Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अलीगढ येथील राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

अलीगढ येथील राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण


भारत माता की जय,

भारत माता की जय।

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल जी, उत्तर प्रदेशचे यशस्वी आणि युवा  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उप मुख्यमंत्री दिनेश शर्मा जी, उत्तर प्रदेश सरकारचे  मंत्रिगण, अन्य खासदार, आमदार आणि अलिगढचे माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो, 

आज अलिगढसाठी , पश्चिम उत्तर प्रदेशसाठी खूप मोठा दिवस आहे. आज राधा अष्टमी देखील आहे. यामुळे आजच्या दिवसाचे पावित्र्य आणखी वाढते. ब्रजभूमीच्या कणाकणात, मातीत सर्वत्र  राधा आहे. मी तुम्हा सर्वांना आणि संपूर्ण देशाला राधा अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो.

आपले सौभाग्य आहे की  विकासाच्या एवढ्या मोठ्या कामांची सुरुवात आज या पवित्र दिनी होत आहे. आपले  संस्कार आहेत की जेव्हा एखादे काही  शुभ कार्य होते तेव्हा आपल्याला आपल्या कुटुंबातील वडीलधारी मंडळींची नक्कीच आठवण येते. मला  आज या भूमीचे महान सुपुत्र स्वर्गीय कल्याण सिंह जी यांची अनुपस्थिति खूप जाणवत आहे. आज कल्याण सिंह जी आपल्याबरोबर असते तर राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठ आणि संरक्षण क्षेत्रात निर्माण होत असलेली अलिगढची नवी ओळख पाहून खूप खूष झाले असते आणि त्यांचा आत्‍मा जिथे कुठे असेल आपल्याला आशीर्वाद देत असेल. 

मित्रांनो ,

भारताचा हजारो वर्षांचा इतिहास अशा  राष्ट्रभक्तांनी भरलेला आहे, ज्यांनी वेळोवेळी भारताला आपली तपस्या आणि त्यागातून दिशा दिली आहे. आपल्या स्वातंत्र्य चळवळीत अशा कितीतरी महान व्यक्तींनी आपले सर्वस्व पणाला लावले. मात्र हे देशाचे दुर्भाग्य आहे की स्वातंत्र्यानंतर असे राष्ट्र नायक आणि  राष्ट्र नायिकांच्या तपस्येशी देशाच्या पुढच्या पिढयांना ओळख करून देण्यात आली नाही. त्यांच्या गाथा जाणून घेण्यापासून देशाच्या कित्येक पिढ्या वंचित राहिल्या. 

20  व्या शतकातल्या त्या चुका आज 21 व्या शतकातील भारत सुधारत आहे. महाराजा सुहेलदेव जी असतील, दीनबंधु चौधरी छोटूराम जी असतील, किंवा मग आता राजा महेंद्र प्रताप सिंह जी, राष्ट्र निर्माणातल्या त्यांच्या  योगदानाची नवीन पिढीला ओळख करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आज देशात होत आहे. आज जेव्हा देश आपल्या स्वातंत्र्याचे 75 वर्षाचे पर्व साजरे करत आहे, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, तेव्हा या प्रयत्नांना आणखी गती देण्यात आली आहे. भारताच्या स्वातंत्र्यात  राजा महेंद्र प्रताप सिंह यांच्या योगदानाला वंदन करण्याचा हा प्रयत्न असेच  एक पवित्र निमित्त आहे.

 मित्रांनो ,

आज देशातील प्रत्येक युवकाने, जो मोठी स्वप्न पाहत आहे , ज्याला मोठे लक्ष्य साध्य करायचे आहे, त्याने  राजा महेंद्र प्रताप सिंह जी यांच्याबाबत अवश्य जाणून घ्यावे, त्यांच्याबाबत वाचायला हवे. राजा महेंद्र प्रताप सिंह जी यांच्या जीवनातून दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आपली स्वप्ने साकार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा  करण्याची तयारी आपल्याला आजही शिकायला मिळते.  त्यांनी  भारताच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेतला होता आणि यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण वेचला.  त्यांनी केवळ भारतातच राहून आणि भारतातल्या लोकांनाच  प्रेरित केले नाही तर ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी जगातील कानाकोपऱ्यात गेले. अफगाणिस्तान असेल, पोलंड असेल, जपान असेल, दक्षिण आफ्रिका असेल, आपल्या आयुष्याचा प्रत्येक धोका स्वीकारत ते भारतमातेला बेड्यांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी झटत राहिले, प्राणपणाने लढत राहिले , आयुष्यभर काम करत राहिले.

मी आजच्या युवकांना सांगेन कि जेव्हा कधी, माझ्या देशातल्या युवकांनो, माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐका , मी देशातल्या युवकांना सांगेन की त्यांना एखादे लक्ष्य कठीण वाटले, काही अडचणी समोर आल्या तर माझी तुम्हाला विनंती आहे की  राजा महेंद्र प्रताप सिंह जी यांचे नक्की स्मरण करा, तुमचे मनोबल नक्की वाढेल. राजा  महेंद्र प्रताप सिंह जी ज्याप्रमाणे  एक लक्ष्य, एकनिष्ठ होऊन भारताच्या स्वातंत्र्यासाठी झटत राहिले , ते आजही आपणा सर्वांना प्रेरणा देत आहे.

आणि मित्रांनो ,

आज जेव्हा मी तुमच्याशी बोलत आहे, तेव्हा मला देशाचे आणखी एक महान स्‍वातंत्र सैनिक,  गुजरातचे सुपुत्र, श्याम जी कृष्ण वर्मा जी यांचीही आठवण येत आहे. पहिल्या जागतिक युद्धाच्या वेळी  राजा महेंद्र प्रताप जी खास  श्यामजी कृष्ण वर्मा जी आणि लाला हरदयाल जी यांना भेटण्यासाठी युरोपला गेले होते. त्याच बैठकीत जी दिशा ठरली, त्याचा परिणाम आपल्याला अफगाणिस्तानात, भारताच्या पहिल्या निर्वासित सरकारच्या रूपाने पहायला मिळाला. या सरकारचे नेतृत्व राजा महेंद्र प्रताप सिंह जी यांनीच केले होते.

 हे माझे  सौभाग्य होते की जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा मला श्यामजी कृष्ण वर्मा जी यांच्या अस्थी 73 वर्षांनंतर भारतात आणण्यात यश मिळाले होते. आणि जर तुम्हाला कधी कच्‍छला जाण्याची संधी मिळाली तर  कच्‍छच्या मांडवी येथे श्‍याम जी कृष्‍ण वर्मा जी यांचे एक खूपच प्रेरक स्‍मारक आहे, जिथे त्यांचे अस्थि कलश ठेवण्यात आले आहेत , ते आपल्याला भारतमातेसाठी जगण्याची प्रेरणा देतात.

आज देशाचा पंतप्रधान या नात्याने, मला पुन्हा एकदा हे  सौभाग्य लाभले आहे की  राजा महेंद्र प्रताप जी यांच्यासारख्या दूरदर्शी आणि  महान स्वातंत्र्यसैनिकांच्या नावे बांधण्यात येत असलेल्या विद्यापीठाचे मी भूमीपूजन करत आहे. माझ्या आयुष्यातील हे मोठे सौभाग्‍य आहे. आणि अशा पवित्र प्रसंगी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी आलात, जनता-जनार्दनचे  दर्शन करणे हे देखील शक्तिदायक असते.

मित्रांनो ,

राजा महेंद्र प्रताप सिंह जी, हे केवळ देशाच्या स्वातंत्र्यासाठीच लढले नाहीत, त्यांनी भारताच्या भविष्याच्या निर्मितीची पायाभरणी करण्यात देखील सक्रिय योगदान दिले होते. त्यांनी आपल्या देश-विदेशातील दौऱ्यांमधून मिळालेल्या अनुभवांचा उपयोग भारताची शिक्षण व्यवस्था आधुनिक बनवण्यासाठी केला. वृंदावन येथील आधुनिक तंत्र महाविद्यालय, त्यांनी आपल्या  संसाधनांतून, आपल्या वाड-वडिलांची  संपत्ति दान करून उभारले आहे. अलिगढ  मुस्लिम विद्यापीठासाठी देखील  राजा महेंद्र प्रताप सिंह यांनीच मोठी जमीन दिली होती. आज स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात जेव्हा  21 व्या शतकातील भारत शिक्षण आणि कौशल्याच्या नव्या युगाच्या दिशेने वाटचाल करत आहे, तेव्हा भारतमातेच्या अशा अमर सुपुत्रांच्या नावे विद्यापीठ उभारले जाणे ही त्यांना खरी कार्यांजली आहे. ही कल्पना  साकार केल्याबद्दल योगी जी आणि त्यांच्या संपूर्ण  टीमचे खूप-खूप अभिनंदन .

मित्रांनो ,

हे विदयापीठ आधुनिक शिक्षणाचे एक मोठे केंद्र तर बनेलच , त्याचबरोबर देशात संरक्षणाशी संबंधित शिक्षण, संरक्षण उत्पादनाशी संबंधित तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ बनवणारे केंद्रही बनेल. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात ज्याप्रमाणे शिक्षण, कौशल्य आणि स्थानिक भाषेत शिक्षणावर भर देण्यात आला आहे, त्यामुळे या विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोठा लाभ होईल.

आपली  सैन्य ताकद मजबूत करण्यासाठी आत्मनिर्भरतेच्या दिशेने पुढे जाणाऱ्या भारताच्या प्रयत्नांना या विद्यापीठात होणारे शिक्षण नवी गती देईल. आज देशच नाही तर जग देखील पाहत आहे की आधुनिक ग्रेनेड, बंदुकांपासून ते लढाऊ विमाने, आधुनिक ड्रोन, युद्ध नौका, यासारखी संरक्षण सामग्री भारतातच निर्माण करण्याचे अभियान सुरु आहे. भारत एकेकाळची  संरक्षण सामग्रीचा मोठा आयातदार ही आपली प्रतिमा मोडून काढत आहे , …नाहीतर आपली प्रतिमा अशीच आहे, आपण संरक्षणासाठी जे काही हवे ते आयात करतो, बाहेरून मागवतो. स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली, अजूनही आपण बाहेरून मागवत आहोत, …ही प्रतिमा झटकून जगातील एक प्रमुख संरक्षण सामुग्री निर्यातदार अशी नवी ओळख निर्माण करण्याच्या संकल्पासह पुढे जात आहे. भारताच्या या बदलत्या रूपाचे एक खूप मोठे केंद्र हा आपला उत्तर प्रदेश बनणार आहे. आणि उत्तर प्रदेशचा खासदार या नात्याने मला या गोष्टीचा विशेष अभिमान वाटतो.

मित्रांनो,

थोड्या वेळापूर्वी संरक्षण उत्पादन मार्गिकेच्या अलिगढ नोड’ च्या प्रगतीचा मी आढावा घेतला. अलिगढमध्ये दीड  डझनहून अधिक  संरक्षण सामुग्री उत्पादक कंपन्या शेकडो  कोटी रुपयांच्या गुंतुवणूकीतून हजारो नवे रोजगार निर्माण करतील . अलिगढ  नोड मध्ये छोटी हत्यारे,  शस्त्रे, हवाई संरक्षणाशी निगडीत उत्पादने, धातूचे सुटे भाग,  एन्टी ड्रोन सिस्टम, डिफेन्स पैकेजिंग सारखी उत्पादने बनवणारे  नवीन कारखाने सुरु व्हावेत यासाठी नवे उद्योग उभारले जात आहेत. हे बदल अलिगढ  आणि आसपासच्या प्रदेशाला एक नवी ओळख देतील.

मित्रांनो,

आतापर्यंत लोक आपली घरे आणि दुकानांचे संरक्षण करण्यासाठी अलिगढच्या भरवशावर अवलंबून असायचे, माहित आहे ना ? कारण अलिगढचे कुलूप जर लावलेले असेल तर लोक निश्चिंत असायचे. आणि आज मला लहानपणीची आणखी एक गोष्ट सांगायची इच्छा होत आहे. साधारण 55-60 वर्षे जुनी गोष्ट आहे. आम्ही लहान मुले होतो, अलिगढच्या कुलुपाचे जे विक्रेते असायचे , एक मुस्लिम पाहुणे होते. ते दर तीन महिन्यांनी आमच्या गावात यायचे. अजूनही मला आठवतंय ते काळे जॅकेट घालायचे. आणि विक्रेते या नात्याने दुकानांमध्ये आपले कुलूप ठेवून जायचे आणि तीन महिन्यांनी येऊन आपले पैसे घेऊन जायचे. गावाच्या आसपासच्या परिसरातील गावांमध्येही व्यापाऱ्यांकडे जायचे, त्यांनाही कुलुपे द्यायचे. आणि माझ्या वडिलांशी त्यांची खूप चांगली मैत्री होती.  आणि ते जेव्हा येत, तेव्हा आमच्या गावात ते चार – सहा दिवस मुक्कामी असत. आणि दिवसभर जे पैसे वसूल होत असत ते माझ्या वडिलांजवळ ठेवत असत आणि माझे वडील ते पैसे सांभाळून ठेवत असत. आणि चार-सहा दिवसांनी जेंव्हा ते गाव सोडून जात, तेंव्हा माझ्या वडिलांकडून ते पैसे घेऊन, आपल्या ट्रेनने निघून जात. लहानपणी उत्तर प्रदेशची दोन शहरे आमच्या  खूप परिचयाची होती. एक सीतापुर आणि दूसरे अलीगढ . गावात कुणालाही डोळ्यांच्या आजारांवर उपचार करवून घ्यायचे असतील तर प्रत्येकजण म्हणत असे सीतापूरला जा. आम्हाला त्यातलं फार काही समजत नसे मात्र सीतापुर सगळ्यांकडून ऐकायला मिळत असे. आणि दुसरं, या महाशयांमुळे अलीगढ  सारखं सारखं  कानावर पडत असे. 

 

मात्र मित्रांनो,

आता अलीगढ ची संरक्षण उपकरणे देखील.. कालपर्यंत ज्या अलीगढ मधील प्रसिद्ध कुलपांमुळे घरे – दुकाने सुरक्षित ठेवण्याचे काम होत होते, ते माझे अलीगढ  21 व्या शतकात भारताच्या सीमांचे रक्षण करेल.  इथे अशी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे बनतील. ‘एक जिल्हा-एक उत्पादन’ योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश सरकारने अलीगढच्या कुलूप आणि हार्डवेयर उद्योगाला नवी ओळख देण्याचे काम केले आहे. यामुळे युवकांसाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी देखील नव्या संधी निर्माण होत आहेत. आता संरक्षण उद्योगामुळे देखील येथे असलेल्या उद्योगांना, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना देखील विशेष फायदा होईल या उद्योगांना प्रोत्साहन मिळेल. जे लहान उद्योजक आहेत, त्यांच्यासाठी देखील डिफेंस कॉरिडोर अलीगढ  नोड( अलीगढ उत्पादन पट्टा) मध्ये नवनवीन संधी निर्माण होतील.

बंधू  आणि भगिनींनो,

डिफेंस कॉरिडोरच्या लखनऊ  नोड मध्ये जगातील सर्वोत्तम प्रक्षेपणास्त्रापैकी एक ब्रह्मोसच्या निर्मितीचा प्रस्ताव देखील आहे. यासाठी येत्या काही वर्षांत 9 हजार कोटी रुपये गुंतवले जात आहेत. झाशी  नोडमध्ये देखील आणखी एक क्षेपणास्त्र निर्मितीशी संलग्न फार मोठे कारखाने सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. उत्तर प्रदेश डिफेंस कॉरिडोर, (संरक्षण विषयक उत्पादनक्षेत्र पट्टा) अशीच मोठी गुंतवणूक  आणि रोजगाराच्या अनेक संधी घेऊन येत आहे.

मित्रांनो,

 

आज उत्तर प्रदेश, देश आणि जगातील प्रत्येक लहान – मोठ्या गुंतवणूकदारांचे आकर्षण केंद्र बनत आहे. जेव्हा गुंतवणुकीस पोषक  वातावरण, आवश्यक त्या सुविधा मिळतात तेव्हाच हे घडून येते. डबल इंजिन सरकारचा डबल फायदा याचे उत्तम उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेश. योगीजी आणि त्यांच्या संपूर्ण चमूने ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हा मूलमंत्र समजून घेत, उत्तर प्रदेशाला एक नव्या भूमिकेसाठी तयार केले आहे. आता सर्वांच्या प्रयत्नाने हे आणखी पुढे न्यायचं आहे. समाजाचे जे घटक विकासापासून वंचित ठेवले गेले अशा प्रत्येक घटकाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत संधी दिली जात आहे. आज मोठमोठे पायाभूत सुविधा प्रकल्प आणि मोठ्या निर्णयांमुळे उत्तर प्रदेश चर्चेत आहे. पश्चिम उत्तर प्रदेश याचा सर्वात मोठा लाभार्थी आहे.

ग्रेटर नोएडामध्ये एकात्मिक औद्योगिक वसाहतीची निर्मिती, मल्टी मोडल लॉजिस्टिक्स हब, जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली -मेरठ प्रादेशिक द्रुतगती वाहतूक व्यवस्था, मेट्रो जोडणी, आधुनिक महामार्ग आणि एक्सप्रेस वे, अशी अनेक कामे आज पश्चिम उत्तर प्रदेशात होत आहेत. उत्तर प्रदेशात सुरु असलेले हे हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प, येणाऱ्या काळात भारताच्या प्रगतीचा पाया बनतील.  

बंधू  आणि भगिनींनो,

ज्या उत्तर प्रदेश राज्याकडे, देशाच्या प्रगतीतला अडथळा म्हणून बघितलं जायचं, तेच  उत्तर प्रदेश आज देशाच्या मोठमोठ्या अभियानांचे  नेतृत्व करत आहे, हे बघून मला आनंद होतो. शौचालय बांधण्याची मोहीम असो, गरिबांना पक्की घरं देण्याचे अभियान असो, उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडण्या असोत, वीज जोडण्या असो, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी असो, प्रत्येक योजना, प्रत्येक अभियानात देशाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात गाठण्यात योगीजींच्या उत्तर प्रदेशाने अग्रणी भूमिका बजावली आहे. नाहीतर, मला आठवतं, ते दिवस मी कधीच विसरू शकत नाही, जेंव्हा 2017 पूर्वी, गारिबांसाठीच्या प्रत्येक योजनेतच्या अंमलबजावणीत, इथे अडथळा निर्माण केला जात असे. एक एक योजना लागू करण्यासाठी केंद्र सरकारला डझनावारी पत्र लिहावी लागत होती, मात्र, तरीही इथे पाहिजे त्या वेगाने कामं होत नसत. ही मी 2017 पूर्वीची परिस्थिती सांगतो आहे… जसं व्हायला पाहिजे, तसं  काम होत नव्हतं.

मित्रांनो,

उत्तर प्रदेशात कसे घोटाळे होत, राज्यकारभार कसा भ्रष्टाचाऱ्यांच्या हातात देऊन टाकला होता, लोक अजून विसरू शकत नाहीत. आज योगीजींचे सरकार पूर्ण प्रामाणिकपणे उत्तर प्रदेशच्या विकासासाठी झटते आहे. एक काळ होता, जेंव्हा येथे शासन-प्रशासन, गुंड आणि माफिया चालवायचे, मात्र आज माफियाराज चालवणारे, वसूली करणारे तुरुंगात आहेत.

 मला विशेषतः पश्चिम उत्तर प्रदेशातल्या लोकांना आठवण करुन द्यायची आहे. या भागात चार – पाच वर्षांपूर्वीपर्यंत लोक आपल्याच घरात दहशतीखाली जगत होते. मुलींना घराबाहेर पडण्याची, शाळा – कॉलेजला जायची भीती वाटत होती. जोपर्यंत मुली सुखरूप घरी पोहोचत नसत, तोपर्यंत आई वडिलांचा जीव टांगणीला लागलेला असायचा. त्या परिस्थितीत अनेक लोकांना आपली पिढीजात घरं सोडून जावं  लागलं, पलायन करावं लागलं. आज मात्र, उत्तर प्रदेशात कुठलाही गुन्हेगार गुन्हा करण्यापूर्वी शंभरवेळा विचार करेल, अशी सरकारची जरब आहे.

योगीजींच्या सरकारमध्ये गरिबांना न्याय मिळतो, गरिबांचा सन्मान देखील होतो. योगीजींच्या नेतृत्वात उत्तर प्रदेशच्या बदलत्या कार्यशैलीचे एक मोठे उदाहरण म्हणजे सर्वांना मोफत लस मोहीम. उत्तर प्रदेशात आतापर्यंत 8 कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे. देशात एका दिवसात सर्वात जास्त लसीकरणाचा विक्रम देखील उत्तर प्रदेशनेच केला आहे. कोरोनाच्या या संकट काळात गरिबांची काळजी, सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. कुणीही गरीब उपाशी राहू नये म्हणून गेले अनेक महीने मोफत धान्य वाटप केले जात आहे. गरिबांना उपासमारीपासून वाचविण्यासाठी मोठ मोठे देश जे करु शकले नाहीत, ते आज भारत करत आहे, हा आमचा उत्तर प्रदेश करत आहे.

मित्रांनो,

स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवात ग्रामीण अर्थव्यवस्था वेगाने बदलत आहे. बदलांशी कसं जुळवून घ्यायचं, याचा मार्ग स्वतः चौधरी चरण सिंगजी यांनी अनेक दशकांपूर्वीच देशाला दाखवून दिला आहे. जो मार्ग चौधरी साहेबांनी दाखवला, त्यामुळे देशातील शेतमजूर आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना किती फायदा झाला, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. आजच्या अनेक पिढ्या त्या सुधारणांमुळेच प्रतिष्ठेचं जीवन जगू शकत आहेत.

देशातल्या ज्या छोट्या शेतकऱ्यांची चौधरी साहेबांना काळजी होती, त्या शेतकऱ्यांसोबत सरकारने त्यांचा एक सहकारी म्हणून उभे राहावे हे अत्यंत आवश्यक आहे. या छोट्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षाही कमी भूमी आहे आणि आपल्या देशात अशा अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या 80 टक्क्यांपेक्षाही अधिक आहे. म्हणजेच देशातील 10 शेतकऱ्यांकडे जी जमीन आहे, त्यापैकी 8 शेतकरी असे आहेत ज्याच्याजवळ जमिनीचा फक्त एक तुकडा आहे. म्हणूनच अशा अल्पभूधारक शेतकऱ्यांना बळ द्यावे,असा केंद्र सरकारचा सतत प्रयत्न सुरु आहे. मग कृषीखर्चाच्या दीडपट किमान हमी भाव पिकांना देणे असो, किसान क्रेडिट कार्डचा विस्तार करणे असो, पीक विमा योजनेत सुधारणा करणे असो, तीन हजार रुपयांच्या निवृत्तिवेतनाची व्यवस्था असो, असे अनेक निर्णय या छोट्या, अल्पभूधारक शेतकऱ्यांना सक्षम करत आहेत.

 

कोरोनाच्या या काळात देशभरातील छोट्या शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम थेट हस्तांतरित केली आहे. यापैकी 25 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम फक्त उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांना मिळाली आहे.उत्तरप्रदेशात, गेल्या चार वर्षात किमान हमीभावानुसार धान्य खरेदीचे नवनवे विक्रम रचले गेले, याचा मला अतिशय आनंद आहे. ऊसाची किंमत मिळण्यात ज्या अडचणी येत होत्या, त्या ही सातत्याने कमी केल्या जात आहेत. गेल्या चार वर्षात, उत्तरप्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक लाख 40 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम देण्यात आली आहे. येणारे वर्ष तर उत्तरप्रदेशातील ऊस उत्पादकांसाठी नव्या संधीची दारे ठोठावणारे ठरणार आहे. ऊसापासून तयार होणारे इथेनॉल आणि इतर जैव इंजिनाचा गाडीच्या इंधनासाठीचा वापर वाढवला जात आहे.याचा लाभ पश्चिम उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांनाही होणार आहे.

 मित्रांनो,

अलीगढ़सह संपूर्ण पश्चिम उत्तर प्रदेश पुढे यावा, प्रगतीपथावर यावा  यासाठी योगीजींचे सरकार आणि केंद्र सरकार खांद्याला खांदा लावून अहोरात्र परिश्रम करत आहे. आपण सर्वांनी मिळून हा प्रदेश आणखी समृद्ध करायचा आहे, इथल्या मुलामुलींची ताकद वाढवायची आहे. आणि प्रत्येक विकास विरोधी शक्तीपासून उत्तर प्रदेशाला वाचवायचे आहे. राजा महेंद्र प्रताप सिंह यांच्यासारख्या राष्ट्र नायकांपासून प्रेरणा घेत आपण आपली सगळी उद्दिष्टे साध्य करु शकू. याच इच्छेसह, आज आपण इतक्या मोठ्या संख्येने आशीर्वाद द्यायला इथे  आलात, आपल्या सगळयांचे दर्शन घेण्याचे भाग्य मला मिळाले, यासाठी मी तुम्हा सगळयांना धन्यवाद देतो. आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !

दोन्ही हात वर करुन माझ्यासोबत म्हणा!- मी म्हणेन राजा महेंद्र प्रताप सिंह, आपण सर्वांनी दोन्ही हात वर करुन म्हणायचे आहे–

  अमर रहे, अमर रहे।

 राजा महेंद्र प्रताप सिंह

 अमर रहे, अमर रहे।

 राजा महेंद्र प्रताप सिंह

 अमर रहे, अमर रहे।

 राजा महेंद्र प्रताप सिंह

 अमर रहे, अमर रहे।

 

भारत माता की

 जय।

 

भारत माता की

जय।

 

 

 

खूप खूप धन्‍यवाद!!

 

***

MC/RA/SK/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com