Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अटल इनोव्हेशन मिशन सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने नीती  आयोगाच्या अखत्यारीतील  अटल इनोव्हेशन मिशन (AIM) या प्रमुख उपक्रमाला कामाची वाढीव व्याप्तीसह आणि  2,750 कोटी रुपये तरतुदीसह 31 मार्च 2028 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी  दिली आहे.

AIM 2.0 हे विकसित भारताच्या दिशेने एक पाऊल आहे. भारताच्या ऊर्जाशील नवोन्मेष आणि उद्योजकता परिसंस्थेचा विस्तार करणे, मजबूत करणे आणि वाढवणे हा यामागचा उद्देश आहे.

या मंजुरीमुळे भारतात एका मजबूत नवोन्मेष आणि उद्योजकता परिसंस्थेला  चालना देण्याप्रति सरकारची वचनबद्धता अधोरेखित होते. जागतिक नवोन्मेष निर्देशांकात भारत 39 व्या क्रमांकावर असून  जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्ट-अप परिसंस्था असलेला देश आहे. अटल इनोव्हेशन मिशन (AIM 2.0) च्या पुढील टप्प्यात भारताची जागतिक स्पर्धात्मकता आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे. अटल इनोव्हेशन मिशन सुरु ठेवल्यामुळे ते उत्तम नोकऱ्या, अभिनव उत्पादने आणि सर्व क्षेत्रांमध्ये उच्च-प्रभावी सेवा निर्माण करण्यात थेट योगदान देईल.

AIM 1.0 मधील अटल टिंकरिंग लॅब (ATL) आणि अटल इनक्युबेशन सेंटर्स (AIC) च्या यशाच्या आधारे पुढे मार्गक्रमण करताना  AIM 2.0 मिशनच्या दृष्टिकोनात दर्जात्मक बदल दिसून येईल.  AIM 1.0 मध्ये भारताच्या तत्कालीन नवख्या  परिसंस्थेला बळकट करण्यासाठी अत्याधुनिक  संशोधनासाठी  नवीन पायाभूत सुविधांची निर्मिती करणाऱ्या कार्यक्रमांची अंमलबजावणी समाविष्ट होते  तर AIM 2.0 मध्ये परिसंस्थेतील त्रुटी भरून काढण्यासाठी डिझाइन केलेले नवीन उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर चालवणे आणि केंद्र आणि राज्य सरकार, उद्योग, शैक्षणिक क्षेत्र आणि समुदाय यांच्या मदतीने  यश मिळवणे समाविष्ट आहे.

AIM 2.0 ची रचना तीन प्रकारे भारतातील नवोन्मेष आणि उद्योजकता परिसंस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने केली आहे: (अ) इनपुट वाढवणे  (म्हणजे अधिक नवोदित आणि उद्योजकांना मार्गदर्शन करणे ), (ब) यशाचा दर सुधारणे  किंवा थ्रूपुट‘ (म्हणजे, अधिक स्टार्टअप्सना यशस्वी होण्यासाठी मदत करणे) आणि (c) ‘आउटपुटची गुणवत्ता सुधारणे  (म्हणजे, उत्तम नोकऱ्या, उत्पादने आणि सेवा निर्माण करणे).

 

Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai