Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

इस्रायलमधील भारतीय समुदायासमोर पंतप्रधान मोदी यांचे भाषण

इस्रायलमधील भारतीय समुदायासमोर पंतप्रधान मोदी यांचे भाषण

इस्रायलमधील भारतीय समुदायासमोर पंतप्रधान मोदी यांचे भाषण


इस्रायलमधील तेल अविव येथे एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भारतीय समुदायाशी संवाद साधला.

भारतीय पंतप्रधानांना इस्रायलमध्ये येण्यास 70 वर्षे लागली असे नमूद करत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू यांनी केलेल्या स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

भारतीय आणि इस्रायलमधील राजनैतिक संबंध गेल्या 25 वर्षात निर्माण झाले असले तरीही दोन्ही देशातील बंध हे शतकापूर्वीचे आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. तेराव्या शतकात भारतीय सूफी संत बाबा करीब जेरुसलेम येथे आले होते आणि त्यांनी तेथील गुहेत ध्यानधारणा केली, असे आपल्याला सांगण्यात आले आहे असे मोदी म्हणाले.

भारत आणि इस्रायलमधील संबंध परंपरा, संस्कृती, विश्वास आणि मैत्रीच्या आधार स्तंभावर उभे आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. भारत आणि इस्रायलमधील उत्सवामध्ये असलेले साम्यही त्यांनी अधोरेखित केले. या संदर्भात त्यांनी होळी आणि पुरीम तसेच दिवाळी आणि हनुख या सणांचा उल्लेख केला.

इस्रायलने तंत्रज्ञान क्षेत्रात केलेल्या नेत्रदिपक प्रगतीचा उल्लेख करत या देशाला शौर्य आणि वीरतेची मोठी परंपरा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. पहिल्या जागतिक महायुध्दादरम्यान हैफाच्या मुक्तीसाठी भारतीय जवानांनी दिलेल्या योगदानाचे पंतप्रधानांनी स्मरण केले. भारत आणि इस्रायल दोन्हीकडे ज्यू नागरिकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचेही पंतप्रधानांनी वर्णन केले.

इस्रायली जनतेमध्ये असलेल्या संशोधक वृत्तीचे कौतुक करत भू-औष्णिक ऊर्जा, सौर ऊर्जा, कृषी-जैव तंत्रज्ञान आणि सुरक्षा अशा क्षेत्रात इस्रायलने मोठी प्रगती केली असल्याचे मोदी म्हणाले.

आपल्या भाषणात मोदी यांनी भारतात अलिकडेच झालेल्या सुधारणांचा उल्लेख केला. जीएसटीची अंमलबजावणी नैसर्गिक स्रोतांचे लिलाव पध्दतीने वितरण, विमा आणि बँकींग क्षेत्रातील सुधारणा तसेच कौशल्य विकासात हाती घेतलेल्या उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. 2022 पर्यंत भारतातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. भारतात दुसरी हरितक्रांती घडवून आणण्यात इस्रायलची भूमिका महत्वाची ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. भविष्यात दोन्ही देशांचे संबंध विज्ञान आणि संशोधन यावर आधारित असतील, असे ते म्हणाले.

मुंबई दहशतवादी हल्ल्यात बचावलेला इस्रायली बालक मोशे होत्सेबर्गची भेट घेतल्याचे मोदी यांनी सांगितले.

इस्रायलमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना ओसीआय कार्ड मिळण्यातल्या अडचणी दूर करु असे आश्वासन देत इस्रायलच्या लष्करात अनिवार्य सेवा बजावणाऱ्या भारतीयांनाही हे कार्ड दिले जाईल, असे मोदी यांनी सांगितले. इस्रायमध्ये लवकरच भारतीय सांस्कृतिक केंद्र उभारले जाईल, असे ते म्हणाले. भारत आणि इस्रायल दरम्यान थेट हवाई सेवा सुरु केली जाईल अशी घोषणा पंतप्रधानांनी केली.

B.Gokhale/R.Aghor/Anagha