Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

“इन्व्हेस्ट कर्नाटक 2022” या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलेले भाषण

“इन्व्हेस्ट कर्नाटक 2022” या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलेले भाषण


नवी दिल्‍ली, 2 नोव्‍हेंबर 2022

 

नमस्कार,

जागतिक गुंतवणूकदारांच्या या परिषदेत जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेले सगळे सहकारी, भारतात तुमचे स्वागत आहे, नम्मा कर्नाटका (कर्नाटकमध्ये स्वागत), आणि नम्मा बंगळुरू (बंगळुरूमध्ये स्वागत आहे). कर्नाटकने काल आपला राज्य स्थापना दिवस साजरा केला. कर्नाटकचे लोक आणि कन्नड भाषेला आपल्या आयुष्याचा भाग बनवणाऱ्या सर्व लोकांना मी यानिमित्त शुभेच्छा देतो. हे असे स्थान आहे, जिथे परंपरा देखील आहेत, आणि तंत्रज्ञान देखील आहे. ही अशी जागा आहे, जिथे सर्वत्र निसर्ग आणि संस्कृती यांचा अनोखा संगम आपल्याला दिसतो. इथले अप्रतिम स्थापत्यशास्त्र आणि अत्यंत गतिमान असे स्टार्ट अप्स देखील, या ठिकाणची ओळख आहेत. जेव्हा गुणवत्ता आणि तंत्रज्ञानाबद्दल चर्चा होते, तेव्हा सर्वात आधी आपल्यासमोर एक नाव येते, ते म्हणजे, ब्रॅंड बंगळुरू आणि हे नाव भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरात प्रस्थापित झाले आहे.  कर्नाटकची ही भूमी, सर्वात सुंदर अशा नैसर्गिक स्थळांसाठी ओळखली जाते. म्हणजे, इथली मृदु भाषा, इथली समृद्ध संस्कृती आणि कानडी लोकांच्या मनात प्रत्येकासाठी असलेले आपलेपण सगळ्यांचे मन जिंकून घेणारे आहे. 

मित्रहो,

जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे कर्नाटकात आयोजन होत आहे, याचा मला मनापासून आनंद झाला आहे. हे आयोजन, राज्यांमधील स्पर्धात्मक आणि सहकार्यात्मक संघराज्याचे एक सुयोग्य उदाहरण आहे. भारतात उत्पादन आणि व्यावसायिकता, तसेच उत्पादन क्षेत्र, बऱ्याच प्रमाणात, राज्यांच्या धोरण आणि निर्णयप्रक्रियेवर त्यांच्या नियंत्रण क्षमतेवर अवलंबून आहे. भारताला पुढे जायचे असेल तर राज्यांनी पुढे जाणे आवश्यक आहे. जागतिक गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून विशिष्ट क्षेत्रांमध्ये राज्ये स्वत:च दुसऱ्या देशांसोबत भागीदारी करत आहेत, ही खूपच चांगली बाब आहे. जगभरातल्या जवळपास सगळ्या कंपन्या या आयोजनात सहभागी झाल्या आहेत, असे मला दिसते आहे. या व्यासपीठावर हजारो कोटी रुपयांची भागीदारी केली जाणार आहे, असे मला सांगण्यात आले आहे. यामुळे युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

मित्रहो,

21 व्या शतकात भारत आज ज्या उंचीवर आहे, तिथून आता आपल्याला सतत पुढेच जायचे आहे. गेल्या वर्षी भारताने सुमारे 84 अब्ज डॉलर्स इतक्या थेट परकीय गुंतवणुकीचा विक्रम प्रस्थापित केला होता. अवघे जग कोविड या जागतिक साथरोगाचे परिणाम आणि युद्धजन्य परिस्थितीचा सामना करत असतानाची ही आकडेवारी आहे, याची कल्पना आपल्याला आहे. सगळीकडे अनिश्चिततेची परिस्थिती आहे. भारतातही युद्ध आणि साथरोगामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे विपरीत परिणाम होत आहेत. असे असतांनाही आज संपूर्ण जग उमेद आणि अपेक्षेने भारताकडे बघत आहे. हा काळ आर्थिक अस्थिरतेचा काळ आहे, मात्र सगळे देश एका बाबतीत अतिशय आश्वस्त आहेत की भारतीय अर्थव्यवस्थेचा मूलभूत पाया अतिशय भक्कम आहे. आजच्या ह्या अतिशय विस्कळीत परिस्थितीत, भारत जगासोबत काम करण्यावर भर देत आहे. या काळात आपण पुरवठा साखळी ठप्प पडताना बघितली आहे, मात्र याच काळात भारत प्रत्येक गरजूला औषधे, लस पुरवठा करण्याची हमी देत आहे. बाजारपेठेत चढउतार होण्याचा हा काळ आहे, पण 130 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आपल्या स्थानिक बाजारपेठेच्या सुदृढतेची हमी देत आहे. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा जागतिक संकटाचा काळ असला तरी जगभरातले तज्ञ, विश्लेषक आणि अर्थव्यवस्थेचे जाणकार भारताकडे आशेचा स्रोत म्हणून बघत आहेत. आणि आपण आपल्या मूलभूत तत्वांवर सातत्याने काम करत आहोत, जेणेकरून भारताची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस मजबूत होईल. गेल्या काही महिन्यांत भारताने जितके मुक्त व्यापार करार केले आहेत, त्यातून जगाला आपल्या तयारीचा अंदाज आला आहे.

मित्रहो,

आज आपण ज्या ठिकाणी पोहोचलो आहोत, तो प्रवास कुठून सुरु झाला होता, हे लक्षात घेणे अतिशय गरजेचे आहे. 9 – 10 वर्षांपूर्वी आपला देश धोरण स्तरावरच होता आणि त्याच स्तरावर संकटाशी सामना करत होता. देशाला त्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी आपल्याला आपला दृष्टीकोन बदलण्याची गरज होती. आम्ही गुंतवणूकदारांना लाल फितीत अडकवून ठेवण्याच्या ऐवजी, गुंतवणुकीसाठी लाल पायघड्या अंथरण्याची परिस्थिती तयार केली. आम्ही नवनवीन किचकट कायदे तयार करण्याच्या ऐवजी त्यांना तर्कशुद्ध आणि कालसुसंगत केले. आम्ही स्वतः व्यवसाय करण्याच्या ऐवजी व्यवसायासाठी पूरक वातावरण तयार केले, जेणेकरून दुसरे लोक पुढे येऊ शकतील. आम्ही युवा वर्गाला नियमांच्या बेड्यांमध्ये अडकवण्याऐवजी त्यांना आपल्या क्षमतेनुसार पुढे जाण्याची संधी दिली.

मित्रहो,

धाडसी सुधारणा, मोठ्या पायाभूत सुविधा आणि सर्वोत्तम प्रतिभा या आधारावरच नव्या भारताची निर्मिती शक्य आहे. आज प्रत्येक सरकारी क्षेत्रात धाडसी सुधारणा केल्या जात आहेत. आर्थिक क्षेत्रात जीएसटी आणि आयबीसी सारख्या सुधारणा केल्या गेल्या आहेत. बँकिंग क्षेत्रात सुधारणा आणि मजबूत अशा स्थूल आर्थिक पायाच्या माध्यमातून, अर्थव्यवस्था भक्कम केली आहे. त्याचप्रमाणे आम्ही यूपीआय सारखी पावले उचलून, देशांत डिजिटल क्रांती आणण्याची तयारी केली. 1500 पेक्षा जास्त कालबाह्य कायदे आम्ही रद्द केले, सुमारे 40 हजार अनावश्यक अनुपालने देखील रद्द केलीत. आम्ही कायद्यातील अनेक तरतुदींना फौजदारी कक्षेतून बाहेर काढले. कार्पोरेट कर कमी करण्यासाठी देखील आम्ही पावले उचललीत. तसेच चेहराविरहीत मूल्यांकनासारख्या सुधारणा अमलात आणून करक्षेत्रात पारदर्शकताही वाढवली आहे. भारतात थेट परकीय गुंतवणुकीसाठी नव्या क्षेत्रांना दरवाजे उघडून दिले आहेत. भारतात ड्रोन, जिओ- स्पेशियल (भू-अवकाशीय) क्षेत्र आणि इतकेच नव्हे तर संरक्षण क्षेत्रातही गुंतवणुकीला अभूतपूर्व चालना दिली जात आहे.  

मित्रहो,

सुधारणांबरोबरच पायाभूत सुविधा क्षेत्रातही भारत अत्यंत वेगाने प्रगती करतो आहे. आधुनिक पायाभूत सुविधांसाठी भारत आधीपेक्षा खूप अधिक जलद गतीने आणि मोठ्या व्यापक स्तरावर कामे करतो आहे. आपण विमानतळांचे उदाहरण बघू शकतो. गेल्या आठ वर्षांत, कार्यरत विमानतळांची संख्या दुप्पट झाली आहे. आधी अवघे 70 विमानतळ होते, ती संख्या आता 140 पेक्षा जास्त झाली आहे. आणि आता आणखी अनेक विमानतळ भारतात सुरु होत आहेत. त्याचप्रमाणे मेट्रो ट्रेनची व्याप्ती पाच शहरांपासून 20 शहरांपर्यंत पसरली आहे. अलीकडेच शुभारंभ करण्यात आलेल्या राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरणामुळे विकासाची गती आणखी वाढवण्यास मदत मिळणार आहे.

मित्रहो,

खासकरून पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय बृहत योजनेकडे मी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधू इच्छितो. गतीशक्ती राष्ट्रीय बृहत योजनेने पायाभूत सुविधांच्या उभारणीची पद्धतच बदलली  आहे. आता जेव्हा एखाद्या प्रकल्पाची योजना तयार केली जाते, तेव्हा सर्वप्रथम त्याच्या तीन पैलूंवर लक्ष दिले जाते. पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच विद्यमान पायाभूत सुविधांचा नकाशा तयार केला जातो. मग त्या  पूर्ण करण्यासाठी सगळ्यात कमी वेळ घेणाऱ्या आणि सर्वात कार्यक्षम मार्गावर चर्चा केली जाते. यामध्ये देशाच्या तळागाळापर्यंत पोहोचण्यावर भर दिला जातो आणि ते उत्पादन किंवा सेवा जागतिक दर्जाची असावी, यावरही भर दिला जातो.

मित्रहो,

आज अवघे जग उद्योग 4.O च्या दिशेने वाटचाल करत आहे आणि  या औद्योगिक क्रांतीमध्ये भारतीय युवा वर्गाची भूमिका आणि भारतीय युवा वर्गाची प्रतिभा पाहून जग आश्चर्यचकित झाले  आहे. भारतातील युवा वर्गाने गेल्या काही वर्षांत 100 पेक्षा जास्त युनिकॉर्न तयार केले आहेत. भारतात 8 वर्षांत 80 हजारपेक्षा जास्त स्टार्टअप्स तयार झाले आहेत. आज भारतातील प्रत्येक क्षेत्र युवाशक्तीच्या जोरावर वाटचाल करत आहे. गेल्या वर्षी भारताने विक्रमी निर्यात केली आहे. कोविडनंतरच्या परिस्थितीत ही कामगिरी अत्यंत महत्त्वाची ठरते. भारतातील युवा वर्गाच्या क्षमतांचा विस्तार करण्यासाठी आम्ही भारतीय शिक्षण व्यवस्थेतही महत्त्वाचे बदल केले आहेत. भारतातील विद्यापीठे, तंत्रज्ञान विद्यापीठे आणि व्यवस्थापन विद्यापीठे यांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मित्रहो,

गुंतवणूक आणि मानवी भांडवलावर लक्ष केंद्रित करूनच विकासाची मोठी उद्दिष्टे साध्य करता येतात. या विचारासह आगेकूच करत आम्ही आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले. उत्पादकता वाढवणे आणि मानवी भांडवल सुधारणे हा देखील आमचा उद्देश आहे. आज एकीकडे आपण जगातील सर्वात मोठ्या उत्पादन प्रोत्साहन योजनेपैकी एक लागू करत आहोत, तर दुसरीकडे जगातील सर्वात मोठ्या आरोग्य हमी योजनेलाही सुरक्षा प्रदान करत आहोत. एकीकडे आपल्या देशात थेट परदेशी गुंतवणुकीत  झपाट्याने वाढ होते आहे आणि दुसरीकडे वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांची  संख्याही वाढते आहे. एकीकडे आम्ही उद्योगाच्या मार्गातील अडथळे दूर करत आहोत, तर दुसरीकडे दीड लाख लाख आरोग्य आणि निरामयता  केंद्रेही उभारत आहोत. एकीकडे आम्ही देशभरात महामार्गांचे जाळे विणत आहोत तर दुसरीकडे लोकांना शौचालये आणि शुद्ध पेयजल देण्याच्या अभियानामध्येही आम्ही व्यस्त आहोत. एकीकडे आम्ही भविष्याचा विचार करून मेट्रो, विमानतळ आणि रेल्वे स्थानके अशा पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर काम करत आहोत, तर दुसरीकडे हजारो स्मार्ट शाळाही तयार करत आहोत.

मित्रहो,

नवीकरणीय ऊर्जेच्या क्षेत्रात भारताने आज जो टप्पा गाठला आहे तो  संपूर्ण जगासाठी आदर्शवत आहे. गेल्या 8 वर्षांत, देशाची नवीकरणीय  ऊर्जा क्षमता तीन पटीने वाढली आहे आणि सौर ऊर्जा क्षमता 20 पट वाढली आहे. हरित विकास  आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेने आपण राबवलेल्या उपक्रमांनी अधिकाधिक गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. त्यांना आपल्या गुंतवणुकीचा परतावा हवा आहे आणि या धरतीच्या प्रति जबाबदारी पूर्ण करायची आहे. ते भारताकडे अपेक्षेने पाहत आहेत.

मित्रहो,

कर्नाटकच्या वैशिष्ट्यात आज आणखी एका बाबीची भर पडली आहे. कर्नाटकात दुहेरी इंजिनची ताकद आहे म्हणजेच केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये एकच पक्ष नेतृत्व करतो आहे. कर्नाटक अनेक क्षेत्रांमध्ये वेगाने विकसित होत आहे, हे देखील एक कारण आहे. उद्योग सुलभतेमध्ये आघाडीच्या क्रमवारीत कर्नाटकने आपले स्थान कायम राखले आहे. यामुळेच थेट परकीय गुंतवणुकीबाबत  कर्नाटकचे नाव अव्वल राज्यांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. फॉर्च्युन 500 कंपन्यांपैकी 400 कर्नाटकात आहेत. भारतातील 100 पेक्षा जास्त युनिकॉर्नपैकी 40 पेक्षा जास्त कर्नाटकात आहेत. कर्नाटक आज जगातील सर्वात मोठे तंत्रज्ञान क्लस्टर म्हणून गणले जात आहे. उद्योगापासून माहिती तंत्रज्ञानापर्यंत , आर्थिक तंत्रज्ञानापासून ते  जैव तंत्रज्ञानापर्यंत, स्टार्ट-अप्सपासून शाश्वत ऊर्जेपर्यंत, कर्नाटकात एक नवीन विकासगाथा लिहिली जात आहे. काही क्षेत्रातील विकासाच्या आकडेवारीच्या बळावर  कर्नाटक हे राज्य भारतातील इतर राज्यांनाच नव्हे तर काही देशांनाही आव्हान देते आहे. आज भारताने राष्ट्रीय सेमी-कंडक्टर मोहिमेसह उत्पादन क्षेत्राच्या नवीन टप्प्यात प्रवेश केला आहे. यामध्ये कर्नाटकची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. इथले तंत्रज्ञान कार्यक्षेत्र  चिप डिझाइन आणि उत्पादन क्षेत्राला नव्या उंचीवर नेईल.

मित्रहो,

एक गुंतवणूकदार मध्यम मुदतीचे ध्येय आणि दीर्घकालीन दृष्टी घेऊन पुढे जात असतो, हे तुम्हाला ठाऊक आहेच. आणि भारताकडे प्रेरक दीर्घकालीन दृष्टीकोनही आहे. नॅनो युरिया असो, हायड्रोजन ऊर्जा असो, हरित अमोनिया असो, कोळसा गॅसिफिकेशन असो वा अवकाश उपग्रह असो,  आज भारत आपल्या विकासासह अवघ्या जगाच्या विकासाचा मंत्र घेऊन वाटचाल करत आहे. हा भारताचा अमृत काळ आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात नवा भारत घडवण्याचा संकल्प घेऊन देशातील जनता पुढे चालली आहे. आम्ही 2047 पर्यंत विकसित भारत घडविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी तुमची गुंतवणूक आणि भारताची प्रेरणा एकत्र येणे अत्यंत गरजेचे आहे, कारण सर्वसमावेशक, लोकशाहीवादी  आणि सशक्त भारताचा विकास जगाच्या विकासाला गती देईल. म्हणूनच आम्ही म्हणतो की भारतातील गुंतवणूक म्हणजे समावेशनातील गुंतवणूक, लोकशाहीतील गुंतवणूक. भारतातील गुंतवणूक म्हणजे जगासाठी गुंतवणूक. भारतातील गुंतवणूक म्हणजे एका चांगल्या ग्रहासाठीची गुंतवणूक, भारतातील गुंतवणूक म्हणजे स्वच्छ आणि संरक्षित ग्रहासाठीची गुंतवणूक. चला,  कोट्यवधी लोकांचे जीवन बदलण्याचे ध्येय बाळगून आपण सर्व मिळून पुढे जाऊया. या कार्यक्रमात सहभागी असलेल्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप  शुभेच्छा. कर्नाटकचे मुख्यमंत्री, त्यांचा संपूर्ण चमू , कर्नाटक सरकार आणि कर्नाटकातील सर्व बंधू-भगिनींना मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद.

 

* * *

M.Pange/R.Aghor/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai