Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अम्मा यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधानांचे संबोधन

अम्मा यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधानांचे संबोधन


नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अम्मा, माता अमृतानंदमयी जी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले.

माता अमृतानंदमयी जी यांना 70 व्या वाढदिवसानिमित्त निरोगी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देऊन पंतप्रधानांनी भाषणाला सुरुवात केली. अम्मा या सेवा आणि अध्यात्माचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. जगभरात प्रेम आणि करुणेच्या प्रसाराचे त्यांचे ध्येय निरंतर सुरु राहो अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांनी अम्मा यांच्या अनुयायांसह तिथे जमलेल्या विविध क्षेत्रातील प्रत्येकाचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

30 वर्षांहून अधिक काळ अम्मा यांच्या संपर्कात असल्याचे सांगताना पंतप्रधानांनी कच्छमधील भूकंपानंतर त्यांच्यासोबत दीर्घकाळ काम करण्याचा अनुभव मिळाल्याचे नमूद केले. अमृतापुरीत अम्मा यांचा 60 वा वाढदिवस साजरा केल्याची आठवण त्यांनी सांगितली. आजही अम्मा यांचा स्मितहास्य विलसत असणारा चेहरा आणि स्नेहमय  स्वभाव पूर्वीसारखाच आहे असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या 10 वर्षात, अम्मांचे कार्य आणि जगावरील  त्यांचा प्रभाव अनेक पटींनी वाढला आहे असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले . अम्मांच्या उपस्थितीत हरियाणातील फरिदाबाद येथे अमृता रुग्णालयाचे उद्घाटन केल्याची आठवण त्यांनी सांगितली. अम्मा यांच्या उपस्थितीचे, त्यांच्या आशीर्वादाचे जे तेजोवलय आहे ते शब्दात वर्णन करणे कठीण आहे, आपण ते केवळ अनुभवू शकतो यावर त्यांनी भर दिला. अम्मा या प्रेम, करुणा, सेवा आणि त्यागाचे मूर्त रूप असून त्या भारताच्या आध्यात्मिक परंपरेच्या वाहक असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

आरोग्य किंवा शिक्षण क्षेत्र असो, अम्मा यांच्या मार्गदर्शनाखालील प्रत्येक संस्थेने मानवसेवा आणि समाजकल्याणात नवीन उंची गाठली आहे, असे अधोरेखित करत पंतप्रधानांनी देशात आणि परदेशात संस्था निर्मिती आणि संस्थांना प्रोत्साहन देण्याच्या अम्मा यांच्या कार्याच्या पैलूवर प्रकाश टाकला. पंतप्रधानांनी देशात सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेचा उल्लेख केला आणि ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पुढे आलेल्या व्यक्तींमध्ये अम्मा सर्वात आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छता मोहिमेला नवी चालना देण्याच्या उद्देशाने अम्मा यांनी गंगेच्या काठावर स्वच्छतागृहे  बांधण्यासाठी 100 कोटी रुपयांची देणगी दिल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. अम्माचे जगभरात अनुयायी आहेत आणि त्यांनी नेहमीच भारताची प्रतिमा आणि विश्वासार्हता मजबूत केली आहे. जेव्हा प्रेरणा खूप मोठी असते तेव्हा प्रयत्नही मोठे असतात, असेही ते म्हणाले.

अम्मांसारखी व्यक्तिमत्त्वे भारताच्या विकासाच्या मानवकेंद्रित दृष्टिकोनाचे प्रतिबिंब असून आज महामारीनंतरच्या जगाने हाच दृष्टिकोन स्वीकारला आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. दिव्यांगांचे सक्षमीकरण आणि वंचितांना प्राधान्य देण्यासाठी अम्मा यांनी नेहमीच मानवतावादी दृष्टिकोनातून त्याग केला आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. काही दिवसांपूर्वीच संसदेत संमत  झालेल्या नारीशक्ती वंदन अधिनियमाचा उल्लेख  करत पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचा संकल्प घेऊन पुढे जाणाऱ्या भारतामध्ये अम्मा यांच्यासारखे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. अम्मा यांचे अनुयायी जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि प्रगतीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी यापुढे देखील असेच कार्य करत राहतील, असा विश्वास पंतप्रधानांनी आपल्या भाषणाच्या समारोपात व्यक्त केला.

 

N.Chitale/S.Kane/S.MukhedkarP.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai