वर्तमान गादीपति- पूज्य कंचन माता व्यवस्थापक- पूज्य गिरीश आपा पौषच्या पवित्र महिन्यात आज आपण सगळे आई श्री सोनल मातेच्या जन्मशताब्दी सोहळ्याला उपस्थित आहोत. आई श्री सोनल मातेच्या आशीर्वादामुळेच मला या पवित्र सोहळ्याच्या आयोजनात सहभागी होण्याचे सौभाग्य लाभले आहे. मी संपूर्ण चारण समाजाचे, सर्व व्यवस्थापकांचे आणि सोनल मातेच्या सर्व भक्तांचे अभिनंदन करतो. मधडा धाम हे चारण समाजासाठी श्रद्धेचे केंद्र आहे , शक्तीचे केंद्र आहे , संस्कार आणि परंपरांचे केंद्र आहे. श्री सोनल मातेच्या चरणी मी विनम्र अभिवादन करतो.
माझ्या कुटुंबियांनो,
जन्मशताब्दीच्या या तीन दिवसीय महोत्सवात आई श्री सोनल मातेच्या आठवणी आपल्यासोबत आहेत. भगवती स्वरूपा सोनल माता या गोष्टीचे मूर्तिमंत उदाहरण आहे की भारताच्या भूमीत कोणत्याही युगात अवतारी आत्मा नाही असे होत नाही. गुजरात आणि सौराष्ट्रची ही भूमी विशेषत: महान संत आणि विभूतींची भूमी आहे. या प्रदेशात अनेक संत आणि महापुरुषांनी संपूर्ण मानवतेसाठी आपला प्रकाश सर्वदूर पसरवला आहे. पवित्र गिरनार तर साक्षात भगवान दत्तात्रेय आणि असंख्य संतांचे स्थान आहे. सौराष्ट्रच्या या सनातन संत परंपरेत श्री सोनल माता आधुनिक युगासाठी दीपस्तंभ प्रमाणे होत्या. त्यांची आध्यात्मिक ऊर्जा, त्यांची मानवतावादी शिकवण, त्यांची तपश्चर्या, या सर्वांमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक अद्भुत दैवी आकर्षण निर्माण व्हायचे. जुनागढ आणि मधडाच्या सोनल धाममध्ये आजही त्याचा प्रत्यय येतो.
बंधू आणि भगिनींनो,
सोनल मातेचे संपूर्ण जीवन लोककल्याण, देशसेवा आणि धर्माच्या सेवेसाठी समर्पित होते. त्यांनी भगत बापू, विनोबा भावे, रविशंकर महाराज, कानभाई लहरी, कल्याणशेठ अशा दिग्गज लोकांसोबत काम केले. चारण समाजातील विद्वानांमध्ये त्यांचे विशेष स्थान असायचे. अनेक तरुणांना त्यांनी दिशा दाखवून त्यांचे आयुष्य बदलले. समाजात शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी अद्भूत कार्य केले. सोनल माँ यांनी समाजाला व्यसनाधीनता आणि नशेच्या अंधःकारातून बाहेर काढून नवा प्रकाश दिला. समाजाला वाईट प्रथांपासून वाचवण्यासाठी सोनल माँ निरंतर काम करत राहिल्या. त्यांनी कच्छच्या वोवार गावातून एक मोठी प्रतिज्ञा मोहीम सुरू केली होती. त्यांनी कठोर परिश्रम करून प्रत्येकाला स्वावलंबी व्हायला शिकवले. पशुधनांप्रति त्यांचे तेवढेच प्रेम होते. पशुधनाच्या रक्षणासाठी त्या नेहमीच प्रत्येक क्षेत्रात आग्रही असायच्या.
मित्रहो,
आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यासोबतच सोनल माँ या देशाच्या एकता आणि अखंडतेच्या खंबीर समर्थक होत्या. भारताच्या फाळणीच्या वेळी जुनागडला तोडण्याचे कारस्थान सुरू होते, तेव्हा सोनल माँ चंडीप्रमाणे त्यांच्या विरोधात उभी राहिल्या .
माझ्या कुटुंबियांनो,
आई श्री सोनल माता देशासाठी, चारण समाजासाठी माता सरस्वतीच्या सर्व उपासकांसाठी महान योगदानाचे महान प्रतीक आहेत. आपल्या धर्मग्रंथातही या समाजाला विशेष स्थान आणि आदर दिलेला आहे. भागवत पुराण सारख्या ग्रंथात चारण समाज हा थेट श्री हरीचे वंशज असल्याचे म्हटले आहे. माता सरस्वतीचाही या समाजावर विशेष आशीर्वाद राहिला आहे. त्यामुळेच या समाजात एकाहून एक विद्वानांची परंपरा अविरत सुरू आहे. पूज्य थारण बापू, पूज्य इसर दास जी, पिंगलशी बापू, पूज्य काग बापू, मेरुभा बापू, शंकरदान बापू, शंभूदान जी, भजनिक नारनस्वामी, हेमुभाई गढवी, पद्मश्री कवी दाद आणि पद्मश्री भिखुदान गढवी अशा अनेक व्यक्तिमत्त्वांनी चारण समाजाची विचारधारा समृद्ध केली आहे.
विशाल चारण साहित्य आजही या महान परंपरेचा पुरावा आहे. देशभक्तीपर गीते असोत वा आध्यात्मिक उपदेश असो, चारण साहित्याने शतकानुशतके यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. श्री सोनल माँ यांची ओजस्वी वाणी हे याचे एक खूप मोठे उदाहरण आहे. त्यांनी कधीही पारंपरिक पद्धतीने शिक्षण घेतले नाही. मात्र संस्कृत भाषेवरही त्यांचे कमालीचे प्रभुत्व होते. त्यांना शास्त्रांचे सखोल ज्ञान होते. त्यांच्या तोंडून ज्यांनी कुणी रामायणाची गोड कथा ऐकली आहे ते कधीही विसरू शकत नाही. 22 जानेवारी रोजी अयोध्येतील श्री राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होणार आहे , त्याबाबत श्री सोनल माँ यांना किती आनंद झाला असेल याची आपण सर्वजण कल्पना करू शकतो. आज या निमित्ताने मी तुम्हा सर्वांना 22 जानेवारीला प्रत्येक घराघरात श्री राम ज्योती प्रज्वलित करण्याचे आवाहन करतो. कालपासून आपण आपल्या मंदिरांमध्ये स्वच्छतेसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. या दिशेनेही आपल्याला एकत्र काम करावे लागेल. मला विश्वास आहे, आपल्या या प्रयत्नामुळे श्री सोनल माँ यांचा आनंद अनेक पटींनी वाढेल.
मित्रहो,
आज जेव्हा भारत विकसित होण्याच्या लक्ष्याच्या दिशेने, आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने काम करत आहे, तेव्हा आई श्री सोनल माँची प्रेरणा आपल्याला नवीन ऊर्जा देत आहे . ही उद्दिष्टे साध्य करण्यात चारण समाजाचीही मोठी भूमिका आहे. सोनल माँ यांनी दिलेले 51 आदेश हे चारण समाजासाठी दिशादर्शक आणि पथदर्शक आहेत. चारण समाजाने हे लक्षात ठेवावेत आणि समाजात जागृती निर्माण करण्याचे काम निरंतर सुरू ठेवायला हवे. मला सांगण्यात आले आहे की, सामाजिक सलोखा मजबूत करण्यासाठी मधडा धाममध्ये सदाव्रतचा अखंड यज्ञही सुरू आहे. या प्रयत्नाचेही मला कौतुक वाटते. मला विश्वास आहे की, मधडा धाम यापुढेही राष्ट्र उभारणीच्या अशा असंख्य अनुष्ठानांना गती देत राहील. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना श्री सोनल माँ जन्मशताब्दी महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा.
त्यासोबतच, तुम्हा सर्वांना खूप-खूप धन्यवाद!
****
MI/Sushama K/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
My message for birth centenary celebrations of Aai Shree Sonal Ma in Junagadh. https://t.co/mrbCOGkx73
— Narendra Modi (@narendramodi) January 13, 2024