Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी येथील साई हिरा ग्लोबल कन्व्हेन्शन सेंटरचे पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्‌घाटन

आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी येथील साई हिरा ग्लोबल कन्व्हेन्शन सेंटरचे पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्‌घाटन


नवी दिल्ली, 4 जुलै 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज  दूरदृश्य प्रणालीद्वारे आंध्र प्रदेशातील पुट्टापर्थी येथील साई हिरा ग्लोबल कन्व्हेन्शन सेंटरचे उद्‌घाटन करण्यात आले. या उद्‌घाटन सोहळ्याला जगभरातील प्रमुख मान्यवर आणि भाविकांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाला  संबोधित करताना, पंतप्रधानांनी या कार्यक्रमासाठी सर्वांचे अभिनंदन केले तसेच  कामाच्या  व्यस्ततेमुळे या कार्यक्रमाला  प्रत्यक्षरित्या ते उपस्थित राहू शकले नाहीत, असे त्यांनी सांगितले. श्री सत्य साईंचे आशीर्वाद आणि प्रेरणा आज आपल्यासोबत आहेत, आज आपल्या कार्याचा विस्तार होत आहे असे सांगत मोदी यांनी, देशाला साई हिरा ग्लोबल कन्व्हेन्शन सेंटर या नावाने एक नवीन उत्कृष्ट  कन्व्हेन्शन सेंटर मिळत आहे याबद्दल आनंद व्यक्त केला.नवीन केंद्र अध्यात्मिक अनुभव देईल आणि आधुनिकतेचे वैभव निर्माण करेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.  या केंद्रामध्ये सांस्कृतिक विविधता आणि वैचारिक भव्यता  यांचा समावेश आहे आणि  या केंद्रात विद्वान आणि तज्ञ एकत्र येऊन हे केंद्र अध्यात्म आणि शैक्षणिक कार्यक्रमांवर चर्चा करण्यासाठी केंद्रबिंदू बनेल, असे ते म्हणाले.

कोणतीही कल्पना जेव्हा कृतीच्या स्वरूपात पुढे जाते तेव्हा ती सर्वात प्रभावी असते. आज, साई हिरा ग्लोबल कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटना व्यतिरिक्त, श्री सत्य साई ग्लोबल कौन्सिलची  लीडर कॉन्फरन्स असल्याचेही त्यांनी नमूद केले.पंतप्रधानांनी  या कार्यक्रमाच्या  ‘आचरण आणि प्रेरणा’ या संकल्पनेचे कौतुक केले – आणि ही संकल्पना प्रभावी तसेच सुसंगत  असल्याचे सांगितले. समाज ज्यांचे अनुसरण करत असतो त्या समाजातील श्रेष्ठ  व्यक्तींच्या उत्तम आचरणाच्या महत्त्वावर मोदी यांनी भर दिला. श्री सत्यसाईंचे जीवन हे याचे जिवंत उदाहरण असल्याचे  त्यांनी सांगितले. आज भारत देखील आपल्या कर्तव्यांना प्राधान्य देत वाटचाल करत आहे.स्वातंत्र्याच्या शतकाकडे वाटचाल करताना आपण अमृत काळाचे  नाव ‘कर्तव्य काळ ’ असे ठेवले आहे.या कर्तव्यांमध्ये आपल्या आध्यात्मिक मूल्यांचे मार्गदर्शन तसेच भविष्यासाठीचे संकल्प यांचा समावेश होतो. त्यात विकास आणि  वारसा  दोन्ही आहेत., असे त्यांनी सांगितले.

अध्यात्मिकदृष्ट्या  महत्त्वाच्या ठिकाणांचे  पुनरुज्जीवन  होत असताना, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेतही भारत अग्रेसर आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भारत आता जगातील पहिल्या 5 अर्थव्यवस्थांपैकी एक बनला असून आज भारतात जगातील तिसरे  सर्वात मोठे स्टार्ट अप कार्यक्षेत्र आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.  डिजिटल तंत्रज्ञान आणि 5 जी  सारख्या क्षेत्रात भारत जगातील आघाडीच्या राष्ट्रांशी स्पर्धा करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.जगात होत असलेल्या रियल टाइम ऑनलाइन व्यवहारांपैकी 40 टक्के व्यवहार भारतात होत आहेत असे  पंतप्रधानांनी सांगितले आणि  पुट्टपर्थी जिल्ह्याचे   डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दिशेने रूपांतर करण्याचे आवाहन भाविकांना  केले.हा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्र आल्यास श्री सत्य साईबाबांच्या पुढील जयंतीपर्यंत संपूर्ण जिल्हा डिजिटल होईल, असे त्यांनी यावेळी सुचवले.

“देशात झालेले परिवर्तन हे प्रत्येक सामाजिक वर्गाच्या योगदानाचे फलित आहे”  असे सांगत ग्लोबल कौन्सिल सारख्या संस्था भारताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि जगाशी संपर्क साधण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. संत हे  प्रवाही  पाण्यासारखे मानले जातात कारण ते कधीही त्यांचे विचार थांबवत नाहीत आणि त्यांच्या आचरणाने  कधीही थकत नाहीत,असे  प्रतिपादन पंतप्रधानांनी प्राचीन धर्मशास्त्राचा  संदर्भ देत केले. संतांचे जीवन त्यांच्या निरंतर  प्रवाहातून आणि प्रयत्नांनी परिभाषित केले जाते, असे मोदी यांनी  नमूद केले. भाविकांसाठी  संतांचे जन्मस्थान कोणते हे महत्त्वाचे नाही तर त्यांच्यासाठी  कोणताही खरा संत हा त्यांचाच असतो, तो त्यांच्या श्रद्धा आणि संस्कृतीचा प्रतिनिधी असतो , असे पंतप्रधानांनी सांगितले. भारतामध्ये हजारो वर्षांपासून सर्व संतांनी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ही भावना जोपासली आहे, असे ते म्हणाले.

श्री सत्य साई बाबा यांचा जन्म पुट्टपूर्ती येथे झाला असला तरी त्यांचे अनुयायी जगभरात आहेत आणि भारतातील प्रत्येक राज्यात त्यांच्या संस्था आणि आश्रम आहेत. त्यांचे सर्व भक्त भाषा आणि संस्कृतीच्या पलिकडे जाऊन प्रशांती निलयमशी जोडले गेले आहेत,  आणि या भावनेनेच भारताला एका धाग्यात विणले आहे असे ते म्हणाले.

सत्यसाई हे सेवेची शक्ती होते असा  उल्लेख पंतप्रधानांनी केला. त्यांच्याशी संवाद साधण्याची आणि सत्यसाईंचा  आशीर्वाद प्राप्त करण्याची संधी मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली. श्री सत्य साई ज्या सहजतेने आशयगर्भित संदेश देत त्याची आठवणही मोदी यांनी करुन दिली. ‘सर्वांवर प्रेम करा सर्वांची सेवा करा’  ‘नेहमी मदत करा कधीही दुखावू नका’;  ‘कमी बोला जास्त काम करा’;  ‘प्रत्येक अनुभव हा एक धडा आहे – प्रत्येक तोटा हा एक फायदा आहे’ या सारख्या कालातीत शिकवणीचे त्यांनी स्मरण केले. या शिकवणींमध्ये संवेदनशीलता आहे तसेच जीवनाचे सखोल तत्त्वज्ञान आहे असे पंतप्रधान म्हणाले.  गुजरातमधील भूकंपाच्या वेळी त्यांनी केलेले मार्गदर्शन आणि मदतीचे पंतप्रधानांनी स्मरण केले. श्री सत्यसाईंच्या करुणामय आशीर्वादाचे मोदी यांनी मनापासून स्मरण केले आणि त्यांच्यासाठी मानवतेची सेवा हीच ईश्वर सेवा होती असे ते म्हणाले.

भारतासारख्या देशात धार्मिक आणि आध्यात्मिक संस्था नेहमीच सामाजिक कल्याणाच्या केंद्रस्थानी राहिल्या आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले.  आपण आज अमृतकाळाच्या संकल्पाने विकास आणि वारसा यांना गती देत आहोत, तेव्हा सत्य साई ट्रस्टसारख्या संस्थांचा त्यात मोठा वाटा आहे असे ते म्हणाले.

सत्य साई ट्रस्टची अध्यात्मिक शाखा बाल विकास सारख्या कार्यक्रमातून नवीन पिढीमध्ये सांस्कृतिक भारत घडवत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. सत्य साई ट्रस्टने राष्ट्र उभारणीत आणि समाजाच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी प्रशांती निलयममधील अत्याधुनिक रुग्णालय आणि वर्षानुवर्षे मोफत शिक्षणासाठी चालवल्या जाणार्‍या शाळा तसेच महाविद्यालयांचा उल्लेख केला. समर्पित भावनेने काम करत असलेल्या सत्य साईंशी संबंधित संघटनांचाही त्यांनी उल्लेख केला. ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत देशातील प्रत्येक गावाला शुद्ध पाणी पुरवठा केला जात आहे. यात सत्य साई सेंट्रल ट्रस्ट दुर्गम गावांना मोफत पाणी पुरवण्याच्या मानवतावादी कार्यात भागीदार झाला आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी मिशन पर्यावरण विषयक उपक्रम LiFE आणि  प्रतिष्ठित G-20 अध्यक्षपद यासारख्या उपक्रमांना मिळालेल्या जागतिक मान्यतेचा त्यांनी उल्लेख केला. एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य या संकल्पनेवर त्यांनी प्रकाश टाकला. जगाचे स्वारस्य भारतामधे वाढत असल्याचा उल्लेख करून, पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्रसंघात मुख्यालयात केलेल्या जागतिक विक्रमाचा उल्लेख केला. सर्वाधिक संख्येने विविध देशांचे लोक तिथे योग करण्यासाठी एकत्र आले होते.  योगसोबतच लोक भारताच्या आयुर्वेद आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. अलीकडच्या काळात चोरीला गेलेल्या कलाकृती परत आल्या याचाही त्यांनी उल्लेख केला. या प्रयत्न आणि भारताच्या नेतृत्वामागे, आपली सांस्कृतिक विचारसरणी ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. त्यामुळे अशा सर्व प्रयत्नांमध्ये सत्य साई ट्रस्टसारख्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक संस्थांचा मोठा वाटा आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी ‘प्रेम तरू’ उपक्रमावर प्रकाश टाकला. या अंतर्गत पुढील 2 वर्षात 1 कोटी झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. वृक्षारोपण असो किंवा प्लास्टिकमुक्त भारताचा संकल्प, अशा उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन मोदी यांनी केले. सौर ऊर्जा आणि स्वच्छ ऊर्जा या पर्यायांचा अवलंब करण्याचे आवाहनही त्यांनी लोकांना केले.

आंध्रातील सुमारे 40 लाख विद्यार्थ्यांना  भरडधान्यापासून (रागी-जव) बनवलेले श्री अन्न पुरवण्याच्या सत्य साई सेंट्रल ट्रस्टच्या उपक्रमाचे पंतप्रधानांनी कौतुक केले.  श्री अन्नाचे आरोग्य लाभ अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की, इतर राज्यांनीही अशा उपक्रमांची अंमलबजावणी केल्यास देशाला मोठा फायदा होईल.  श्री अन्नामध्ये आरोग्य आहे, आणि शक्यताही आहेत. आपले सर्व प्रयत्न जागतिक स्तरावर भारताला अधिक सक्षम करतील आणि भारताची ओळख अधिक मजबूत करतील, असे ते पुढे म्हणाले.

सत्य साईंचे आशीर्वाद आपल्या सर्वां सोबत आहेत. या शक्तीसह आपण विकसित भारत घडवू आणि संपूर्ण जगाची सेवा करण्याचा आपला संकल्प पूर्ण करू, अशा शब्दात पंतप्रधानांनी समारोप केला.

पार्श्वभूमी

श्री सत्य साई सेंट्रल ट्रस्टने पुट्टपूर्ती येथील प्रशांती निलयम येथे साई हिरा जागतिक परिषद केन्द्र (ग्लोबल कन्व्हेन्शन सेंटर) हे नवीन सुविधा केन्द्र उभारले आहे.  प्रशांती निलयम हा श्री सत्य साईबाबांचा मुख्य आश्रम आहे. दानशूर रियुको हिरा यांनी यांनी या कन्व्हेन्शन सेंटरसाठी निधी दिला आहे. हे सांस्कृतिक देवाणघेवाण, आध्यात्म आणि जागतिक सौहार्दाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनाचे निदर्शक आहे. हे विविध पार्श्वभूमीच्या लोकांना एकत्र येण्यासाठी, जोडण्यासाठी आणि श्री सत्य साईबाबांच्या शिकवणींचे अन्वेषण करण्यासाठी पोषक वातावरण प्रदान करते. त्याच्या जागतिक दर्जाच्या सुविधा आणि पायाभूत सुविधा परिषदा, परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना सुविधा प्रदान करतील. जीवनाच्या सर्व स्तरांतील व्यक्तींमध्ये संवाद आणि समज वाढवतील. विस्तीर्ण संकुलात ध्यान सभागृह, विहंगम उद्याने आणि निवास सुविधा देखील आहेत.

JPS/SRT/S.Chavan/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai