Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अलीगढ़ मुस्लीम विद्यापीठाच्या शतकमहोत्सवी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

अलीगढ़ मुस्लीम विद्यापीठाच्या शतकमहोत्सवी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण


 

नमस्‍कार, अलीगढ़ मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू, सन्माननीय डॉक्टर सैयदना मुफद्दल सैफुद्दीन साहेब, शिक्षण मंत्री डॉ रमेश पोखरियाल निशंक जी, शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे जी, उपकुलगुरू भाई तारिक मन्सूर जी, सर्व प्राध्यापक गण, इतर कर्मचारी, या कार्यक्रमात सहभागी झालेले एएमयुचे हजारो विद्यार्थी, माजी विद्यार्थी, इतर मान्यवर आणि मित्रांनो,

अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या शताब्दी समारंभाच्या या ऐतिहासिक प्रसंगी तुमच्या आनंदात सहभागी होण्याची संधी आपण मला दिलीत त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले आभार मानतो. मी फोटोंमध्ये बघत होतो, सेंच्युरी गेट्स, सामाजिक शास्त्रे  विभाग, जनसंवाद विभाग, सर्व  विभागांच्या इमारती अत्यंत सुरेख सजवण्यात आल्या आहेत. या केवळ इमारती नाहीत, त्यांच्यासोबत शिक्षणाचा जो इतिहास जोडला गेला आहे, ती भारताचा अनमोल वारसा आहे.

आज एएमयु मधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले अनेक लोक, भारतात अनेक संस्थांमध्ये  सर्वोच्च पदांवर आहेत एवढेच नाही, तर जगातल्या अनेक देशांमध्ये आहेत. मला माझ्या परदेश दौऱ्यांदरम्यान इथले अनेक माजी विद्यार्थी भेटतात, जे खूप अभिमानाने सांगतात की मी ए एमयु मध्ये शिकलो आहे. ए एम यु चे विद्यार्थी या परिसरातून जातांना आपल्यासोबत गंमत, हसते-खेळते वातावरण आणि शेरो-शायरीची एक वेगळी शैली घेऊन येतात. ते जगात कुठेही असोत, भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात.

प्राउड अलीग्सहेच म्हणता ना तुम्ही? आणि तुमच्या या अभिमामाचे रास्त कारणही आहे. आपल्या शंभर वर्षांच्या इतिहासात अलिगढ मुस्लीम विद्यापीठाने लाखो आयुष्ये  घडवली आहेत, समृद्ध केली आहेत, त्यांना एक आधुनिक आणि वैज्ञानिक विचार दिला आहे. समाजासाठी, देशासाठी काही करण्याची प्रेरणा जागृत केली आहे. मी सगळ्यांची नावं घेतलीत, तर कदाचित वेळ कमी पडेल. अलिगढ मुस्लीम विद्यापीठाची ही ओळख, या सन्मानाचा आधार त्याची मूल्ये आहेत, ज्यांच्या आधारावर सर सैयद अहमद खान यानी या संस्थेची स्थापना केली होती. असे प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि या शंभर वर्षात अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या माध्यमातून देशाची सेवा करणाऱ्या प्रत्येक शिक्षक आणि प्राध्यापकाचे मी अभिनंदन करतो.

आता कोरोनाच्या या संकटकाळात देखील एएमयु ने जशाप्रक्रारे समाजाची मदत केली, ती अभूतपूर्व आहे. हजारो लोकांची मोफत चाचणी करणे, अलगीकरण कक्ष बनवणे, प्लाज्मा बँक बनवणे आणि पीएम केअर निधीत मोठे योगदानही आपण दिलेत. यातून समाजाप्रती आपल्या जबाबदाऱ्या पार पडण्याचे गांभीर्यच लक्षात येते.

आता काही दिवसांपूर्वी मला कुलगुरू डॉ सय्यदना साहेबांनी पत्र पाठवले होते. त्यांनी देशाच्या लसीकरण कार्यक्रमात सर्वप्रकारे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. देशाला सर्वोच्च स्थानी ठेवणाऱ्या अशाच संघटीत प्रयत्नांमधून आज भारत कोरोना सारख्या जागतिक संकटांचा यशस्वीपणे सामना करतो आहे.

 

मित्रांनो,

अनेक लोक मला हे सांगतात की एएमयु चा परिसर आता एखाद्या संपूर्ण शहरासारखा आहे. अनेक विभाग, डझनभर वसतिगृहे, हजारो शिक्षक, प्राध्यापक, लाखो विद्यार्थी या सगळ्यांमुळे भारताचे एक लघुरूपच तिथे बघायला मिळते. एएमयु मध्ये एका बाजूला उर्दू शिकवली जाते, तर हिंदी आणि अरबीही शिकवली जाते. आणि इथे संस्कृतच्या शिक्षणाचा ही एक शतकभर जुना विभाग आहे. इथल्या वाचनालयात कुराणाची हस्तलिखित प्रत आहे आणि इथे गीता-रामायणाचे अनुवाद देखील त्याचप्रकारे जतन करुन ठेवले आहेत. ही विविधता एएमयु सारख्या प्रतिष्ठीत संस्थांचीच नाही, तर देशाचीही ताकद आहे. आपल्याला या ताकदीचा विसर पडू  द्यायचा नाही आणि तिला कमकुवतही होऊ द्यायचे नाही. एएमयु च्या परिसरात, एक भारत-श्रेष्ठ भारताची भावना दिवसेंदिवस अधिकाधिक मजबूत होत जावी, यासाठी  आपल्याला मिळून काम करायचे आहे.

 

मित्रांनो,

गेल्या 100 वर्षात, एएमयु मुळे जगातील अनेक देशांशी भारताचे संबंध मजबूत करण्याचेही काम केले आहे. उर्दू, फारसी आणि अरबी भाषांमध्ये इथे जे संशोधन होते, इस्लामी साहित्याविषयी जे संशोधन होते, त्यातून संपूर्ण इस्लामी जगासोबत भारताच्या सांस्कृतिक संबंधांना एक नवी उर्जा मिळते.

मला असे सांगण्यात आले की आता सुमारे एक हजार विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत. अशावेळी एएमयु ची ही जबाबदारी आहे की आपल्या देशात जे उत्तम आहे, उत्कृष्ट आहे, जे देशाची ताकद आहे, ते बघून, ते शिकून, त्याच्या आठवणी मनात घेऊन हे परदेशी विद्यार्थी आपापल्या देशात परत जावेत. कारण एएमयु मध्ये ते जी चर्चा ऐकतील, बघतील त्या आधारावरच ते एक देश म्हणून भारताची प्रतिमा,ओळख आपल्या मनात तयार करतील. म्हणूनच आपल्या संस्थेवर अशाप्रकारे दुप्पट जबाबदारी आहे. 

आपल्याविषयीचा आदर वाढवण्याची आणि आपली जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडण्याची. आपल्याला एकीकडे आपला सन्मानही वाढवायचा आहे आणि आपली जबाबदारीही पार पडायची आहे. आपल्याला एकीकडे आपल्या विद्यापीठाची ही सांस्कृतिक शक्तीही वाढवायची आहे आणि दुसरीकडे राष्ट्रबांधणीचे आपले कर्तव्य पार पाडत राहायचे आहे. मला विश्वास आहे, एएमयु शी संबंधित प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनी आपली कर्तव्ये लक्षात घेऊनच पुढे वाटचाल करेल. सर सय्यद यांनी सांगितलेली एक गोष्ट मला इथे आपल्याला सांगायची आहे.  त्यांनी म्हटले होते आपल्या देशाची काळजी करणाऱ्यांचे पहिले आणि सर्वात मोठे कर्तव्य आहे की त्यांनी  सर्व लोकांच्या कल्याणासाठी काम करावे. मग त्या लोकांची जात, विचारसरणी किंवा धर्म कुठलाही असो.

 

मित्रांनो,

आपले हे मत अधिक स्पष्टतेनं मांडण्यासाठी सर सय्यद यांनी एक उदाहरणही दिले होते. त्यांनी म्हटले जोते- ज्या प्रकारे मानवी आयुष्य आणि मानवी शरीर निरोगी राहण्यासाठी शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी राहणे गरजेचे आहे, तशाच प्रकारे, देशाच्या समृद्धीसाठी देखील त्याचा प्रत्येक पातळीवर, सर्व अंगांनी विकास होणे आवश्यक आहे.

 

मित्रांनो,

आज देशही त्याच मार्गाने पुढे वाटचाल करतो आहे जिथे प्रत्येक नागरिकाला काहीही भेदभाव न होता देशात सुरु असलेया विकासाचे लाभ मिळतील. आज देश त्याही मार्गाने पुढे जातो आहे, जिथला प्रत्येक नागरिक संविधानाने त्याला दिलेल्या अधिकारांविषयी निश्चिंत राहील, आपल्या भविष्याविषयी निश्चिंत राहील. देश आज त्या मार्गाने पुढे जातो आहे, जिथे  धर्मामुळे कोणी मागे  राहणार नाही, सर्वांना पुढे वाटचाल करण्याची समान संधी मिळेल, सर्व लोक आपली स्वप्ने पूर्ण करु शकतील. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वासहा या विचारांचा पाया आहे. देशाची नियत आणि धोरणे यांच्यातून हाच संकल्प झळकतो. आज देशात गरिबांसाठी ज्या योजना बनवल्या जात आहेत त्या कोणत्याही भेदभावाविना सर्व वर्गांपर्यंत पोहोचत आहेत.

कुठलाही भेदभाव न होता, 40 कोटींपेक्षा जास्त गरिबांची बँक खाती उघडली आहेत. काहीही भेदभाव न करता 2 कोटींपेक्षा जास्त गरिबांना पक्की घरे देण्यात आली आहेत. कुठल्याही भेदभावाविना कोरोनाच्या या काळात 80 कोटी देशबांधवांना मोफत अन्न मिळाले आहे. कोणताही भेदभाव न होता, आयुष्मान योजनेअंतर्गत 50 कोटी नागरिकांवर  पाच लाखांपर्यंतचे उपचार करणे शक्य झाले आहे. जे जे देशाचे आहे, ते देशातल्या प्रत्येक नागरीकाचे आहे आणि त्याचा लाभ प्रत्येक देशबांधवाला मिळायलाच हवा. आमचे सरकार याच भावनेने काम करत आहे.

 

मित्रांनो,

काही दिवसांपूर्वी माझी भेट एएमयुच्याच एका माजी विद्यार्थ्यांशी झाली, ते इस्लामचे अभ्यासक देखील आहेत. त्यांनी मला एक खूपच रोचक गोष्ट सांगितली, जी मला आपल्यालाही सांगायला आवडेल. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जेव्हा देशात 10 कोटींपेक्षा अधिक शौचालये बांधण्यात आली, तेव्हा त्याचा लाभ सगळ्यांना मिळाला. ही शौचालयेही कुठल्याही भेदभावाविना बांधण्यात आली होती. मात्र त्याचा आणखी एक पैलू असाही आहे, ज्याची फार चर्चा झाली नाही आणि ना शैक्षणिक जगतातील अभ्यासकांचे त्याकडे फारसे लक्ष गेले. माझी इच्छा आहे की अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या प्रत्येक विद्यार्थ्याने इकडे लक्ष द्यावे.

 

माझ्या मित्रांनो,

एक काळ होता जेव्हा आपल्या देशात मुस्लीम मुलींचे शाळाबाह्य होण्याचे प्रमाण 70 टक्क्यांपेक्षा जास्त होते. मुस्लीम मुलींचे असे शिक्षण अर्धवट सोडणे, मुस्लीम समाजाच्या प्रगतीत मोठे अडथळे आणणारे होते. मात्र गेल्या 70 वर्षात आपल्याकडे अशी स्थिती होती की 70 टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लीम मुली, आपले शिक्षण पूर्ण करू शकत नव्हत्या. याच परिस्थितीत, स्वच्छ भारत अभियान सुरु झाले. गावागावात शौचालये बांधली गेली. सरकारने शालेय विद्यार्थिनींसाठी मिशन मोडवर वेगळी शौचालये बनवलीत. आज देशासमोर काय स्थिती आहे? आधी मुस्लीम मुलींचे शाळाबाह्य असण्याचे जे 70 टक्के प्रमाण होते, ते आता 30 टक्यांपर्यंत कमी झाले आहे.

आधी लाखो मुस्लीम मुली केवळ शौचालयांच्या अभावामुळे शिक्षण अर्धवट सोडून देत असत. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. मुस्लीम मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण कमी व्हावे म्हणून केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे.आपल्या अलिगढ मुस्लीम विद्यापीठातच शाळा सोडलेल्या मुला-मुलींसाठी ब्रिज कोर्सचालवला जातो आहे. आणि मला आणखी एक गोष्ट सांगितली गेली, जी मला खूपच आवडली. एएमयु मध्ये आता विद्यार्थिनींची संख्या 35 टक्के झाली आहे. यासाठी मी आपल्या सगळ्यांचे अभिनंदन करेन. मुस्लीम मुलींच्या शिक्षणावर, त्यांच्या सशक्तीकरणावर सरकारचे विशेष लक्ष आहे. गेल्या सहा वर्षात, सरकारकडून सुमारे एक कोटी मुस्लीम विद्यार्थिनीना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे.

 

मित्रांनो,

लिंगभेद होऊ नये, सर्वांना समान अधिकार मिळावा, देशाच्या विकासाचा लाभही सर्वांना मिळावा याला एएमयु चे सुरुवातीपासून प्राधान्य होते. आजही एएमयु साठी गौरवाची गोष्ट म्हणजे, या विद्यापीठाच्या संस्थापक कुलगुरूपदाची जबाबदारी बेगम सुलतान यांनी सांभाळली होती. शंभर वर्षांपूर्वीच्या परिस्थितीत ही जबाबदारी सांभाळणे किती मोठे काम होते, याचा अंदाज आपण करू शकता. आधुनिक मुस्लीम समाजाची उभारणी करण्याचे जे प्रयत्न त्याकाळी सुरु झाले होते, त्याच प्रयत्नांना आज पुढे नेत, तीन तलाक सारखी कुप्रथा संपवून आज पुढे वाटचाल करतो आहोत.

 

मित्रांनो,

आधी असे म्हटले जात होते की जर घरातली स्त्री शिक्षित झाली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होऊ शकते. हे बरोबर आहे. मात्र कुटुंबाच्या शिक्षेच्या पलीकडेही त्याचा व्यापक अर्थ आहे. महिलांनी यासाठी शिक्षण घ्यायला हवे जेणेकरुन त्या आपल्या अधिकारांचा योग्यप्रकारे वापर करु शकतील, आपले भविष्य स्वतः निश्चित करु शकतील. शिक्षण स्वतःसोबत रोजगारही घेऊन येते आणि स्वयंरोजगाराची संधीही ! आणि या दोन गोष्टींसोबत येते ते आर्थिक स्वातंत्र्य! आर्थिक स्वातंत्र्यासोबत येते ती सक्षमता ! एका सक्षम महिलेचे प्रत्येक पातळीवर, प्रत्येक निर्णयात समान योगदान असते. मग तो कुटुंबाला दिशा देण्याची गोष्ट असो किंवा देशाला दिशा देण्याची. आज जेव्हा आपल्याशी संवाद साधतो आहे तेव्हा देशातल्या इतर शिक्षण संस्थांना देखील हेच सांगेन, की जास्तीत जास्त मुलींना शिक्षणप्रवाहात आणण्याचा प्रयत्न करा. आणि त्यांना केवळ शिक्षणच नाही तर उच्च शिक्षणापर्यंत घेऊन या.

 

मित्रांनो,

एएमयु ने उच्च शिक्षण क्षेत्रात, आपल्या समकालीन अभ्यासक्रमांमुळे अनेकांना आकर्षित केले आहे. आपल्या विद्यापीठात आंतरशाखीय विषय आधीपासूनचा शिकवले जातात. जर कोणाचा विज्ञान विषय चांगला असेल आणि त्याला इतिहासही आवडत असेल, तर त्याच्यावर असे बंधन का असावे की त्याने दोन्हीपैकी एकाच विषयाची निवड करावी? हाच विचार, नव्या राष्ट्रीय धोरणामागेही आहे. यात एकविसाव्या शतकातील भारताच्या विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण होऊ शकतील, त्यांचे हित जोपासले जाईल, याकडे सर्वात जास्त लक्ष दिले गेले आहे. आपल्या देशातील युवक, राष्ट्र प्रथम या आवाहनासोबत, देशाला पुढे नेण्यासाठी वचनबद्ध आहे. तो नवनव्या स्टार्ट अप कंपन्यांच्या माध्यमातून आव्हानांवर तोडगा शोधतो आहे. तर्कसंगत विचार आणि वैज्ञानिक दृष्टीकोन याला त्याचे प्राधान्य आहे.

या राष्ट्रीय शिक्षण धोरणात भारतीय युवकांच्या याच आकांक्षांना प्राधान्य देण्यात आले आहे. भारताची शैक्षणिक व्यवस्था, जगातल्या आधुनिक शिक्षण व्यवस्थांपैकी एक असावी असाच आमचा प्रयत्न आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात ज्या शिक्षणप्रवाहात येण्यासाठीआणि मध्ये बाहेर जाण्यासाठीचे जे विविध पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षणविषयक निर्णय घेणे सोपे होणार आहे. बाहेर जाण्याच्या प्रत्येक पर्यायात, त्यांना त्यांनी तिथवर घेतलेल्या शिक्षणाचे योग्य ते प्रमाणपत्रही दिले जाईल. यामुळे विद्यार्थाला पूर्ण अभ्यासक्रमाच्या शुल्काची चिंता न करता, आपला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असेल.

 

मित्रांनो,

उच्च शिक्षणासाठीच्या जागा वाढवण्यासाठी देखील सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. वर्ष 2014 पर्यंत देशात 16 आयआयटी होत्या, आज 23 आहेत. 2014 पर्यंत देशात 9 आयआयआयटी होत्या, आज त्यांची संख्या 25 पर्यंत पोहोचली आहे. 2014 मध्ये देशात 13 आयआयएम्स होते, आज 20 आहेत. वैद्यकीय शिक्षणक्षेत्रात देखील महत्वाचे काम केले जात आहे. सहा वर्षांपूर्वी देशात फक्त सात एम्स होते आज देशभरात 22 एम्स आहेत. शिक्षण ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन, ते सर्वांपर्यंत पोहोचावे, समान पद्धतीने पोहोचावे, सर्वांच्या आयुष्यात बदल घडावेत, हेच उद्दिष्ट घेऊन आम्ही काम करतो आहोत.

 

मित्रांनो,

एएमयु ला शंभर वर्षे पूर्ण होत असतांना, माझ्या तुम्हा युवा भागीदारांकडून आणखी काही अपेक्षा आहेत. या शताब्दीच्या औचित्याने, एएमयुच्या 100 वसतिगृहांतले विद्यार्थी मिळून एक अभ्यासेतर उपक्रम करू शकतील काआणि हा उपक्रम देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होण्याशी संबंधित असू शकेल का ?एएमयु कडे एवढ्या मोठ्या प्रमाणात नवोन्मेष आणि संशोधक-पूरक गुणवत्ता आहे. मग इथल्या वसतिगृहातले विद्यार्थी देशातल्या अशा अनाम स्वातंत्र्य सैनिकांवर संशोधन करुन  त्यांचे कार्य आणि आयुष्य देशासमोर आणू शकतील का? काही विद्यार्थ्यांनी या महापुरुषांच्या जन्मगावी जावे, त्याच्या कर्मभूमीत जावे, त्यांच्या कुटुंबातले लोक आता कुठे आहेत हे शोधून काढत त्यांच्याशी संपर्क करावा. काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन स्त्रोतांचा वापर करुन त्याद्वारे शोध घ्यावा. उदाहरणार्थ, 75 वसतिगृहे एकेका आदिवासी स्वातंत्र्य सैनिकावर एक एक संशोधन प्रबंध तयार करु शकतील. याचप्रकारे 25 वसतिगृहे महिला स्वातंत्र्यसैनिकांवर संशोधन-अध्ययन करु शकतील.

आणखी एक काम आहे, जे एएमयुचे विद्यार्थी-विद्यार्थिनी देशासाठी करु शकतील. एएमयु कडे देशातील अत्यंत मौल्यवान अशा प्राचीन पांडूलिपींचा संग्रह आहे. हा सगळा आपला मोठा सांस्कृतिक वारसा आहे. माझी अशी इच्छा आहे की आपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण या सगळ्याना डिजिटल किंवा व्हर्चुअल स्वरुपात संपूर्ण जगापुढे आणले पाहिजे.

अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या जगभर पसरलेल्या माजी विद्यार्थ्यांनाही मी आवाहन करतो की नव्या भारताच्या निर्मितीत आपली भागीदारी त्यांनी अधिक वाढवावी. आत्मनिर्भर भारत अभियान यशस्वी करण्यासाठी, व्होकल फॉर लोकल यशस्वी करण्यासाठी आणखी बरेच काही करण्याची गरज आहे. याबद्दल जर मला एएमयु कडून काही सूचना मिळाल्या, इथल्या माजी विद्यार्थ्यांकडून काही सूचना मिळाल्यात तर मला खूप आनंद होईल.

 

मित्रांनो,

आज संपूर्ण जगाच्या नजरा भारताकडे खिळल्या आहेत. जे शतक भारताचे शतक असल्याचे म्हटले गेले आहे, त्या लक्ष्याकडे भारत कशी वाटचाल करतो, याबद्दल संपूर्ण जगात उत्सुकता आहे. यासाठी आज आपल्या सर्वांचे एकमेव आणि एकनिष्ठ लक्ष्य हेच असायला हवे की भारताला आत्मनिर्भर कसे बनवावे? आम्ही कुठे आणि कोणत्या कुटुंबात जन्मलो, कोणत्या विचारसरणीत-धर्मात मोठे झालो, यापेक्षाही महत्वाचे आहे की देशातल्या प्रत्येक नागरिकांच्या आशा-आकांक्षा आणि त्यांचे प्रयत्न, देशाच्या आकांक्षांमध्ये कसे सामावले जातील. जेव्हा याचा एक भक्कम पाया तयार होईल, तेव्हा उद्दिष्टापर्यंत पोचणे आणखी सोपे होईल.

 

मित्रांनो,

समाजात वैचारिक मतभेद असणे अगदी स्वाभाविक आहे. मात्र, जेव्हा राष्ट्रहिताचा, राष्ट्राच्या उद्दिष्टांचा प्रश्न असतो, तेव्हा आपण सर्व मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत.जर आपण सगळे युवक जर याच विचारांनी पुढे गेलात. तर असे कुठलेही उद्दिष्ट नाही, जे आपण एकत्रित गाठू शकणार नाही. शिक्षण असो, आर्थिक विकास असो, उत्तम राहणीमान असो, महिलांचे हक्क असोत, सुरक्षा असो, राष्ट्रवाद असो, या सगळ्या गोष्टी ज्या प्रत्येक प्रत्येक नागरीकासाठी आवश्यक असतात, हे असे काही मुद्दे आहेत ज्याबद्दल आपण आपल्या राजकीय अथवा वैचारिक मतभेदांचे कारण सांगूनही असहमत असू शकत नाही, इथे अलिगढ मुस्लीम विद्यापीठात या मुद्यांवर चर्चा करणे यासाठी स्वाभाविक आहे, कारण इथून अनेक स्वातंत्र्यसैनिक निर्माण झाले होते, या मातीतून जन्मले होते. या स्वातंत्र्यसैनिकांनाही आपली कौटुंबिक, सामाजिक, वैचारिक जडणघडणीचा वारसा होता, आपापले विचार होते. मात्र जेव्हा पारतंत्र्यातून मुक्ती मिळवण्याचा विषय होता, त्यावेळी सगळे विचार स्वातंत्र्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी एकतर आले.

 

मित्रांनो,

आपल्या पूर्वजांनी जे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी केले, तेच काम आपल्याला, युवा पिढीला भारताच्या निर्माणासाठी करायचे आह , जसे स्वातंत्र्य एक समान लक्ष्य होते तसेच आज नव्या भारताच्या उभारणीचे एक लक्ष्य साध्य करण्यासाठी आपल्या सगळ्यांना मिळून काम करायचे आहे. नवा भारत आत्मनिर्भर असेल, सर्वप्रकारे समृद्ध, संपन्न असेल तर त्याचा लाभही सर्व 130 कोटी भारतीयांना होईल. या विचार, समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, याचे काम आपण करु शकता, युवा सहकरी करु शकतात.

 

मित्रांनो,

आपण हे लक्षात घ्यायला हवेराजकारण समाजाचा एक महत्वाचा भाग आहे. मात्र समाजात या राजकारणापेक्षाही महत्वाचे इतर अनेक विषय आहेत. राजकारण आणि सत्तेच्या विचारांपेक्षा खूप मोठा, खूप व्यापक कोणत्याही देशाचा समाज असतो. राजकारणाच्या पलीकडेही समाजाला पुढे नेण्यासाठी एक खूप मोठी जागा असते. ही जागा अधिकाधिक व्यापक करत राहणे अत्यंत आवश्यक असते. हे काम आपल्या एएमयु सारख्या संस्था करु शकतात, आपण सर्व करु शकता.

 

मित्रांनो,

जेव्हा आपण नव्या भारताच्या दूरदृष्टीविषयी चर्चा करतो, तेव्हा त्याच्या मूळाशीही हाच विचार आहे की राष्ट्राच्या, समाजाच्या विकासाला कोणत्याही राजकारणाच्या चष्म्यातून बघू नये. हा, असेही आहे की जेव्हा आम्ही हे व्यापक उद्दिष्ट घेऊन वाटचाल करतो, तेव्हा काही तत्वे त्यामुळे अस्वस्थ होतील. अशी समाजविघातक तत्वे जगातल्या सर्व समाजात आपल्याला आढळतील. ही अशी काही माणसे असतात, ज्यांचे आपले स्वार्थ असतात. ते आपले स्वार्थ साध्य करण्यासाठी सगळ्या प्रकारची कामे करतात, वाटेल ती नकारात्मकता पसरवतात. मात्र जेव्हा आपल्या मन आणि मेंदू मध्ये नव्या भारताचे निर्माण सर्वोच्च स्थानी असेल, तर अशा लोकांचे स्थान आणि कृत्ये आपोआप आक्रसत कमी हित जातील. 

 

मित्रांनो,

राजकारण प्रतीक्षा करु शकतं पण समाज प्रतीक्षा करु शकत नाही. देशाचा विकास वाट बघू शकत नाही. गरीब, मग तो समाजातल्या कोणत्याही वर्गाचा असो, तो वाट बघू शकत नाही. महिला असो, वंचित, पीडित, शोषित समाज विकासासाठी वाट बघू शकत नाही. गेल्या शतकात देखील मतभेदांच्या नावाखाली आधीच खूप वेळ वाया गेला आहे. आता आपण अधिक वेळ घालवू शकत नाही, सर्वांना एक उद्दिष्ट घेऊन, एकत्रितपणे, नवा भारत, आत्मनिर्भर भारताची उभारणी करायची आहे.

 

मित्रांनो,

शंभर वर्षांपूर्वी 1920 मध्ये जे तरुण होते, त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढताना जीवाचे बलिदान दिले, त्यांना देशासाठी प्राणांची आहुती देण्याचे भाग्य लाभले. त्या पिढीची तपश्चर्या आणि त्यागामुळेच देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. तुम्हाला, आजच्या पिढीला आत्मनिर्भर भारत, नव्या भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी खूप काही करण्याची संधी आहे. तो काळ 1920 चा होता, आजचा काळ 2020 चा. 1920 पासून 27 वर्षांनी देश स्वतंत्र झाला. 2020 पासून 27 वर्षांनी म्हणजे 2020 ते 2047, हे तुमच्या आयुष्यातले फार महत्वाचे वर्ष आहेत.

2047 या वर्षी जेंव्हा भारत स्वातंत्र्याची 100 वर्ष साजरी करत असेल, तेंव्हा तुम्ही त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असाल. इतकाच नाही, या 27 वर्षात आधुनिक भारताच्या निर्मितीत तुमचे योगदान असेल. तुम्हाला प्रत्येक क्षण देशाचाच विचार करायचा आहे, प्रत्येक निर्णयात देशहिताचा विचार करावा लागेल. तुमचा प्रत्येक निर्णय देशहितावर आधारलेला असला पाहिजे.

मला विश्वास आहे, आपण सर्व मिळून अत्मिनिर्भार भारताचे स्वप्न पूर्ण करू, आपण सर्व मिळून देशाला देशाला उन्नतीच्या नवीन शिखरावर घेऊन जाऊ. आपणा सर्वांचे AMU च्या 100 व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अनेक अनेक अभिनंदन. आणि या 100 वर्षांत ज्या ज्या महापुरुषांनी या संस्थेची प्रतिष्ठा एका नव्या उंचीवर पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले त्यांचेही मी आज पुण्य स्मरण करतो, त्या सर्वांप्रती आदर व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या पवित्र प्रसंगासह भविष्यासाठी आपल्याला अनेक शुभेच्छा देतो. या संस्थेच्या जगभर पसरलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी, उत्तम भाविष्यासाठी मी शुभेच्छा देतो. अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या भविष्यासाठी अनेक शुभेच्छा देतांनाच, मी ही  ग्वाही देतो की सरकार आपल्या प्रगतीसाठी, आपली स्वप्न साकार करण्यासाठी कधीही मागे हटणार नाही.

याच विश्वासासह आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद.

****

M.Chopade/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com