्रष्टाचार, रुग्णवाहिकांमध्ये  भ्रष्टाचार, नियुक्तिमध्ये  भ्रष्टाचारबदल्या -पोस्टिंग मध्ये भ्रष्टाचार ! या संपूर्ण खेळात उत्तर प्रदेशात  काही घराणेशाही समर्थकांचे मात्र भले झाले .   भ्रष्टाचाराचे चक्र  खूप चालले,मात्र त्यात   पूर्वांचल आणि उत्तर प्रदेशचा सामान्य माणूस भरडला गेला.

योग्य म्हटले आहे –

जाके पाँव न फटी बिवाई, वो क्या जाने पीर पराई’

मित्रांनो

गेल्या काही वर्षात डबल इंजिनच्या सरकारने प्रत्येक गरीबापर्यंत   उत्तम आरोग्य  सुविधा पोहचवण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केलेनिरंतर काम केले आहे. आम्ही देशात नवीन आरोग्य धोरण लागू केले जेणेकरून गरीबाला स्वस्तात उपचार मिळतील आणि त्याला आजरांपासूनही वाचवता येईल. इथे उत्तर प्रदेशात देखील  90 लाख रुग्णांना  आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार मिळत आहेत.  आयुष्मान भारतमुळे या गरीबांचे सुमारे  एक हजार कोटी रुपये उपचारांसाठी खर्च होण्यापासून वाचले आहेत. आज हजारो जन औषधि केंद्रांमधून अतिशय स्वस्त दरात औषधे मिळत आहेत.  कर्करोगावर उपचार, डायलिसिस आणि हृदयावरील शस्त्रक्रिया खूप स्वस्त झाली आहे,   शौचालय सारख्या सुविधांमुळे अनेक आजार कमी झाले आहेत. एवढेच नाही तर देशभरात उत्तम रुग्णालये कशी उभी राहतील आणि त्या रुग्णालयांमध्ये उत्तम डॉक्टर्स आणि अन्य वैद्यकीय  कर्मचारी कसे  उपलब्ध होतील, यासाठी खूप व्यापक आणि दूरदृष्टीसह काम केले जात आहे. आता रुग्णालयांचे , वैद्यकीय महाविद्यालयांचे  भूमिपूजन देखील होते आणि त्यांचे ठरलेल्या वेळी  लोकार्पण देखील पार पडते.  योगीजी यांच्या सरकारपूर्वी जे सरकार होते, त्यांनी आपल्या कार्यकाळात उत्तर प्रदेशात केवळ   6 वैद्यकीय महाविद्यालये बांधली.  योगीजी यांच्या कार्यकाळात  16 वैद्यकीय महाविद्यालये सुरु झाली आहेत आणि   30 नव्या  वैद्यकीय महाविद्यालयांचे काम वेगाने सुरु आहे.  रायबरेली आणि गोरखपुर इथे बनत  असलेले  एम्स तर उत्तर प्रदेशासाठी एक प्रकारे बोनस आहे.

बंधू आणि भगिनींनो,

वैद्यकीय महाविद्यालये केवळ उत्तम उपचार देत नाहीत तर नवीन  डॉक्टर्स, नवीन निम वैद्यकीय  कर्मचारी देखील तयार करतात.  जेव्हा वैद्यकीय महाविद्यालय उभे राहते तेव्हा तिथे विशिष्ट प्रकारचे प्रयोगशाळा प्रशिक्षण केंद्र  , नर्सिंग विभाग, वैद्यकीय विभाग आणि  रोजगाराची अनेक नवी साधने बनतात. दुर्दैवाने पूर्वीच्या दशकांमध्ये देशातील डॉक्टरांची कमतरता पूर्ण करण्यासाठी देशव्यापी धोरणावर काम झाले नाही. अनेक दशकांपूर्वी  वैद्यकीय महाविद्यालय आणि वैद्यकीय शिक्षणाच्या देखरेखीसाठी जे  नियम कायदे बनवले गेले होते , ज्या संस्था निर्माण केल्या त्या जुन्या पद्धतीने चालत होत्या. ,नवीन  वैद्यकीय महाविद्यालयांच्या उभारणीत त्या अडथळा बनत होत्या.

मागील  7 एकामागोमाग एक  अशी प्रत्येक जुनी व्यवस्था बदलली जात आहे.,जी वैद्यकीय शिक्षणाच्या मार्गात अडथळा बनत आहे. याचा परिणाम वैद्यकीय शिक्षणाच्या  जागांच्या संख्येवरही दिसून येतो. 2014 पूर्वी आपल्या देशात वैद्यकीय जागा 90,000 पेक्षा कमी होत्या. गेल्या 7 वर्षांत देशात 60,000 नवीन वैद्यकीय जागा यात जोडल्या गेल्या आहेत. इकडे उत्तर प्रदेशातही 2017 पर्यंत सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात केवळ 1900 वैद्यकीय जागा होत्या. मात्र  दुहेरी इंजिनच्या सरकारमध्ये गेल्या चार वर्षांत 1900 हून अधिक जागा वाढवण्यात आल्या  आहेत.

मित्रांनो ,

वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढण्याचा, वैद्यकीय जागा वाढण्याचा  एक महत्वपूर्ण पैलू हा देखील आहे की इथले जास्तीत जास्त युवक  डॉक्टर बनतील. गरीब मातेच्या मुलाला आणि मुलीलाही  आता डॉक्टर बनणे सोपे जाईल. सरकारच्या  निरंतर प्रयत्नांचा  परिणाम आहे की स्वातंत्र्यानंतर, 70 वर्षांमध्ये जेवढे डॉक्टर शिकून तयार झाले त्यापेक्षा जास्त  डॉक्टर आपण पुढील 10-12 वर्षांमध्ये तयार करू शकू.

मित्रांनो

युवकांना देशभरात विविध प्रवेश परीक्षांच्या तणावापासून  मुक्ति देण्यासाठी एक देश, एक परीक्षा  लागू करण्यात  आले आहे. यामुळे खर्चाची देखील बचत होईल आणि आणि त्रास देखील कमी होईल. वैद्यकीय शिक्षण गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात असावे यासाठी खासगी महाविद्यालयांचे  शुल्क नियंत्रित ठेवण्यासाठी कायदेशीर तरतूद देखील करण्यात आली आहे. स्थानिक भाषांमध्ये वैद्यकीय शिक्षण न झाल्यामुळे देखील अनेक अडचणी येतात. आता  हिंदी सह अनेक भारतीय भाषांमध्येही उत्तम वैद्यकीय शिक्षणाचा  पर्याय देण्यात आला आहे. आपल्या  मातृभाषेत जेव्हा युवक  शिकतील तेव्हा  आपल्या कामावर त्यांची मजबूत पकड असेल.

मित्रांनो,

आपल्या आरोग्य सुविधा उत्तर प्रदेश जलद गतीने सुधारू शकतो हे उत्तर प्रदेशच्या लोकांनी  या  कोरोना काळात  देखील सिद्ध केले आहे. चार दिवसांपूर्वीच भारताने  100 कोटी लसींच्या मात्रांचे मोठे लक्ष्य  साध्य केले आहे. आणि यात उत्तर प्रदेशचे मोठे  योगदान आहे. मी उत्तर प्रदेशची सगळी जनता , कोरोना योद्धे, , सरकार, प्रशासन आणि याच्याशी संबंधित  लोकांचे अभिनंदन करतो.  आज देशाकडे 100 कोटी लसींच्या मात्रांचे   सुरक्षा कवच आहे. आणि तरीही  कोरोना पासून बचावासाठी उत्तर प्रदेश तयारी करत आहे. उत्तर प्रदेशच्या प्रत्येक जिल्ह्यात कोरोनापासून वाचण्यासाठी मुलांसाठी आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे आणि वेगाने काम सुरु आहे.   कोविड तपासणीसाठी आज उत्तर प्रदेशाकडे  60 पेक्षा अधिक प्रयोगशाळा आहेत. 500 हून अधिक नव्या ऑक्सिजन संयंत्रांवर देखील वेगाने काम सुरु आहे.

मित्रांनो ,

हाच तर  सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि  सबका प्रयास हाच तर त्याचा मार्ग आहे.  जेव्हा सगळे निरोगी असतील, जेव्हा सगळ्यांना संधी मिळेल. तेव्हा कुठे  सबका प्रयास देशाच्या उपयोगी येईल.  दीपावली आणि छठ चे  पर्व यावेळी  पूर्वांचलमध्ये आरोग्याचा नवा  विश्वास घेऊन आले आहे. हा  विश्वास, गतिमान विकासाचा आधार  बनवा या कामनेसह नव्या वैद्यकीय महाविद्यालयांसाठी संपूर्ण उत्तर प्रदेशला  पुन्हा शुभेच्छा आणि   धन्यवाद देतो. तुम्ही देखील एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला  आशीर्वाद  देण्यासाठी आलात त्यासाठी  मी तुमचे विशेष   आभार मानतो, खूप-खूप  धन्यवाद।

 

JPS/MC/RA/SK/PM

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com