Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

इस्त्रायलच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी जारी केलेले निवेदन (१५ जानेवारी २०१८)

इस्त्रायलच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी जारी केलेले निवेदन (१५ जानेवारी २०१८)

इस्त्रायलच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी जारी केलेले निवेदन (१५ जानेवारी २०१८)


सन्माननीय पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू,

माध्यम प्रतिनिधी, 

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या पहिल्याच भारतीय दौऱ्यात त्यांचे स्वागत करतांना मला अतिशय आनंद होतो आहे.

येदीदीहायाकर, बरूख़िमहाबायिमलेहोदू!

(माझे परममित्र, भारतात तुमचे खूप खूप स्वागत!)

आपली भारत भेट ही भारत आणि इस्रायलच्या मैत्रीच्या य प्रवासातील अनेक वर्षांपासूनचा इच्छित आणि अपेक्षित क्षण होता, तो आज साकार झाला आहे.

भारत आणि इस्त्रायलच्या राजनैतिक संबंधांना 25 वर्षे पूर्ण होत असताना, त्याचे औचित्य साधत तुमचा हा दौरा अधिकच वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे.

2018 या वर्षातले तुम्ही आमचे पहिले सन्माननीय पाहुणे आहात,त्या दृष्टीने, तुम्ही आमच्या नववर्षाची खास सुरुवात केली आहे. सध्या भारतात सगळीकडे वसंत ऋतूचे स्वागत केले जात आहे. नव्या आशेचा, धनधान्य समृद्धीचा हा उत्सव सगळीकडे उत्साहात साजरा होत असतानाच, तुमचे भारतात आगमन आमच्यासाठी एक शुभसंकेतच आहे! भारताच्या विविध प्रांतात साजरे होणारे, लोहडी, बिहू, मकरसंक्रांति आणि पोंगल हे सण भारताच्या विविधतेतील एकतेचेच दर्शन घडवतात.

मित्रांनो,

गेल्या वर्षी जुलै महिन्यात मी माझ्या सव्वाशे कोटी देशबांधवांच्या सदिच्छा आणि मैत्रीचा संदेश घेऊन इस्त्रायलला गेलो होतो.तिथून परत येतांना, इस्त्रायली जनतेने, विशेषतः माझे मित्र, पंतप्रधान नेतन्याहू, म्हणजेच बीबी यांनी केलेला प्रेमाचा वर्षाव आणि आपुलकीचे स्वागत अनुभवून मी अगदी भारावून गेलो होतो.

त्या भेटीदरम्यान मी आणि पंतप्रधान नेतन्याहू यांनी एकमेकांना आणि आमच्या जनतेला एक वचन दिले होते- दोन्ही देशातील राजनैतिक भागीदारी अधिक दृढ करण्याचं ! एक अशी भागीदारी, जी आशा आणि विश्वासावर आधारित असेल, जी या वैविध्यपूर्ण समाजाची प्रगती साधेल, सहकार्य वृद्धिंगत करेल, जी एकत्रित प्रयत्न आणि एकत्रित यशाचे साधन बनेल, अशा भागीदारीचे वचन आम्ही दिले. परस्परांविषयी नैसर्गिक स्नेह आणि मैत्रीभावना- जिने गेल्या अनेक वर्षांपासून आम्हाला बांधून ठेवले आहे,तिच्या आधारावर उभय देशातील जवळपास प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांना लाभ मिळावा अशी भागीदारी आम्ही विकसित करणार आहोत.

आणि आमच्या या एकत्रित महत्वाकांक्षेचे आणि कटिबद्धतेचे फलित म्हणजेच, माझ्या इस्त्रायल दौऱ्यानंतर सहा महिन्यातच आपल्या भारत भेटीचा योग जुळून आला आहे.

काल आणि आज, पंतप्रधान नेतन्याहू आणि मी आमच्या संबंधांच्या प्रगतीचा आढावा घेतला. दोन्ही देशातील संधी आणि आम्हाला साद घालणाऱ्या विकासाच्या शक्यता कशा प्रत्यक्षात साकारता येतील, याची आम्ही चाचपणी केली.

आमची चर्चा अतिशय विस्तृत आणि सखोल झाली. या चर्चेतून दोन्ही देशातील जनतेसाठी आणखी काही करण्याचे ध्येय अधोरेखित झाले. पंतप्रधान नेतन्याहू, कोणत्याही कामाची फळे लवकरात लवकर मिळावीत यासाठी मी आग्रही असल्याची ख्याती पसरली आहे. आणि तुमचाही स्वभाव काहीसा असाच आहे, हे आता एक उघड गुपित आहे !   

गेल्या वर्षी तेल अविव येथे आपण भेटलो असतांना नोकरशाहीतील लालफित एखाद्या मोठ्या सुरीने कापून टाकण्याचा मनोदय आपण व्यक्त केला होता, आणि आपण अतिशय वेगाने ते काम सुरूही केले. 

पंतप्रधान महोदय, मला आपल्याला हे सांगायला आवडेल की आम्हीदेखील भारतात हेच करण्याच्या मार्गावर आहोत. आधीच्या अनेक निर्णयांची अंमलबजावणी करतांना आपण दोघांनीही ही तत्परता आणि धडाडी दाखवली आहे.

त्याचे परिणाम आज आपल्याला ठळकपणे दिसत आहेत.दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ करणे आणि ही भागीदारी अशीच वाढवणे, ही एकवाक्यता आमच्या आजच्या चर्चेत विशेषत्वाने जाणवली.

ह्या निर्णयाचा आपण तीन मार्गांनी पाठपुरावा करु शकतो:

आपल्या जनतेच्या जीवनमानाशी जवळून संबध असणारे विषय, जसे कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि सुरक्षाव्यवस्था यातले सहकार्य अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न.

या संदर्भात, आम्ही चर्चा केली. कृषीक्षेत्रासह, विविध क्षेत्रात परस्पर सहकार्यातून सुरु असलेली उत्कृष्टता केंद्रे अधिक उत्तम करण्याविषयी आम्ही काही उपाययोजना मांडल्या.इस्त्रायलमधील कृषीसंशोधन, तंत्रज्ञान आणि पद्धतींच्या  मदतीने हे साध्य करता येईल.

भारत सरकारने संरक्षण क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणुकीचे मार्ग मोकळे केले आहेत,या निर्णयाचा लाभ घेत, भारतातील संरक्षण उपकरण कंपन्यामध्ये इस्रायलने अधिकाधिक गुंतवणूक करावी, असे आवाहन मी त्यांना केले आहे. 

दुसरे,

आतापर्यत ज्या क्षेत्रात परस्पर सहकार्य अद्याप फारसे विकसित झाले नाही, अशी क्षेत्रे म्हणजे, उदाहरणार्थ, तेल आणि नैसर्गिक वायू,सायबर सुरक्षा, चित्रपट आणि स्टार्ट अप, अशा क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य वाढवण्याचा आमचा मानस आहे. आम्ही आताच केलेल्या करारात आमच्या या निर्णयाचे पडसाद आपल्याला निश्चित बघायला मिळतील. यापैकी अनेक क्षेत्रे आमच्या विस्तृत आणि वैविध्यपूर्ण सहकार्याचे निदर्शक आहेत.

आणि तिसरे,

आम्ही दोन्ही देशातील कुशल, बुद्धिमान मनुष्यबळ आणि अभिनव कल्पनांची परस्परांशी देवघेव करण्यास कटिबद्ध आहोत. यासाठी धोरण सुविधा, पायाभूत सुविधा, दळणवळणाच्या सोयी तसेच सरकारी मदतीशिवाय, परस्परांना जोडण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही दोघेही कटिबद्ध आहोत.

भारत आणि इस्त्रायलच्या जनतेला एकमेकांच्या देशात सहज जाता यावे,तिथे काम करणे सोपे जावे अशी व्यवस्था करण्यासाठी आम्ही दोघेही प्रयत्न करत आहोत. यात दीर्घकाळासाठी एकमेकांच्या देशात वास्तव्य करण्यासाठी सुविधा निर्माण करण्याचाही प्रयत्न असेल, जेणेकरून दोन्हीकडचे लोक परस्परांच्या जवळ येऊ शकतील. याच प्रयत्नांचा भाग इस्त्रायलमध्ये लवकरच भारतीय सांस्कृतिक केंद्र सुरु होणार आहे. 

विज्ञानाशी संबंधित शैक्षणिक उपक्रमांसाठी दरवर्षी १०० युवकांना परस्पर देशामध्ये पाठवण्याचा निर्णयही आम्ही घेतला.

मित्रांनो,

उभय देशातील भागीदारी अधिक भक्कम व्हावी, यासाठी दोन्ही बाजूंनी व्यापार आणि गुंतवणूक वाढवणे हा आमच्या दृष्टिकोनाचा महत्वाचा भाग आहे.या दिशेने अधिक प्रयत्न करण्यावर मी आणि पंतप्रधान नेतन्याहू यांच्यात सहमती झाली आहे. गेल्या वर्षी तेल अविव इथे झालेल्या बैठकीनंतर, आम्ही आता लवकरच दोन्ही देशातील उद्योगसमूहाच्या प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यांची एका द्विपक्षीय मंचावर एकत्रित बैठक घेणार आहोत.

पंतप्रधान नेतन्याहू यांच्यासोबत भारतात आलेल्या सर्व उद्योगपतींचे मी मनःपूर्वक स्वागत करतो. पंतप्रधान नेतन्याहू आणि माझ्यात प्रादेशिक आणि जागतिक परिस्थितीबाबतही चर्चा झाली. आपल्या प्रदेशात आणि एकूणच जगात शांतता नांदावी, यादृष्टीनेही आम्ही भारत –इस्त्रायल संबंधावर चर्चा केली. 

मित्रांनो,

भारताच्या भूमीवर पहिले पाऊल ठेवल्यावर पंतप्रधान नेतन्याहू माझ्यासोबत तीन मूर्ती चौकाच्या नामकरण समारंभाला आले. इस्त्रायलमधील हैफा शहराच्या मुक्तीलढ्यासाठी ज्या भारतीय सैनिकांनी बलिदान दिले, त्यांना यावेळी आम्ही श्रद्धांजली वाहिली आणि त्याच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी या चौकाचे नाव ‘तीन मूर्ती हैफा चौक’ असे करण्यात आले.

आम्ही दोन्ही देश असे आहोत, ज्यांना कधीही आपला इतिहास आणि आपल्या वीर पुरुषांना विस्मरण झालेलं नाही.त्यामुळेच पंतप्रधान नेतान्याहू यांच्या, भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्याच्या कृतीविषयी आम्हाला अत्यंत आदर आहे. 

इस्त्रायल सोबतच्या आमच्या भागीदारीच्या भविष्याचा मी आज जेव्हा विचार करतो, तेव्हा आशा आणि सकारात्मकतेने माझे हृद्य भरून जाते. भारत आणि इस्त्रायलचे संबंध नव्या उंचीवर नेण्यासाठी माझ्याइतकेच पंतप्रधान नेतन्याहू कटिबद्ध आहेत. याबद्दल माझ्या मनात काहीही शंका नाही. 

तसेच, पंतप्रधान नेतन्याहू यांना माझ्या गुजरातमध्ये घेऊन जाण्याची संधी मला मिळणार आहे याचा मला विशेष आनंद आहे.

तिथे आपल्याला आपली वचने पूर्ण करण्याची संधी मिळेल. कृषी, तंत्रज्ञान आणि संशोधन अशा क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्याची संधी आपल्याला तिथे मिळू शकेल.

पंतप्रधान नेतन्याहू, श्रीमती नेतन्याहू आणि त्यांच्यासोबत आलेले प्रतिनिधीमंडळ, यांचे भारतातले वास्तव्य अविस्मरणीय ठरेल असा विश्वास व्यक्त करत मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो.

खूप खूप धन्यवाद ! तोडा रबाह !!

B.Gokhale/R.Aghor/Anagha