Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अमेरिकेत डेलावेर मध्ये विल्मिंग्टन इथे झालेल्या क्वाड देशांच्या नेत्यांच्या सहाव्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी

अमेरिकेत डेलावेर मध्ये विल्मिंग्टन इथे झालेल्या क्वाड देशांच्या नेत्यांच्या सहाव्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी


नवी दिल्‍ली, 22 सप्‍टेंबर 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल 21 सप्टेंबर 2024 रोजी अमेरिकेत डेलावेर मध्ये विल्मिंग्टन इथे झालेल्या क्वाड समूहातील देशांच्या नेत्यांच्या सहाव्या शिखर परिषदेत सहभागी झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आर बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीस आणि जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा हे देखील या परिषदेत सहभागी झाले होते.

या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. यजमान देश म्हणून ही शिखर परिषद आयोजित केल्याबद्दल तसेच जागतिक कल्याणासाठी एक शक्ती म्हणून क्वाडला बळकट करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर दाखवलेल्या वचनबद्धतेबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संबोधनातून आभार मानले. सद्यस्थितीत  जग तणाव आणि संघर्षांने व्यापलेले आहे, अशावेळी सामायिक लोकशाही मूल्ये आणि तत्वांना अनुसरून क्वाड समूह देशांनी एकत्र येणे मानवतेसाठी महत्वाचे असल्याची बाबही पंतप्रधानांनी आपल्या संबोधनात अधोरेखित केली. क्वाड संघटना ही कायमच सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करत तसेच जागतिक पातळीवरील वादांचे शांततापूर्ण निराकरण करण्याच्या वचनबद्धतेला अनुसरूनच नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था अबाधित राखण्यासाठी वाटचाल करत आली असल्याची बाबही त्यांनी आपल्या संबोधनात ठळकपणे अधोरेखित केली. स्वतंत्र, मुक्त, सर्वसमावेशक आणि समृद्ध हिंद-प्रशांत क्षेत्र हे क्वाड समूहाच्या सदस्य देशांचे परस्पर सामायिक उद्दिष्ट असल्याचेही ते म्हणाले. हिंद-प्रशांत क्षेत्रातील देशांसाठी क्वाड ही संघटना कायम उपलब्ध असेल, परस्परांना सहकार्य करत राहील, तसेच भागीदारीच्या प्रयत्नांमध्येही सहभागी असेल असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या परिषदेत सहभागी झालेल्या क्वाड समूहाच्या सर्व सदस्य देशांनी क्वाड ही जागतिक हिताची ताकद असल्याचा पुनरुच्चार केला. यावेळी सर्व सदस्य देशांच्या नेत्यांनी एकमताने हिंद-प्रशांत क्षेत्रासह, एकूणच जागतिक समुदायाच्या विकासाच्या प्राधान्यक्रमांवर भर देण्याच्या उद्देशाने महत्वाच्या घोषणाही केल्या. या घोषणांविषयीचे ठळक मुद्दे खाली नमूद केले आहेत. :

  • गर्भाशयमुखाच्या कर्करोगाशी (cervical cancer) लढा देत, हिंद-प्रशांत क्षेत्रातील नागरिकांच्या जीवांचे संरक्षण करण्यासाठी ‘क्वाड कॅन्सर मूनशॉट’ या महत्त्वाच्या भागीदारी उपक्रमाची घोषणा केली गेली.
  • हिंद-प्रशांत क्षेत्रातील भागीदार घटकांना सागरी क्षेत्र जागरूकताविषयक हिंद-प्रशांत क्षेत्र भागीदारी (Indo-Pacific Partnership for Maritime Domain Awareness -IPMDA ) उपक्रम आणि क्वाडच्या वतीने राबवलेल्या इतर उपक्रमाअंतर्गत पुरवलेल्या संसाधनांचा सक्षमतेने वापर करण्यासंबंधीचा मैत्री (Maritime Initiative for Training in the Indo-Pacific – MAITRI) हा प्रशिक्षण उपक्रम.
  • आंतर समन्वयीत कार्यान्वयनात सुधारणा घडवून आणण्यासाठी तसेच  सागरी सुरक्षेत वृद्धी साधण्यासाठी 2025 मध्ये पहिले समुद्री जहाजांवर क्वाड अभियान (Quad-at-Sea Ship Observer Mission)
  • संपूर्ण हिंद-प्रशांत क्षेत्रात शाश्वत आणि कोणत्याही परिस्थितीत टिकाव धरू शकतील अशा प्रकारची बंदरे विषयक पायाभूत सुविधा उभारण्याकरता, क्वाड समूह देशांच्या तज्ञ व्यक्तींच्या ज्ञानाचा एकत्रितपणे वापर करणारी   भविष्यकालीन क्वाड बंदरे भागीदारी (Quad Ports of the Future Partnership).
  • हिंद-प्रशांत क्षेत्रासह इतरत्रही डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा विकास आणि प्रत्यक्ष वापरासाठीची क्वाड संघटनेची तत्व प्रणाली
  • क्वाडच्या सेमीकंडक्टर पुरवठा साखळीची कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता वाढविण्यासाठी “सेमीकंडक्टर पुरवठा साखळी आपत्कालीन परिस्थितील व्यवस्थाविषयक सहकार्यासंबंधीचे टिपणवजा दस्तऐवज (Semiconductor Supply Chains Contingency Network Memorandum of Cooperation).
  • हिंद-प्रशांत क्षेत्रात उच्च – कार्यक्षमतेच्या परवडणाऱ्या कूलिंग प्रणालीचे उत्पादन आणि प्रत्यक्ष अंमलबजवणीसह ऊर्जा कार्यक्षमता वाढवण्यासाठी क्वाड समूह देशांचे सामूहिक प्रयत्न.
  • हवामानाशी संबंधित आपत्कालीन घटना आणि हवामानातील बदलांमुळे होणाऱ्या परिणामांवर देखरेख ठेवता यावी या उद्देशाने, मुक्त विज्ञानाच्या संकल्पनेला पाठबळ देत,  मॉरिशससाठी भारताद्वारे अंतराळ – आधारित वेब पोर्टलची स्थापना.
  • हिंद-प्रशांत क्षेत्रातील विद्यार्थ्यांना भारत सरकारच्या अनुदानित तांत्रिक संस्थेत चार वर्षांच्या पदवी स्तरावरील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी भारताच्या वतीने घोषित क्वाड स्टेम पाठ्यवृत्तीअंतर्गत  एक नवीन उपश्रेणीची घोषणा.

या परिषदेत क्वाड समूह देशाच्या सर्व नेत्यांनी पुढच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये या संघटनेच्या शिखऱ परिषदेचे यजमानपद भारताकडे असल्याबद्दल भारताचे अभिनंदन केले. त्यासोबतच सर्व देशांनी क्वाड संघटनेचा कार्य आराखडा पुढे नेण्याच्या उद्देशाने क्वाड विल्मिंग्टन जाहीरनाम्यालाही मान्यता दिली.

 

* * *

S.Patil/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai