आपणा सर्व मित्रांचे आज इथं स्वागत आहे.
आपल्या सर्वांची परवा एक जणू मोठीच परीक्षा आहे. आणि आपण सर्वजण ही परीक्षा अतिशय उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणार आहात, या परीक्षेत तुम्ही चांगले यश मिळवणार आहात, हे मला चांगलं माहिती आहे.
या प्रजासत्ताक दिनाला आणि प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी मी आपल्या सर्वांना खूप- खूप शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
आज आपण इथं जितके सहकारी म्हणून एकत्र आलो आहोत, ते पाहिल्यावर जाणवते की, जणू ‘मिनी इंडिया’चे प्रदर्शन करण्यासाठी सगळे एकत्रित जमले आहेत. खराखुरा भारत नेमका आहे तरी कसा, तर हा असा आमचा देश आहे. संपूर्ण दुनिया आपल्या माध्यमातूनच आपला भारत कसा आहे हे जाणून घेवू शकणार आहे.
एनसीसी आणि एनएसएस च्या माध्यमातून शिस्त आणि सेवा यांची एक समृद्ध परंपरा ज्यावेळी राजपथावरून सर्वांना दिसते, त्यावेळी या देशाचे कोट्यवधी युवा प्रेरणा घेतात आणि प्रोत्साहित होतात. देशाची समृद्ध कला, संस्कृती, भारताची परंपरा यांचे प्रदर्शन करणा-या चित्ररथांची शोभायात्रा ज्यावेळी आपल्या राजपथावरून निघते, त्यावेळी संपूर्ण जग ती मंत्रमुग्ध होवून पहात असते. विशेष म्हणजे आपले आदिवासी सहकारी तर आपल्या प्रदर्शनातून एक अद्भूत आणि अनोखी संस्कृती देश आणि दुनियेसमोर आणतात.
इतकी कडाक्याची थंडी असतानाही आपण सर्वजण अतिशय परिश्रम करून या शोभायात्रेत, पथसंचलनामध्ये सहभागी होता, हे खरोखरीच खूप कौतुकास्पद आहे.
यंदाच्या पथसंचलनामध्ये मी उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर देखावा सादर करणा-या सर्व कलाकारांना भेटू शकलो, त्यांचे आभार मानू शकलो, याचं मला विशेष समाधान मिळत आहे.
मित्रांनो,
आपण सर्वजण देशाची विविधता दिल्लीपर्यंत घेवून तर नक्कीच येता. दिल्लीमध्ये जी विविधता प्रजासत्ताक दिनी दिसून येते, त्यातून मिळणारा संदेशही तुम्ही आपआपल्या क्षेत्रात, राज्यांमध्ये घेवून जाता. आपण सर्व म्हणजे ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ हा विचार प्रत्यक्षात आणणारे कलाकार, प्रतिनिधी आहात.
ज्यावेळी आपण ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ याविषयी बोलतो, त्यावेळी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. खराखुरा भारत नेमका आहे कसा? भारत काय फक्त सीमेच्याआत असलेल्या 130 कोटी लोकांचे घर, इतका मर्यादित आहे? नाही!! भारत एका राष्ट्राबरोबरच एक जीवंत परंपरा आहे, भारत एक विचार आहे. एक संस्कार आहे. एक विस्तार आहे.
भारताचा अर्थ आहे – वसुधैव कुटुम्बकम्
भारताचा अर्थ आहे – सर्व पंथ समभाव
भारताचा अर्थ आहे – सत्यमेव जयते
भारताचा अर्थ आहे – अहिंसा परमो धर्मः
भारताचा अर्थ आहे – एकम् सद विप्राः बहुधाः वदन्ति सत्य. म्हणजेच सत्य तर एकच आहे. मात्र त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे.
भारताचा अर्थ आहे – वैष्णव जन तो तेने कहिये जे पीड पराई जाने रे
भारताचा अर्थ आहे – वृक्ष-लता वेलींमध्ये ईश्वराचा निवास आहे.
भारताचा अर्थ आहे – अप्प दीपो भवः म्हणजेच दुस-यांकडे अपेक्षेने पाहण्यापेक्षा आपण स्वतःच स्वप्रेरणा घेवून पुढे जायचे.
भारताचा अर्थ आहे – तेन त्यक्तेन भुन्जिथा म्हणजेच जो त्याग करतो तोच फळाची प्राप्ती करू शकतो.
भारताचा अर्थ आहे – सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः
भारताचा अर्थ आहे – जनसेवा ही प्रभू सेवा.
भारताचा अर्थ आहे – नर करनी करे तो नारायण हो जाए म्हणजेच माणसानं पुरूषार्थ दाखवला तर तो नराचा नारायण होतो.
भारताचा अर्थ आहे – नारी तू नारायणी.
भारताचा अर्थ आहे – जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी म्हणजेच माता आणि जन्मभूमी यांचे स्थान स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे, महान आहे.
भारत अशाच अनेक आदर्श आणि महान विचारांना समाविष्ट करणारी एक जीवन शक्ती आहे. ऊर्जेचा, चैतन्याचा प्रवाह आहे.
म्हणूनच ज्यावेळी भारताची एकता आणि श्रेष्ठता यांच्याविषयी चर्चा केली जाते, त्यावेळी आपल्या भौगोलिक आणि आर्थिक श्रेष्ठतेबरोबरच या आदर्शांची आणि मूल्यांची श्रेष्ठता यांचाही त्यामध्ये समावेश होत असतो.
मित्रांनो,
भारताच्या श्रेष्ठतेची आणखी एक शक्ती म्हणजे, या देशाची भौगोलिक आणि सामाजिक विविधता आहे. आमचा हा देश म्हणजे, एकप्रकारे फुलांची एक माळच अर्थात पुष्पहारच आहे. या पुष्पहारामध्ये रंगबिरंगी फूले भारतीयतेच्या धाग्यामध्ये जणू ओवण्यात, गुंफण्यात आली आहेत.
आपण कधी एकरूपतेचे नाही तर एकतेचे पक्षकार आहोत. एकतेचे सूत्र कायम स्वरूपी जीवंत ठेवणे, एकतेचे सूत्र अधिकाधिक बळकट बनवणे, याचाच आपण सर्वजण प्रयत्न करीत असतो. आणि हाच खरा एकतेचा संदेश आहे.
राज्य अनेक- राष्ट्र एक, समाज अनेक- भारत एक, पंथ अनेक- लक्ष्य एक, बोली अनेक- स्वर एक, भाषा अनेक- भाव एक, रंग अनेक- तिरंगा एक, रिवाज अनेक- संस्कार एक, कार्य अनेक- संकल्प एक, मार्ग अनेक- गाठण्यासाठी मुक्काचे स्थान एक, चेहरे अनेक- हास्य एक, याच एकतेच्या मंत्राचे स्मरण करीत हा देश पुढे पुढे जात आहे. या विचारांच्याबरोबरीनेच आपल्याला सातत्याने कार्य करीत रहायचे आहे.
मित्रांनो,
राजपथावर आपण जे प्रदर्शन करणार आहात, ते पाहून संपूर्ण दुनियेला आपल्या भारताच्या या शक्तीचे दर्शन होत असते. त्याचा वेगळाही परिणाम होत असतो. भारताची ही ‘सॉफ्ट पॉवर’ सर्वांना दिसते. त्याचा प्रचार- प्रसार होतो. त्याचबरोबर भारताच्या पर्यटन क्षेत्राला यामुळे बळकटी प्राप्त होत असते. या भावनेला आपल्या ‘यूथ एक्सचेंज’ कार्यक्रमामुळे अधिक मजबुती मिळत आहे.
मित्रांनो,
एनसीसी आणि एनएसएस च्या युवा विद्यार्थी वर्गाने यंदा क्रीडा स्पर्धांबरोबरच संकटग्रस्त काळामध्ये मदत आणि बचाव कार्यामध्येही महत्वपूर्ण भूमिका पार पाडली, असं मला सांगण्यात आलं. एनएसएस तर देशातली सर्वात मोठी रक्तदान करणारी संघटना आहेच. ‘फिट इंडिया’ या अभियानासाठी घेण्यात आलेल्या सायक्लोथॉनमध्येही आठ लाख युवकांनी सहभाग नोंदवला.
याचप्रमाणे एनसीसीच्या छात्रांनी गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त देशभरामध्ये 8 हजार किलोमीटरची स्वच्छता यात्रा काढून कौतुकास्पद काम केलं आहे. इतकंच नाही तर बिहार, केरळ, कर्नाटक, ओडिशा आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी पूर तसेच इतर संकटाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी 1 लाखापेक्षा जास्त एनसीसीच्या छात्रांनी मदत आणि बचावाचे काम केले.
ही सर्व आकडेवारी मी या इथं सांगण्याचं कारण म्हणजे, देशामध्ये ज्या इतर अनेक गोष्टी घडतात, त्याची चर्चा होते. मात्र या चांगल्या कार्याची त्यामानाने कमी चर्चा केली जाते, कौतुकही फारसं केलं जात नाही. परंतु छात्रांनी केलेले हे कार्य खरोखरीच प्रशंसनीय आहे. तुम्ही जे परिश्रम केले आणि देशासाठी जे काम केलंत ते कार्य माझ्यासाठीही खूप मोठी प्रेरणा देणारं आहे.
मित्रांनो,
यंदा आपला 71 वा प्रजासत्ताक दिवस आहे. गेली 70 वर्षे आम्ही एक भारतीय संघराज्य म्हणून संपूर्ण विश्वासमोर एक उत्तम उदाहरण ठेवले आहे.
असे असताना आपण सर्वांनी देशाच्या घटनेतील एका विशिष्ट पैलूकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. गेल्या सात दशकामध्ये या पैलूविषयी फारशी विस्ताराने कधीच चर्चा होवू शकली नाही. आपण नागरिक म्हणून आपल्या कर्तव्यांना प्राधान्य देवून ती प्रामुख्याने पार पाडली पाहिजेत. जर आपण कर्तव्ये अगदी योग्य प्रकारे पार पाडू शकलो तर आपल्याला आपल्या अधिकारांसाठी लढण्याची गरजही पडणार नाही.
आज या इथं जितके युवा सहकारी आहेत, त्या सर्वांना माझा आग्रह आहे की, राष्ट्राविषयी आपली जी कर्तव्ये आहेत, त्यांच्याविषयी जास्तीत जास्त चर्चा करावी. केवळ चर्चाच करावी असे नाही, तर आपण कर्तव्यांचे पालन करून एक आदर्श उदाहरण सर्वांसमोर ठेवावे. आपण असे प्रयत्न केले तरच ‘नव भारत’ निर्माण करू शकणार आहे.
मित्रांनो,
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी ‘माझ्या स्वप्नातला भारत’ या शीर्षकाअंतर्गत एक लेख लिहिला होता. त्यामध्ये त्यांनी लिहिले होते की, सर्वोच्च आकांक्षा ठेवणा-या कोणाही व्यक्तीला स्वतःचा विकास घडवून आणण्यासाठी जे काही हवं आहे, ते ते सर्व काही या भारतामध्ये मिळू शकते.
आपण सर्वजण गांधीजींच्या या स्वप्नाचे, त्यांच्या भावनेचे भागीदार आहात. आपण ज्या नव भारताची चर्चा करीत पुढे जात आहे, त्या आकांक्षांची, स्वप्नांची या वाटचालीत, या मार्गावरच पूर्तता होवू शकणार आहे. भारतामधली कोणीही व्यक्ती, कोणतेही क्षेत्र मागे पडू नये, याची आपण दक्षता घेतली पाहिजे. प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनाच्यामागेही हेच ध्येय आहे.
मित्रांनो,
आपण सर्वांनी राष्ट्राच्या सामूहिक संकल्पांबरोबर स्वतःलाही जोडलं पाहिजे. देशाच्या प्रत्येक नागरिकाचे जीवन अधिकाधिक सुकर, सुलभ बनवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. आपल्यापैकी अनेक सहकारी, काही कालावधीनंतर परीक्षेला बसणार आहेत. हा काळ आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा आहे.
आपल्या सर्वांना आगामी परीक्षांसाठी मी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनामध्ये आपण सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करावे, अशी भावना व्यक्त करतो.
आपण सर्वजण मला भेटण्यासाठी इथं आलात, त्याबद्दल सर्वांचे खूप-खूप आभार.
धन्यवाद !!
B.Gokhale/S.Bedekar /P.Kor
यहां आप जितने भी साथी एकत्र हुए हैं, आप एक प्रकार से Mini India- New India को showcase करने वाले लोग हैं। भारत असल में क्या है, ये हमारा देश और पूरी दुनिया आपके माध्यम से समझती है: PM @narendramodi pic.twitter.com/SAIzXmDvKT
— PMO India (@PMOIndia) January 24, 2020
NCC और NSS के माध्यम से अनुशासन और सेवा की एक समृद्ध परंपरा जब राजपथ पर दिखती है, तो देश के करोड़ों युवा प्रेरित और प्रोत्साहित होते हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 24, 2020
जब हम एक भारत, श्रेष्ठ भारत की बात करते हैं, तो हमें ये भी याद रखना है कि भारत असल में है क्या। भारत क्या सिर्फ सरहदों के भीतर 130 करोड़ लोगों का घर भर ही है? नहीं, भारत एक राष्ट्र के साथ-साथ एक जीवंत परंपरा है, एक विचार है, एक संस्कार है, एक विस्तार है: PM @narendramodi pic.twitter.com/bEZeiIZrsH
— PMO India (@PMOIndia) January 24, 2020
भारत की श्रेष्ठता की एक और शक्ति इसकी भौगोलिक और सामाजिक विविधता में ही है। हमारा ये देश एक प्रकार से फूलों की माला है, जहां रंग-बिरंगे फूल भारतीयता के धागे से पिरोए गए हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 24, 2020
राजपथ पर आपके प्रदर्शन से पूरी दुनिया भारत की इस शक्ति के भी दर्शन करती है। इसका असर भारत की ‘सॉफ्ट पावर’ के प्रचार-प्रसार में भी होता है और भारत के टूरिज्म सेक्टर को भी इससे मजबूती मिलती है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 24, 2020
यहां जितने भी युवा साथी आए हैं, मेरा आपसे आग्रह रहेगा कि राष्ट्र के प्रति अपने कर्तव्यों की ज्यादा से ज्यादा चर्चा करें। चर्चा ही नहीं, बल्कि खुद अमल करके, उदाहरण पेश करें। हमारे ऐसे ही प्रयास न्यू इंडिया का निर्माण करेंगे: PM @narendramodi pic.twitter.com/rvxAfggq1W
— PMO India (@PMOIndia) January 24, 2020
हम जिस न्यू इंडिया की तरफ आगे बढ़ रहे हैं, वहां यही आकांक्षाएं, यही सपने हमें पूरे करने हैं। भारत का कोई भी व्यक्ति, कोई भी क्षेत्र पीछे ना रह जाए, ये हमें सुनिश्चित करना है। गणतंत्र दिवस की परेड के पीछे भी यही ध्येय है: PM @narendramodi pic.twitter.com/lmzBmOJoVT
— PMO India (@PMOIndia) January 24, 2020