Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

‘आयुष्मान भारत’ची संख्या एक कोटी पर्यंत; लाभार्थ्याशी पंतप्रधानांनी साधला संवाद


आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या एक कोटींपर्यंत पोहचल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आनंद व्यक्त केला. या योजनेचा लाभ एक कोटी नागरिकांपर्यंत पोहोचणे, हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे, अशी भावना पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट संदेशात व्यक्त केली आहे.

“केवळ दोन वर्षांपेक्षा कमी काळात, या योजनेचा सकारात्मक परिणाम अनेकांच्या आयुष्यावर झाला आहे. या योजनेचे सर्व लाभार्थी व त्यांचे कुटुंबीय यांचे मी अभिनंदन करतो. त्यांच्या उत्तम आरोग्याचीही कामना करतो” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

आयुष्मान योजनेशी सबंधित सर्व डॉक्टर्स, परिचारिका व आरोग्य सेवक तसेच इतर सर्व लोकांनी गरजू लोकापर्यंत ही योजना पोहचवण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाचे पंतप्रधानांनी कौतुक केले. “त्यांच्याच प्रयत्नांमुळे ही योजना जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना ठरली आहे. या उप्रकमामुळे हजारो भारतीय, विशेषतः गरीब व उपेक्षित यांच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे.’ असे ते म्हणाले. आयुष्मान भारत योजनेची सर्वात मोठी उपयुक्तता म्हणजे त्याची सुवाहकता आहे, असे त्यांनी सांगितले. “लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत उत्तम दर्जाच्या आरोग्यसेवा माफक दरात मिळू शकतात. तेही केवळ त्यांनी नोंदणी केलेल्या रुग्णालयातच नाही, तर भारतात कुठेही ही सुविधा उपलब्ध असेल. त्यामुळे, लाभार्थ्यांचे घर एकीकडे व ते कामानिमित्त दुसरीकडे राहत असतील, तरीही त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.” असे पंतप्रधान म्हणाले.

सध्याची परिस्थिती बघता, आपल्याला ‘आयुष्मान भारत’च्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे शक्य नाही; मात्र, या योजनेच्या एक कोटीव्या लाभार्थी, मेघालयच्या पूजा थापा यांच्याशी आपण दूरध्वनीच्या माध्यमातून संवाद साधला आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

*****

S.Pophale/R.Aghor/P.Kor