Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अरुणाचल प्रदेशातील पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ ‘डोनी पोलो’ व इतर विकास प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

अरुणाचल प्रदेशातील पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ ‘डोनी पोलो’ व इतर विकास प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण


जय हिंद.

जय हिंद.

भारत माता की जय.

भारत माता की जय.

अरुणाचल प्रदेशाचे राज्यपाल बी. डी. मिश्रा, येथील लोकप्रिय युवा मुख्यमंत्री पेमा खांडू, मंत्रीमंडळातील माझे सहकारी किरेन रिजिजू, उपमुख्यमंत्री चौना मीन, सन्माननीय संसद सदस्य, विधानसभा सदस्य, महापौर, अन्य सर्व गणमान्य व्यक्ती आणि अरुणाचल प्रदेशातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!

मी अरुणाचल प्रदेशला अनेकदा भेट दिली आहे. मी जेंव्हा जेंव्हा अरुणाचल प्रदेशात येतो, तेंव्हा एक नवी उर्जा, नवा उल्हास, नवा उत्साह येथून घेऊन जातो. पण मला हे म्हणावे लागेल की, मी इतक्या वेळा अरुणाचलला आलो आहे, कदाचित मोजणी केली तरी काही ना काही तरी चूक होईलच, इतक्या वेळा आलो आहे. पण इतका मोठा कार्यक्रम प्रथमच पाहिला आणि तोही सकाळी साडे नऊ वाजता. अरुणाचलमध्ये पहाडी भागातून लोकांनी कार्यक्रमाला येणे, यांचा अर्थ असा होतो की विकासाच्या कामांना तुमच्या जीवनात किती महत्त्व आहे, हे दर्शवते आणि म्हणूनच तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी आला आहात.

बंधू – भगिनींनो,

अरुणाचलच्या लोकांना, अरुणाचलच्या लोकांची आत्मियता, कधीही अरुणाचलच्या लोकांना पहा, ते सतत हसत असतात, त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असते. कधीही उदासीनता, निराशा अरुणाचलच्या लोकांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. आणि शिस्त, मला वाटते की सीमावर्ती भागात शिस्त काय असते, हे माझ्या अरुणाचल मधील प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबात, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात दिसून येते.

आपले मुख्यमंत्री पेमा जी यांच्या नेतृत्वाखाली ही दुहेरी इंजीनाच्या सरकारची मेहनत, विकासासाठीची प्रतिबद्धता आहे, तीच आज अरुणाचलला या नव्या उंचीवर स्थापित करत आहे. मी पेमा जी आणि त्यांच्या संपूर्ण सहकारी गटाला खूप खूप शुभेच्छा देत आहे.

तुम्हाला आठवत असेल, आणि आत्ताच पेमा यांनी उल्लेख देखील केला होता की, फेब्रुवारी 2019 मध्ये या विमानतळाची पायाभरणी करण्याचे सौभाग्य मला प्राप्त झाले होते. आणि तुम्ही तर जाणताच आम्ही एक अशी कार्यपद्धती अंमलात आणली आहे, ज्या प्रकल्पाची पायाभरणी आम्ही करतो त्या प्रकल्पाचे उद्घाटन देखील आम्हीच करतो. अडकवणे, लटकवणे, भटकवणे आता तो काळ संपला आहे. पण मी काही तरी दुसरे सांगू इच्छितो, फेब्रुवारी 2019 मध्ये मी या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. तेंव्हा मे 2019 मध्ये निवडणूका होणार होत्या. हे जितके राजकीय टिप्पणी करणारे आहेत ना, त्यांच्या डोळ्यांवर जुन्या जमान्यातील विचारांचा चष्मा चढवलेला आहे, त्या लोकांनी ओरड सुरू केली, लिहायला सुरुवात केली, बोलायला सुरुवात केली, विमानतळ – बिमानतळ काही बनणार नाही, निवडणूका आहेत ना म्हणून मोदी इथे दगड उभे करायला आले आहेत. आणि इथे असे होत आहे, नाही, प्रत्येक गोष्टीत त्यांना निवडणूकाच दिसतात. प्रत्येक गोष्टीत, कोणत्याही चांगल्या कामाला निवडणूकीचा रंग चढवणे ही फॅशन बनली आहे. 

या सर्व लोकांना आज या विमानतळाचे उद्घाटन म्हणजे एक जबरदस्त उत्तर आहे, त्यांच्या कानशिलात एक चपराक आहे. आणि या राजकीय टिप्पणी करणाऱ्यांना माझा आग्रह आहे, हात जोडून विनंती आहे की, बंधूंनो आता जुने चष्मे काढून टाका, हा देश नव्या उल्हास आणि उत्साहाने आगेकूच करत आहे, राजनैतिक तराजूने तोलणे आता बंद करा. टिप्पणी करणारे जे लोक याला निवडणुकीतली घोषणा समजत होते, आज तीन वर्षांच्या कालावधीतच ते या आधुनिक भव्य स्वरूपात उभ्या राहिलेले विमानतळ पाहत आहेत. आणि हे माझे सौभाग्य आहे की मला तुमच्या उपस्थीतीत, लाखो लोकांच्या साक्षीने पूर्ण अरुणाचल आज ऑनलाईन जोडला गेलेला आहे, ही देखील एक अभिमानास्पद बाब आहे. आज इथे कोणतीही निवडणूक नाही आणि निकट भविष्यातही कोणती निवडणूक येत नाही. असे असतानाही हे घडत आहे, कारण आज देशात जे सरकार आहे, त्याचे प्राधान्य देशाच्या विकासाला आहे, देशातील लोकांच्या विकासाला आहे. वर्षातील 365 दिवस, चोवीस तास, आम्ही देशाच्या विकासासाठी काम करत आहोत. आणि तुम्ही पहा, आता मी सूर्य जिथे उगवतो त्या अरुणाचल प्रदेशात आहे आणि संध्याकाळी जिथे सूर्य मावळतो त्या दमनमध्ये माझे विमान उतरेल, या दरम्यान मी काशीला भेट देईन. ही मेहनत एकाच स्वप्नाच्या पूर्तीसाठी केली जात आहे, जीवतोड मेहनत करत आहोत – माझ्या देशाची प्रगती झाली पाहिजे. आम्ही निवडणूकीतील फायदे किंवा तोटे लक्षात घेऊन काम करत नाही आणि निवडणूकीपासून लाभ मिळविण्यासाठी छोट्या छोट्या उद्देशाने काम करणारे लोक आम्ही नाहीत. आमचे स्वप्न केवळ आणि केवळ भारत माता आहे, हिंदूस्थान आहे, 130 कोटी नागरिक आहेत. आज या विमानतळासोबतच 600 मेगावॉट क्षमतेच्या कामेंग जलविद्युत निर्मिती प्रकल्पाचेही लोकार्पण झाले आहे. ही देखील एक मोठी उपलब्धी आहे. विकासाची भरारी आणि विकासासाठी लागणारी उर्जा यांचे संघटन अरुणाचल प्रदेशाला नवी गति देऊन नव्या उंचीवर पोहोचवेल. मी या उपलब्धीसाठी अरुणाचल मधील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींचे, ईशान्येकडील राज्यांमधील सर्व बंधू आणि भगिनींचे खूप खूप अभिनंदन करतो, खूप खूप शुभेच्छा देतो.

स्वातंत्र्यानंतर ईशान्येकडील राज्ये बिलकुल वेगळ्याच प्रकारच्या वाटचालीचा साक्षीदार राहीले आहेत. अनेक दशके हा भाग उपेक्षा आणि उदासीनतेचा सामना करत राहीला. तेंव्हा दिल्लीत बसून धोरण तयार करणाऱ्यांना केवळ इथे निवडणूक कशी जिंकता येईल याच्याशीच देणेघेणे होते. तूम्ही तर जाणताच की अनेक दशके ही स्थिती कायम राहिली. जेंव्हा अटलजींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले, त्यानंतर पहिल्यांदा ही स्थिती बदलण्यासाठी प्रयत्न केले गेले. ते पहिले सरकार होते ज्यांनी ईशान्येकडील राज्यांच्या विकासासाठी वेगळे मंत्रालय स्थापन केले.

पण त्यानंतर आलेल्या सरकारांनी त्या चालनेची गति कायम राखली नाही. त्यानंतर बदलाचे नवे युग 2014 नंतर सुरू झाले, जेंव्हा तुम्ही मला तुमची सेवा करण्याची संधी दिली. अरुणाचल प्रदेश खूप दूर आहे, ईशान्येकडील राज्ये खूप दूर आहेत असा विचार पूर्वीचे सरकार करत होते. दूर अति दूर सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांना पूर्वी शेवटचे गाव मानले जायचे. पण आमच्या सरकारने त्या गावांना शेवटचे गाव नाही, शेवटचे टोक नाही तर देशाचे पहिले गाव मानण्याचे काम केले आहे. याचा परिणाम म्हणजे ईशान्येकडील राज्यांच्या विकासाला देश प्राधान्य देत आहे. 

आता संस्कृती असो की शेती, वाणिज्य असो की संपर्क सुविधा ईशान्येकडील राज्यांना शेवटी नाही तर सर्वोच्च प्राधान्य मिळत आहे. गोष्ट व्यापाराची असो की पर्यटनाची, टेलीकॉम असो की कापड उद्योग ईशान्येकडील राज्यांना शेवटी नाही तर सर्वोच्च प्राधान्य मिळत आहे. ड्रोन तंत्रज्ञान ते कृषी भरारी पर्यंत, विमानतळापासून बंदराच्या संपर्क सुविधेपर्यंत ईशान्येकडील राज्यांना सर्वोच्च प्राधान्य मिळत आहे.

भारतातील सर्वात लांब पूल असो की रेल्वे मार्गावरील सर्वात लांब पूल, रेल्वे लाईन टाकणे असो की विक्रमी गतीने महामार्ग तयार करणे असो – देशासाठी ईशान्येकडील राज्ये सर्वप्रथम आहेत. याचाच परिणाम म्हणून आज ईशान्येकडील राज्यांमध्ये अपेक्षा आणि संधींचा नवा काळ सुरू झाला आहे, नव्या युगाची सुरुवात झाली आहे.

आजचे हे आयोजन, नव भारताच्या या भूमिकेचे खूप उत्तम उदाहरण आहे. डोनी-पोलो विमानतळ, अरुणाचलचा चौथा कार्यान्वित विमानतळ आहे. स्वातंत्र्यानंतर सात दशके संपूर्ण ईशान्य भारतात केवळ 9 विमानतळे होती. तर आमच्या सरकारने केवळ आठ वर्षात सात नवीन विमानतळे बनवली आहेत. इथे असे अनेक विभाग आहेत, जे स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आत्ता, हवाई दळणवळणाने जोडले गेले आहेत. यामुळे इथून ईशान्येकडे जाणाऱ्या विमानउड्डाणांची संख्या देखील दुप्पटीपेक्षा जास्त झाली आहे.

मित्रांनो,

ईटानगरचा डोनी-पोलो विमानतळ, अरुणाचल प्रदेशच्या भूतकाळ आणि संस्कृतीचा देखील साक्षीदार बनत आहे. आणि मला सांगण्यात आले,

पेमाजी सांगत होते की, डोनी म्हणजे सूर्य आणि चंद्राला पोलो असे म्हणतात.

मी, अरुणाचलच्या डोनी-पोलो संस्कृतीतही विकासाकरीता एक दिशा पाहतो आहे. प्रकाश एकच आहे. परंतु सूर्याचा प्रकाश आणि, चंद्राचा शितल प्रकाश, दोघांचे आपले स्वतःचे असे महत्व आहे. आपले स्वतःचे असे सामर्थ्य आहे. अगदी याच प्रकारे, जेव्हा आम्ही विकासाची चर्चा करतो, तेव्हा मोठे मोठे प्रकल्प असोत, किंवा गरिबांपर्यंत पोहोचणाऱ्या जनकल्याणाच्या योजना, दोन्हीही विकासाचे आवश्यक आयाम आहेत. आज विमानतळासारख्या मोठ्या पायाभूत सुविधांचे जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व, गरिबांच्या सेवेला आणि त्यांच्या स्वप्नांना देखील दिले जात आहे. आज जर विमानतळाचे निर्माण होत आहे, तर त्याचा लाभ सर्वसामान्याला कसा मिळावा, याकरीता उडान योजनेवरही काम होत आहे. विमान सेवा सुरू झाल्यानंतर पर्यटकांची संख्या कशी वाढेल, त्याचा लाभ छोटे व्यापारी, दुकानदार, टॅक्सी चालक यांना कसा मिळेल, यासाठी आम्ही काम करत आहोत.

मित्रांनो,

अरुणाचल प्रदेशात आज अतिदुर्गम उंचीवर, सीमा भागात रस्ते आणि महामार्ग बनत आहेत. केंद्र सरकार रस्त्यांच्या निर्माणाकरीता जवळपास 50 हजार कोटी रुपये आणखी खर्च करणार आहे. जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांचे निर्माण होईल, तेव्हा मोठ्या संख्येने पर्यटकही येतील. अरुणाचलच्या कानाकोपऱ्यात निसर्गाने सौंदर्याचे वरदान दिले आहे. प्रत्येक गावात पर्यटनाच्या अपार शक्यता आहेत. निवासव्यवस्था आणि स्थानिक उत्पादनांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढू शकते. यासाठी गावागावापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था असणेही गरजेचे आहे. याकरीता आज अरुणाचलच्या 85% पेक्षा जास्त गावांपर्यंत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना राबवण्यात आली आहे.

मित्रांनो,

विमानतळ आणि उत्कृष्ट पायाभूत सुविधांच्या निर्माणानंतर आता अरुणाचलमध्ये मालवाहू सुविधांची देखील मोठी शक्यता निर्माण होत आहे. यामुळे इथले शेतकरी आपले उत्पादन, अरुणाचलबाहेर मोठ्या बाजारामध्ये सहजपणे विकू शकतील. त्यांना आजच्या तुलनेत अनेक पटीने जास्त पैसे मिळतील. अरुणाचलच्या शेतकऱ्यांना, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा देखील मोठा लाभ होत आहे.

मित्रांनो,

पूर्वोत्तरमध्ये आमचे सरकार कशाप्रकारे काम करत आहे, याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे बांबूची शेती देखील आहे. बांबू इथल्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहे. बांबूची उत्पादने आज संपूर्ण देश आणि जगात लोकप्रिय होत आहेत. परंतु इंग्रजांच्या काळापासून बांबू कापण्यावर असे कायदेशीर निर्बंध घातले होते की आपल्या आदिवासी बंधू भगिनी, आपल्या ईशान्येतील लोकांच्या जीवनात तो अडसर ठरला होता. म्हणून आम्ही तो कायदा बदलला. आता तुम्ही बांबूचे पीक घेऊ शकता, बांबू कापू शकता, बांबू विकू शकता, बांबूचे मूल्यवर्धन करू शकता आणि खुल्या बाजारात जाऊन तुम्ही व्यापारही करू शकता. ज्या प्रकारे पिकं घेतली जातात त्याच प्रकारे बांबूचेही पीक घेतले जाऊ शकते.

बंधू आणि भगिनींनो,

गरीब, जीवनातील मूलभूत चिंतांपासून जेव्हा स्वतंत्र होतात, ते स्वतः सोबतच देशाच्या विकासाकरिता देखील नवीन आयाम निर्माण करू लागतात. यासाठी, आज गरिबातील गरीब व्यक्ती उपेक्षा आणि दारिद्र्यातून बाहेर यावी, त्यांना सन्मानजनक जीवन मिळावे, ही देशाची प्राथमिकता आहे. पूर्वी म्हटले जात असे की डोंगराळ भागात उपचार आणि शिक्षण नेहमीच एक संकट असते. परंतु आता, चांगल्या आरोग्य सुविधांसोबतच आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून, पाच लाख रुपयांच्या मोफत उपचाराची व्यवस्थाही करण्यात आली आहे. प्रत्येक गरिबाला प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पक्के घर दिले जात आहे. खासकरून आदिवासी क्षेत्रात, केंद्र सरकार 500 कोटी रुपये खर्च करून, एकलव्य मॉडेल स्कूल सुरू करत आहे. जेणेकरून एकही आदिवासी मुल शिक्षणापासून वंचित राहू नये. ज्या तरुणांनी काही कारणाने हिंसेचा मार्ग अवलंबला असेल, त्यांना एका वेगळ्या धोरणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यांच्यासाठी वेगळा निधी उभारण्यात आला आहे. स्टार्ट अप इंडियाच्या सामर्थ्याशी जोडले जाण्याकरीता, अरुणाचल स्टार्टअप धोरणाच्या माध्यमातून, अरुणाचल प्रदेश देखील खांद्याला खांदा लावून काम करत आहे. म्हणजे, विकासाचा आपला अखंड प्रवाह, जो वरून सुरू होतो, तो आज गाव, गरीब, तरुण, महिलांपर्यंत पोहोचून त्यांची ताकद बनत आहे.

मित्रांनो,

देशाने 2014 नंतर प्रत्येक गावापर्यंत वीज पोहोचवण्याचे अभियान सुरू केले होते. या अभियानाचा खूप मोठा लाभ अरुणाचल प्रदेशातील गावांना देखील झाला आहे. इथे अशी अनेक गावे होती जेथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा वीज पोहोचली होती. यानंतर केंद्र सरकारने सौभाग्य योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घराला वीजजोडणी देण्याचे अभियान राबवले होते. इथे अरुणाचल प्रदेशात देखील हजारो घरांना मोफत वीज जोडणी देण्यात आली. आणि जेव्हा इथल्या घरांमध्ये वीज पोहोचली, तेव्हा केवळ घरांमध्येच प्रकाश आला नाही तर, इथल्या लोकांचे जीवन देखील उजळून निघाले.

बंधू आणि भगिनींनो,

अरुणाचल प्रदेशात विकासयात्रेने जो वेग पकडला आहे, त्यास आम्ही गावागावापर्यंत, घराघरापर्यंत पोहोचवण्याच्या मोहिमेवर काम करत आहोत. आमचा प्रयत्न आहे की, सीमा भागातील गावांना व्हायब्रंट बॉर्डर व्हिलेजचा दर्जा देऊन त्यांना सशक्त बनवले जावे. जेव्हा सीमालगच्या प्रत्येक गावात शक्यतांचे नवे द्वार उघडतील, तिथूनच समृद्धीची सुरुवात होईल. व्हायब्रंट बॉर्डर व्हिलेज कार्यक्रमांतर्गत, सीमालगतच्या गावांमधून पलायन रोखणे आणि तिथे पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या योजनेवर वेगाने काम होत आहे. सरकारद्वारे सीमावर्ती क्षेत्रातील तरुणांना एनसीसीशी जोडण्याकरिता, एक विशेष अभियान चालवले जात आहे. सीमावर्ती भागातील गावांना, तिथल्या तरुणांना एनसीसी मध्ये अधिकाधिक सहभागी करून घ्यावे हा प्रयत्न आहे. एनसीसीमध्ये सहभागी होणाऱ्या या गावातील मुलांना लष्करातील अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण मिळेल. यामुळे, तरुणांच्या उज्वल भविष्याचा मार्ग प्रशस्त तर होईलच, सोबतच त्यांच्यात देशसेवेप्रती एक भावना निर्माण होईल, ती अधिक प्रखर होईल.

मित्रांनो,

सबका साथ-सबका विकासाच्या मंत्राचा अवलंब करत दुहेरी इंजनाचे हे सरकार, अरुणाचलच्या विकासाकरीता, लोकांच्या राहणीमान सुलभतेकरता कटीबद्ध आहे. माझी मनोकामना आहे की, विकासाचा हा सूर्य याच प्रकारे आपल्याला प्रकाश देत राहो. मी पुन्हा एकदा पेमाजी आणि त्यांच्या संपूर्ण सरकारला, केंद्र सरकारच्या या सर्व योजना पुढे नेण्यात सक्रिय सहकार्य करण्याकरिता खूप खूप शुभेच्छा देतो, आणि आमचे पूर्वोत्तरातील सहकारी, आमच्या माता-भगिनी यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद!

***

H.Raut/S.Mukhedkar/V.Ghode/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai