Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय विद्यापीठाची पंतप्रधानांनी केली पायाभरणी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लखनौ येथे अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय विद्यापीठाची पायाभरणी केली. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले कि सुशासन दिनी उत्तर प्रदेश सरकारचे कामकाज ज्या इमारतीतून चालते तिथे अटलजींच्या पुतळ्याचे अनावरण होणे हा एक योगायोग आहे. त्यांचा हा भव्य पुतळा लोक भवनमध्ये काम करणाऱ्या लोकांना सुशासन आणि लोकसेवेसाठी प्रेरणा देईल असे ते म्हणाले.

लखनौ हा अनेक वर्षे अटलजींचा संसदीय मतदारसंघ होता, त्यामुळे अटलजींना समर्पित आरोग्य शिक्षणाशी संबंधित संस्थेची पायाभरणी करणे हे आपले सौभाग्य असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आयुष्य तुकड्यांमध्ये विखुरलेले पाहता येत नाही, ते पूर्ण एकसंध पाहायला हवे असे अटलजी नेहमी म्हणत याची पंतप्रधानांनी आठवण करून दिली. हे सरकारसाठी देखील तेवढेच खरे आहे, सुशासनासाठी देखील तेवढेच खरे आहे. जोपर्यंत आपण समस्येचा एकसंधपणे विचार करत नाही तोवर सुशासन शक्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी आरोग्य क्षेत्र, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, परवडणाऱ्या आरोग्यसेवेचा विस्तार, पुरवठा सुनिश्चित करणे आणि प्रसंगी हस्तक्षेप यासारख्या क्षेत्रांसाठी आपल्या सरकारची रूपरेषा स्पष्ट केली. ते म्हणाले की, स्वच्छ भारत ते योग, उज्ज्वला ते फिट इंडिया चळवळ आणि या सर्वांसह आयुर्वेदाला प्रोत्साहन – असे प्रत्येक उपक्रम आजार रोखण्यात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. ते म्हणाले की, देशातील ग्रामीण भागात 1.25 लाखाहून अधिक कल्याणकारी केंद्रे बांधणे ही प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेची गुरुकिल्ली आहे. ही केंद्रे, या आजाराची सुरुवातीची लक्षणे हेरून , सुरुवातीच्या काळात त्यांच्या उपचारांमध्ये उपयुक्त ठरतील. आयुष्मान भारतमुळे देशातील सुमारे 70 लाख गरीब रुग्णांना मोफत उपचार देण्यात आले असून त्यापैकी 11 लाख येथे केवळ उत्तर प्रदेशात देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान म्हणाले की, सरकारने गावोगाव स्वच्छता आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी येथे सुरू केलेली मोहीमउत्तर प्रदेशातील लोकांचे जीवन सुलभ बनविण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल आहे. ते म्हणाले की, त्यांच्या सरकारसाठी सुशासन म्हणजे- प्रत्येकाचे म्हणणे ऐकणे, प्रत्येक नागरिकापर्यंत सेवा पोहोचवणे, प्रत्येक भारतीयांना संधी मिळणे, प्रत्येक नागरिकाला प्रत्येक सरकारी व्यवस्थेत सुरक्षित आणि सुगम्यतेची भावना जाणवावी. ते म्हणाले की, स्वातंत्र्योत्तर काळात आपण अधिकारावर सर्वाधिक भर दिला असून उत्तर प्रदेशातील जनतेला विनंती केली की आपण आपल्या जबाबदाऱ्यांवर , आता आपल्या कर्तव्यावरही समान भर दिला पाहिजे. आपण अधिकार आणि कर्तव्ये एकत्रितपणे आणि नेहमीच लक्षात ठेवणे आवश्यक आहे, असेही ते पुढे म्हणाले. चांगले शिक्षण, सुगम्य शिक्षण हा आपला हक्क आहे, परंतु शिक्षण संस्थांची सुरक्षा, शिक्षकांप्रति आदर हे आपले कर्तव्य आहे असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या भाषणाच्या शेवटी ते म्हणाले कि आपण आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, आपली उद्दिष्टे साध्य केली पाहिजेत, सुशासन दिनी हा आपला संकल्प असायला हवा , ही लोकांची अपेक्षा आहे, अटलजींची देखील ही भावना होती.

******

G.Chippalkatti/S.Kane/P.Kor