Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ कार्यक्रमामध्ये लाभार्थी आणि इतर हितसंबंधीयांशी संवाद साधल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ कार्यक्रमामध्ये लाभार्थी आणि इतर हितसंबंधीयांशी संवाद साधल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण


 

आत्मनिर्भर भारताचे सपन, स्वयंपूर्ण गोवा येव-जणे-तल्येन, साकार करपी गोयकारांक येवकार। तुमच्या.सारख्याए धड.पड.करपी, लोकांक लागून, गोंय राज्याचो गरजो, गोयांतच भागपाक सुरू जाल्यात, ही खोशयेची गजाल आसा।

ज्यावेळी सरकारची मदत आणि  जनतेचे परिश्रम एकत्रितपणे काम करतात, त्यावेळी कशा पद्धतीने परिवर्तन घडून येते, आत्मविश्वास कसा दुणावतो, याचा आपण सर्वांनी स्वयंपूर्ण गोव्याच्या लाभार्थींबरोबर चर्चा करताना अनुभव घेतला. गोव्यामध्ये आलेल्या या सार्थक परिवर्तनाचा मार्ग दाखविणारे लोकप्रिय आणि ऊर्जावान मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे वरिष्ठ सहयोगी श्रीपाद नाईक, गोव्याचे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर, उपमुख्यमंत्री चंद्रकांत केवलेकर, राज्य सरकारमधले इतर मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक संस्थांचे सर्व प्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सदस्य, इतर लोकप्रतिनिधी आणि माझ्या प्रिय गोव्याच्या  बंधू आणि भगिनींनो!!

असे म्हणतात की, गोवा म्हणजे आनंद, गोवा म्हणचे निसर्ग, गोवा म्हणजे पर्यटन, मात्र आज मी असेही म्हणेन – गोवा म्हणजे विकासाचे नवीन मॉडेल! गोवा म्हणजे सामूहिक प्रयत्नांचे प्रतिबिंब. गोवा म्हणजे पंचायतीपासून ते प्रशासनापर्यंत विकासासाठी असलेली एकजूटता!

 

मित्रांनो,

गेल्या काही वर्षांमध्ये देशाने अभावाच्या स्थितीतून बाहेर पडून आवश्यकता-आकांक्षांची पूर्तता करण्याचे आपले ध्येय बनवले आहे. ज्या मूलभूत सुविधांपासून देशातले नागरिक दशकांपासून वंचित होते, त्या सर्व सुविधा देशवासियांना मिळाव्यात यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. यंदाच्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी मी लाल किल्ल्यावरून भाषण देताना सांगितले होते की, आपल्याला आता या योजना सॅच्युरेशनम्हणजेच अगदी शंभर टक्के लक्ष्यपूर्तीपर्यंत न्यायच्या आहेत. या ध्येयाच्या पूर्तीमध्ये प्रमोद सावंत आणि त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली गोवा अग्रणी भूमिका बजावत आहे.  खुल्या जागेत शौच करण्याच्या पद्धतीमधून भारताला मुक्त करण्याचे लक्ष्य निश्चित केले गेले. गोव्याने हे लक्ष्य अगदी शंभर टक्के गाठले. देशाने प्रत्येक घरामध्ये विजेची जोडणी देण्याचे लक्ष्य निश्चित केले. हे लक्ष्यही गोवा राज्याने पूर्ण केले. प्रत्येक घरामध्ये नळाव्दारे पाणी अभियान सुरू केल्यानंतर गोव्याने सर्वात प्रथम हे काम पूर्ण केले. गरीबांना मोफत अन्नधान्य देण्याच्या कामातही गोव्यामध्ये शंभर टक्के काम करण्यात आले आहे.

 

मित्रांनो,

दोनच दिवसांपूर्वी भारताने लसीच्या 100 कोटी मात्रा देण्याचा एक विराट- विक्रमी, महत्वपूर्ण टप्पा पार केला आहे. यामध्येही गोवा आघाडीवर असून गोव्यातल्या सर्व पात्र म्हणजे अगदी 100 टक्के  लोकांना लसीची पहिली मात्रा देऊन झाली आहे. आता लसीची दुसरी मात्रा  सर्वांनी घ्यावी, हे लक्ष्य शंभर टक्के साध्य करण्यासाठी गोवा आपली शक्ती वापरत आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

महिलांच्या सुविधेसाठी आणि त्यांच्या सन्मानासाठी केंद्र सरकारने ज्या योजना बनविल्या आहेत, त्या सर्व योजनांचे कार्य गोव्याच्या भूमीमध्ये यशस्वीपणे पार पाडण्यात आले आहे, इतकेच नाही तर या कामांचा विस्तारही करण्यात येत आहे. या गोष्टीचा मला आनंद होत आहे. मग यामध्ये शौचालयांचे बांधकाम असो, उज्ज्वला गॅस जोडणी असो किंवा मग बँकेमध्ये जन-धन खाती उघडणे असो, गोव्यामध्ये महिलांसाठी आवश्यक सुविधा देण्याचे काम खूप चांगले झाले आहे. या कारणामुळेच कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये हजारो भगिनींना मोफत गॅस सिलेंडर मिळू शकले होते. तसेच त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसेही जमा होवू शकले. घराघरामध्ये आता नळाव्दारे पाणी पोहोचवून गोवा सरकारने भगिनीवर्गाला मोठीच सुविधा करून दिली आहे. आता गोवा सरकार, गृह आधार आणि दीनदयाल विशेष सामाजिक सुरक्षा यासारख्या योजनांच्या माध्यमातून गोव्यातल्या भगिनींचे जीवन आणखी चांगले बनविण्याचे काम करीत आहे.  

 

बंधू आणि भगिनींनो,

ज्यावेळी कठीण-अवघड काळ असतो, ज्यावेळी आव्हाने समोर असतातत्याचवेळी आपल्याकडे खरे किती सामर्थ्य आहे, ही गोष्ट समजते. गेल्या दीड-दोन वर्षांमध्ये गोव्यासमोर शंभर वर्षातून आलेले सर्वात मोठे महामारीचे संकट आले. गोव्याने भीषण चक्रीवादळाचा सामना केला, महापूराचा प्रकोपही झेलला. या आपत्तींमुळे गोव्याच्या पर्यटन क्षेत्रापुढे किती संकटे आली असतील, याची जाणीव मला आहे. मात्र अशी आव्हाने सामोरी आली असतानाही, गोव्याचे सरकार केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे दुप्पट ताकदीने गोव्यातल्या लोकांना मदत करण्यासाठी कार्यरत आहे. आम्ही गोव्यामध्ये विकास कार्य थांबवू दिली नाहीत. प्रमोद सावंत  आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मी अभिनंदन करू इच्छितो. या सर्वांनी मिळून स्वयंपूर्ण गोवा अभियानाला गोव्याच्या विकासाचा आधार बनविले आहे. आता या अभियानाला अधिक वेगवान करण्यासाठी सरकार तुमच्या दारीया योजनेचे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.

 

मित्रांनो,

ही गोष्‍ट म्हणजे प्रो पीपल, प्रोअॅक्टिव्ह गव्हर्नन्सच्या भावनेचा विस्तार आहे. गेल्या सात वर्षांपासून देश या संकल्पनेनुसार पुढे जात आहे. अशाप्रकारे जिथे प्रशासन कार्य केले जाते, तिथे सरकार स्वतःहून नागरिकांकडे जाते आणि त्यांच्या समस्यांवर तोडगा काढते. गोव्याने तर गावपातळीवर, पंचायत स्तरावर, जिल्हा स्तरावर एक चांगले मॉडेल विकसित केले आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, ज्या प्रकारे केंद्राच्या अनेक अभियानांमध्ये आत्तापर्यंत गोव्याने आपले शंभर टक्के योगदान दिले आहे, आणि त्या योजना यशस्वी केल्या आहेत, तसेच इतर लक्ष्यही सर्वांच्या प्रयत्नांमधून तुम्ही लवकरच पूर्ण करणार आहात, असा मला ठाम विश्वास आहे.

 

मित्रांनो,

मी गोव्याविषयी बोलावे आणि फुटबॉलविषयी बोलायचं नाही, असे होऊच  शकत नाही. फुटबॉलविषयीचे गोवेकरांचे प्रेम खूप काही वेगळेच आहे. फुटबॉलची गोव्यात असलेली क्रेझअगदी वेगळीच आहे. फुटबॉलमध्ये मग डिफेन्सअसो अथवा फॉरवर्डसर्व काही गोलशी निगडित असते.  कुणाला गोल करण्यापासून वाचवायचं आहे तर कुणाला गोल करायचा आहे. आपआपला गोल साधून घेण्याचीही भावना गोव्यामध्ये कधीच कमी नाही. मात्र आधी जी सरकारे होती, त्यांच्यामध्ये संघभावनेचा, एक सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा अभाव होता. दीर्घकाळापर्यंत गोव्यामध्ये राजकीय स्वार्थ हा सुशासनावर भारी पडत होता. गोव्यातल्या संमजस लोकांनी इथली राजकीय अस्थिरता संपुष्टात आणून स्थिरता आणली आहे. माझे मित्र स्वर्गीय मनोहर पर्रिकर जी यांनी गोव्यामध्ये जो वेगवान विकास घडवून आणला, गोव्याला ज्या विश्वासाने विकासाच्या आघाडीवर वेगाने नेले, तेच कार्य प्रमोद जी आणि त्यांची टीम संपूर्ण इमानदारीने करीत असल्याने नवीन विक्रम प्रस्थापित होत आहे. आज गोवा नव्या आत्मविश्वासाने पुढे जात आहे. टीम गोव्याच्या या नवीन टीम स्पिरीटचा परिणाम म्हणजे स्वयंपूर्ण गोव्याचा संकल्प आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

गोव्याकडे एक अतिशय समृद्ध ग्रामीण संपदाही आहे. आणि एक आकर्षक नागरी जीवनही आहे. गोव्याकडे शेत-शिवारही आहे आणि नील अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या असंख्य संधीही आहेत. आत्मनिर्भर भारताच्या निर्माणासाठी जे काही आवश्यक-गरजेचे आहे, ते सर्व काही गोव्याकडे आहे. म्हणूनच गोव्याचा संपूर्ण विकास करण्‍यासाठी  हे डबल इंजिनचे सरकार त्याला प्राधान्य देत आहे.

 

मित्रहो,

डबल इंजिन सरकार गोव्याच्या ग्रामीण शहरी आणि समुद्र किनाऱ्याशी  निगडीत पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष पुरवत आहे.

गोव्याचा दुसरा विमानतळ असो, वाहतूक केंद्र म्हणजे लॉजिस्टिक हब असो, भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा केबल ब्रिज असो किंवा हजारो कोटी रुपये खर्चून तयार केलेला नॅशनल हायवे असो या सगळ्यांमुळे गोव्याच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीला नवीन दिशा मिळणार आहेत‌.

 

बंधू-भगिनींनो,

गोव्यात विकसित होत असलेल्या पायाभूत सुविधा या शेतकरी, पशुपालक आणि आमच्या मच्छिमार बांधवांची कमाई वाढण्यासाठी उपयुक्त ठरतील. ग्रामीण पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी यावर्षी गोव्याला देण्यात येणाऱ्या निधीत पाचपट वाढ करण्यात आली आहे.

ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र सरकारने 500 करोड कोटी रुपये गोव्यासाठी मंजूर केले आहेत. त्यामुळे कृषी आणि पशुपालन क्षेत्रात गोव्यामध्ये जे काम होत आहे त्याला वेग येईल.

 

बंधू-भगिनींनो,

शेतकरी आणि मच्छीमारांना बँकेशी तसंच बाजारपेठेशी जोडण्यासाठी ज्या ज्या योजना केंद्र सरकारने आखल्या आहेत त्या लोकांपर्यंत पोचण्यावर गोवा सरकार काम करत आहे. गोव्यामध्ये छोट्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. मग ते फळे ,भाज्या विकणारे असोत वा मासेमारीच्या व्यवसायातील असोत. या छोट्या शेतकऱ्यांना, पशुपालन करणाऱ्यांना किंवा मच्छिमारांना बँकेकडून कर्ज मिळवणे म्हणजे एक मोठेच आव्हान होते. त्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन किसान क्रेडिट कार्ड या योजनेचा विस्तार केला गेला आहे.

छोट्या शेतकऱ्यांना तत्परतेने किसान क्रेडिट कार्ड दिले जात आहे तर दुसरीकडे पशुपालन करणाऱ्यांना तसेच मच्छिमारांना यात प्रथमच सामावून घेतले गेले आहे.गोव्यासुद्धा अगदी थोड्या काळात शेकडो नवीन किसान क्रेडिट कार्ड दिली गेली आहेत आणि करोडो रुपयांची मदत हे दिली गेली आहे. पंतप्रधान शेतकरी सम्मान निधीची  गोव्यातल्या शेतकऱ्यांना खूप मदत झाली आहे. अशाच प्रयत्नांमुळे अनेक नवीन साथीदार सुद्धा शेतीकडे वळले आहेत. एका वर्षातच गोव्यामध्ये फळांचे आणि  भाज्यांचे उत्पादन जवळपास 40 टक्‍क्‍यांनी वाढले. दूध उत्पादनाच्या  प्रमाणातही  चाळीस टक्‍क्‍यांहूनअधिक  वाढ झाली  आहे.

 

मित्रहो,

अन्न प्रक्रिया केंद्र ही स्वावलंबी गोव्याची मोठी ताकत बनणार आहे. विशेषतः मत्स्य प्रक्रिया या क्षेत्रात गोवा भारताची ताकद बनवू शकतो. भारत खूप वर्षांपूर्वीपासून मासे निर्यात करत आला आहे.भारतातील मासे पूर्व आशियाई देशांमध्ये प्रक्रिया झाल्यानंतर जगभरातील बाजारामध्ये पोचतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी मत्स्य उत्पादन क्षेत्राला पहिल्यांदाच मोठ्या स्तरावर मदत दिली जात आहे. माशांचचा व्यापार किंवा व्यवहारांसाठी विशेष मंत्रालय ते मच्छीमारांच्या होड्यांचे आधुनिकीकरण अशा प्रत्येक स्तरावर प्रोत्साहन दिलं जात आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा या योजनेअंतर्गत गोव्यातील मच्छिमारांना खूप मदत मिळत आहे.

 

मित्रहो,

गोव्याचे पर्यावरण आणि गोव्याचा पर्यटन या दोन्हीचा विकास भारताच्या विकासाशी थेट जोडलेला आहे. गोवा हे भारताच्या पर्यटन क्षेत्राचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. वेगाने वाढणाऱ्या भारताच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन आणि अतिथी क्षेत्राचा वाटा सातत्याने वाढत आहे. साहजिकच यात गोव्याचा वाटा खूप मोठा आहे . गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटन आणि अतिथी क्षेत्रांना वेग देण्याच्या दृष्टीने प्रत्येक प्रकारे मदत दिली जात आहे. विजा ऑन अरायवल ही सुविधा व्यापक प्रमाणावर राबवली जात आहे. कनेक्टिविटीशिवाय पर्यटनाशी संलग्न पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र सरकारने गोव्याला करोडो रुपयांची मदत दिली आहे.

 

मित्रहो,

भारतातील लसीकरण मोहिमेतसुद्धा गोव्या सह पर्यटनाचे केंद्र असलेल्या राज्यांना विशेष प्रोत्साहन दिले गेले. यामध्ये गोव्यालाही मोठा फायदा मिळाला. गोव्याने दिवस-रात्र प्रयत्न करून राज्यातल्या सर्व पात्र लोकांना लसींची पहिली मात्रा दिली. इतर राज्यांनीही विशेष प्रोत्साहन दिले. आता आपल्या देशानेही लसीकरणाचा 100 कोटींचा आकडा ओलांडला आहे . यामुळे देशवासियांचा, पर्यटकांचा विश्वास वाढला आहे.

आता आपण दिवाळी ख्रिसमस आणि नववर्षाच्या तयारीत गुंतलेला आहात. अशावेळी सणांच्या आणि सुट्ट्यांच्या या या मोसमात गोव्यातील पर्यटन क्षेत्रात नवीन उर्जा दिसायला लागणार आहे. गोव्यात स्वदेशी आणि विदेशी दोन्ही पर्यटकाची हालचाल नक्कीच वाढणार आहे. गोव्याच्या पर्यटन उद्योगासाठी हे शुभकारक आहे.

 

बंधू-भगिनींनो,

जेव्हा गोवा विकासाच्या प्रत्येक शक्यतेचा शंभर टक्के उपयोग करेल तेव्हाच गोवा स्वयंपूर्ण बनेल. स्वयंपूर्ण गोवा म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या आकांक्षा आणि अपेक्षांना प्रत्यक्षात आणण्याचा संकल्प आहे स्वयंपूर्ण गोवा म्हणजे माता-भगिनी आणि लेकींच्‍या आरोग्य सुविधा सुरक्षा आणि सन्मानाची खात्री आहे.

स्वयंपूर्ण गोव्यात तरुणांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी आहेत, गोव्याच्या समृद्ध भविष्याची झलक आहे. हा केवळ पाच महिन्याचा किंवा पाच वर्षांचा कार्यक्रम नाही , तर येत्या पंचवीस वर्षांसाठी आखलेल्या दूरदर्शीपणाचा पहिला टप्पा आहे. या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी गोव्यातील प्रत्येकाने आपल्याला याच्याशी जोडून घेतले पाहिजे. म्हणून गोव्याला डबल इंजिन विकासासाठी सातत्य आवश्यक आहे

गोव्याला सध्या आहे तसे स्पष्ट धोरण हवे आहे. आतासारखे स्थिर सरकार हवे आहे. आणि आता आहे तसे ऊर्जावान नेतृत्व हवे आहे. संपूर्ण गोव्यातून मिळालेल्या प्रचंड आशीर्वादाने आम्ही स्वयंपूर्ण गोवा हा संकल्प पूर्ण करू या विश्वासासौबतच आपल्याला खूप खूप शुभेच्छा.

खूप खूप धन्यवाद!

***

Jaydevi PS/R.Aghor/S.BedekarV.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com