‘कलमनो कार्निवल‘ च्या भव्य आयोजनाबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. नवभारत साहित्य मंदिर‘ ने दरवर्षी अहमदाबादमध्ये पुस्तक मेळ्याची जी परंपरा सुरु केली आहे, ती काळाच्या ओघात अधिकच समृद्ध होत चालली आहे. या माध्यमातून गुजरातचे साहित्य आणि ज्ञान यांचा विस्तार तर होत आहेच, त्याचबरोबर नव्या तरुण साहित्यिक -लेखकांनाही एक व्यासपीठ मिळत आहे.
या समृद्ध परंपरेसाठी मी ‘नवभारत साहित्य मंदिर‘ आणि त्याच्याशी संबंधित सर्व सदस्यांचे अभिनंदन करतो. विशेषतः महेंद्र भाई, रोनक भाई यांनाही शुभेच्छा देतो. त्यांच्या प्रयत्नांमुळेच गुजरातच्या लोकांना या पुस्तक मेळाव्याचा लाभ मिळत आहे.
मित्रांनो,
‘कलमनो कार्निवल‘ गुजराती भाषेबरोबरच हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तकांचे देखील एक मोठे संमेलन आहे. या आयोजनाचा जो उद्देश तुम्ही ठरवला आहात ,’वांचे गुजरात, वांचनने वधावे गुजरात‘, तो देखील प्रासंगिक आहे. जेव्हा मी गुजरातमध्ये तुम्हा सर्वांबरोबर काम करत होतो, तेव्हा गुजरातने देखील ‘वांचे गुजरात‘ अभियान सुरु केले होते. आज ‘कलमनो कार्निवल‘ सारखे अभियान गुजरातचा तो संकल्प पुढे नेत आहेत.
मित्रांनो,
पुस्तके आणि प्राचीन ग्रंथ ही दोन्ही आपल्या विद्या उपासनेची मूळ तत्वे आहेत. गुजरातमध्ये ग्रंथालयांची तर फार जुनी परंपरा आहे. आपले वडोदराचे महाराजा सयाजीरावजी यांनी त्यांच्या प्रदेशात सर्व प्रमुख ठिकाणी ग्रंथालये स्थापन केली होती. माझा जन्म झाला त्या वडनगर गावात खूप चांगले वाचनालय होते. गोंडलचे महाराज भगवत सिंह यांनी ‘भगवत गोमंडल‘ सारखा विशाल शब्दकोश दिला. मला तर कधी-कधी वाटतं, कधी लोक मला सांगतात की, मी गुजरातमध्ये असताना मुलांच्या नावांवरून कुटुंबात खूप वेळ चर्चा व्हायची आणि मग मुलांची नावं काय ठेवायची यासाठी पुस्तके शोधायचे. तेव्हा एकदा कोणीतरी माझ्यासमोर विषय काढला , मी म्हणालो, तुम्ही ‘भगवत गोमंडल‘ बघा, त्यात तुम्हाला खूप गुजराती शब्द सापडतील, त्यातून तुम्हाला तुमच्या मुलांच्या नावासाठी अनुकूल नाव सापडेल. आणि खरंच , इतके संदर्भ ग्रंथ आहेत, इतके अर्थ आहेत, ही समृद्ध परंपरा आपल्याकडे आहे.
त्याचप्रमाणे वीर कवी नर्मद यांनी ‘नर्म कोश’चे संपादन केले. आणि ही परंपरा आमच्या केका शास्त्रीजींपर्यंत चालू होती. 100 वर्षांहून अधिक काळ आपल्या सोबत असलेल्या केका शास्त्रीजींनीही या क्षेत्रात बहुमोल योगदान दिले. पुस्तके , लेखक, साहित्यनिर्मितीच्या बाबतीत गुजरातचा इतिहास खूपच समृद्ध राहिला आहे.असे पुस्तक मेळावे गुजरातच्या कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत, प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचले पाहिजेत, जेणेकरून त्यांनाही हा इतिहास समजेल आणि त्यांनाही नवी प्रेरणा मिळेल.
मित्रांनो,
यंदा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना या पुस्तक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.अमृत महोत्सवाचा एक आयाम हा देखील आहे की आपण आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास कशा प्रकारे पुनरुज्जीवित करू.आपल्या भावी पिढ्यांपर्यंत आपण हे कसे पोहोचवायचे? .स्वातंत्र्यलढ्याच्या काळातील हे जे विस्मृतीत गेलेले अध्याय आहेत, त्यांचा गौरव देशासमोर आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि तुमच्या सर्वांच्या प्रयत्नानी हे शक्य देखील आहे.
‘कलमनो कार्निवल‘ सारखे आयोजन देशाच्या या अभियानाला गति देऊ शकतात. पुस्तक मेळ्यात स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित पुस्तकांना विशेष महत्त्व देता येईल, अशा लेखकांना भक्कम व्यासपीठ देता येईल. मला विश्वास आहे की हा कार्यक्रम या दिशेने एक सकारात्मक माध्यम सिद्ध होईल.
मित्रांनो,
आपल्याकडे शास्त्रांमध्ये असे म्हटले जाते –
शास्त्र सुचिन्तित पुनि पुनि देखिअ।
म्हणजेच शास्त्रे , ग्रंथ आणि पुस्तकांचा पुन्हा पुन्हा अभ्यास करत राहिले पाहिजे, तरच ते प्रभावी आणि उपयुक्त ठरतात. ही गोष्ट अधिक महत्त्वाची बनली आहे
कारण आज इंटरनेटच्या काळात ही विचारसरणी अधिक प्रबळ होत चालली आहे की जेव्हा गरज भासेल, तेव्हा आपण इंटरनेटची मदत घेऊ. तंत्रज्ञान हे निःसंशयपणे आपल्यासाठी माहितीचे एक महत्त्वाचे माध्यम आहे, मात्र पुस्तकांची जागा घेण्याला , पुस्तकांचा अभ्यास करण्याला पर्याय ठरू शकत नाही. जेव्हा माहिती आपल्या डोक्यात असते तेव्हा मेंदू त्या माहितीचे सखोल विश्लेषण करतो, त्याच्याशी निगडित नवे पैलू आपल्यासमोर येतात.
आता मी आपणा सर्वाना एक छोटेसे काम देतो.नरसी मेहता यांनी रचलेले ‘वैष्णव जन तो ते ने रे कहिए‘ हे आपण सर्वांनी कितीतरी वेळा ऐकले असेल, कितीतरी वेळा म्हटलेही असेल.एक काम करा,ही रचना आपण लिखित स्वरुपात आपल्यासमोर ठेवून विचार करा की या रचनेत सध्याच्या काळातले कोणते- कोणते संदर्भ आहेत. कोण-कोणत्या गोष्टी अनुकूल आहेत. जे वैष्णव जन आपण हजारो वेळा ऐकले असेल, ते लेखी स्वरुपात घेऊन आपण विचार करू लागाल, वर्तमानाच्या संदर्भात ते जाणून घेण्याचा प्रयत्न कराल तेव्हा प्रत्येक वेळी आपणाला शेकडो अर्थ नव्याने उमगत जातील हे मी खात्रीने सांगू शकतो. हे सामर्थ्य असते आणि म्हणूनच पुस्तक आपल्याजवळ असणे, आपल्याबरोबर असणे हे नव- नव्या कल्पना सुचण्यासाठी, नव-नव्या संशोधनासाठी विचार करण्याकरिता, सखोल चिंतनासाठी मोठे बळ देतात.
म्हणूनच बदलत्या काळात पुस्तके, पुस्तके वाचण्याची आपली सवय कायम राखणे अतिशय आवश्यक आहे. मग पुस्तके प्रत्यक्ष आपल्या हातात असोत किंवा डिजिटल स्वरुपात. युवावर्गामध्ये पुस्तकांची गोडी निर्माण करण्यात, त्यांचे महत्व समजण्यासाठी अशा प्रकारचे पुस्तक मेळे मोठी भूमिका बजावतील असे मला वाटते.
मित्रहो,
आज गुजरातच्या लोकांसमवेत संवाद साधताना मला असेही सांगायचे आहे की आपण नवे घर बांधतो तेव्हा वस्तू रचनाकाराबरोबर कितीतरी चर्चा करतो.भोजनासाठी इथे जागा, दिवाणखाना इथे, कोणी-कोणी म्हणते देवघर इथे करूया,त्यापुढे काही जण असेही सांगतात कपड्यांसाठी इथे व्यवस्था करा. मात्र माझी आपल्याला एक विनंती आहे नवे घर बांधताना आपण त्याला असे सांगता का की आमचे पुस्तकांचे भांडार राहील अशी एक जागा ठेवा. मी पण पुस्तके ठेवलेल्या जागी जाईन, मुलांना पण नेईन, त्यांना वाचनाची सवय लावेन,माझ्या घरातली एक जागा अशी असेल जी खास पुस्तकांसाठी असेल,असे आपण नाही म्हणत.
आपल्याला माहीतच असेल गुजरातमध्ये मी एक गोष्ट आग्रहाने सांगत असे. कोणताही कार्यक्रम असेल तर मी मंचावर सांगत असे की बुके नको, बुक द्या,कारण 100-200 रुपयांचा तो पुष्पगुच्छ टिकतोही अल्प काळ. मी सांगत असे पुस्तके आणा, यामुळे पुस्तकांची विक्रीही वाढेल हे मला माहित होते. प्रकाशक, लेखक यांना आर्थिक हातभार हवा ना.आपण अनेक वेळ पुस्तके खरेदी करत नाही. खरे तर पुस्तके खरेदी करणे ही पण एक समाज सेवा आहे. कारण या प्रकारच्या कार्यासाठी समर्पित जीवनाना आपले सहकार्य अवश्य असले पाहिजे. पुस्तके खरेदी करण्याची आपण सवय लावून घेतली पाहिजे. पुस्तके जतन करण्याची, ती बाळगण्याची सवय लावून घेतली पाहिजे. गुजरातमध्ये मी पाहिले होते, काही जण घरोघरी जाऊन पुस्तके देत आणि विनंती करत की हे पुस्तक जरूर वाचा आणि खरेदी करण्याजोगे वाटले तर खरेदी करा नाहीतर आम्हाला परत करा. असे खूप लोक मी पहिले आहेत. मला आठवतंय आपल्या भावनगर मध्ये एक व्यक्ती ग्रंथोत्सव भरवत असे. अशा प्रकारचे कार्य अनेक लोक करतात.आपल्याकडे म्हणतात ना, सरस्वती लुप्त आहे, गुप्त आहे. साहित्यिक कार्यक्रमात मी विज्ञानापेक्षा त्याचा वेगळा अर्थ देतो.हा साहित्य जगतातला तर्क आहे. सरस्वती तर ज्ञानाची देवी आहे.ती लुप्त आहे, गुप्त आहे म्हणजे याचा अर्थ ही सरस्वती देवी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य या तीन्हीना लुप्त अवस्थेत जोडते. पुस्तकांच्या माध्यमातून सरस्वती इतिहास, वर्तमान आणि उज्वल भविष्य यांना जोडण्याचे कार्य करते. म्हणूनच पुस्तक मेळ्याचे महत्व जाणा,या मेळ्यात तर कुटुंबासह गेले पाहिजे. पुस्तके पाहिल्यानंतर, हातात घेतल्यानंतर वाटते अरे हे पण आहे इथे, या गोष्टीवरही विचार झाला आहे, अनेक गोष्टी उपलब्ध होतात. म्हणून गुजरातच्या सर्व बंधू-भगिनींनी खूप वाचन करावे, खूप चिंतन करावे अशी माझी अपेक्षा आहे. विचारमंथन करावे यातून भावी पिढीसाठी विचारधनाचा ठेवा उपलब्ध करून द्यावा. गुजरातचे जे नामवंत साहित्यिक आहेत त्यांच्या प्रती ही एक आदरांजली ठरेल, या मेळ्यात आपण सहभागी झालो तर शब्द साधक,सरस्वतीचे पुजारी यांच्या प्रती एक प्रकारे आदरभावना व्यक्त होईल.आपणा सर्वाना माझ्या खूप-खूप शुभेच्छा.वाचकांसह सर्वाना पुन्हा एकदा आदरपूर्वक नमन करून इथे थांबतो.
आपणा सर्वाना पुन्हा एकदा खूप-खूप शुभेच्छा.
धन्यवाद !
***
G.Chippalkatti/S.Kane/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
My message for the book fair being held in Ahmedabad. https://t.co/Z62T4oevO5
— Narendra Modi (@narendramodi) September 8, 2022
जब मैं गुजरात में आप सबके बीच था, तब गुजरात ने भी ‘वांचे गुजरात’ अभियान शुरू किया था।
— PMO India (@PMOIndia) September 8, 2022
आज ‘कलम नो कार्निवल’ जैसे अभियान गुजरात के उस संकल्प को आगे बढ़ा रहे हैं: PM @narendramodi
पुस्तक और ग्रंथ, ये दोनों हमारी विद्या उपासना के मूल तत्व हैं।
— PMO India (@PMOIndia) September 8, 2022
गुजरात में पुस्तकालयों की तो बहुत पुरानी परंपरा रही है: PM @narendramodi
इस वर्ष ये पुस्तक मेला एक ऐसे समय में आयोजित हो रहा है जब देश अपनी आजादी का अमृत महोत्सव मना रहा है।
— PMO India (@PMOIndia) September 8, 2022
अमृत महोत्सव का एक आयाम ये भी है कि हम हमारी आजादी की लड़ाई के इतिहास को कैसे पुनर्जीवित करें: PM @narendramodi
आज इंटरनेट के जमाने में ये सोच हावी होती जा रही है कि जब जरूरत होगी तो इंटरनेट की मदद ले लेंगे।
— PMO India (@PMOIndia) September 8, 2022
तकनीक हमारे लिए निःसन्देह जानकारी का एक महत्वपूर्ण जरिया है, लेकिन वो किताबों को, किताबों के अध्ययन को रिप्लेस करने का तरीका नहीं है: PM @narendramodi