Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अहमदाबाद इथे प्रमुख स्वामी महाराज शताब्दी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

अहमदाबाद इथे प्रमुख स्वामी महाराज शताब्दी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण


जय स्वामीनारायण!

जय स्वामीनारायण!

परम पूज्य महंत स्वामी जी, पूज्य संत गण, राज्यपाल श्री आचार्य देवव्रत जी, मुख्यमंत्री श्री भूपेंद्र पटेल जी,आणि उपस्थित सर्व सत्संग परिवार, माझं हे भाग्य आहे, की मला या ऐतिहासिक कार्यक्रमाचा साक्षीदार बनण्याचे आणि सत्संगी बनण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. इतक्या मोठ्या स्तरावर आणि एक महिनाभर चालणारा हा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम केवळ संख्येच्या बळावर मोठा आहे किंवा कालावधी खूप जास्त आहे, म्हणून मोठा आहे असे नव्हे . तर ,जेवढा वेळ मी इथे घालवला, त्यावरून मला असं जाणवलं की ही दिव्यत्वाची अनुभूती आहे. इथे संकल्पांची भव्यता आहे. इथे आबालवृद्धांसाठी आपला वारसा काय आहे, आपली परंपरा काय आहे, श्रद्धा काय आहेत, आपले अध्यात्म काय आहे, संस्कृती काय आहे, आपला स्वभावधर्म काय आहे, या सगळ्या गोष्टी या परिवाराने सांभाळून ठेवल्या आहेत, त्यांचे जतन करत आहेत. इथे भारताचा प्रत्येक रंग आपल्याला दिसतो. मी या प्रसंगी, सर्व पूज्य संत गण यांना या आयोजनामागच्या कल्पनाशक्तिसाठी, आणि त्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी जे परिश्रम घेतले आहेत, त्यासाठी मी त्या सर्वांना वंदन करतो. मनापासून त्यांचे आभार मानतो. पूज्य महंत स्वामीजी यांच्या आशीर्वादाने इतके मोठे भव्य आयोजन देश आणि जगाला केवळ आकर्षित करणार नाही, तर प्रभावितही करेल, येणाऱ्या पिढ्यांनाही प्रेरणा देईल.

15 जानेवारीपर्यंत, जगभरातील लाखों लोक, माझे पितृतुल्य पूज्य स्वामीजी यांच्याप्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी इथे येणार आहेत. आपल्यापैकी कदाचित अनेक लोकांना माहिती असेल, संयुक्त राष्ट्रांत देखील प्रमुख स्वामीजी यांचा शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला  आणि हा याचाच पुरावा आहे, की त्यांचे विचार किती शाश्वत आहेत, किती सार्वत्रिक आहेत आणि ज्या महान परंपरांना संतांनी प्रस्थापित केल्या आहेत, ज्या वेदांपासून विवेकानंदांपर्यंत जो प्रवाह, स्वामी सारख्या महान संतांनी पुढे नेला आहे. त्याच वसुधैव कुटुंबकमच्या भावनेचे आज या शताब्दी समारंभातही दर्शन होत आहे. हे जे नगर तयार करण्यात आले आहे, इथे आपल्या हजारो वर्षांची ही महान संत परंपरा, कुठले एक मत, पंथ, आचार, विचार फक्त एवढेच परसवण्यापर्यंत मर्यादित राहिली नाही, तर आपल्या संतांनी संपूर्ण विश्वाला जोडणारा ‘वसुधैव कुटुंबकम’ हा शाश्वत भाव अधिक सशक्त केला आहे. आणि माझे सौभाग्य आहे, की आता ब्रह्मविहारी स्वामी जी काही अधिक  गोष्टीही सांगत आहेत. लहानपणापासूनच, माझ्या मनात अशा काही क्षेत्रांविषयी आकर्षण राहिले आहे. त्यामुळे प्रमुख स्वामीजी यांचेही मी दुरून दर्शन करत असे. त्यावेळी कधी कल्पनाही केली नव्हती, की त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल. मात्र खूप छान वाटत असे, की दुरून का होईना, त्यांच्या दर्शनाची संधी मिळत असे. चांगले वाटत असे. वय लहान  होते. मात्र, जिज्ञासा वाढत होती. त्यानंतर खूप वर्षांनी,1981 साली मला पहिल्यांदा एकट्याला, त्यांच्यासोबत सत्संगाचे सौभाग्य मिळाले आणि माझ्यासाठी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे, माझ्याविषयी काही  माहिती त्यांनी, गोळा करुन ठेवली होती. त्यावेळी पूर्ण वेळ, त्यांनी ना कोणती धर्म चर्चा केली, ना ईश्वराविषयी चर्चा केली, ना काही आध्यात्मिक चर्चा केली. पूर्णतः सेवा, मानव सेवा, याच विषयांवर बोलत होते. ती त्यांची माझी पहिली भेट होती.आणि एकेक शब्द माझ्या मन:पटलावर अंकित होत होता. त्यांचा एकच संदेश होता, की आयुष्याचे सर्वोच्च उद्दिष्ट, सेवा हेच असले पाहिजे. आपण शेवटच्या श्वासापर्यंत सेवाकार्यात गुंतले असलो पाहिजे. आपली शास्त्र तर सांगतात- ‘नर सेवा हीच नारायण सेवा आहे.” सजीवमात्रातच शिव आहे. ते खूप मोठमोठे आध्यात्मिक सिद्धांत, चर्चा, अत्यंत सोप्या शब्दात उलगडून सांगत असत. समोरची व्यक्ती जशी असेल, त्याप्रमाणे ते त्याला बोध देत  असत, जेवढे तो पचवू शकेल, आत्मसात करु शकेल. अब्दुल कलाम जी, इतके मोठे वैज्ञानिक, त्यांनाही, स्वामीजींना भेटून समाधान मिळत असे, काही वेगळी अनुभूती होत असे आणि माझ्यासारखा एक सामान्य सामाजिक कार्यकर्ताही त्यांना भेटायला जात आहे, तेव्हा त्यालाही काही ना काही मिळत असे, समाधान मिळत असे. ही त्यांच्या व्यक्तिमत्वाचीच व्यापकता होती, सखोलता होती. एक आध्यात्मिक संत या नात्याने, आपण खूप काही सांगू शकतो, जाणू शकतो. मात्र, माझ्या मनात एक गोष्ट कायम राहिली आहे. की ते खऱ्या अर्थाने एक समाज सुधारक होते. ते एक सुधारणावादी होते. आपण जेव्हा आपण त्यांचे आपल्या आपल्या पद्धतीने स्मरण करतो, तेव्हा एक धागा मला नेहमीच दिसत असतो. कदाचित आपल्या सगळ्यांना त्या माळेतले वेगवेगळे मणी दिसत असतील, मोती आपल्याला दिसत असतील. मात्र त्यांना एकत्र  गुंफणारा जो धागा आहे, जी तार  आहे, ती म्हणजे, एकप्रकारे, मनुष्य कसा असावा, त्याचे भविष्य कसे असावे, व्यवस्थांमध्ये परिवर्तन का  केले जावे, आपल्या आयुष्यात पारंपरिक आदर्शाना स्थान असावे, मात्र आधुनिकतेची स्वप्ने बघणारे, आधुनिकतेतील प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करणारे असावे, एक अद्भुत संयोग, एक अद्भुत संगम त्यांच्यात होता. त्यांची पद्धतही खूप वेगळी होती. त्यांनी नेहमी लोकांमधील जे काही चांगलं आहे, त्याला प्रोत्साहन दिले. त्यांनी कधीच असे नाही म्हटले की तुम्ही असे करा, ईश्वराचे नाव घ्या, म्हणजे तुमचं सगळं भलं होईल. त्यांनी सांगितलं की तुमच्यात काही उणिवा असतील, काही अडचणी असतील, मात्र तुमच्यात जो  चांगुलपणा आहे, त्यावर लक्ष केंद्रित कर. ते कोणत्याही व्यक्तीमत्वातील शक्तीला आधार देत असत, त्या सामर्थ्याला खतपाणी घालत असत.आपल्या आतील चांगुलपणाच, आपल्या आत असलेल्या, निर्माण होणाऱ्या वाईट गोष्टींना तिथेच संपवून टाकू शकतो,  असा उच्च विचार ते अगदी सहज शब्दांत आपल्याला सांगत असत. आणि याच माध्यमाला, त्यांनी एकप्रकारे, लोकांवर संस्कार करण्याचे, संस्कारातून त्यांच्यात बदल घडवण्याचे माध्यम बनवले होते. शेकडो वर्षांपासूनच्या, ज्या कुप्रथा, आपल्या समाजात उच्च-नीचतेचा भेदभाव निर्माण करण्यास कारणीभूत होत्या, त्या सगळ्या त्यांनी संपवून टाकल्या होत्या. आणि त्यांच्या  वैयक्तिक स्पर्शामुळे  हे शक्य झाले होते. सर्वांना मदत करणे, सर्वांची काळजी करणे, काळ चांगला असो अथवा आव्हानांचा, पूज्य प्रमुख स्वामीजी यांनी समाजहितासाठी कायम सर्वांना प्रेरणा दिली. पुढे राहत, पुढे येत योगदान दिले. जेव्हा मोरबी इथे, पहिल्यांदा मच्छु तलाव दुर्घटना झाली  त्यावेळी मी तिथे स्वयंसेवक म्हणून काम करत होतो. आपले प्रमुख स्वामी, काही संत, त्यांच्यासोबत काही सत्संगी सर्वांना तिकडे पाठवले आणि ते देखील आमच्यासोबत माती उपसायचे काम करत असत. मृतदेहांवर अग्निसंस्कार करण्याच्या कामाला लागले. मला आठवते, 2012 मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो होतो. तसे तर, माझ्या आयुष्यात जे काही महत्वाचे टप्पे आले, त्या त्या वेळी, मी त्यांच्याकडे गेलो होतो.कदाचित खूप कमी लोकांना माहिती असेल, की जेव्हा मी 2002 ची निवडणूक लढवत होतो, पहिल्यांदा मला निवडणूक लढवायची होती, पहिल्यांदा उमेदवारी अर्ज भरत होतो, राजकोटहून माझी उमेदवारी  व्हायची  होते. तेव्हा तिथे  दोन संत उपस्थित होते. मी जेव्हा तिथे गेलो, तेव्हा मला एक डबा देण्यात आला. मी तो उघडला तेव्हा, पहिले की त्याच्या आत एक पेन होते. त्यांनी सांगितले की प्रमुख स्वामीजी यांनी पाठवले आहे. जेव्हा तुम्ही उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी कराल,तेव्हा या पेनने करा. आता तिथून निवडणुकीची सुरुवात केल्यानंतर, मी काशीपर्यंत  निवडणूक लढवायला गेलो. तेव्हापासून एकही अशी निवडणूक नाही, जेव्हा मी उमेदवारी अर्ज भरायला गेलो, आणि त्यावर स्वाक्षरी करण्यासाठी पूज्य प्रमुख स्वामीजींकडून  व्यक्ती तिथे हजर नव्हती .आणि जेव्हा मी काशीला गेलो, तेव्हा माझ्यासाठी आणखी एक आश्चर्याची गोष्ट होती. तिथे पाठवलेल्या पेनचा रंग भाजपाच्या झेंड्यासारखा होता. त्याचे टोपण होते, ते हिरव्या रंगाचे होते, आणि खालचा भाग भगव्या रंगाचा होता.याचा अर्थ, अनेक दिवसांपासून त्यांनी हे  पेन सांभाळून ठेवले  असेल, आणि लक्षात ठेवून, त्याच रंगाचे पेन मला पाठवले. म्हणजे खरं तर व्यक्तिगत रुपात हे काही त्यांचे क्षेत्र नव्हते. तरीही त्यांनी माझी एवढी काळजी घेतली. कदाचित अनेकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल, की 40 वर्षांत एकही वर्ष असे नाही गेले, की प्रमुख स्वामीजींनी माझ्यासाठी कुर्ता-पायजाम्याचे कापड पाठवले नाही. हे माझे सौभाग्य आहे. आणि आपल्याला माहीत आहे, मुलगा काहीही बनेल, कितीही मोठा होईल, तरीही त्याच्या आईवडलांसाठी ते कायम मूलच असतं. देशाने मला पंतप्रधान बनवले. मात्र, जी परंपरा प्रमुख स्वामीजी चालवत असत, त्यांच्यानंतरही मला वस्त्र पाठवण्याची ती परंपरा सुरुच आहे. म्हणजे ते आपलेपण. आणि मला नाही वाटत की हे काही संस्थेचे काम म्हणून केले जाते. न, ते एक आध्यात्मिक नाते होते, पिता-पुत्र या नात्याचा स्नेह त्यामध्ये आहे. एक अतूट बंधन आहे. आणि आजही ते जिथे कुठे असतील, माझ्या प्रत्येक क्षणाकडे बघत असतील. अतिशय बारकाईने, माझ्या कामाकडे लक्ष देत असतील. त्यांनी मला शिकवले, मार्गदर्शन केले. आता मीच त्याच मार्गाने जातो आहे की नाही, याकडे त्यांचे नक्की लक्ष असेल. कच्छमध्ये आलेल्या भूकंपाच्या वेळी मी जेव्हा स्वयंसेवक म्हणून काम करत होतो, तेव्हा तर, माझा मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच नव्हता. पण तिथल्या सर्व संतांना भेटल्यावर सर्वप्रथम  त्यांनी विचारलं, की तुमच्या जेवणाची काय व्यवस्था आहे, मी माझ्या कार्यकर्त्याच्या घरी जाईन, असे सांगितले. त्यावेळी ते म्हणाले, नाही, तुम्ही कुठेही गेलात, तरी तुमच्यासाठी इथे भोजन असेल, तुम्ही उशिरा आलात तरी चालेल. रात्री इथेच जेवायला यायचं आहे. म्हणजे जोपर्यंत मी भूजमध्ये काम करत होतो, तोपर्यंत माझ्या जेवणाची चिंता त्यांनीच केली. प्रमुख स्वामींनी आपल्या शिष्यांना सांगितले असावे, की ते सतत मला आग्रह करत असत, इतका त्यांना माझ्याविषयी स्नेह होता. मी हे  कोणत्याही अध्यात्मिक गोष्टींबद्दल बोलत नाही, तर त्यांच्या तुमच्याशी साध्या-सरळ आणि प्रेमळ वागण्याबद्दल सांगतो आहे.

आयुष्यातील सर्वात कठीण क्षणांमध्ये क्वचितच असा प्रसंग  असेल की जेव्हा स्वतः प्रमुख स्वामींनी मला बोलवले  नसेल किंवा फोनवर माझ्याशी बोलले नसतील, क्वचितच अशी घटना असेल. मला आठवतंय, जसे आत्ता चित्रफीत  दाखवत होते,त्यात त्याचा उल्लेख होता. 1991-92 मध्ये माझ्या पक्षाच्या वतीने  श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा ध्वज फडकवण्यासाठी एकता यात्रेचे आयोजन केले होते. डॉ. मुरली मनोहर जी यांच्या नेतृत्वाखाली ती यात्रा चालू होती आणि मी त्यासाठी  व्यवस्था पाहत असे. जाण्यापूर्वी मी प्रमुख स्वामीजींचे आशीर्वाद घेतले होते, त्यामुळे मी कुठे जात आहे आणि काय करतो आहे हे त्यांना माहीत होते. आम्ही पंजाबमधून जात असताना आमच्या प्रवासात दहशतवाद्यांशी चकमक झाली आणि आमचे काही सहकारी मारले गेले. कुठेतरी गोळीबार झाला आणि त्यात अनेक बळी गेले ही संपूर्ण देशासाठी चिंतेची बाब होती, आणि मग तिथूनच आम्ही जम्मूला पोहोचत होतो. आम्ही श्रीनगरच्या लालचौकात तिरंगा ध्वज फडकवला. पण जम्मूला उतरताच मला पहिला दूरध्वनी आला तो प्रमुख स्वामीजींचा आणि मी सुखरूप आहे ना, ईश्वर  तुम्हाला आशीर्वाद देवो, तुम्ही आलात की पुन्हा भेटूच, तुमच्याकडून ऐकू काय झाले , अगदी सहज आणि सरळ .  मी मुख्यमंत्री झालो, अक्षरधामच्या समोर 20 मीटर अंतरावर, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या माझ्या घरात राहायचो. आणि माझा येण्या-जाण्याचा मार्गही असा होता की मी निघताना अक्षरधामच्या कळसाचे दर्शन घेऊनच पुढे जायचो. अगदी सहज –नित्याचा पाठ .  दहशतवाद्यांनी अक्षरधामवर हल्ला केला, तेव्हा मी प्रमुख स्वामीजींना फोन केला. एवढा मोठा हल्ला झाला आहे, माझे मन धास्तावले, अक्षरधामवर हल्ला झाला, संतांचे काय झाले असेल, गोळीबार झाला असेल का नाही , कोणाला लागल्या तर नसतील, ही चिंतेची बाब होती कारण वातावरण पूर्णत: धूसर होते. अशा संकटाच्या काळात एवढा मोठा दहशतवादी हल्ला, कैक लोक मारले गेले होते. जेव्हा मी प्रमुख स्वामीजीना दूरध्वनी केला तेव्हा ते मला काय म्हणाले असतील, अरे , तुझे घर तर समोरच आहे, तुला काही त्रास झाला  नाही ना? मी म्हणालो,  बाबा , या संकटाच्या काळात तुम्ही माझी आस्थेने काळजी करत आहात. ते म्हणाले हे पहा,  देवावर विश्वास ठेवा , सर्व ठीक होईल. देव सत्याच्या पाठीशी असतो, म्हणजेच कोणतीही व्यक्ती असो, अशा स्थितीत मानसिक संतुलन, स्थैर्य आणि आंतरिक आध्यात्मिक शक्तीशिवाय हे शक्य नाही. जी प्रमुख स्वामींनी आपल्या गुरुजनांकडून आणि आपल्या  तपश्चर्येने आत्मसात केली होती.आणि माझ्या एक गोष्ट नेहमी स्मरणात असते, मला वाटते की ते माझ्यासाठी वडिलांसारखे होते, तुम्हाला ते कदाचित माझे गुरु वाटतील. परंतु आणखी एका गोष्टीकडे माझे लक्ष जाते आणि  दिल्लीतले अक्षरधाम जेव्हा बांधले गेले तेव्हा मी याचा उल्लेखही केला होता, कारण मला कोणीतरी सांगितले होते की यमुनेच्या काठावर अक्षरधाम व्हावे ही योगीजी महाराजांची इच्छा होती. आता बोलता-बोलता योगीजी महाराजांच्या तोंडून ही गोष्ट निघाली असेल, पण आपल्या गुरूंच्या इच्छेला मूर्तरूप देणारा हा शिष्य पहा. योगीजी तर आता राहिले नाहीत, मात्र  योगीजींचे शब्द ते जगत राहिले, कारण योगीजींच्या समोर प्रमुख स्वामी शिष्य होते. एक गुरू म्हणून आपण त्यांचे कर्तृत्व पाहतो, पण एक शिष्य म्हणून मला त्यांचे कर्तृत्व दिसते की  आपल्या गुरूंचे शब्द त्यांनी प्रत्यक्षात आणले. आणि यमुनेच्या तीरावर अक्षरधाम बांधले. आज जगभरातून लोक अक्षरधामला भेट देतात  आणि भारताचा महान वारसा समजून घेण्याचा प्रयत्न करतात. युगा-युगांसाठी  केलेले हे कार्य आहे, युगांना प्रेरणा देणारे हे कार्य आहे. आज जगात कुठेही जा, मंदिरे ही आपल्यासाठी काही नवीन गोष्ट नाही, हजारो वर्षांपासून मंदिरे बांधली जात आहेत. पण आपली मंदिर  परंपरेचा  आधुनिकीकरणाशी मेळ, मंदिराच्या व्यवस्थेमध्ये अध्यात्म आणि आधुनिकता यांची सांगड घालणे. मला वाटते की प्रमुख स्वामीजींनी एक महान परंपरा प्रस्थापित केली आहे. अनेक जण, नव्या पिढीच्या मनात काय काय भरले आहे, असे  मानतात . पूर्वीच्या काळी एक म्हण असायची की सर्व सत्संगी लोकांनो,मला माफ करा, तुम्हाला संन्यासी व्हायचे असल्यास संत स्वामीनारायणांचे अनुयायी व्हा,असा सल्ला ते देत असत आणि नंतर लाडू दाखवत .

असे सांगितले जायचे   की जर तुम्हाला साधू व्हायचे असेल तर संत स्वामीनारायणांचे अनुयायी व्हा, मौज असेल.  ज्या प्रकारे स्वामी विवेकानंदजींनी रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून  संन्यस्थ  जीवनाचा सेवाभावाने मोठा विस्तार केला, त्याचप्रकारे प्रमुख स्वामींनी संत परंपरेचा पूर्णपणे कायापालट केला. प्रमुख स्वामीजीनी देखील संत केवळ स्वतःच्या कल्याणासाठी नव्हे, संत हे समाजाच्या कल्याणासाठी असतात आणि म्हणून त्यांनी प्रत्येक संत घडवले,  इथे बसलेला प्रत्येक संत कोणत्या ना कोणत्या सामाजिक कार्यातून पुढे आला आहे आणि आजही सामाजिक कार्य ही त्यांची जबाबदारी आहे. केवळ आशीर्वाद देणे  आणि मोक्ष मिळेल  असे नाही. ते जंगलात जातात, आदिवासींबरोबर काम करतात. नैसर्गिक आपत्ती आली की ते आपले जीवन स्वयंसेवक म्हणून व्यतीत करतात. आणि ही परंपरा रुजवण्यात आदरणीय प्रमुख स्वामी महाराजांचे मोठे योगदान आहे. मंदिरांच्या माध्यमातून जगात आपली ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी जितका वेळ, ताकद आणि प्रेरणा दिली, तेव्हढ्याच सशक्तपणे ते संतांच्या विकासासाठी कार्यरत असत. प्रमुख स्वामींनी मनात आणले असते तर ते गांधीनगरमध्ये राहू शकले असते, अहमदाबादमध्ये राहू शकले असते, मोठ्या शहरात राहू शकले असते, परंतु त्यांनी आपला बहुतांश वेळ सहारनपूरमध्ये घालवणे पसंत केले. सहारनपूर इथून 80-90 किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथे त्यांनी काय कार्य केले? त्यांनी संतांसाठी प्रशिक्षण संस्थेवर भर दिला आणि आज जेव्हा मी कोणत्याही आखाड्याच्या लोकांना भेटतो तेव्हा मी त्यांना सांगतो की तुम्ही 2 दिवस सहारनपूरला जा, संतांचे प्रशिक्षण कसे असावे, आपले महात्मा कसे असावेत, साधू-महात्मा कसे असावेत, हे पाहून या, ते जातात आणि पाहून येतात. म्हणजे आधुनिकतेत  भाषा शिकवतात, इंग्रजी भाषा, संस्कृत, विज्ञान, आपल्या आध्यात्मिक परंपराही शिकवल्या जातात. म्हणजेच सर्वांगीण विकास करून एक समर्थ असा संत समाजात घडवला गेला पाहिजे. केवळ त्यागी असणं गरजेचं नाही, त्याग असावा मात्र सामर्थ्य जाणवले पाहिजे.  त्यांनी संत परंपरा निर्माण केली , त्यांनी अक्षरधाम मंदिरांच्या माध्यमातून आपल्या भारताच्या महान परंपरेची जगाला ओळख करून दिली. तसेच प्रमुखजी स्वामीजी महाराजांनी उत्तम प्रकारची संत परंपरा निर्माण करण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा उभी केली आहे. त्यांनी अशी एक संस्थात्मक यंत्रणा उभी केली आहे, जी वैयक्तिक व्यवस्थेखाली नाही, त्यामुळे शतकानुशतके लोक येतील आणि जातील, नवीन संत येतील, परंतु ही व्यवस्था अशा प्रकारे बनविली गेली आहे जेणेकरून नवीन परंपरेच्या पिढ्या तयार होत राहतील, हे मला डोळ्यासमोर दिसत आहे. आणि त्यांनी देवभक्ती आणि देशभक्ती यात  कधी फरक केला नाही, असा माझा अनुभव आहे. तुम्ही भगवंताच्या भक्तीसाठी जगता, देशभक्तीसाठी जगता, ते दोघेही माझ्यासाठी सत्संगी आहेत, असे त्यांना वाटते. जो भक्तीसाठी जगतो तोही सत्संगी असतो, जो देशभक्तीसाठी जगतो तोही सत्संगी असतो. आज प्रमुख स्वामीजींचा जन्मशताब्दी सोहळा आपल्या नवीन पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, एक जिज्ञासा  निर्माण होईल. तुम्ही प्रमुख स्वामीजींबाबत अधिक जाणून घेतले तर तुम्हाला समजेल की कोणत्याही मोठ्या संकटाचा सामना करण्यासाठी त्यांनी क्लिष्ट भाषेत उपदेश केला नाही तर  सहज आकलन होईल अशा साध्या सोप्या भाषेत उपदेश केला, सहज-सोप्या जीवनातील उपयुक्त गोष्टी सांगितल्या आणि त्यांनी 80 हजार स्वयंसेवकांचा  एवढा मोठा समूह जोडला आहे असे मला सांगण्यात आले आहे. आम्ही आता येत होतो तेव्हा आपले  ब्रह्मजी मला सांगत होते की हे सर्व स्वयंसेवक आहेत आणि भेट देत असलेले खुद्द पंतप्रधान सुद्धा. मी म्हणालो, तुम्ही पण एक विलक्षण व्यक्तिमत्व आहात, विसरलात का? मी म्हणालो, तुम्ही कमाल करता  आहात, मी एक स्वयंसेवक आहे आणि आपण दोघेही एकमेकांकडे हात दाखवत  आहोत. त्यावर  मी म्हणालो, आता 80 हजारात अजून एकाची भर घाला. असो, खूप काही सांगण्यासारखं आहे, जुन्या आठवणी आज मनात दाटून आल्या आहेत. परंतु मला प्रमुख स्वामींची उणीव नेहमीच जाणवते. आणि मी त्यांच्याकडून कधीच मोठे ज्ञानार्जन केलं नाही, मला त्यांच्या सहवासात जाऊन बसायला आवडायचं. उदाहरणार्थ, तुम्ही थकून झाडाखाली बसले आहात, जरी झाड आपल्याला कोणतेही भाषण देत नसले तरी झाडाखाली बसल्यावर आपल्यला  खूप छान वाटते. प्रमुख स्वामींच्या जवळ बसल्यावर मला देखील असेच वाटायचे. मी वटवृक्षाच्या सावलीत बसलो आहे, ज्ञानाच्या भांडाराच्या चरणी  बसलो आहे. या गोष्टी मी कधी लिहू शकेन की नाही माहीत नाही, पण माझ्या अंतर्मनाचा प्रवास, तो प्रवास अशा संत परंपरेने, आध्यात्मिक परंपरेने युक्त  आहे आणि त्यात आदरणीय योगीजी महाराज, पूज्य प्रमुख स्वामी महाराज आणि पूज्य महंत स्वामी महाराज, आहेत.  मी खूप भाग्यवान आहे की , तामसी  जगात स्वतःचे रक्षण करून अशा सात्विक वातावरणात मला कार्य करण्याचे बळ मिळत आहे. कायमस्वरूपी प्रभाव जाणवतो आणि राजसी देखील बनायचे नाही , तामसी देखील व्हायचे नाही , सात्विक होऊन मार्गक्रमण करायचे , सतत चालत रहायचे आहे.  तुम्हा सर्वांना खूप-खूप  शुभेच्छा.

जय स्वामीनारायण !

***

Sushama Kane/Radhika A/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai