Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अहमदाबाद येथे साबरमती नदीच्या तीरावर आयोजित खादी उत्सवात पंतप्रधान सहभागी

अहमदाबाद येथे साबरमती नदीच्या तीरावर आयोजित खादी उत्सवात पंतप्रधान सहभागी


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदाबाद येथे, साबरमती नदीच्या तीरावर सुरु असलेल्या खादी उत्सवात सहभागी झाले. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, खासदार सी.आर. पाटील, गुजरात राज्य सरकारमधील मंत्री हर्ष संघवी आणि जगदीश पांचाल, अहमदाबादचे महापौर किरीटभाई परमार आणि खाडी व ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना, पंतप्रधान मोदी यांनी, चरख्याशी असलेल्या त्यांच्या व्यक्तिगत नात्याचे स्मरण केले आणि लहानपणी, त्यांची आई कशा प्रकारे चरख्यावर काम करीत असे याची आठवण काढली. ते म्हणाले, स्वातंत्र्यलढ्याच्या अमृत महोत्सवाच्या  निमित्ताने साडेसात हजार भगिनी आणि कन्यांनी आज एकत्रितपणे चरख्यावर सूतकताई करून इतिहास रचला आणि त्यातून साबरमतीचा किनारा  धन्य झाला. चरख्यावर सूत कातणे हे काम एखाद्या दैवताच्या आराधनेच्या समान आहे असे ते पुढे म्हणाले.

पंतप्रधानांच्या हस्ते आज ज्या अटल पुलाचे उद्घाटन झाले त्याच्या निर्मितीसाठी वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञान आणि संरेखनातील उत्कृष्टतेचा त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले की, हा पूल म्हणजे, गुजरातच्या लोकांनी ज्यांच्यावर निरतिशय प्रेम केले आणि ज्यांचा सदैव आदर केला, त्या अटल बिहारी वाजपेयी यांना वाहिलेली श्रद्धांजली आहे. अटल पूल हा केवळ साबरमतीच्या दोन्ही काठांना जोडणारा मार्ग नाही तर तो त्याची संरचना आणि नवोन्मेषामुळे तो अभूतपूर्व ठरला आहे. गुजरातच्या सुप्रसिद्ध पतंग महोत्सवाचा देखील त्याच्या संरचनेत समावेश करण्यात आला आहे, पंतप्रधान म्हणाले. संपूर्ण भारतभरात हर घर तिरंगाअभियान ज्या उत्साहाने साजरे करण्यात आले त्याचा देखील पंतप्रधान मोदी यांनी आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले की या उत्सवाने केवळ नागरिकांच्या देशभक्तीच्या भावनेचेच दर्शन घडविले नाही तर त्याचसोबत आधुनिक तसेच विकसित भारताच्या उभारणीचा निश्चय देखील त्यातून दिसून आला. चरख्यावर सूत कातत असताना, तुमचे हात भारताचे महावस्त्र विणत होते, ते पुढे म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले, खादीचे धागे स्वातंत्र्य चळवळीचे सामर्थ्य ठरले आणि त्यांनी गुलामीचे साखळदंड तोडून टाकले. ते पुढे म्हणाले की, हेच खादीचे धागे आता विकसित भारत साकारण्याचे वचन पूर्ण करण्यासाठी आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरणास्त्रोत ठरू शकतील. खादीसारख्या क्षेत्रांमध्ये असलेली पारंपरिक शक्ती आपल्याला नव्या उंचीवर घेऊन जाईल,  असे ते पुढे म्हणाले. हा खादी उत्सव म्हणजे स्वातंत्र्य चळवळीची उर्जा आणि इतिहास पुनर्जीवित करण्याचा एक प्रयत्न आहे आणि नव्या भारताचे निर्धार पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रेरणास्त्रोत आहे असे पंतप्रधान मोदी यांनी पुढे नमूद केले.

यावर्षी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या पाच संकल्पांची त्यांनी उपस्थितांना पुन्हा आठवण करून दिली. या पवित्र ठिकाणी, साबरमती नदीच्या तीरावर मी त्या पाच निर्धारांचा पुनरुच्चार करू इच्छितो. पहिला निर्धार देशासमोरील मोठे ध्येय, विकसित भारत घडविण्याचे ध्येय, दुसरा निर्धार- गुलामगिरीच्या मानसिकतेचा सर्वार्थाने त्याग करणे, तिसरा आपल्या ऐतिहासिक वारशाचा अभिमान बाळगणे, चौथा- देशाची एकात्मता बळकट करण्यासाठी जोमदार प्रयत्न करणे आणि पाचवा नागरिक म्हणून आपली कर्तव्ये पूर्ण करणे. ते म्हणाले की आजचा खादी महोत्सव हे या पाच निर्धारांचे अत्यंत सुरेख प्रतिबिंब आहे.

स्वातंत्र्यानंतरच्या काळात खादीकडे झालेल्या दुर्लक्षाबाबत पंतप्रधानांनी खंत व्यक्त केली. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात, ज्या खादीला गांधीजींनी देशाच्या स्वाभिमानाचे प्रतीक केले होते, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात मात्र त्याच खादीच्या वापराबाबत न्यूनगंड निर्माण केला गेला. आणि त्यामुळे, खादी विषयाशी संबंधित खादी आणि ग्रामोद्योग संपूर्णतः उध्वस्त झाले. खादीची ही अवस्था सर्वांसाठीच आणि विशेषतः गुजरातमधील लोकांसाठी अत्यंत वेदनादायी होती, ते म्हणाले. खादीला नवजीवन देण्याचे कार्य गुजरातच्या भूमीवर सुरु झाल्याबद्दल पंतप्रधानांनी अत्यंत अभिमान व्यक्त केला.

परिवर्तनासाठी खादीपासून खादी फॉर फॅशन, खादी फॉर नेशनया सरकारच्या या संकल्पावर पंतप्रधानांनी भर दिला. ते म्हणाले, “आम्ही गुजरातमध्ये मिळालेल्या  यशाचे अनुभवांची देशभर  अंमलबजावणी करायला सुरुवात केली.” देशभरातील, खादीशी संबंधित असलेल्या समस्यांचे निराकरण सुद्धा करण्यात आले. आम्ही देशवासीयांना खादी उत्पादने खरेदी करण्यास प्रोत्साहित केले. खादीच्या पुनरुज्जीवन प्रक्रियेत महिलांचे मोठे योगदान असल्याची यथोचित दखल पंतप्रधानांनी आपल्या भाषणात घेतली. भारताच्या खादी उद्योगाच्या वाढत्या सामर्थ्यात महिला शक्तीचाही मोठा वाटा आहे. आपल्या माता-भगिनींमध्ये  उद्योजकतेची भावना रुजलेली आहे. गुजरातमधील सखी मंडळांचा विस्तार हा देखील याचाच पुरावा आहे, असेही ते म्हणाले. गेल्या 8 वर्षात खादीची विक्री चार पटीने वाढली असून खादी आणि ग्रामोद्योगाची उलाढाल प्रथमच एक लाख कोटींच्या पुढे गेल्याची माहिती त्यांनी दिली. या क्षेत्राने 1.75 कोटी लोकांसाठी नवीन रोजगारही निर्माण केला. मुद्रा योजनेसारख्या आर्थिक समावेशक योजना उद्योजकतेला चालना देतात,असं ते म्हणाले.

खादीचे फायदे अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की, खादीची वस्त्रे  टिकाऊ आणि पर्यावरणपूरक वस्त्रांचे उत्तम यांचे उदाहरण आहे आणि त्याच्या निर्मितीमुळे अतिशय कमी कार्बन उत्सर्जन होते. असे अनेक देश आहेत जिथे तापमान जास्त आहे,त्यांच्यासाठी देखील खादी  आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर खादी मोठी भूमिका बजावू शकते. जागतिक स्तरावर मूलभूत आणि शाश्वत जीवनाकडे परत जाण्याच्या वाढत्या वृत्तीशी  खादीचा वापर सुसंगत आहे असंही ते म्हणाले.

आगामी सणासुदीच्या काळात खादी ग्रामोद्योगात तयार केलेली उत्पादनेच भेट द्यावीत, असे आवाहन पंतप्रधानांनी देशातील जनतेला केले. तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची वस्त्रे असू शकतात. पण त्यात तुम्ही खादीला स्थान दिल्यास  व्होकल फॉर लोकलगती मिळेल, असे पंतप्रधान म्हणाले.

गेल्या काही दशकांमध्ये परदेशी खेळण्यांशी होत असलेल्या स्पर्धेत, भारताचा स्वतःचा समृद्ध खेळणी उद्योग उद्ध्वस्त होत चालला होता, याची आठवण करून देताना पंतप्रधानांनी सरकारच्या प्रयत्नांमुळे आणि खेळण्यांच्या उद्योगाशी निगडित आपल्या बंधू-भगिनींच्या मेहनतीमुळे ही परिस्थिती आता सुधारत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आता बदल व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खेळण्यांच्या आयातीत मोठी घट झाली आहे.

पंतप्रधानांनी उपस्थितांना  दूरदर्शनवरील स्वराजमालिका पाहण्यास सांगितले. या मालिकेत महान स्वातंत्र्यसैनिकांची कथा आणि त्यांच्या संघर्षाचे प्रभावी आणि तपशीलवार वर्णन करण्यात आले आहे. आपल्या स्वातंत्र्यासाठी आपल्या पूर्वजांनी दिलेल्या बलिदानाबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वांनी सहकुटुंब ही मालिका पाहावी,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

खादी उत्सव

खादीला लोकप्रिय करणे, खादी उत्पादनांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि तरुणांमध्ये खादीच्या वापरास प्रोत्साहन देण्याचा पंतप्रधानांचा सतत प्रयत्न असतो. पंतप्रधानांच्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून, 2014 पासून, भारतातील खादीच्या विक्रीत चार पटीने वाढ झाली आहे, तर गुजरातमध्ये खादीच्या विक्रीत आठ पटीने वाढ झाली आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या खादी उत्सवया उपक्रमाचे आयोजन खादीचा गौरव वाढवण्यासाठी आणि स्वातंत्र्यलढ्यातील खादीचे महत्त्व सांगण्यासाठी करण्यात येत आहे. हा उत्सव अहमदाबाद येथील साबरमती नदी किनारी आयोजित केला जाईल आणि यात  गुजरातच्या विविध जिल्ह्यांतील 7500 महिला खादी कारागीर एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी चरख्यावर सूत काढतील. या कार्यक्रमात 1920 च्या दशकापासून वापरल्या जाणार्‍या विविध प्रकारचे 22 चरखे ठेवले जाणार असून, या प्रदर्शनातून “चरख्यांची उत्क्रांती” दर्शवली जाईल. त्यात स्वातंत्र्यलढ्यात वापरल्या जाणाऱ्या चरख्याचे प्रतीक असलेल्या येरवडा चरखा सारख्या चरख्यासोबतच आजच्या काळात वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक नवनवीन शोध आणि तंत्रज्ञानानी युक्त चरख्यांचा समावेश असेल.   पोंडुरू खादीच्या उत्पादनाचे थेट प्रात्यक्षिकही दाखविण्यात येणार आहे. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी गुजरात राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या नवीन कार्यालयाच्या इमारतीचे आणि साबरमती येथील अटल ब्रिजया पादचारी पुलाचेही उद्घाटन केले.

***

R.Aghor/S.Chitnis/G.Deoda/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai