Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त सत्राला उद्देशून पंतप्रधानांचे संबोधन


श्री स्पीकर,

श्रीमान उप राष्ट्रपति,

अमेरिकन कांग्रेसचे प्रतिष्ठित सदस्यगण,

सभ्य स्त्री-पुरूष हो,

अमेरिकन कांग्रेसच्या या संयुक्त बैठकीला संबोधित करण्यासाठी देण्यात आलेल्या या निमंत्रणामुळे सन्मानित झाल्याची भावना माझ्या मनात आहे.

स्पीकर महाशय, या भव्य राजधानीची दालने माझ्यासाठी खुली केल्याबद्दल आपले अनेक आभार.

लोकशाहीच्या या मंदिराने जगातील इतर लोकशाहीप्रधान देशांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे आणि त्यांना सशक्त केले आहे. अब्राहम लिंकन यांनी केलेली स्वातंत्र्याची परिभाषा, सर्व माणसे समान आहेत, या धारणेप्रती समर्पित होती, तीच परिभाषा खऱ्या अर्थाने या महान देशाची भावना अभिव्यक्त करते.

आज मला ही संधी देऊन आपण जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीला आणि या देशातील 1.25 अब्ज जनतेला सन्मानित केले आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा प्रतिनिधी म्हणून जगातील सर्वात प्राचीन लोकशाहीच्या नेत्यांना मी संबोधित करतो आहे, हे खरोखर माझे सौभाग्य आहे.

स्पीकर महाशय,

या महान भूमीच्या अनेक विरांनी जेथे समाधी घेतली, त्या आर्लिंग्टन राष्ट्रीय दफनभूमी पासून दोन दिवसांपूर्वी मी माझ्या दौऱ्याला सुरूवात केली. त्यांचे साहस तसेच स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या आदर्शांप्रती त्यांच्या बलिदानाला मी अभिवादन करतो. त्या निर्णायक दिवसाचा आज 72 वा वर्धापन दिवस आहे.

त्या दिवशी या महान देशाच्या हजारो जवानांनी स्वातंत्र्याचा यज्ञ प्रज्वलित राहावा, यासाठी पूर्णपणे अज्ञात अशा भूमीच्या किनाऱ्यावर निकराचा लढा दिला होता. जगाला स्वतंत्र मोकळा श्वास घेता यावा यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहूती दिली.

मानवतेच्या सेवेसाठी स्वातंत्र्याच्या या भूमीवर राहणाऱ्या वीर जवांनांच्या या देशातील पुरूष आणि महिलांनीही दिलेल्या महान बलिदानाचे मला कौतुक वाटते, अवघ्या भारताला कौतुक वाटते. या सर्वाचा काय अर्थ आहे, काय महत्व आहे, हे आम्ही जाणतो कारण आमच्या सैनिकांनी सुद्धा याच आदर्शांसाठी दूर असलेल्या युद्धभूमीवर आपल्या प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्यप्राप्तीच्या ध्यासाच्या याच समान धाग्यांनी आपल्या दोन्ही लोकशाही परस्परांशी मजबूत बंधनात बांधल्या गेल्या असतील.

स्पीकर महाशय,

आपल्या या दोन्ही राष्ट्रांचा इतिहास, संस्कृती आणि श्रद्धा वेगवेगळ्या असल्या तरी लोकशाहीप्रती आपली आस्था आणि आपल्या देशवासियांचे स्वातंत्र्य, या दोन्ही देशांसाठी समान आहे. सर्व नागरिक समान आहेत, हा अनुपम विचार अमेरिकेच्या राज्यघटनेचा मध्यवर्ती आधार असला तरीही दोन्ही देशांच्या संस्थापकांचाही यावर ठाम विश्वास होता आणि त्यांनाही भारताच्या प्रत्येक नागरिकाचे वैयक्तिक स्वातंत्र्य हवे होते.

एक नवे, स्वतंत्र राष्ट्र म्हणून आम्ही जेव्हा लोकशाहीबद्दल आस्था व्यक्त केली होती तेव्हा भारताबद्दल शंका बाळगून असणारे अनेक लोक होते. आमच्या अयशस्वी होण्याची इतकी खात्री होती की त्यावरही लोकांनी पैजा लावल्या. मात्र भारतीय जनता डगमगली नाही.

आमच्या संस्थापकांनी एका आधुनिक राष्ट्राची निर्मीती केली, ज्याचा पाया स्वातंत्र्य, लोकशाही आणि समानतेवर आधारलेला होता. आणि देशाला घडविताना आम्ही आमच्या युगांपूर्वीच्या वैविध्याचे उत्सव कायम साजरे करीत राहू, याचीही त्यांनी काळजी घेतली.

• आज आपले सर्व रस्ते आणि संस्था

• आपली गावे आणि शहरे

• सर्व विचारधारांबद्दल आदराची समान भावना आणि

• आपल्या शेकडो भाषा आणि बोलीभाषांचे माधुर्य

या सर्वच बाबतीत भारत एक आहे आणि तो एक देश म्हणून पुढे जात आहे. भारतात सर्व उत्सव सारख्याच उत्साहात साजरे केले जातात.

स्पीकर महाशय,

आधुनिक भारताने स्वातंत्र्य प्राप्त केले, त्याला आता सत्तर वर्षे पूर्ण होतील. खरे सांगायचे तर माझ्या सरकारसाठी देशाचे संविधान हाच वास्त्विक पवित्र ग्रंथ आहे. आणि त्या ग्रंथात, कोणाचीही काहीही पार्श्वभूमी असली तरीही सर्व नागरिकांसाठी विश्वासाचे स्वातंत्र्य, बोलण्याचा अधिकार, मताधिकार आणि समानतेचा अधिकार हे मौलिक अधिकार म्हणून अधिमान्यता दिलेली आहे.

आमच्या देशातील 800 दशलक्ष नागरिक दर पाच वर्षांनंतर आपला मताधिकार बजावू शकतात. आमचे सर्व 1.25 अब्ज नागरिक भयमुक्त आहेत आणि ते आयुष्यातील प्रत्येक क्षणी स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकतात.

माननीय सदस्यण,

आमच्या हितचिंतकांनी परस्परांना प्रभावित केले आणि आमच्या सामाजिक विचारप्रवाहांना योग्य आकार दिला, त्यावरून आमच्या लोकशाही यंत्रणेतील उत्तम समन्वय अधोरेखीत होतो. नागरी असहकाराबाबत थोरोसच्या विचारांनी आमच्या राजकीय विचारांना प्रभावित केले. आणि अशाच प्रकारे भारताचे महान संत स्वामी विवेकानंदांनी मानवतेचा स्वीकार करण्याचे सुप्रसिद्ध आवाहन शिकागोमध्ये केले होते.

महात्मा गांधींच्या अहिंसेच्या शिकवणीने मार्टीन ल्युथरला साहस करण्याची प्रेरणा दिली. आज वॉशिग्टनमधील मार्टीन ल्युथर किंगचे स्मारक मॅसेच्युसेटस अव्हेन्यू मध्ये गांधीजींच्या प्रतिमेपासून केवळ तीन मैल अंतरावर आहे. वॉशिग्टनमधील त्यांच्या स्मारकांमधील ही जवळीक त्यांचा विश्वास असणाऱ्या आदर्श आणि मूल्यांप्रती त्यांची निष्ठा प्रतिबिंबित करते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोलंबिया विद्यापीठातील वास्तव्यादरम्यान साधारण शतकभरापूर्वीच त्यांची प्रतिभा प्रसिद्ध पावली होती. अमेरिकेच्या राज्यघटनेचा त्यांच्यावर असलेला प्रभाव साधारण तीन दशकांनंतर भारताच्या राज्यघटनेची निर्मीती करताना प्रतिबिंबित झाल्याचे दिसले. ज्या स्वातंत्र्याच्या ओढीने तुम्हाला संघर्ष करण्य़ाची प्रेरणा दिली, तोच आदर्शवाद आमच्याही स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा ठरला. म्हणूनच, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत आणि अमेरिकेचा उल्लेख ‘स्वामभाविक मित्र’ असा केला, त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.

स्वातंत्र्याचे समान आदर्श आणि समान विचारांनीच या नात्याला आकार दिला यात शंकाच नाही. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आमच्या या नात्याला 21 व्या शतकातील विशेष भागिदारी असे म्हटले आहे, ते सुद्धा म्हणूनच यथार्थ आहे.

स्पीकर महाशय,

15 वर्षांपूर्वी भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी याच ठिकाणी उभे राहून भूतकाळातील दुविधेच्या छायेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले होते. तेव्हापासून आमच्या मैत्रीचा अध्याय उल्लेखनिय कहाणी सांगतो आहे. आज आमच्यातील नाते सर्व दुविधांमधून बाहेर पडले आहे. सहजता, स्पष्टवक्तेपणा आणि अनुकरण यातून आमच्यातील संवाद साकार होतो.

निवडणुकीची चक्रे आणि प्रशासनातील परिवर्तन कालावधीसह आपले संबंध अधिक दृढ झाले आहेत. आणि या रोमहर्षक प्रवासात अमेरिकेच्या कॉंग्रेसने दिशादर्शकाप्रमाणे काम केले आहे.

आपण आमच्या समस्यांचे भागिदारीच्या सेतुमध्ये परिवर्तन करून आमचे नेहमी सहाय्य केले आहे. 2008 साली जेव्हा काँग्रेसने नागरी अणु करार संमत केला, तेव्हा त्यात आमच्यातल्या या नात्याचे प्रतिबिंब दिसून आले. भागिदारीची सर्वात जास्त गरज होती, तेव्हा आमच्यासाठी तुम्ही उभे राहिलात, त्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. दु:खाच्या वेळीही आपण कायम आमच्या सोबत राहिलात.

नोव्हेंबर 2008 साली मुंबईवर जेव्हा सीमेपलीकडच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यावेळी अमेरिकेच्या कॉग्रेसने आमच्यासोबत राहून जी बांधिलकी दाखवली, ती भारत कधीही विसरू शकणार नाही.

स्पीकर महाशय,

मला सांगण्यात आले की अमेरिकन कॉंग्रेसची काम करण्याची पद्धत अतिशय सद्भावनापूर्ण आहे. आपण द्विपक्षिय व्यवस्थेसाठी ओळखले जाता, असेही मला सांगण्यात आले. अशी व्यवस्था मानणारे तुम्ही एकटेच नाहीत. मी यापूर्वी आणि आजही आमच्या भारतीय संसदेत असा उत्साह कायमच पाहिला आहे. विशेषत: वरच्या सदनातील आमच्या परंपरांमध्ये बरेच साम्य आहे.

स्पीकर महाशय,

प्रत्येक प्रवासाचा एक पथदर्शक असतो, हे या देशाला चांगलेच ठाऊक आहे. जुन्या नेत्यांनी आपसातील फार प्रत्यक्ष भेटी न होता सुद्धा फारच कमी वेळात विकासाची एक भागिदारी तयार केली.

नॉर्मन बोरलॉग सारख्या प्रतिभावंत व्यक्तिमत्वांनी भारतात हरीत क्रांती आणि खाद्य क्रांती आणली. अमेरिकन विद्यापीठांच्या उत्कृष्टतेने भारतीय तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन संस्थांना चांगलेच विकसित केले.

आम्ही आमच्या या भागिदारीचा वेग आज अधिक वाढवू शकतो. आमच्या लोकांनी केलेल्या अविरत प्रयत्नांमुळेच आमची भागिदारी स्वीकारार्ह ठरली आहे. आमची ही भागिदारी समुद्राच्या गहिरेपणापासून आकाशाच्या उंचीपर्यंत दिसून येते.

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली आमची भागिदारी, आरोग्य, शिक्षण, अन्न आणि कृषी क्षेत्रातल्या जुन्या समस्या सोडविण्यात सातत्याने सहाय्य करीत आहे. वाणिज्य आणि गुंतवणुक क्षेत्रातही आमची भागिदारी सातत्याने वाढते आहे. इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत अमेरिकेसोबत आमचा व्यापार जास्त आहे. आमच्यात विविध माल, सेवा आणि पैशाची देवाणघेवाण वाढल्यामुळे दोन्ही बाजुला नोकरीच्या संधीही वाढत आहेत. व्यापाराप्रमाणे संरक्षण क्षेत्रातही हेच चित्र दिसत आहे. इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत अमेरिकेसोबत भारताचे संरक्षण विषयक सहकार्यसुद्धा जास्त आहे. एका दशकापेक्षा कमी अवधीमध्ये आमची संरक्षण सामग्री खरेदी 0 वरून 10 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. आमच्या या परस्पर सहकार्यामुळे आमची शहरे आणि तेथील नागरिकांचे दहशतवाद्यांपासून संरक्षण आणि पायाभूत संरचनांचे सायबर संकटांपासून बचावाची हमी प्राप्त होते.

राष्ट्राध्यक्ष ओबामा यांना मी काल सांगितल्याप्रमाणे आमच्यात झालेला नागरी अणु करार हे वास्तव आहे.

स्पीकर महाशय,

दोन्ही देशांच्या नागरिकांमध्ये दृढ परस्पर संबध आहेत. तसेच दोन्ही देशांच्या नागरिकामध्ये अतिशय जवळीकीचे सांस्कृतिक संबंध राहिले आहेत.

भारताच्या प्राचीन संस्कृतीचा भाग असणाऱ्या योगविद्येचा अभ्यास अमोरिकेत 30 दशलक्ष लोक करीत असल्याची माहिती सीरीने दिली. एका अनुमानानुसार अमेरिकेतील जनतेला बॉल फेकण्यासाठी वाकण्यापेक्षा योगाभ्यासासाठी वाकणे आवडते. आणि स्पीकर महाशय, आम्ही योगविद्येवर बौद्धिक संपदा असल्याचा अधिकार सुद्धा दाखवलेला नाही.

आमचे 30 लाख भारतीय – अमेरिकन नागरिक दोन्ही देशांना जोडणाऱ्या एका अद्वितीय आणि सक्रिय सेतुचे काम करतात. आजघडीला ते सर्वोत्तम सीईओ, शिक्षणतज्ञ, अंतराळवीर, वैज्ञानिक, अर्थशास्त्रज्ञ, चिकीत्सक आणि इंग्रजी वर्तनशैलीतही निष्णात आहेत.

ही माणसे आपली ताकत आहेत. हे लोक भारताची शान आहे. हे लोक आमच्या दोन्ही समाजासाठी प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.

स्पीकर महाशय,

सार्वजनिक आयुष्यात पदार्पण करण्यापूर्वीच आपल्या या महान देशाबद्दलच्या माझ्या भावना विकसित झाल्या होत्या. पदभार स्वीकारण्याच्या फार पूर्वी मी किनारी भागांमध्ये भ्रमण करत 25 पेक्षा जास्त अमेरिकन राज्यांमध्ये फिरलो आहे. अमेरिकेची खरी ताकत येथील नागरिकांची स्वप्ने आणि त्यांच्या आकांक्षांमध्ये आहे, हे मला तेव्हाच जाणवले होते.

स्पीकर महाशय,

आज तीच भावना भारतीयांमध्ये रूजू पाहते आहे. 800 दशलक्ष युवा जे अधिर आहेत. भारतात मोठे सामाजिक-आर्थिक परिवर्तन घडून येत आहे. कोट्यवधी भारतीय राजकीयदृष्ट्या आधीपासूनच समर्थ आहेत. त्यांना सामाजिक-आर्थिक परिवर्तनाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हे माझे स्वप्न आहे.

2022 साली भारत स्वातंत्र्यप्राप्तीची 75 वर्षे पूर्ण करेल. साध्य करायच्या बाबींची माझी यादी बरीच मोठी आहे, जी तुम्ही समजून घेऊ शकता. यात समाविष्ट असणाऱ्या बाबी आहेत –

– सुदृढ़ कृषि क्षेत्राचा समावेश असणारी एक विस्तृत ग्रामीण अर्थव्यवस्था

– सर्व नागरिकांसाठी एक घर आणि विजेची सोय

– आमच्या लक्षावधी युवा वर्गाला कौशल्ये प्रदान करणे

– 100 स्मार्ट शहरांची निर्मिती

– एक अब्ज लोकांना इंटरनेट प्रदान करणे आणि गावांना डिजिटल विश्वाशी जोडणे.

– 21 व्या शतकाला साजेशा रेल्वे, रस्ते आणि जहाजांसाठी आधारभूत आराखडा तयार करणे.

ही केवळ महत्वाकांक्षा नाही, हे विशिष्ट कालावधीत साध्य करणे हे आम्ही निर्धारित केलेले लक्ष्य आहे. ही सर्व ध्येये साध्य करण्यासाठी एक निश्चित योजना तयार करण्यात आली आहे, ज्यात नूतनीकरणावर आम्ही विशेष भर दिला आहे.

स्पीकर महाशय,

भारताच्या प्रगती करण्याच्या या सर्व योजनांमध्ये एक अनिवार्य सहकारी म्हणून मी अमेरिकेकडे पाहतो आहे. आपल्यापैकी बहुतेकांना हे माहिती आहे की भारताने मजबूत आणि समृद्ध असणे हे अमेरिकेसाठी सामयिक दृष्ट्या महत्वाचे आहे.

चला तर मग, एकत्र येऊन परस्परांचे आदर्श समजून घेत व्यावहारिक सहकार्याच्या दिशेने पुढे चालू या. हे नाते सुदृढ झाल्यास दोन्ही देशांना अनेक स्तरांवर लाभ होईल, यात शंकाच नाही. अमेरिकन व्यापार विश्व उत्पादन आणि निर्मितीसाठी आर्थिक विकासाच्या नव्या क्षेत्रांच्या, कुशल कामगार आणि जागतिक स्थानांच्या शोधात आहे. भारत अमेरिकेचा योग्य सहकारी होऊ शकेल.

भारताची सुदृढ अर्थव्यवस्था आणि 7.6 हा विकासदर परस्पर समृद्धीच्या नव्या संधी प्रदान करीत आहे. भारतात परिवर्तनशील अमेरिकन तंत्रज्ञान आणि भारतीय कंपन्यांकडून अमेरिकेत वाढती गुंतवणुक, या दोन्ही बाबींचा आमच्या नागरिकांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम दिसून येतो आहे.

आज आपले जागतिक संशोधन आणि विकास केंद्रांसाठी भारत हेच अमेरिकन कंपन्यांचे आवडते गंतव्य स्थान आहे. भारताच्या पूर्वेकडून पाहिल्यास प्रशांत सागरापलिकडे आमच्या दोन्ही देशांच्या नूतनीकरण क्षमतांचा कॅलिफोर्नियामध्ये संगम होतो.

येथे अमेरिकेची अभिनव प्रतिभा आणि भारताची बौद्धिक रचनात्मकता भविष्यातील नव्या उद्योगांना आकार देण्याचे काम करीत आहे.

स्पीकर महाशय,

21 वे शतक आपल्याबरोबर अनेक मोठ्या संधी घेऊन आले आहे. मात्र त्याचबरोबर ते आपल्यासोबत अनेक नवी आव्हानेही घेऊन आले आहे. परस्पर अवलंबित्व वाढते आहे. मात्र एकीकडे जगातील काही भाग वाढत्या समृद्धीची बेटे झाले आहेत तर त्याच वेळी दुसरीकडे अनेक भागांमध्ये संघर्ष ही रोजची बाब झाली आहे.

आशियामध्ये कोणत्याही परस्पर सहमतीच्या संरक्षण आराखड्याअभावी अनिश्चितता निर्माण होते. दहशतवादाचा धोका वाढतो आहे आणि सायबर सुरक्षा तसेच बाह्य अवकाशातही नवी आव्हाने समोर येत आहेत. आणि 20 व्या शतकात जागतिक शक्ती मानली गेलेली राष्ट्रे या नव्या आव्हानांची जबाबदारी घेण्यात असमर्थ ठरत असल्याचे चित्र आहे.

अनेक बदल आणि आर्थिक संधी, वाढती अनिश्चितता आणि राजकीय क्लिष्टता, सध्याचे धोके आणि नव्या आव्हानांच्या या जगात आमची वचनबद्धता या गोष्टींबाबत प्रोत्साहन दिल्यास मोठा प्रभाव दाखवू शकेल –

• सहकार्य, प्रभुत्व नाहीं;

• जोडणी, अलगाव नाहीं;

• सर्वसाधारण जनतेप्रती आदराची वैश्विक भावना;

• समावेशक व्यवस्था, वंचित न ठेवणारी; आणि सर्वात महत्वाचे म्हणजे

• आंतरराष्ट्रीय नियम आणि मानकांचे पालन

हिंदी महासागर क्षेत्र सुरक्षित राखण्याबाबतची जबाबदारी भारत पूर्वीपासून समर्थपणे सांभाळत आहे. भारत-अमेरिकेतली एक समर्थ भागिदारी आशियापासून आफ्रीकेपर्यंत आणि हिंदी महासागरापासून प्रशांत महासागरापर्यंत शांतता, समृद्धी आणि स्थैर्य प्रदान करू शकते.

व्यापाराच्या सागरी मार्गांची सुरक्षा आणि सागरात नौवहन स्वातंत्र्य सुनिश्चित करण्याच्या दृष्टीनेही ही भागिदारी सहायक ठरू शकेल.

मात्र 20 व्या शतकातील मानसिकतेत वाढलेली राष्ट्रे आजची वास्तविक स्थिती समजून घेतील तेव्हाच आमचे सहकार्य अधिक प्रभावी ठरेल.

स्पीकर महाशय,

वाशिंग्टन डीसी ला येण्यापूर्वी मी पश्चिम अफगाणिस्तान मध्ये हेरात येथे गेलो होतो. तेथे मी अफगाण-इंडिया मैत्री सेतुचे उद्‌घाटन केले. 42 मेगावॅट क्षमतेचा हा जलविद्युत प्रकल्प भारताच्या सहकार्यातून साकारला आहे. मी गेल्या वर्षी नाताळलाही तेथे गेलो होतो आणि तेथील संसद राष्ट्रार्पण केली. आमच्या लोकशाही संबंधाचा हा पुरावा आहे.

अमेरिकेच्या बलिदानाला अफगाणिस्तानने स्वाभाविकपणे मान्यता दिली आहे, त्यामुळे त्यांचे आयुष्य अधिक सुसह्य झाले आहे. या क्षेत्राला सुरक्षित राखण्यासाठी आपण केलेले अंशदान यापुढेही उल्लेखिले जाईल.

भारतानेसुद्धा अफगाणिस्तानच्या नागरिकांप्रती असलेल्या स्नेहभावनेच्या समर्थनार्थ लक्षणिय योगदान आणि बलीदान केले आहे. शांततापूर्ण, स्थिर आणि समृद्ध अशा अफगाणिस्तानची निर्मिती करणे हे आमचे समान ध्येय आहे.

माननीय सदस्य, आतापर्यंत केवळ अफगाणिस्तानसाठीच नाही तर दक्षिण आशियात सर्वत्र आणि जागतिक स्तरावरसुद्धा दहशतवादाचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

पश्चिम भारतापासून आफ्रीकेच्या सीमेपर्यंतच्या क्षेत्रात लश्कर-ए-तैय्यबा, तालिबान, आयएसआयएस अशा वेगवेगळ्या नावांनी दहशतवाद पसरला आहे. नावे वेगळी असली तरी घृणा, हत्या आणि हिंसा हीच त्यांची समान उद्दिष्ट्ये आहेत. याचे सावट संपूर्ण जगावर असले तरी भारताच्या शेजारी तो फोफावत आहे.

निव्वळ राजकीय लाभापोटी धर्म आणि दहशतवादाचा वापर करणाऱ्यांना निर्वाणीचा इशारा देणाऱ्या अमेरिकन कॉंग्रेसचे मला कौतुक करावेसे वाटते. त्यांना पुरस्कृत करायला नकार देणे, हे त्यांच्या कृत्यासाठी त्यांनाच जबाबदार ठरविण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे.

दहशतवादाविरोधात अनेक पातळ्यांवर लढायचे आहे. केवळ सैन्य, गुप्तचर सेवा आणि कूटनीतीच्या आधारे ही लढाई जिंकता येणार नाही.

स्पीकर महाशय,

आम्ही या लढाईमध्ये आमच्या नागरिकांचे आणि सैनिकांचे बलीदान दिले आहे. आता संरक्षण विषयक सहकार्य वाढविणे ही बदलत्या काळाची गरज आहे.

एक असे धोरण तयार केले जावे, जे

– दहशतवादाला शरण, सहकार्य आणि प्रायोजित करणाऱ्या लोकांना वेगळे करीत राहील.

– चांगल्या आणि वाईट दहशतवादामध्ये फरक करणार नाही.

– जे धर्म आणि दहशतवादाला परस्परांपासून स्वतंत्र ठेवेल.

मानवतेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांनी याविरूद्ध लढा देण्यासाठी एकत्र यावे, या अपप्रवृत्तीच्या विरोधात एकाच सुरात बोलावे आणि या कामी आम्हाला यश मिळावे. दहशतवादाला संविधानबाह्य ठरविले गेले पाहिजे.

स्पीकर महाशय,

आमच्या भागिदारीचे लाभ इतर देशांना आणि क्षेत्रांना होतीलच. त्याचबरोबर आम्ही आवश्यकता भासली, त्या प्रत्येक वेळी स्वत:च्या आणि आपल्या क्षमता एकत्र करून मानवी मदतीची गरज भासली त्या प्रत्येक वेळी समोर आलेल्या जागतिक आव्हानांचा सामना केला आहे.

आमच्या देशापासून हजारो मैल दूर येमेन मधून आम्ही हजारो भारतीय, अमेरिकन आणि इतर देशांच्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढले होते.

आमच्या शेजारच्या नेपाळ देशातील भूकंप, मालदिव मधील जल संकट आणि श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या भूस्खलनानंतर मदतीसाठी पोहोचणारा भारत हा पहिला देश होता.

संयुक्त राष्ट्र शांति स्थापना कार्यक्रमात सैनिकांना पाठविणारा भारत हा सर्वात मोठी देश आहे. जगात अनेक ठिकाणी भूकबळी, गरीबी, आजारपणे आणि निरक्षरतेचा सामना करण्यासाठी भारत आणि अमेरिकेने बहुतेकदा विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्यतापूर्ण क्षेत्रात सारख्या क्षमतेने पुढाकार घेतात.

आमच्या यशस्वी भागिदारीमुळे आशियापासून आफ्रिकेपर्यंत शिक्षण, संरक्षण आणि विकासाच्या नव्या संधी समोर येत आहेत. एका चांगल्या जगाच्या निर्मितीसाठी पर्यावरण संरक्षण आणि वसुंधरेची काळजी घेणे हा आमच्या समान उद्दिष्टांचा एक भाग आहे. भारतात धरतीमातेबद्दल सौहार्दाची भावना बाळगणे हा आमच्या प्राचिन संस्कृतीचा एक भाग आहे. आणि निसर्गाकडून केवळ आवश्यक तेवढेच घेणे, हे आमच्या सभ्यतेचे नैतिक मूल्य आहे. त्याचमुळे क्षमतांसह जबाबदाऱ्यांचे संतुलन राखणे हे आमच्या भागिदारीमागचे उद्दीष्ट आहे.

नविकरणीय उर्जेची उपलब्धता आणि त्याचा वापर वाढविण्याच्या दिशेनेही आम्ही सक्रिय आहोत. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी तयार करण्यासाठीच्या आमच्या पुढाकाराला अमेरिकेचे उत्स्फूर्त समर्थन, हे याचेच द्योतक आहे. आपल्या देशाबरोबरच संपूर्ण विश्वाच्याही उज्वल भवितव्यासाठी आम्ही कार्यरत आहोत.

जी-20, पूर्व आशियाई परिषद आणि जलवायु परिवर्तनविषयक परिषदांमध्येही आम्ही आमचे हे ध्येय साध्य करण्याप्रती आम्ही कार्यरत आहोत.

अध्यक्ष महाशय आणि माननीय सदस्य हो,

आपली भागिदारी अधिक दृढ होईल आणि दरम्यानच्या काळात असेही प्रसंग येतील, जेव्हा आपले विचार जुळणार नाहीत. मात्र आपले हीत आणि काळजीचे विषय समान असल्या कारणाने निर्णय प्रक्रियेतील स्वायत्तता आणि आमच्या दृष्टीकोनातील वैविध्य, आमच्या भागिदारीच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल.

आम्ही एक नवा प्रवास सुरू करतो आहोत आणि नवे ध्येय निश्चित करीत आहोत. त्यामुळे रोजच्या घडामोडींबरोबरच आमचे लक्ष परिवर्तनशील विचारांकडेही असले पाहिजे. या काही विचारावर लक्ष केंद्रित करणे मला गरजेचे वाटते:

आमच्या समाजासाठी केवळ धन-संपदा निर्माण न करता नैतिक मूल्यांचीही निर्मिती केली पाहिजे.

केवळ तात्कालीन लाभ लक्षात न घेता दीर्घकालीन लाभही विचारात घेतले पाहिजेत.

केवळ चांगल्या कार्य संस्कृतीसाठी काम करण्याऐवजी भागिदारी वाढविण्याबाबतही विचार केला पाहिजे.

केवळ आपल्या नागरिकांचे हीत लक्षात न घेता अधिक संयुक्त, एकजुटीच्या मानवतापूर्ण आणि समृद्ध विश्वाच्या सेतुच्या रूपात कार्यरत राहिले पाहिजे. आणि आमच्या नव्या भागिदारीच्या यशस्वितेसाठी सर्व परिस्थितीकडे एका नव्या दृष्टीकोनातून, नव्या संवेदनेतून पाहणे फार गरजेचे आहे. असे केल्यास या विशेष नात्याची वचने आपल्याला जाणवत राहतील.

स्पीकर महाशय,

सरतेशेवटी माझ्या शब्दांमधून आणि विचारांमधून मी हेच सांगू इच्छितो की प्रभावी भविष्याची निर्मिती करणे, हा आपल्यातील नात्याचा मुख्य उद्देश आहे.

गतकाळातील समस्या आता मागे पडल्या आहेत आणि ठाम पायावर नव्या भवितव्याची पायाभरणी झाली आहे.

वाल्ट व्हीटमॅनच्या शब्दात सांगायचे तर,

“वादक समूहाने आपली वाद्ये जुळविली आहेत आणि संयोजकाच्या छड़ीने इशारा केला आहे. (The Orchestra have sufficiently tuned their instruments, the baton has given the signal)

आता या सुरांमधून नवी सुरावट आकाराला येत आहे, अशी भर मला या रचनेत घालाविशी वाटते.

आपण दिलेल्या या बहुमानाबद्दल अध्यक्ष महाशय आणि माननीय सदस्यांचे मनापासून खूप – खूप आभार !!!

S.Kane/B.Gokhale