वयाच्या 40व्या वर्षी पंतप्रधान बनलेले श्री. राजीव गांधी भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते आणि कदाचित जगातील अशा तरुण राजकीय नेत्यांपैकी एक होते ज्यांनी सरकारचे नेतृत्व केले. त्यांच्या मातोश्री श्रीमती इंदिरा गांधी 1966 मध्ये जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या होत्या, तेव्हा त्या 48 वर्षांच्या होत्या तर त्यांचे आजोबा पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले त्यावेळी ते 58 वर्षांचे होते जेव्हा त्यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
देशात पिढी बदलाचे अग्रदूत श्री. राजीव गांधी यांना इतिहासातील सर्वाधिक जनादेश मिळाला होता. आपल्या मातोश्रींच्या हत्येच्या दुखातून सावरल्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्या निवडणुकीत कॉंग्रेसला मागील सात निवडणुकांच्या तुलनेत लोकप्रिय मते अधिक प्रमाणात मिळाली. पक्षाने 508 जागांपैकी 401 जागा मिळवून एक विक्रम केला.
70 कोटी भारतीयांचा नेता म्हणून अशी शानदार सुरुवात कोणत्याही परिस्थितीत उल्लेखनीय मानली जाते. हे याकरिता देखील अद्भुत आहे की श्री. राजीव गांधी अशा राजकीय कुटुंबाशी संबंधित होते ज्यांच्या चार पिढ्यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात भारताची सेवा केली. तरीदेखील श्री. राजीव गांधी राजकारणात प्रवेश करण्यास इच्छुक नव्हते व त्यांनी राजकारणात उशिरा आगमन केले.
श्री. राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 ला मुंबई येथे झाला. ते केवळ तीन वर्षांचे होते जेव्हा भारत स्वतंत्र झाला आणि त्यांचे आजोबा स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. श्री. राजीव गांधी यांचे आई-वडिल लखनऊ येथून नवी दिल्ली येथे स्थायिक झाले. त्यांचे वडिल फिरोज गांधी खासदार बनले व एक निर्भय तसेच मेहनती खासदार म्हणून ख्याती प्राप्त केली.
श्री. राजीव गांधींनी आपले बालपण आपल्या आजोबांसोबत तीन मूर्ती हाउसमध्ये घालवले, ते काही काळासाठी देहरादूनच्या वेल्हम शाळेत गेले. परंतु लवकरच त्यांना हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या निवासी दून शाळेत भरती करण्यात आले. तेथे त्यांचे कित्येक मित्र बनले. ज्यांच्यासोबत त्यांची आयुष्यभराची मैत्री झाली. नंतर त्यांचे छोटे भाऊ संजय गांधी यांनाही त्याच शाळेत पाठवण्यात आले. जेथे दोघे एकत्र राहिले.
शालेय शिक्षणानंतर श्री. राजीव गांधी केंब्रिजच्या ट्रिनिटी महाविद्यालयात गेले. पण लवकरच त्यांनी लंडन स्थित इम्पिरियल महाविद्यालयात प्रवेश घेतला. या महाविद्यालयातून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरींगचा अभ्यास केला.
हे तर स्पष्ट होते की राजकारणात करीअर करण्यामध्ये त्यांना रस नव्हता. त्यांच्या वर्गमित्रांनुसार श्री. राजीव गांधी यांच्याकडे तत्वज्ञान, राजकारण किंवा इतिहासाशी संबंधित पुस्तके नसत. तर विज्ञान व इंजिनीअरींगची बरीच पुस्तके असत. शिवाय संगीतामध्ये त्यांना विशेष रुची होती. आधुनिक संगीतासोबतच त्यांना पाश्चिमात्य व हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आवडत असे. त्यांना छायाचित्रण व रेडिओ ऐकण्याचाही छंद होता.
विमान उड्डाण आकाशात उडणे ही त्यांची सर्वात मोठी आवड होती. त्यामुळेच हे अपेक्षितच होते की इंग्लंडहून घरी परतताना त्यांनी दिल्ली फ्लाइंग क्लबची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि व्यावसायिक वैमानिकाचे अनुज्ञप्ती पत्र मिळवले. लगेचच ते इंडिअन एयरलाईन्सचे देशांतर्गत सेवेचे वैमानिक बनले.
केम्ब्रिजमध्ये त्यांची भेट इटालियन विद्यार्थिनी सोनिया मैनोशी झाली, ज्या तेथे इंग्रजी विषयाचा अभ्यास करत होत्या. या द्वयींनी 1968 मध्ये दिल्ली येथे विवाह केला. हे दोघेही राहुल व प्रियांका या आपल्या दोन मुलांसहित इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी राहत असत. आजूबाजूला राजकीय हालचालींचा गोंधळ असताना देखील ते आपले खाजगी जीवन जगत होते.
परंतु 1980 मध्ये एका विमान अपघातात त्यांच्या भावाचा संजय गांधींच्या मृत्यूने सर्व परिस्थिती बदलून टाकली. श्री. राजीव गांधी यांच्यावर राजकारणात प्रवेश करण्याबाबत आणि आपल्या आईला राजकीय कामात मदत करण्यासाठी दबाव पडू लागला. त्यांनतर अनेक बाह्य व अंतर्गत आव्हाने देखील समोर आली. आधी त्यांनी या दबावांना विरोध केला. परंतु नंतर त्यांनी केलेल्या तर्काशी श्री. राजीव गांधी सहमत झाले. त्यांनी आपल्या भावाच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या उत्तरप्रदेशच्या अमेठी येथून पोटनिवडणूक जिंकली.
नोव्हेंबर 1982 मध्ये भारताने आशियायी क्रीडा स्पर्धेचे यजमानपद घेतले होते. यावेळी क्रीडासंकुल उभे करणे व इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात अनेक वर्षांपूर्वी दिलेल्या वचनांची पूर्ती करण्यात आली होती. श्री. राजीव गांधी यांना ही जबाबदारी देण्यात आली होती की सर्व कामे वेळेत पूर्ण होतील व कोणत्याही अडचणींशिवाय क्रीडास्पर्धांचे आयोजन केले जाईल. श्री. राजीव गांधी यांनी दक्षतेने व सहज समन्वयाद्वारे हे आव्हानात्मक काम पूर्ण केले. सोबतच कॉंग्रेसचे सरचिटणीस म्हणून त्यांनी त्याच तन्मयतेने काम करत पक्ष संघटनेला व्यवस्थित आणि सक्रिय केले. पुढे त्यांच्यासमोर याहून अधिक कठीण परिस्थिती येणार होती, ज्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाची परीक्षा होणार होती.
31 ऑक्टोबर 1984 रोजी आपल्या आईच्या क्रूर हत्येनंतर अत्यंत दु:खद परिस्थितीत ते कॉंग्रेसचे अध्यक्ष व देशाचे पंतप्रधान बनले होते. परंतु वैयक्तिक पातळीवर इतके दु:खी असूनही संतुलन, मर्यादा आणि संयमाने त्यांनी राष्ट्रीय जबाबदारी उत्तमरीत्या पार पडली.
महिन्याभराच्या मोठ्या निवडणूक प्रचार कार्यक्रमादरम्यान श्री. राजीव गांधी यांनी पृथ्वी परिघाच्या दीडपट अंतराची यात्रा करत देशातील जवळपास सर्व भागात जाऊन 250 पेक्षा जास्त सभा घेतल्या आणि लाखो लोकांना प्रत्यक्ष भेटले.
स्वभावाने गंभीर परंतु आधुनिक विचार व अदभूत निर्णयक्षमता असलेले श्री. राजीव गांधी भारताला जगातील उच्च तंत्रज्ञानाने परिपूर्ण करू इच्छित होते. ते सतत म्हणत की भारत एकसंघ ठेवण्याव्यतिरिक्त 21 व्या शतकातील भारत निर्माण करणे, हेही त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे.