Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आग्रा मेट्रो प्रकल्पाच्या बांधकामाचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ

आग्रा मेट्रो प्रकल्पाच्या बांधकामाचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील आग्रा मेट्रो प्रकल्पाच्या बांधकामाचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रारंभ केला. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी कामकाज मंत्री हरदीप सिंह पुरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.

देशाच्या पायाभूत क्षेत्रात नवे प्रकल्प जाहीर करण्यात आले मात्र यासाठी निधी कसा येईल यावर जास्त लक्ष पुरवण्यात आले नाही, या महत्वाच्या समस्येकडे पंतप्रधानांनी यावेळी लक्ष वेधले. आपल्या सरकारने, नवे प्रकल्प सुरु करतानाच त्यासाठी आवश्यक निधी सुनिश्चित केल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान म्हणाले, नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन प्रकल्पा अंतर्गत 100 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च करण्यात येईल. मल्टीमोडल कनेक्टीव्हिटी  इन्फ्रास्ट्रक्चर मास्टर प्लान संदर्भातही काम सुरु असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. देशाच्या पायाभूत सुविधा उंचावण्यासाठी जगभरातून गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले.

पर्यटन क्षेत्र म्हणजे प्रत्येकासाठी उदरनिर्वाह पुरवण्याचे साधन असलेले क्षेत्र असून, सरकारने  ई- व्हिसा योजने अंतर्गत असलेल्या देशांची संख्या वाढवण्या बरोबरच हॉटेलमधील खोल्यांवर आकारल्या जाणाऱ्या करात लक्षणीय  कपात केल्याची माहिती त्यांनी दिली. स्वदेश दर्शन आणि प्रसाद यासारख्या योजनाद्वारे पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न  करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. सरकारच्या प्रयत्नांमुळे प्रवास आणि पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांकात भारत आता 34 व्या स्थानावर आहे. 2013 मध्ये भारत या  निर्देशांकात 65 व्या स्थानी होता. कोरोना संदर्भातली परिस्थिती आता सुधारू लागल्याने पर्यटन क्षेत्राची पूर्वीची झळाळी परत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान म्हणाले, आता सुधारणा या तुकड्या-तुकड्याने न करता सर्वसमावेशी पद्धतीने करण्यात येत आहेत. शहरांच्या विकासासाठी 4 स्तरावर काम सुरु आहे- दीर्घकालीन समस्यांचे निराकरण, जीवनमान सुकर करणे, जास्तीत जास्त गुंतवणूक, आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक उपयोग. बांधकाम व्यावसायिक आणि गृह खरेदीदार यांच्यामध्ये विश्वासाची दरी होती. चुकीचा हेतु बाळगणाऱ्या काही लोकांमुळे संपूर्ण रिअल इस्टेट क्षेत्राची बदनामी झाली, मध्यमवर्गाला ते त्रासदायक ठरले. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रेरा कायदा आणण्यात आला. हा कायदा आल्यानंतर मध्यम वर्गासाठीची घरे झपाट्याने पूर्ण होऊ लागल्याचे नुकत्याच काही अहवालातून दिसून आले आहे. शहरी जीवन सुकर व्हावे यासाठी आधुनिक सार्वजनिक वाहतूक ते गृह निर्माणापर्यंत चोहोबाजूंनी विकास सुरु असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान आवास योजनेची सुरुवात आग्रा येथून झाली होती आणि या योजने अंतर्गत शहरी गरिबांसाठी 1 कोटी पेक्षा जास्त घरांना मंजुरी देण्यात आली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. शहरी मध्यम वर्गासाठी पहिल्यांदा घर घेण्यासाठी सहाय्य पुरवण्यात येत आहे. आतापर्यंत 12 लाखांहून अधिक शहरी मध्यम वर्ग कुटुंबांना घर खरेदीसाठी सुमारे 28000 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. अमृत अभियानांतर्गत अनेक शहरात पाणी, गटारे यासारख्या इतर सुविधा सुधारण्यात  येत आहेत. सार्वजनिक स्वच्छतागृहे सुधारण्यासाठी आणि कचरा व्यवस्थापनासाठीच्या आधुनिक प्रणाली राबवण्यासाठी स्थानिक यंत्रणांना सहाय्य देण्यात येत आहे.

2014 नंतर 450 किमी मेट्रो मार्ग कार्यान्वित झाला, तर यापूर्वीच्या काळात केवळ 225 किमी मार्ग कार्यान्वित होत असे. 1000 किमी लांबीच्या मेट्रो मार्गासाठी जलदगतीने काम सुरु असल्याचे ते म्हणाले.  देशाच्या 27 शहरांमध्ये हे काम सुरु आहे.

आग्रा मेट्रो प्रकल्पात एकूण 29.4 किमी लांबीचे दोन कॉरिडॉर आहेत आणि ते ताजमहाल, आग्रा किल्ला, सिकंद्रा यासारख्या प्रमुख पर्यटन स्थळांना रेल्वे स्थानक आणि बसस्थानकांशी जोडतात. या प्रकल्पामुळे आग्रा शहराच्या 26 लाख जनतेला फायदा होईल तसेच या शहराला दरवर्षी भेट देणाऱ्या 60 लाखाहून अधिक पर्यटकांनाही त्याचा लाभ होईल. ऐतिहासिक आग्रा शहराला पर्यावरण अनुकूल जलद वाहतूक प्रणाली प्रदान करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठीचा प्रस्तावित खर्च 8,379.62 कोटी रुपये असून हा प्रकल्प 5 वर्षात पूर्ण होईल.

याआधी, 8 मार्च 2019 ला पंतप्रधानांनी सीसीएस विमानतळ ते मुन्शीपुलियापर्यंत संपूर्ण 23 किमी लांबीच्या उत्तर-दक्षिण कॉरिडॉरवर लखनौ मेट्रोचे व्यावसायिक परिचालन सुरू करण्याबरोबरच आग्रा मेट्रो प्रकल्पाचे उद्‌घाटन केले होते.

***

S.Thakur/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com