Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

इटलीची राजधानी रोम इथे एफएओच्या आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाच्या उद्‌घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला संदेश


नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2022

इटलीची राजधानी, रोम इथे, आंतरराष्ट्रीय अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाचे उद्घाटन झाले, या उद्‌घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला संदेश पाठवला.  

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे या उद्‌घाटन समारंभात भारताच्या प्रतिनिधी म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी पंतप्रधानांचा संदेश वाचून दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आणि पुढाकारामुळेच, संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत, 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या प्रस्तावाला, जगभरातील 70 पेक्षा जास्त देशांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे, जगभरात, शाश्वत शेतीत, भरड धान्याच्या योगदानाचे महत्त्व, आणि एक पोषक, आरोग्यदायी सुपरफूड म्हणून त्याची उपयुक्तता, याबद्दल जनजागृती करण्यास मदत होईल.

आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष-2023 चे उद्‌घाटन केल्याबद्दल, संयुक्त राष्ट्रे तसेच आंतरराष्ट्रीय अन्न आणि कृषी संघटनेचे अभिनंदन केले. तसेच, आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष-2023 ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पाठिंबा आणि मदत केलेल्या सदस्य देशांचे त्यांनी आभार मानले.

भरड धान्ये, ही मानवाने घेतलेल्या सर्वात आदिम पिकांपैकी एक असून, मानवाला आवश्यक पोषणमूल्यांचा तो उत्तम स्त्रोत आहे, असं सांगत भविष्यात ही भरड धान्येच आपल्या पसंतीचा आहार असायला हवा, यावर पंतप्रधानानांनी भर दिला.अन्नसुरक्षेच्या आव्हांनाना अधोरेखित करतांना पंतप्रधान म्हणाले की शतकात एकदाच येणाऱ्या महामारीचा जगाने सामना केला आणि त्यानंतर येणारे संघर्ष या सगळ्यात, अन्नसुरक्षा ही पृथ्वीसाठी आजही चिंतेची बाब असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच हवामान बदलाचा, अन्नधान्याच्या उपलब्धतेवर कसा परिणाम होतो आहे, यालाही त्यांनी स्पर्श केला.

भरड धान्याशी संबंधित जागतिक चळवळ हे अन्न सुरक्षेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे अधोरेखित करत पंतप्रधानांनी सांगितले की, भरड धान्ये वाढण्यास सोपी, हवामानास अनुकूल आणि दुष्काळ प्रतिरोधक आहे. भरड धान्ये संतुलित पोषणाचा समृद्ध स्त्रोत आहे, नैसर्गिक शेतीच्या पद्धतींशी सुसंगत आहे आणि कमी पाण्यात होणारी पिके आहेत, असं सांगतपंतप्रधान म्हणाले, “भरड धान्ये ग्राहक, शेतकरी आणि हवामान या सर्वांसाठी चांगली आहेत.”

शेतजमीन आणि आपल्या जेवणातही विविधतेची गरज आहे, यावर भर देताना पंतप्रधानांनी सांगितले की, जर शेतीत एकच एक धान्य पिकत असेल तर आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. भरड धान्ये, कृषी आणि आहारातील विविधता वाढवण्याचा एक उत्तम  मार्ग आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

आपल्या संदेशाच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधानांनी, ‘भरड धान्याविषयी लोकप्रियता निर्माण करण्यासाठी, जनजागृती करण्यावर भर दिला. आणि यात, संस्था तसेच व्यक्तिगत पातळीवर आपण किती मोठे योगदान देऊ शकतो, हे सांगितले. संस्थात्मक पातळीवर, आपण भरड धान्याचे उत्पादन वाढवण्यास प्रोत्साहन देऊ शकतो आणि, धोरणात्मक उपक्रम राबवून ही धान्ये शेतकऱ्यांना नफा मिळवून देण्यास कशी उपयुक्त ठरतील, याची व्यवस्था करु शकतो, त्याचवेळी, व्यक्तिगत पातळीवर आपण आपल्या आहारात भरड धान्याचा समावेश करत, एक आरोग्यदायी आणि पर्यावरण स्नेही आयुष्य जगण्याची निवड करु शकतो, असे त्यांनी सुचवले.

या प्रसंगी पंतप्रधानांनी दिलेला संपूर्ण संदेश खालीलप्रमाणे :

आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023 चा शुभारंभ केल्याबद्दल मी संयुक्त राष्ट्र आणि अन्न आणि कृषी संघटनेचे अभिनंदन करतो.

आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे करण्याच्या आमच्या प्रस्तावाला पाठिंबा देणाऱ्या विविध सदस्य राष्ट्रांचेही मी कौतुक करतो.

मानवाने सर्वात सुरुवातीला घेतलेल्या पिकांपैकी एक असलेल्या भरड धान्याला एक वैभवशाली इतिहास आहे. भूतकाळात ते अन्नाचा एक महत्वाचा स्त्रोत होतेच. आणि भविष्यातील खाद्यपदार्थ म्हणून त्याची निवड करणे ही आजच्या काळाची गरज आहे!  

शतकामधील एक असलेल्या महामारी नंतर निर्माण झालेल्या संघर्षाच्या परिस्थितीने हे दाखवून दिले आहे की अन्न सुरक्षा ही अजूनही पृथ्वी ग्रहासाठी चिंतेची बाब आहे. हवामान बदलाचे संकटही  अन्नाच्या उपलब्धतेवर परिणाम करू शकते. 

अशा वेळेस भरड धान्यांशी निगडित जागतिक चळवळ हे एक महत्त्वाचे पाऊल आहे कारण भरड dधान्ये सहज वाढतात, हवामानास अनुकूल आणि दुष्काळ प्रतिरोधक असतात.

ग्राहक, शेतकरी आणि हवामानासाठी भरड धान्ये चांगली आहेत. ती ग्राहकांसाठी संतुलित पोषणाचे समृद्ध स्रोत आहेत. भरड धान्यांना कमी पाणी लागत असल्याने आणि त्यांची शेती नैसर्गिक शेती पद्धतींशी सुसंगत असल्याने ती पिके घेणे शेतकरी आणि पर्यावरणासाठी फायदेशीर आहे.

जमिनीसाठी आणि आपल्यासाठी विविधतेची गरज आहे. जर शेती ही मोनोकल्चर झाली तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर आणि जमिनीच्या आरोग्यावर होतो. भरड धान्ये हा शेतीत आणि आहारात विविधता वाढवण्याचा एक चांगला मार्ग आहे.

मिलेट माइंडफुलनेसम्हणजे भरड धान्याविषयी अनुकूल जनमत तयार करण्यासाठी जनजागृती करणे हा या चळवळीचा महत्त्वाचा भाग आहे. संस्था आणि व्यक्ती यात मोठे योगदान देऊ शकतात.

संस्थात्मक यंत्रणा भरड धान्ये उत्पादनाला प्रोत्साहन देऊ शकतात आणि धोरणात्मक उपक्रमांद्वारे शेतकऱ्यांना फायदा मिळवून देऊ शकतात, तर व्यक्ती भरड धान्याला आहाराचा एक भाग बनवून आरोग्यदायी आणि पर्यावरण स्नेही आयुष्याची निवड करू शकतात.

आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष-2023 जगाच्या सुरक्षित, शाश्वत आणि निरोगी भविष्यासाठी लोक चळवळ सुरू करेल, असा मला विश्वास वाटतो.

पार्श्वभूमी

संयुक्त राष्ट्रांच्या सर्व साधारण सभेने 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. पंतप्रधानांची दूरदृष्टी आणि पुढाकारामुळेच हा संयुक्त राष्ट्रांचा ठराव जगभरातील 70  हून अधिक राष्ट्रांच्या पाठिंब्याने स्वीकारला गेला. शाश्वत शेतीमध्ये भरड धान्याची महत्त्वाची भूमिका तसेच स्मार्ट आणि सुपरफूड (पोषणमूल्य असलेले धान्य) म्हणून त्याचे फायदे याबद्दल जगभरात जागरूकता निर्माण करण्यात त्यामुळे मदत होईल. 170 लाख टनांहून अधिक उत्पादनासह भारत भरड धान्याचे जागतिक केंद्र बनण्याच्या तयारीत आहे. आशियातील 80% पेक्षा जास्त भरड धान्याचे उत्पादन भारतात होते. या धान्यांचे सर्वात जुने पुरावे सिंधू संस्कृतीत सापडले आहेत आणि अन्नासाठी लागवडीखाली आलेल्या पहिल्या वनस्पतींपैकी ही धान्ये एक होती. भरड धान्ये सुमारे 131 देशांमध्ये घेतली जातात. आशिया आणि आफ्रिकेतील सुमारे 60 कोटी लोकांचे हे पारंपरिक अन्न आहे.

भारतीय भरड धान्ये, पाककृती आणि मूल्यवर्धित उत्पादने जागतिक स्तरावर स्वीकारली जावीत यासाठी भारत सरकारने ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’  लोक चळवळ म्हणून साजरे करणार असे जाहीर केले आहे.. ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’ हे जागतिक उत्पादन वाढवण्यासाठी, कार्यक्षम प्रक्रिया वापरासाठी, पीक रोटेशनच्या चांगल्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी, भरड धान्याला अन्नाचा एक प्रमुख घटक म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्व अन्न प्रणालींमध्ये उत्तम कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देण्यासाठी एक अनोखी संधी प्रदान करते.

अन्न आणि कृषी संस्था अर्थात एफएओने एका संक्षिप्त संदेशात म्हटले आहे की एफएओने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाच्या उद्‌घाटन समारंभाचा उद्देश सदस्य आणि इतर संबंधितांनी त्याबद्दलची जागरूकता वाढवणे आणि त्याला चालना देणे तसेच भरड धान्याची शाश्वत लागवड आणि वापर करण्याचे फायदे प्रकाशात आणणे हा आहे.

 

 

R.Aghor/Rajashree/Prajna/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai