Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अयोध्येतील लता मंगेशकर चौकाच्या लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले

अयोध्येतील लता मंगेशकर चौकाच्या लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले


नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे अयोध्येतील लता मंगेशकर चौकाच्या लोकार्पण प्रसंगी उपस्थितांना संबोधित केले.

मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधानांनी प्रत्येक भारतीयाच्या आदरणीय आणि प्रेमळ मूर्ती लता दीदींचा वाढदिवस साजरा केला. त्यांनी नवरात्रोत्सवाचा तिसरा दिवस देखील साजरा केला, जेव्हा माँ चंद्रघंटाची पूजा केली जाते. पंतप्रधान म्हणाले की, साधक जेव्हा कठोर साधनेतून जातो तेव्हा त्याला माँ चंद्रघंटाच्या कृपेने दैवी वाणींचा अनुभव येतो. “लता जी माँ सरस्वतीच्या अशाच एक साधक होत्या, ज्यांनी आपल्या दैवी वाणीने संपूर्ण जगाला मोहित केले. लताजींनी साधना केली, आम्हा सर्वांना वरदान मिळाले!”, असे मनोगत पंतप्रधानांनी व्यक्त केले. अयोध्येतील लता मंगेशकर चौकात स्थापित केलेली माँ सरस्वतीची विशाल वीणा, संगीताच्या अभ्यासाचे प्रतीक बनेल, असे मोदींनी अधोरेखित केले. चौक संकुलातील तलावाच्या वाहत्या पाण्यात संगमरवरी ९२ पांढरी कमळे लताजींच्या संपूर्ण आयुष्याचे प्रतिबिंब ठरतील, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

या अभिनव प्रयत्नाबद्दल पंतप्रधानांनी उत्तर प्रदेश सरकार आणि अयोध्या विकास प्राधिकरणाचे अभिनंदन केले आणि सर्व देशवासियांच्या वतीने लताजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. “मी प्रभू श्री रामाला प्रार्थना करतो की, त्यांच्या जीवनातून आम्हाला मिळालेले आशीर्वाद त्यांच्या मधुर गाण्यांद्वारे येणाऱ्या अनेक पिढ्यांवर छाप सोडत राहावेत”, असे पंतप्रधान म्हणाले.

लता दीदींच्या वाढदिवसाशी संबंधित अनेक भावनिक आणि प्रेमळ आठवणींना उजाळा देताना पंतप्रधान म्हणाले की, लता दीदींच्या आवाजातील परिचित गोडवा त्यांना प्रत्येक वेळी मंत्रमुग्ध करत असे. पंतप्रधानांनी आठवण करून दिली, “दीदी मला नेहमी सांगायच्या, ‘माणूस वयाने ओळखला जात नाही, तर कर्तृत्वाने ओळखला जातो आणि तो देशासाठी जेवढं जास्त कार्य करतो, तेवढा तो मोठा असतो!” पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “मला विश्वास आहे की, अयोध्येतील लता मंगेशकर चौक आणि त्यांच्याशी निगडीत अशा सर्व आठवणी आपल्याला देशाप्रती कर्तव्याची भावना निर्माण करण्यास सक्षम करतील.”

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन झाल्यानंतर पंतप्रधानांना लता दीदींचा फोन आला होता, त्या वेळेची आठवण करून देताना पंतप्रधानांनी सांगितले की, मंदिर निर्माणाचे कार्य सुरू झाल्याने लता दीदींनी आनंद व्यक्त केला होता. पंतप्रधानांनी लता दीदींनी गायलेल्या ‘मन की अयोध्या तब तक सूनी, जब तक राम ना आये’ या भजनाचे स्मरण केले आणि अयोध्येच्या भव्य मंदिरात भगवान श्री रामाच्या लवकरच होणाऱ्या आगमनावर भाष्य केले. करोडो लोकांच्या हृदयात रामाची स्थापना करणाऱ्या लता दीदींचे नाव आता अयोध्या या पवित्र नगरीशी कायमचे जोडले गेले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. राम चरित मानस चे कथन करून, पंतप्रधान म्हणाले “राम ते अधिक, राम कर दासा”, याचा अर्थ प्रभू रामाचे भक्त प्रभूच्या आगमनापूर्वी येतात. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ बांधलेला लता मंगेशकर चौक भव्य राम मंदिर पूर्ण होण्याआधीच पूर्ण झाला आहे.

अयोध्येच्या अभिमानास्पद वारशाची पुनर्स्थापना आणि शहरातील विकासाची नवी पहाट, यावर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी प्रभू राम हे आपल्या सभ्यतेचे प्रतीक आहेत आणि आपली नैतिकता, मूल्ये, प्रतिष्ठा आणि कर्तव्याचे जिवंत आदर्श आहेत, अशी मनोगत मांडले. “अयोध्येपासून रामेश्वरमपर्यंत, भारताच्या प्रत्येक कणात भगवान राम  आहेत”, असे मोदी म्हणाले. प्रभू रामाच्या आशीर्वादाने मंदिराच्या बांधकामाचा वेग पाहून संपूर्ण देश रोमांचित झाला आहे, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.

लता मंगेशकर चौकाच्या विकासाचे ठिकाण अयोध्येतील विविध सांस्कृतिक महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणाऱ्या प्रमुख स्थळांपैकी एक असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. हा चौक राम की पौडी जवळ आहे आणि शरयू नदीच्या पवित्र प्रवाहाजवळ आहे. “लता दीदींच्या नावावर चौक बांधण्यासाठी त्यापेक्षा आणखी कोणती चांगली जागा असू शकते?”, असे उद्गार पंतप्रधानांनी काढले. अनेक युगांपासून अयोध्येने प्रभू रामाची जी साधना केली आहे, त्याच्याशी साधर्म्य साधून पंतप्रधान म्हणाले की, लता दीदींच्या भजनाने आपले अंत:करण प्रभू राम नामात गुंतून ठेवले आहे”

‘श्री रामचंद्र कृपालु भज मन, हरण भव भय दारुणम’ हा मानस मंत्र असो अथवा मीराबाईंची ‘पायो जी मैने राम रतन धन पायो’ सारखी स्तोत्रे असोत; बापूंचा आवडता ‘वैष्णव जन’ असो अथवा ‘तुम आशा विश्वास हमारे राम’ सारख्या गोड गाण्यांनी लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे, पंतप्रधान म्हणाले की, लताजींच्या गाण्यांमधून अनेक देशवासीयांनी भगवान राम अनुभवला आहे.“आम्ही लता दीदींच्या दैवी आवाजातून प्रभू रामाच्या अलौकिक रागाचा अनुभव घेतला आहे”, असे मोदी म्हणाले.

लता दीदींच्या आवाजातील ‘वंदे मातरम’ ही हाक आपण ज्यावेळी ऐकतो तेव्हा भारत मातेचे विशाल रूप आपल्या डोळ्यांसमोर दिसू लागते, असे पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधान पुढे म्हणाले की, “ज्याप्रमाणे लता दीदी नागरी कर्तव्यांबाबत सदैव जागरूक होत्या, त्याचप्रमाणे हा चौक अयोध्येत राहणाऱ्या लोकांना आणि कर्तव्याप्रती अयोध्येत येणाऱ्या लोकांना प्रेरणा देईल.” ते पुढे म्हणाले, “हा चौक, ही वीणा अयोध्येच्या विकासाला आणि अयोध्येच्या प्रेरणेला आणखी दुमदुमून टाकेल.” लता दीदींचे नाव असलेला हा चौक कलेच्या जगाशी निगडित लोकांसाठी प्रेरणास्थान म्हणून काम करेल, असे श्री मोदींनी अधोरेखित केले. आधुनिकतेकडे वाटचाल करताना आणि त्याच्या मुळाशी जोडलेले राहून भारताची कला आणि संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्याची आठवण प्रत्येकाला करून देईल. “भारताची कला आणि संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे”, असे मोदी म्हणाले.

आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी भारताच्या हजारो वर्षांच्या जुन्या वारशाचा अभिमान बाळगताना भारताची संस्कृती येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेण्याची गरज व्यक्त केली. “लता दीदींचे गायन या देशातल्या प्रत्येक कणाला पुढील अनेक युगांशी जोडेल”, असेही ते म्हणाले.

 

 

 

 

 

 

 

 

* * *

G.Chippalkatti/V.Yadav/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai