नवी दिल्ली, 24 जुलै 2023
संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या विशेष प्रतिनिधी मामी मिझुटोरी, भारताचे जी20 शेर्पा अमिताभ कांत, जी20 चे सदस्य तसेच अतिथी देश, आंतरराष्ट्रीय संघटनांचे अधिकारी, कार्यगटाचे अध्यक्ष कमल किशोर, भारताचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था आणि गृह मंत्रालयातील सहकारी, उपस्थित महिला-पुरुषगण
आपत्ती जोखीम कपात कार्यगटाच्या तिसर्या बैठकीला तुमच्यासोबत उपस्थित राहून मला आनंद होत आहे. या वर्षी मार्चमध्ये आपण पहिल्यांदा गांधीनगरमध्ये भेटलो. तेव्हापासून जगाने काही अभूतपूर्व आपत्ती पाहिल्या आहेत. जवळजवळ संपूर्ण उत्तर गोलार्धातील शहरे अति उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात सापडली आहेत. कॅनडातील जंगलातील वणवे आणि त्यानंतरच्या धुक्यामुळे उत्तर अमेरिकेतील अनेक भागांमध्ये शहरांना झळ बसली आहे. इथे भारतात आपण आपल्या पूर्व आणि पश्चिम किनार्यावर मोठ्या चक्रीवादळांचा अनुभव घेतला आहे. दिल्लीत 45 वर्षांतील सर्वात भयंकर पूर ! आणि अजून आपल्याकडे पावसाळ्याचा हंगाम अर्ध्यावरही पोहोचलेला नाही !
मित्रांनो,
हवामान बदल-संबंधित आपत्तींचे परिणाम आता भविष्यातील राहिलेले नाहीत. त्यांचे आगमन आधीच झाले आहे. ते महाकाय आहेत. ते एकमेकांशी जोडलेले आहेत आणि त्यांचा परिणाम आपल्या या ग्रहावरील प्रत्येकावर होत आहे. आज जगासमोरील आव्हाने या कार्यगटाचे महत्त्व अधोरेखित करत आहेत. चार महिन्यांच्या अल्प कालावधीत, कार्यगटाने मोठ्या प्रमाणावर प्रगती केली आहे आणि एक गती प्राप्त केली आहे. मात्र, तरीही आपल्याला आणखी जास्त काही करण्याची आवश्यकता आहे. या कार्यगटाच्या महत्त्वाकांक्षेची सांगड जगाला भेडसावणाऱ्या समस्यांशी घातली पाहिजे. टप्प्याटप्प्याने बदल घडवून आणण्याची वेळ निघून गेली आहे आणि नवीन आपत्ती जोखमीची निर्मिती रोखण्यासाठी आणि सध्याच्या काळातील आपत्तींचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक प्रणालींमध्ये परिवर्तन घडवून आणणे आवश्यक आहे. असमान राष्ट्रीय आणि जागतिक प्रयत्नांचे अतिशय सक्रिय पद्धतीने एकीकरण करण्याची गरज आहे जेणेकरून या एकत्रित प्रयत्नांमुळे अधिक जास्त परिणाम साध्य होईल. संकुचित संस्थात्मक दृष्टीकोनातून सुरू असलेले विखुरलेल्या स्वरुपातील प्रयत्न आपल्याला चालणार नाहीत. आपण समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून काम करणारे असलो पाहिजे. जी20 ने “अर्ली वॉर्निंग आणि अर्ली अॅक्शन” यांचा समावेश पाच प्राधान्यक्रमांमध्ये केला आहे आणि आपला संपूर्ण भर त्यावर दिला आहे, ही विचारात घेण्याजोगी बाब आहे. आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी वित्तपुरवठा करण्याच्या क्षेत्रात, आपत्ती जोखीम कमी करण्याच्या सर्व पैलूंना वित्तपुरवठा करण्यासाठी सर्व स्तरांवर संरचित यंत्रणांचा आपण पाठपुरावा करत राहिले पाहिजे. गेल्या काही वर्षांत, भारतात आम्ही आपत्ती जोखीम कमी करण्याच्या पद्धती पूर्णपणे बदलल्या आहेत. आता आमच्याकडे केवळ आपत्ती प्रतिसादाच्या वित्तपुरवठ्यासाठीच नव्हे तर आपत्ती निवारण, तयारी आणि परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी पूर्वानुमान लावणारी एक यंत्रणा देखील आहे. आपण जागतिक स्तरावर अशाच प्रकारची व्यवस्था तयार करू शकतो का ? आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी उपलब्ध वित्तपुरवठ्याच्या विविध स्रोतांमध्ये अधिक समन्वय साधण्याची गरज आहे . हवामानासाठी अर्थसाहाय्य हा आपत्ती जोखीम कमी करण्यासाठीच्या अर्थसाहाय्य व्यवस्थेचा अविभाज्य भाग असला पाहिजे. आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी खाजगी क्षेत्रांकडून अर्थसाहाय्य मिळवणे हे एक आव्हान आहे, परंतु त्याशिवाय आपण आपत्ती जोखीम कमी करण्याच्या सर्व गरजांची पूर्तता करण्याच्या दिशेने फार पुढे जाऊ शकणार नाही. आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी खाजगी क्षेत्रांकडून अर्थसाहाय्य आकर्षित करण्यासाठी सरकारने कोणत्या प्रकारचे पूरक वातावरण निर्माण केले पाहिजे ? या क्षेत्रात जी -20 कशा प्रकारे चालना देऊ शकेल आणि आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी खाजगी गुंतवणूक ही केवळ कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीची एक भावना नसून कंपन्यांच्या मुख्य व्यवसायाचाच एक भाग आहे हे सुनिश्चित करू शकेल ?
आपत्ती-प्रतिरोधक पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात, जी20 देश, संयुक्त राष्ट्रे आणि इतरांच्या भागीदारीत आम्ही काही वर्षांपूर्वीच स्थापन केलेल्या आपत्ती-प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठीच्या आघाडीमुळे होणारे लाभ पाहात आहोत. लहान विकसनशील द्वीपराष्ट्रांसह विविध देश कशा प्रकारे आपल्या मानकांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि अधिक चांगल्या प्रकारे जोखिमांच्या आकलनाच्या आधारे पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जोखिमांचे चांगल्या प्रकारे मूल्यांकन आणि मोजमाप करत आहेत याची माहिती या आघाडीच्या कामातून जगाला मिळत आहे. या कल्पनांची व्याप्ती वाढवण्यासाठी आपण काम करणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्याला प्रायोगिक योजनांच्या पलीकडे विचार करावा लागेल आणि आपल्या योजनांची आखणी जास्त मोठ्या क्षेत्राच्या दृष्टीकोनातून करावी लागेल. आपत्तींनंतर ‘अधिक चांगल्या प्रकारची उभारणी’ करण्यासंदर्भात गेल्या काही वर्षांमध्ये प्रात्यक्षिक स्वरुपात खूप जास्त अनुभव मिळाला आहे. मात्र, या विषयातील चांगल्या पद्धती संस्थात्मक करण्याचे मार्ग आपल्याला शोधावे लागतील. ‘प्रतिसादासाठी सज्जते’ प्रमाणेच आर्थिक व्यवस्था, संस्थात्मक यंत्रणा आणि क्षमता यांच्या आधारे ‘पूर्वस्थितीत येण्यासाठी सज्जता’ यावर आपण भर दिला पाहिजे.
मित्रांनो,
मला हे जाणून अतिशय आनंद होत आहे की कार्यगटाने पाठपुरावा केलेल्या सर्व पाच प्राधान्यक्रमांमध्ये, फलनिष्पत्तीकारक सर्व बाबींमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. पुढील काही दिवसात तुम्ही ज्या परिपत्रकावर चर्चा करणार आहात त्याचा प्रारंभिक मसुदा मी पाहिला आहे .जी-20 देशांसाठी आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी अतिशय सुस्पष्ट आणि धोरणात्मक जाहीरनामा मांडणारा हा मसुदा आहे. गेल्या चार महिन्यांत या कार्यसमूहाच्या विचारमंथनात सामंजस्य, सहमती आणि सह – निर्मितीची भावना पुढील तीन दिवस आणि त्यानंतरही कायम राहील, अशी मला आशा आहे.
या प्रयत्नात आमच्या ज्ञान भागीदारांकडून आम्हाला सातत्याने मिळत असलेल्या पाठबळाबाबत आम्ही आभारी आहोत. या गटाच्या कार्याला पाठिंबा देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या विशेष प्रतिनिधी मामी मिझुटोरी यांच्या वैयक्तिक सहभागाची मी विशेष प्रशंसा करतो. या कार्यगटाचा जाहीरनामा तयार करण्यात जी20च्या ‘ट्रोइका’(आजी, माजी आणि भावी या तिन्ही यजमानांच्या) च्या सहभागामुळे आम्हाला अतिशय आनंद झाला आहे. इंडोनेशिया, जपान आणि मेक्सिकोसह पूर्वीच्या अध्यक्षतांकडून घातल्या गेलेल्या पायावर आम्ही याची उभारणी केली आहे आणि हे काम ब्राझील पुढे नेणार असल्याचा आम्हाला आनंद आहे. या बैठकीत ब्राझीलचे सचिव व्हॉलनी यांचे स्वागत करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. आम्ही सचिव व्हॉलनी आणि त्यांच्या टीमला आश्वासन देतो की आपण सर्व पुढे वाटचाल करत असताना आमच्याकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य असेल .
भारताच्या G –20 अध्यक्षतेच्या गेल्या आठ महिन्यांत संपूर्ण देश मोठ्या उत्साहाने सहभागी झाला आहे. आतापर्यंत देशभरात 56 ठिकाणी 177 बैठका झाल्या आहेत. विविध देशांच्या प्रतिनिधींनी या चर्चेत सक्रिय सहभाग घेतला आहे. भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक विविधतेचेही त्यांना दर्शन घडले आहे. जी20 जाहीरनाम्याच्या प्रमुख पैलूंवर बरीच प्रगती झाली आहे. मला खात्री आहे की दीड महिन्यात होणारी ही शिखर परिषदेची बैठक ऐतिहासिक ठरेल. या फलनिष्पत्तीमध्ये तुम्हा सर्वांचे मोलाचे योगदान असेल.
जगासाठी आपत्ती जोखीम कमी करण्याबाबत जी20 कडून अर्थपूर्ण फलनिष्पत्ती साध्य होईल हे सुनिश्चित करण्यासाठी तुमच्याकडून येत्या काही दिवसात होणाऱ्या विचारमंथनासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो.
S.Tupe/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai