Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन

इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन


 

महामहिम राष्ट्राध्यक्ष आणि माझे मित्र  प्रबोवो सुबियांतो,

दोन्ही देशांचे प्रतिनिधी,

माध्यमातील मित्रांनो,

नमस्कार!

भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनासाठी इंडोनेशिया आपला  मुख्य अतिथी देश  होता आणि आपल्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की, आपण  आपला  75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना, इंडोनेशिया पुन्हा एकदा या महत्त्वाच्या प्रसंगाचा एक भाग बनत आहे. या प्रसंगी  मी राष्ट्राध्यक्ष प्रबोवो यांचे भारतात हार्दिक स्वागत करतो.

मित्रहो,

2018 मधील माझ्या इंडोनेशिया दौऱ्यादरम्यान, आम्ही आमची भागीदारी सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीमध्ये रूपांतरित केली. आज राष्ट्राध्यक्ष प्रबोवो यांच्यासमवेत आम्ही परस्पर सहकार्याच्या विविध पैलूंवर विस्तृत चर्चा केली. संरक्षण क्षेत्रातील आमचे सहकार्य मजबूत करण्यासाठी आम्ही संरक्षण उत्पादन आणि पुरवठा साखळी या क्षेत्रात एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

आम्ही सागरी सुरक्षा, सायबर सुरक्षा, दहशतवादाला प्रतिबंध आणि कट्टरतावाद विरोधात  सहकार्यावरही भर दिला आहे. सागरी सुरक्षा आणि सुरक्षिततेबाबत आज स्वाक्षरी करण्यात आलेल्या करारामुळे गुन्ह्यांना प्रतिबंध, शोध आणि बचाव तसेच  क्षमता निर्मिती क्षेत्रात आमचे सहकार्य अधिक मजबूत होईल. गेल्या काही वर्षांमध्ये, आमचा द्विपक्षीय व्यापार झपाट्याने वाढला आहे आणि गेल्या वर्षी तो  30 अब्ज डॉलर्सच्या पलिकडे गेला  आहे.

तो आणखी पुढे नेण्यासाठी, आम्ही बाजारपेठेतील प्रवेश आणि ट्रेड बास्केटमध्ये वैविध्य  आणण्यावर देखील चर्चा केली आहे. खाजगी क्षेत्र देखील या प्रयत्नांमध्ये समान भागीदार आहे. आज झालेल्या सीईओ मंचाच्या  बैठकीचे आणि खाजगी क्षेत्रातील करारांचे आम्ही स्वागत करतो. आम्ही फिनटेक, कृत्रिम बुद्धिमत्ता , इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रात परस्पर सहकार्य आणखी मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे.

आरोग्य आणि अन्न सुरक्षा या क्षेत्रांमध्ये, भारत मध्यान्ह भोजन योजना आणि सार्वजनिक वितरण प्रणाली मधून आलेले  अनुभव आणि विचार इंडोनेशियासोबत सामायिक  करत आहे. आम्ही ऊर्जा, महत्वपूर्ण खनिजे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, अंतराळ आणि एसटीईएम (स्टेम) शिक्षण या क्षेत्रांमध्ये एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संयुक्त सरावासाठी एकत्र येतील.

मित्रहो,

भारत आणि इंडोनेशियामधील संबंध हजारो वर्षांपासूनचे आहेत. रामायण आणि महाभारतातून प्रेरित कथा आणि बाली जत्राहे आपल्या दोन महान राष्ट्रांमधील प्राचीन सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांचे पुरावे आहेत. बौद्ध बोरोबुदुर मंदिरानंतर, भारत आता प्रम्बानन हिंदू मंदिराच्या संवर्धनाच्या प्रयत्नांमध्येही योगदान देईल, याचा मला खूप आनंद आहे.

याव्यतिरिक्त, 2025 हे वर्ष इंडो-आसियान पर्यटन वर्ष म्हणून साजरे केले जाईल. यामुळे भारत आणि इंडोनेशियामधील सांस्कृतिक देवाणघेवाण आणि पर्यटनाला देखील चालना मिळेल.

मित्रहो,

इंडोनेशिया हा आसियान आणि भारत –प्रशांत  प्रदेशांमध्ये आमचा महत्त्वाचा भागीदार आहे. या संपूर्ण प्रदेशात शांतता, सुरक्षा, समृद्धी आणि नियम-आधारित सुव्यवस्था राखण्यासाठी दोन्ही देश वचनबद्ध आहेत. आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार जलवाहतुकीचे स्वातंत्र्य सुनिश्चित केले पाहिजे यावर आम्ही सहमत आहोत.

आमच्या अ‍ॅक्ट इस्ट  पॉलिसीमध्ये आसियान एकता आणि केंद्रस्थान  यावर भर देण्यात आला आहे. आम्ही जी-20, आसियान आणि हिंद महासागर रिम असोसिएशन सारख्या व्यासपीठांवर एकत्र काम करत आहोत.

आता आम्ही ब्रिक्समध्ये इंडोनेशियाच्या सदस्यत्वाचे देखील स्वागत करत आहोत. या सर्व मंचांवर, आम्ही ग्लोबल साऊथमधील राष्ट्रांच्या हितासाठी आणि प्राधान्यांसाठी समन्वय आणि सहकार्याने काम करू.

महोदय,

उद्या आपल्या प्रजासत्ताक दिन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तुमची भारत भेट आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. या कार्यक्रमात पहिल्यांदाच इंडोनेशियाच्या संचलन पथकाचे साक्षीदार होण्यास आम्ही सर्वजण उत्सुक आहोत. पुन्हा एकदा, मी तुमचे आणि तुमच्या प्रतिनिधी मंडळाचे भारतात हार्दिक स्वागत करतो.

खूप खूप धन्यवाद.

***

N.Chitale/S.Kane/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com