नवी दिल्ली, 4 जुलै 2023
साईराम, आंध्र प्रदेशचे राज्यपाल अब्दुल नजीर जी , सत्य साई सेंट्रल ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त आर. जे. रत्नाकर जी , के. चक्रवर्ती जी , माझे खूप जुने मित्र र्-यूको हीरा जी, डॉ. व्ही. मोहन, एम.एस. नागानंद जी , निमिष पंड्या जी, इतर सर्व मान्यवर,महोदया आणि महोदय , तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा साईराम
पुट्टपर्थीला जाण्याचे भाग्य मला अनेकदा लाभले आहे. या वेळीही मी तुम्हा सर्वांमध्ये यावे, तुम्हाला भेटावे, तेथे उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाचा भाग व्हावे, अशी माझी खूप इच्छा होती. पण माझ्या व्यस्त वेळापत्रकामुळे मी उपस्थित राहू शकलो नाही.आता मला निमंत्रण देताना बंधू रत्नाकरजी म्हणाले की तुम्ही एकदा या आणि आशीर्वाद द्या. रत्नाकरजींचे म्हणणे दुरुस्त केले पाहिजे असे मला वाटते. मी तिथे नक्की येईन पण आशीर्वाद देण्यासाठी नाही, आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहे.तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मी तुम्हा सर्वांमध्ये आहे. मी श्री सत्य साई सेंट्रल ट्रस्टशी संबंधित सर्व सदस्यांचे आणि आजचा हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्व सत्यसाई बाबा यांच्या भक्तांचे अभिनंदन करतो. या कार्यक्रमात श्री सत्यसाईंची प्रेरणा, त्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत आहेत. मला आनंद होत आहे की या शुभ प्रसंगी श्री सत्य साईबाबांचे कार्य विस्तारत आहे.देशाला श्री हीरा ग्लोबल कन्व्हेन्शन सेंटरच्या रूपाने एक मोठा थिंक टंक प्राप्त होत आहे. मी या कन्व्हेन्शन सेंटरची छायाचित्रे पाहिली आहेत आणि तुमच्या या लघुपटात त्याची झलक देखील पाहायला मिळाली. या केंद्रात अध्यात्माची अनुभूती आहे आणि आधुनिकतेचे वैभवही आहे. त्यात सांस्कृतिक वैविध्य तसेच वैचारिक भव्यता देखील आहे.हे केंद्र आध्यात्मिक परिषद आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे केंद्र बनेल. जगभरातील विविध क्षेत्रातील विद्वान आणि तज्ज्ञ येथे एकत्र येतील . मला आशा आहे की हे केंद्र तरुणांना खूप सहाय्य्यकारी ठरेल.
मित्रांनो,
कोणताही विचार हा जेव्हा सर्वात प्रभावी असतो तेव्हा तो विचार पुढे सरकतो, कृतीच्या रूपात पुढे जातो. सतकर्म जितके प्रभावशाली असते तितकी अल्प वचने प्रभाव पाडत नाहीत. आज कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटनासोबतच श्री सत्यसाई ग्लोबल कौन्सिलच्या नेत्यांची परिषदही येथे सुरू होत आहे. या परिषदेत देशातील आणि जगातील अनेक देशांचे प्रतिनिधी येथे उपस्थित आहेत.विशेषतः, या कार्यक्रमासाठी तुम्ही निवडलेली “आचरण आणि प्रेरणा”, ही संकल्पना प्रभावी आणि समर्पक देखील आहे. आपल्या येथे असेही म्हटले आहे -यत् यत् आचरति श्रेष्ठः, तत्-तत् एव इतरः जनः॥ म्हणजेच श्रेष्ठ लोक जसे आचरण करतात समाजही त्याचप्रमाणे अनुसरण करतो.
त्यामुळे आपले आचरण हे इतरांसाठी सर्वात मोठे प्रेरणास्थान आहे. सत्यसाईबाबांचे जीवन हे त्याचे जिवंत उदाहरण आहे.आज भारतही कर्तव्याला प्रथम प्राधान्य देऊन वाटचाल करत आहे. स्वातंत्र्याच्या 100 वर्षांच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करताना आम्ही आपल्या अमृत काळाला कर्तव्यकाळ असे नाव दिले आहे.आपल्या या कर्तव्यामध्ये आध्यात्मिक मूल्यांचे मार्गदर्शन आहेच, शिवाय भविष्यासाठी संकल्पही आहेत. यात विकास आहे, वारसाही आहे.आज एकीकडे देशात अध्यात्मिक केंद्रांचे पुनरुज्जीवन होत आहे, त्याचवेळी भारत अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही अग्रेसर आहे. आज भारताने जगातील अव्वल -5 अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवले आहे. आज भारतामध्ये जगातील तिसरे सर्वात मोठे स्टार्टअप कार्यक्षेत्र आहे. डिजिटल तंत्रज्ञान आणि 5जी सारख्या क्षेत्रात आपण मोठ्या देशांशी स्पर्धा करत आहोत. आज जगात जे काही प्रत्यक्ष वेळेतील ऑनलाइन व्यवहार होत आहेत, त्यापैकी 40 टक्के एकट्या भारतात होत आहेत. आणि आज मी रत्नाकरजींना आवाहन करेन आणि आमच्या सर्व साई भक्तांना आवाहन करेन की, साईबाबांच्या नावाशी संबंधित असलेला हा आपला नवनिर्मित जिल्हा, हा संपूर्ण पुट्टपर्थी जिल्हा, तुम्ही याला १००% डिजिटल करू शकता का ? प्रत्येक व्यवहार डिजिटली झाला पाहिजे, बघाच या जिल्ह्याची जगात एक वेगळी ओळख निर्माण होईल आणि बाबांच्या आशीर्वादाने ,माझ्या रत्नाकरजींसारख्या मित्रांनी हे कर्तव्य आपली जबाबदारी म्हणून पार पाडले तर बाबांच्या पुढील जयंतीपर्यंत संपूर्ण जिल्हा डिजिटल होऊ शकतो. जिथे कुठेही रोख रकमेची आवश्यकता भासणार नाही आणि ते करू शकता.
मित्रांनो ,
समाजातील प्रत्येक घटकाच्या सहभागाने बदल होत आहेत. म्हणूनच, ग्लोबल कौन्सिल सारखा कार्यक्रम हा भारताबद्दल जाणून घेण्याचा आणि उर्वरित जगाशी जोडण्याचा एक प्रभावी मार्ग आहे.
मित्रांनो ,
आपल्याकडे अनेकदा संतांचे वर्णन वाहते पाणी असे केले जाते. कारण संतांचे कधी विचार थांबत नाहीत आणि आचरणाने ते कधी दमत नाहीत. अखंड प्रवाह आणि अखंड प्रयत्न हे संतांचे जीवन असते . सामान्य भारतीयासाठी या संतांचे जन्मस्थान कोणते हे महत्त्वाचे नाही. त्याच्यासाठी कोणताही खरा संत हा त्याचाच असतो, त्याच्या श्रद्धा आणि संस्कृतीचा प्रतिनिधी असतो.म्हणूनच आपल्या संतांनी हजारो वर्षांपासून ‘एक भारत श्रेष्ठ भारत‘ ही भावना जोपासली आहे. सत्य साईबाबांचा जन्मही आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी येथे झाला होता! पण त्यांचे अनुयायी, त्यांचे चाहते जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत.आज देशाच्या प्रत्येक भागात सत्य साईंशी संबंधित ठिकाणे आणि आश्रम आहेत. प्रत्येक भाषेचे ,प्रत्येक प्रथा परंपरा असलेले लोक एका कार्या अंतर्गत प्रशांती निलयमशी जोडलेले आहेत. भारताची ही अशी चेतना आहे जी भारताला एका धाग्यात बांधते, अमर करते.
मित्रांनो,
श्री सत्य साई म्हणायचे – सेवा अने, रेंडु अक्षराल-लोने, अनन्त-मइन शक्ति इमिडि उन्दी। म्हणजेच सेवा या दोन अक्षरांमध्ये असीम शक्ती आहे.
सत्यसाईंचे जीवन या भावनेचे जिवंत रूप होते. सत्यसाईबाबांचे जीवन जवळून पाहण्याची, त्यांच्याकडून शिकण्याची आणि त्यांच्या आशीर्वादांच्या सावलीत जगण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य आहे. त्यांचा माझ्याशी नेहमीच विशेष स्नेह होता, त्यांचे आशीर्वाद मला नेहमीच लाभले.
जेंव्हा कधी त्यांच्याशी संवाद व्हायचा तेंव्हा ते अति गहन गोष्टी देखील खूप सोप्या रितीने समजावून सांगत असत. मला आणि त्यांच्या अगणित भक्तांना श्री सत्य साईंचे असे अनेक मंत्र आजही स्मरणात आहेत. ”सर्वांप्रति प्रेम- सर्वांची सेवा”, “मदतीसाठी सदैव तत्पर रहा – पण कोणाला कधीही दुखवू नका” ” बोलणे कमी – काम जास्त”, ”प्रत्येक अनुभव हा एक धडा असतो आणि प्रत्येक तोटा हा फायदा असतो.” अशी अनेक जीवन सूत्रे श्री सत्य साई आपल्याला देऊन गेले आहेत. या सूत्रांमध्ये संवेदनशीलता आहे, आयुष्याचे गंभीर तत्वज्ञान देखील आहे. माझ्या आजही स्मरणात आहे, जेंव्हा गुजरातमध्ये भूकंप झाला होता तेंव्हा त्यांनी मला आवर्जून फोन केला होता. सर्व प्रकारच्या मदत आणि बचावकार्यात ते स्वतः सहभागी झाले होते. त्यांच्या निर्देशानुसार संस्थेतील हजारो लोक भूकंप प्रभावित भूजमध्ये काम करत होते. कोणतीही व्यक्ती असो, ते तिची अशी काळजी घेत जणू काही ती आपली नातलग आहे, खूप जवळची आहे. सत्य साई यांच्यासाठी ‘ मानव सेवा हीच माधव सेवा‘ होती. ‘प्रत्येक नरामध्ये नारायण‘ आणि ‘प्रत्येक जीवात शिव‘ पाहण्याची हीच भावना जनतेला जनार्दन बनवत असते.
मित्रांनो,
भारतासारख्या देशात धार्मिक आणि आध्यात्मिक संस्था नेहमीच समाज उत्कर्षाच्या केंद्रस्थानी राहील्या आहेत. आज देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि आगामी 25 वर्षांसाठी संकल्प करून आपण अमृत काळात प्रवेश केला आहे. आज आपण जेंव्हा वारसा आणि विकासाला नवी गती देत आहोत, सत्य साई ट्रस्ट सारख्या संस्थांनी या कार्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आपला आध्यात्मिक विभाग बाल विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्या पिढीच्या मनात सांस्कृतिक भारत रुजवत आहे. सत्य साईबाबांनी मानव सेवेसाठी रुग्णालयांची निर्मिती केली, प्रशांती निलायममध्ये हायटेक रुग्णालय बांधून तयार आहे. मोफत शिक्षण देण्यासाठी सत्य साई ट्रस्ट अनेक वर्षांपासून उच्च दर्जाची विद्यालये आणि महाविद्यालये चालवत आहे. राष्ट्र निर्मितीमध्ये, समाजाच्या सशक्तिकरणामध्ये आपल्या संस्थेचे असे प्रयत्न खूपच प्रशंसनीय आहेत. देशाने जे उपक्रम सुरू केले आहेत त्यात सत्य साई या संस्थेशी संलग्न असणाऱ्या इतर संस्था देखील समर्पित भावनेने काम करत आहेत. देशात आज ‘जल जीवन मिशन‘ अंतर्गत प्रत्येक गावाला स्वच्छ पाण्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. दुर्गम भागातील गावांना मोफत पाणी पुरवठा करून सत्य साई सेंट्रल ट्रस्ट देखील या मानवीय कार्यात भागीदार बनत आहे.
मित्रांनो,
एकविसाव्या शतकातील आव्हानांना तोंड देत असताना हवामानातील बदल ही देखील जगासमोरची एक मोठी समस्या आहे. भारताने जागतिक व्यासपीठावर मिशन LiFE सारखे अनेक उपक्रम सुरू केले आहेत. जग भारताच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आहे. यावर्षी जी ट्वेंटी सारख्या महत्त्वपूर्ण गटाचे अध्यक्षस्थान भारताकडे आहे, हे तुम्ही सर्वजण जाणताच. हे आयोजन देखील यावेळी ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य‘ अशा भारताच्या मूलभूत चिंतनाच्या संकल्पनेवर आधारित आहे. जग आज भारताच्या या दृष्टिकोनामुळे प्रभावित देखील होत आहे आणि जगात भारताप्रती आकर्षण देखील वाढत आहे. मागच्या महिन्यात, 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने, कशाप्रकारे संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात जागतिक विक्रम स्थापित करण्यात आला, हे आपण सर्वांनी पाहिले आहे. जगातील सर्वात जास्त देशांचे प्रतिनिधी एकाच वेळी, एकाच स्थानी योग करण्यासाठी एकत्र आले होते.
आज लोक आयुर्वेदाचा स्वीकार करत आहेत. भारताची शाश्वत जीवनशैली शिकण्यात रुची दाखवत आहेत. आपली संस्कृती, आपला वारसा, आपला भूतकाळ, आपला ठेवा याबाबत लोकांची जिज्ञासा निरंतर वाढत आहे, आणि केवळ जिज्ञासा वाढत आहे असे नाही तर लोकांची आस्था देखील वाढत आहे. मागच्या काही वर्षांमध्ये जगातील वेगवेगळ्या देशांमधून भारतात अशा अनेक मूर्ती परत आणण्यात आले आहेत, ज्या मूर्ती शंभर वर्षांपूर्वी, पन्नास वर्षांपूर्वी आपल्या देशातून चोरुन बाहेर देशात नेण्यात आल्या होत्या. भारताच्या या प्रयत्नांमागे, या नेतृत्वामागे असलेली आपली संस्कृतीक विचारधारा हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. म्हणूनच अशा सर्व प्रयत्नांमध्ये सत्य साई ट्रस्ट सारख्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक संस्थांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आपण सर्वांनी येत्या 2 वर्षात ‘प्रेम तरू‘ नावाने एक कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे. माझी अशी इच्छा आहे की वृक्षारोपण असो…आणि मला असे वाटते की जेंव्हा माझे मित्र भाई हिराजी इथे बसलेले आहेत, तर जपानचे जे छोटी छोटी जंगले विकसित करण्याचे मीयावाकी तंत्रज्ञान आहे, माझी अशी इच्छा आहे की, या तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या येथील ट्रस्टचे लोक करतील आणि आपण फक्त वृक्षच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी छोटी, छोटी, छोटी जंगले तयार करून देशासमोर एक उदाहरण पेश करू. कारण अशा जंगलांमध्ये एकमेकाला जिवंत ठेवण्याची ताकद असते. एका रोपाला जिवंत ठेवण्याची ताकद दुसऱ्या रोपामध्ये असतेच. मी असे मानतो की याचे अध्ययन…हिराजी येथे आहेत आणि मी अगदी हक्काने हिराजींना कोणतेही काम सांगू शकतो. आणि म्हणूनच मी आज हिराजींना देखील सांगितले आहे. पहा, प्लास्टिक मुक्त भारताच्या संकल्पामध्ये तुम्ही जास्तीत जास्त लोकांना सामील करून घेतले पाहिजे.
सौर ऊर्जा स्वच्छ ऊर्जा या पर्यायासाठी देखील लोकांना प्रेरित करण्याची आवश्यकता आहे. सत्य साई सेंट्रल ट्रस्ट आंध्र प्रदेशातील सुमारे 40 लाख विद्यार्थ्यांना श्री अन्न रागी आणि जव यापासून बनवलेले पदार्थ भोजन म्हणून देत असल्याचे मला सांगण्यात आले आहे आणि हे आपण आत्ताच एका छोट्या चित्रफितीत देखील पाहिले आहे. हा एक खूपच प्रशंसनीय उपक्रम आहे. यासारख्या उपक्रमांना इतर राज्यांबरोबर जोडले तर संपूर्ण देशाला याचा मोठा लाभ होईल. श्री अन्न वापरामुळे स्वास्थ्य लाभ देखील होईल आणि अनेक संधी निर्माण होतील. आपले असे सारे प्रयत्न जागतिक स्तरावर भारताचे सामर्थ्य वाढ होतील आणि भारताची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आणखी दृढ होईल.
मित्रांनो,
सत्य साईंचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या सोबत आहे. याच शक्तीने आपण विकसित भारताची निर्मिती करू आणि संपूर्ण जगाची सेवा करण्याचा संकल्प सिद्धीस नेऊ. मी पुन्हा एकदा प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलो नाही पण भविष्यात नक्कीच भेट देईन. तुमच्या सर्वांच्या सोबतीने जुने दिवस आठवत गौरव पूर्ण क्षण व्यतीत करेन. हिराजी बरोबर अधून मधून भेट होत असते पण मी आज तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की, मी आज येऊ शकलो नाही पण भविष्यात नक्की येईन आणि याच विश्वासासह तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा अंतःकरणापासून खूप खूप शुभेच्छा देत आहे. तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. साई राम !
JPS/S.Chavan/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
Speaking at the inauguration of Sai Hira Global Convention Centre in Puttaparthi, Andhra Pradesh. https://t.co/rgOKb6GXYb
— Narendra Modi (@narendramodi) July 4, 2023
श्री हीरा ग्लोबल convention सेंटर के रूप में देश को एक प्रमुख विचार केंद्र मिल रहा है: PM pic.twitter.com/qA632dZzGd
— PMO India (@PMOIndia) July 4, 2023
आज भारत कर्तव्यों को पहली प्राथमिकता बनाकर आगे बढ़ रहा है: PM @narendramodi pic.twitter.com/pPicNj7XeJ
— PMO India (@PMOIndia) July 4, 2023
आज एक ओर देश में आध्यात्मिक केन्द्रों का पुनरोद्धार हो रहा है तो साथ ही भारत economy और technology में भी lead कर रहा है: PM @narendramodi pic.twitter.com/soW0WBdJx3
— PMO India (@PMOIndia) July 4, 2023
हमारे संतों ने हजारों वर्षों से ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ की भावना का पोषण किया है। pic.twitter.com/Z7LTfSpN21
— PMO India (@PMOIndia) July 4, 2023