Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट


प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या 100 हून अधिक लाभार्थ्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज नवी दिल्ली इथे राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या एलपीजी पंचायतसाठी देशातल्या विविध राज्यातून महिला लाभार्थी आल्या होत्या.

एलपीजी सिलेंडरच्या वापरामुळे जीवनमान कसे सुधारले आहे, याची माहिती लाभार्थी महिलांनी पंतप्रधानांना सांगितली. त्यांच्या दैनंदिन जीवनातील विविध बाबींबद्दल पंतप्रधानांनी जाणून घेतले. प्रत्येक घरासाठी विद्युत जोडणी देणाऱ्या केंद्र सरकारच्या सौभाग्य योजनेबाबतची माहिती पंतप्रधानांनी यावेळी महिलांना दिली. मुलींना दिली जाणारी भेदभावाची वागणूक पूर्णपणे थांबली पाहिजे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. महिलांनी त्यांच्या गावांमध्ये स्वच्छतेवर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले. ज्याप्रकारे उज्ज्वला योजनेमुळे कुटुंबातल्या सर्व सदस्यांचे आरोग्य सुधारले त्याप्रमाणे गावात स्वच्छता राखल्यास संपूर्ण गावाचे आरोग्य सुधारेल, असा सल्ला पंतप्रधानांनी महिलांना दिला.

उज्ज्वला योजनेबाबत महिलांनी पंतप्रधानांचे कौतुक केले तसेच आभार मानले. काही महिलांनी त्यांच्या परिसरातल्या विकासातल्या काही आव्हानांबाबत चर्चा केली.

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यावेळी उपस्थित होते.

 

B.Gokhale/S.Kakade/D.Rane